राय : (इं. राय लॅ. सेकेल सिरिएल कुल-ग्रॅमिनी). हे तुलनेने कमी महत्त्वाचे तृणधान्य यूरोप, आशिया व उ. अमेरिका या खंडांत मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे. ते सु. २,००० वर्षे लागवडीत असून मध्ययुगीन कालात त्याचा विशेषेकरून यूरोप खंडात पुष्कळ प्रसार झाला. एकोणिसाव्या शतकापर्यंत ते भाकरीचे (पावाचे) जगातील प्रमुख धान्य होते. त्यानंतर त्याची जागा हलके हलके गव्हाने घेतली.

या वनस्पतीने मूलस्थान मध्य व नैर्ऋत्य आशियात असून तेथून ती पश्चिमेकडे बाल्कन द्वीपकल्पातून यूरोपात पसरली असावी, असे मानण्यात येते.

राय : (अ) ओंब्या (आ) दाणे.

सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ग्रॅमिनी  कुलातील वनस्पतीप्रमाणे आहेत. मुळे तंतुमय, पुष्कळ शाखा व उपशाखायुक्त असून त्यांतील काही सु. २ मी. पर्यंत खोल जातात. काही बारीक, ताठ व केशहीन असून वनस्पती १·५ मी. पर्यंत उंच असते. पाने पुष्कळ, काहीशी मऊ व निळसर, सु. १ सेंमी. रुंद असतात. कणिश [⟶ पुष्पबंध] अग्रस्थ, ८ –१५ सेंमी. लांब व वक्र असून त्यावर लांब प्रशूके (ताठर सरळ केस) असतात. कणिशके (कुड्या) कणिशाच्या नागमोडी पर्णाक्षावर दोन्ही बाजूंस चिकटलेली असतात. दाणा आयताकृती, ७ – ८ मिमी. लांब, फिक्या तपकिरी रंगाचा असतो. बीजधारणा जवळजवळ पूर्णपणे परपरागणावर [⟶ परागण] अवलंबून असते.

लागवडीचे प्रदेश, क्षेत्र व उत्पादन : राय धान्याचे सर्वांत जास्त उत्पादन समशीतोष्ण व थंड प्रदेशात, त्याचप्रमाणे जास्त उंचीवरील प्रदेशात होते. ते कडाक्याची थंडी सहन करणारे पीक असून त्याची लागवड यूरोप व आशिया खंडांच्या उत्तर ध्रुवाकडील प्रदेशापर्यंत केली जाते. इतर तृणधान्यांची लागवड यशस्वी होत नाही अशी परिस्थिती असलेल्या प्रदेशात रायचे पीक घेतात.

इ. स. १९८२ मध्ये रायचे जागतिक क्षेत्र सु. १·७६ कोटी हेक्टर होते व सु. ३ कोटी टन उत्पादन झाले. स्थूलमानाने असे म्हणता येईल की, ८० ते ९०% क्षेत्र यूरोपात व रशियात आहे. भारतात लडाख, लाहुल व हिमालयाच्या वायव्येकडील प्रदेशात रायची लागवड धान्योत्पादनासाठी थोड्या प्रमाणात होते. लागवडीखालील क्षेत्र व उत्पन्न यांसंबंधी आकडेवारी उपलब्ध नाही. जम्मू व काश्मीर भागात ⇨अरगटाच्या औषधी उत्पादनासाठी कवकाची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीची) पोषक वनस्पती म्हणून या पिकाची मर्यादित क्षेत्रात (सु. ६० हेक्टर) लागवड केली जाते.

गहू व राय यांच्या आंतरप्रजातीय संकरातून शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले ‘ट्रिटिकेल’ हे नवीन तृणधान्य काही ठिकाणी रायची जागा घेऊ शकेल, असे मानण्यास जागा आहे. ट्रिटिकेलसंबंधी तपशीलवार माहिती याच नोंदीत रायनंतर दिली आहे.

हवामान व जमीन : राय हे मुख्यतः थंड हवामानातील पीक आहे. कडक हिवाळी हवामानात व उंचीवरील डोंगराळ प्रदेशात इतर कोणत्याही तृणधान्यापेक्षा हे पीक जास्त उत्पन्न देते. उष्ण हवामान वगळता इतर कोणत्याही हवामानात हे पीक वाढते. तसेच ज्या हलक्या जमिनीत इतर कोणत्याही हवामानात हे पीक वाढते. तसेच ज्या हलक्या जमिनीत इतर कोणतेही पीक वाढू शकत नाही अशा जमिनीत हे पीक समाधानकारक उत्पन्न देते आणि जमिनीतील अम्लता व क्षारता (अल्कलायनिटी) पुष्कळ प्रमाणात सहन करू शकते. हे थोड्या मुदतीचे पीक असल्यामुळे अवर्षणाखाली तोंड देऊ शकते.

उत्तर भारतात ज्या भागात हिवाळ्यातील सरासरी तापमान २५° से. च्यावर जात नाही अशा भागात हिवाळी पीक म्हणून या पिकाची लागवड करता येईल.

लागवड : काश्मीर खोऱ्यातील समशीतोष्ण हवामानात रायची पेरणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करतात. पेरणीनंतर बियांचे फुटून आलेले अंकुर पुढील मार्चपर्यंत थंडीमध्ये सुप्तावस्थेत राहातात व वाढत्या तापमानाबरोबर त्यांची वाढ सुरू होते. हेक्टरी ४० – ६० किग्रॅ. नायट्रोजन एकदा पेरणीच्या वेळी व पिकाच्या वाढीच्या हंगामात अशा दोन हप्त्यांत विभागून देतात. पीक जुलै महिन्यात काढणीस तयार होते. कापणी व मळणी गव्हाच्या पिकाप्रमाणे करतात. भारतात या पिकावर रोगाचा उपद्रव फारसा आढळून येत नाही.

उत्पन्न : जमीन व हवामान यांवर अवलंबून हेक्टरी सु. ८०० ते ३,००० किग्रॅ. दाण्यांचे उत्पन्न मिळते.

रासायनिक संघटन : रायच्या दाण्यात जलांश ११%, प्रथिने १२·१%, वसा (स्निग्ध पदार्थ) १·७%, कार्बोहायड्रेटे ७३·४% आणि लवणे १·८% असतात. तसेच त्यात ब जीवनसत्त्वाचे विविध प्रकार व १८ ॲमिनो अम्ले असतात. शिवाय काही परिस्थितींत व काही ठिकाणी त्यात गव्हापेक्षा सु. ३०% जास्त लायसीन आढळते.

उपयोग : मानवी खाद्य व पशुखाद्य हे रायचे दोन मुख्य उपयोग आहेत. यूरोपात रायची लागवड मुख्यतः मानवी खाद्यासाठी केली जाते. पाव बनविण्यासाठी गव्हाखेरीज फक्त रायचाच उपयोग करता येतो परंतु गव्हाच्या तुलनेत रायचा पाव बराच खालच्या दर्जाचा असतो. रायच्या भिजविलेल्या पिठात स्थितिस्थापकत्वाचा (लवचिकतेचा) गुणधर्म नसल्यामुळे त्याच्या पिठापासून चांगला पाव होत नाही. शिवाय तो जड व काळपट असून त्याला किंचित कडवट चव असते. त्याला काळा पाव असे नाव पडले आहे परंतु तो पौष्टिक असतो. यामुळे उत्तर यूरोपात हा पाव मोठ्या प्रमाणावर लोकांच्या खाण्यात आहे. तो स्वस्त असतो व शिवाय तो पुष्कळ लोकांना आवडतो.

अमेरिकेत राय धान्याचा पाव करण्यासाठी फारसा उपयोग करीत नाहीत व केल्यास रायच्या पिठात गव्हाचे पीठ मिसळून तो करतात. त्या देशात रायचा मुख्य उपयोग पशुखाद्यासाठी इतर धान्यांत मिसळून केला जातो. रायपासून अल्कोहॉलयुक्त पेये, विशेषतः व्हिस्की, तयार करतात. ⇨अरगटाच्या औषधी उत्पादनात कवकाची पोषक वनस्पती म्हणून रायचा उपयोग केला जातो.

हिरवळीच्या खतासाठी, चराऊ कुरणासाठी व तणांच्या वाढीला पायबंद घालण्यासाठी आच्छादन पीक म्हणूनही रायचा उपयोग केला जातो.  


 ट्रिटिकेल : गहू (ट्रिटिकम) व राय (सेकेल) यांच्या आंतरप्रजातीय संकरातून निर्माण झालेले हे नवीन तृणधान्य आहे. गहू व राय यांच्या संकरजातील रंगसूत्रांची (आनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून पुढील पिढीत नेणाऱ्या सूक्ष्म सुतासारख्या घटकांची) संख्या दुप्पट करून ट्रिटिकेलाची निर्मिती झाली आहे. त्यामध्ये थंडी सहन करण्याचा रायचा गुणधर्म व गव्हातील पुष्कळ प्रमाणात असलेली प्रथिने यांचा संयोग झाला आहे. ट्रिटिकेलाची कणिशे मोठी असून त्यात गव्हाच्या कणिशापेक्षा जास्त दाणे असतात मुळे रायप्रमाणे खोलवर जातात. पीक पेरल्यापासून थोड्या मुदतीत कापणीला येते. या सर्व गोष्टींमुळे कोरडवाहू शेतीसाठी ते रायपेक्षा जास्त उपयुक्त आहे व त्यांमुळे शास्त्रज्ञांचे लक्ष त्यावर केंद्रित झाले आहे. उत्तर भारतातील कुमाऊँसारख्या डोंगराळ भागात कडाक्याची थंडी व गारांचा वर्षाव यामुळे गव्हाचे उत्पन्न फार कमी येते. त्या भागात ट्रिटिकेलाचे उत्पन्न कल्याणसोना गव्हापेक्षा सहापटींनी जास्त मिळाले. तसेच डोंगराळ भागातील जमिनीचे पीएच मूल्य [⟶ पीएच मूल्य] फार कमी (४·३) असते परंतु ट्रिटिकेल अशा जमिनीतही पिकते. त्यामुळे सध्या त्या भागात पिकत असलेल्या राय धान्याऐवजी ट्रिटिकेलाची लागवड करता येण्याजोगी आहे.

ट्रिटिकेलाच्या सुरुवातीच्या वाणांमध्ये अंशतः वंध्यत्व, दाणा नीट न पोसणे, पीक जमिनीवर लोळणे, दाणे तयार झाल्याबरोबर शेतात गळणे अथवा कणिशकातच दाण्याचे अंकुरण होणे इ. दोष होते. संकरण व उत्परिवर्तन (आनुवंशिक लक्षणांत आकस्मिक बदल होणे) या पद्धतींचा अवलंब करून शास्त्रज्ञांनी अंबर रंगाचे आणि दाण्याची पूर्ण वाढ झालेले प्रकार निर्माण करण्यात पुष्कळसे यश मिळविले आहे.

ट्रिटिकेलाच्या बऱ्याच वाणांच्या चाचण्या भारतात घेण्यात येत आहेत. त्यातील पुढील वाण उंच प्रदेशात लागवडीच्या दृष्टीने आशादायक आहेत आर्मडिलो पीपीव्ही –१३, आर्मडिलो –१३३ आणि आर्मडिलो पीएम – ४. सपाटीवरील लागवडीसाठीही काही वाणांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

ट्रिटिकेलामध्ये १६% प्रथिने आणि ३·२% लायसीन असल्यामुळे त्याचे पोषणमूल्य चांगले आहे. वजन वाढविण्यासाठी ट्रिटिकेलामधील प्रथिने अंड्यातील प्रथिनांच्या तोडीची आहेत. गव्हाच्या तुलनेत ट्रिटिकेलापासून पीठ कमी मिळते. पिठाच्या चपात्या चांगल्या होतात. गव्हाच्या चपात्यांपेक्षा काहीशा कमी प्रतीच्या असल्या, तरी त्या आवडण्याइतपत असतात.

संदर्भ : 1. Bushuk, W. Rye: Production, Chemistry and Technology, 1976.

            2. C. I. S. R. The Wealth of India, Raw Materials,Vols. IX and X, New Delhi, 1972 and 1976.

            3. Leonard, W. H. Marlin, J. H. Cereal Crops, New York, 1963.                                                                    

जोशी, वा. ना. गोखले, वा. पु.