सुरण : (अ) फुलोरा असलेला गड्डा, (आ) गड्ड्यासहित वनस्पती.सुरण : (हिं. जिमीकंद गु. सुरण क. डोड्‌डास्वणड्‌डे सं. सूरण, शूरण, अर्शो इं. एलेफंट्स फूट यॅम लॅ. ॲमॉर्पोफॅलस कँपॅन्यूलेटस कुल-ॲरॉइडी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक खाद्य वनस्पती. ही दृढकंदयुक्त [→ खोड], मजबूत व ओषधीय [→ ओषधि] वनस्पती भारत व श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणावर पिकविली जाते.  

ॲमॉर्पोफॅलस या शास्त्रीय प्रजातीत सु. १०० जाती असून त्यांपैकी भारतात सु. १४ जाती आढळतात, त्यातील सुरण ही एक आहे. सर्वच जाती मूलतः उष्णकटिबंधीय भागातील (विशेषतः आशिया व आफ्रिका) असून काही जाती लागवडीत व काही वन्य आहेत. ⇨  अळू  ह्या त्याच कुलातील खाद्य व वन्य जातीप्रमाणे सुरणाच्या वन्य जाती अधिक खाजऱ्या आहेत. सुरणाचे मूलस्थान भारत व श्रीलंका असावे असे मानतात.  

वनस्पतिवर्णन : सुरणाचा जमिनीतील गड्डा (अन्नसंचयामुळे मोठ्या गाठीसारखे बनलेले खोड) अथवा दृढकंद मोठा (२०—२५ सेंमी. व्यासाचा), अर्धगोलाकृती, वर खोलगट व एकंदरित काहीसा चपटा, गर्द तपकिरी असून त्यावर लहान कंदिका (कळ्या) असतात आणि त्यांचा लागवडीकरिता उपयोग करतात. फुलोरा येऊन गेल्यावर बऱ्याच दिवसांनी एकच पान येते व ते पुन्हा फुलोरा येईपर्यंत टिकून राहते. पान मोठे, त्रिभागी, संयुक्त असून दल पसरट, ५–१२·५ सेंमी. लांब, पिसासारखे विभागलेले (परंतु अपूर्ण) असते. देठ सु. १ मी. लांब, जाड, गर्द हिरवा व त्यावर फिकट ठिपके असतात. फुलोऱ्याचा देठ सुरुवातीस फार आखूड मात्र फळे बनत असताना लांब वाढतो. महाछद (फुलोऱ्याचे आवरण) घंटेसारखे असून त्याची किनार दुमडलेली, बाहेरून हिरवट गुलाबी व आत जांभळट असते. फुलोरा [स्थूलकणिश → पुष्पबंध] लांब असून दांडा गोलसर, गर्द लालसर जांभळा व खंडित आणि त्यावर पुं- व स्त्री-पुष्पे सलगपणे असतात. स्त्री-पुष्पे फुलोऱ्याच्या खालच्या आणि पुं-पुष्पे वरच्या बाजूस असतात. किंजपुट गोलसर व चपटे असते किंजल लांबट, जांभळे व किंजल्क मोठे ⇨ फूल  असून ⇨ परागण  कॅरियन माश्यांकडून होते, कारण फुलोऱ्याला येणारा दुर्गंध त्यांना आकर्षून घेतो वंध्य फुले नसतात. मृदुफळे लाल व लंबगोल असून त्यात प्रत्येकी २-३ बिया असतात. ह्या वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रॉइडी  कुलात (आधुनिक वर्गीकरणात ॲरेसी अथवा सुरण कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.  

उपयोग व गुणधर्म : कंदाची व कोवळ्या देठांची भाजी करतात वापरुन उरलेला कंदाचा तुकडा तसाच ठेवल्यास बरेच दिवस टिकून राहतो. दीर्घकाळ उकळून किंवा शिजवून वापरल्यास त्यातील खाजरेपणा कमी होतो तथापि चिंचेचा तुकडा टाकल्यास सुरणातील कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे स्फटिक विरघळून खाजरेपणा जातो. दृढकंद दीपक (भूक वाढविणारा), पौष्टिक, आरोग्य पुनःस्थापक, वायुसारी, आमांश व मूळ-व्याधीत हितकर असून ताजेपणी जहाल उत्तेजक व कफोत्सारक असतो. संधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते. आतड्यांच्या तक्रारीवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते. ‘मदनमस्त’ ह्या नावाने जंगली सुरणाचे सुकविलेले तुकडे बाजारात मिळतात ते कामोत्तेजक असतात त्यांची पेज दूधसाखरेबरोबर घेतात (मात्रा ३·४–३·६ ग्रॅ. वजनाचा तुकडा). सुरणाच्या कंदात पुढील घटक असतात (प्रतिशत प्रमाणात) : प्रथिने १·२ मेद ०·१ कार्बोहायड्रेटे १८·४ खनिजे ०·८ कॅल्शियम ०·०५ फॉस्फरस ०·२ याशिवाय लोह ०·४ मिग्रॅ. जीवनसत्त्व ४३४ आं. ए./१०० ग्रॅ. आणि जीवनसत्त्व २० आं. ए./१०० ग्रॅ. स्टार्च ४·४ पेक्षा कमी.  

फिलिपीन्समध्ये डुकरांना कंद व जून पाने खाऊ घालतात. कौटिलीय अर्थशास्त्र, शुकनीति, कामंदकीय नीतिसार, वात्सायनाचे कामसूत्र, सुश्रुतसंहिता  इ. प्राचीन संस्कृत ग्रंथांत सुरणाचा (भाज्या व कंद यांसंबंधीच्या संदर्भात) उल्लेख आलेला आहे. त्यावरुन त्याच्या मूलस्थानासंबंधी व पुरातनत्वाबद्दल निष्कर्ष काढणे सोयीचे होते.  

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.

क्षेत्र : सुरणाची लागवड प्रामुख्याने दक्षिण भारतातील केरळ व तमिळनाडू राज्यांत आणि गुजरात राज्यातील सुरत व अहमदाबाद जिल्ह्यांत केली जाते. महाराष्ट्रात या पिकाचे क्षेत्र मर्यादित आहे.

हवामान : हे पीक उष्ण व समशीतोष्ण प्रदेशांत चांगले येते. पिकाची उगवण होताना उबदार व ओलसर हवेची जरुरी असते आणि कंद जमिनीत वाढावयास लागल्यावर थंड व कोरड्या हवेची जरुरी असते. ज्या भागात पर्जन्यमान ६२– १०० सेंमी. असते व पाऊस चांगला विभागून पडतो, अशा भागांत हे पीक चांगले येते. जास्त पर्जन्यमानही हे पीक सहन करू शकते.


जमीन : मध्यम काळ्या, गोराडू जातीच्या तांबूस व वाळुसऱ्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते. जमिनीत कार्बनी पदार्थ भरपूर प्रमाणात असावे लागतात. जमीन उत्तम प्रकारे पाण्याचा निचरा होणारी असावी.

पूर्व मशागत : जमिनीतील पूर्वीचे पीक निघाल्यानंतर जमीन लोखंडी नांगराने २५—३०  सेंमी. खोल नांगरतात. ढेकळे फोडून व काडी कचरा, धसकटे वेचून घेऊन जमीन स्वच्छ करतात. दर हेक्टरी ३६ मे. टन चांगले मुरलेले शेणखत अगर कंपोस्ट खत घालून ते सर्व जमिनीत सारखे पसरतात. नंतर जमिनीला दुसरी आडवी नांगरणी देतात, त्यामुळे खत मातीत चांगले मिसळले जाते. यानंतर कुळवाच्या २-३ उभ्या-आडव्या पाळ्या देऊन जमीन लागवडीसाठी तयार करतात.

लागवड : सुरणाचा कंद भाजीसाठी चार हंगामांनंतर म्हणजेच चार वर्षांनी तयार होतो, त्यामुळे यासाठी या पिकाची लागोपाठ चार वर्षे लागवड करावी लागते. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे सुरणाचे पीक गादी वाफ्यावर घेतात. गादी वाफे तयार करताना प्रत्येक गादी वाफ्याची तळाची रुंदी १५२ सेंमी., माथ्याची रुंदी १०६ सेंमी., उंची २४ सेंमी. व लांबी उताराप्रमाणे ४·५–६ मी. असते. दोन शेजारील गादी वाफ्यांतील अंतर ४५ सेंमी. ठेवतात. या जागेचा उपयोग पाण्याच्या पाटासारखा होतो. चौथ्या वर्षाचे पीक रुंद वरंब्यावर घेतात. यासाठी वरंब्याच्या तळाची रुंदी १२२ सेंमी. व खोली ३०–३८ सेंमी. आणि लांबी जमिनीच्या उताराप्रमाणे ४·५– ६ मी. ठेवतात.

पहिल्या वर्षाच्या सुरण लागवडीसाठी चौथ्या वर्षाच्या सुरणाच्या कंदावरील टेंगळासारखे वाढलेले गोलसर भाग बियाणे म्हणून वापरतात. या प्रत्येकाचे वजन ३०– ५० ग्रॅ. असते. या पिकाची लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करतात. लागवडीनंतर पीक ७–८ महिन्यांत तयार होते. यावेळी प्रत्येक सुरण कंदाचे वजन १२५–१७५ ग्रॅ. असते. हे कंद थंड व मोकळ्या ठिकाणी सावलीत मे महिन्यापर्यंत ४– ५ महिने तसेच साठवून ठेवतात. मे महिन्याच्या सुरुवातीस त्यांचे डोळे फुगावयास लागतात.

दुसऱ्या वर्षाच्या सुरणाची लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात गादी वाफ्यावर करतात. पहिल्या ( आधीच्या ) वर्षाचे साठवून ठेवलेले सुरण कंद या पिकाच्या लागवडीसाठी बियाणे म्हणून वापरतात. हे पीकसुद्घा लागवडीनंतर ७–८ महिन्यांनी काढणीसाठी तयार होते. काढणीच्या वेळी प्रत्येक सुरण कंदाचे वजन ४५०–६७५ ग्रॅ. असते. हे कंदसुद्घा मोकळ्या आणि थंड ठिकाणी सावलीत मे महिन्यापर्यंत साठवून ठेवतात. त्यांना मे महिन्याच्या सुरुवातीला कोंब फुटू लागतात.

तिसऱ्या वर्षाच्या सुरणाची लागवड पुन्हा मे महिन्याच्या मध्यावर गादी वाफ्यावरच करतात. दुसऱ्या वर्षाच्या पिकातील साठवून ठेवलेले सुरण कंद बियाणे म्हणून वापरतात. लागवडीनंतर हे पीक ७–८ महिन्यांनी काढणीसाठी तयार होते. यावेळी प्रत्येक सुरण कंदाचे वजन ९००–१,३५० ग्रॅ. असते. हे कंद मोकळ्या व थंड हवेत सावलीच्या ठिकाणी मे महिन्यापर्यंत साठवून ठेवतात आणि त्यांना थोडे कोंब फुटू देतात.

चौथ्या वर्षाच्या सुरणाच्या पिकाची लागवड मे महिन्याच्या मध्यावर रुंद वरंब्यावर करतात. लागवडीसाठी तिसऱ्या वर्षाच्या पिकाचे साठवून ठेवलेले १–१·५ किग्रॅ. वजनाचे डोळा असलेले काप बियाणे म्हणून वापरतात. हे पीक काढणीसाठी ७–८ महिन्यांनी तयार होते. बाजाराच्या मागणीप्रमाणे हे कंद विक्रीसाठी पाठवितात किंवा साठवून ठेवतात.

सुरणाची लागवड करताना जमिनीत खड्डे करुन व कोंब वरच्या बाजूस ठेवून एका ठिकाणी एकच कंद लावतात. प्रत्येक कंदावर एकच उत्तम प्रतीचा कोंब ठेवून बाकीचे कोंब काढून टाकतात आणि नंतर कंदाची लागवड करतात.

आंतर मशागत : आवश्यकतेनुसार पिकाला ३–४ वेळा खुरपणी करतात. लागवडीनंतर ३–३·५ महिन्यांनी पिकाला मातीची भर देतात. यामुळे झाडांना आधार मिळतो. उघडे पडलेले कंद झाकून जातात व कंद पोसण्यास मदत होते. यानंतर बहुधा कोणत्याही प्रकारची आंतर मशागत करण्याची गरज पडत नाही.

वरखते : पिकाला हेक्टरी एकूण ९० किग्रॅ. नायट्रोजनाच्या दोन सारख्या मात्रा देतात. त्यांपैकी पहिली ४५ किग्रॅ.ची मात्रा बेण्याची पूर्ण उगवण झाल्यावर म्हणजेच लागवडीनंतर सहा आठवड्यांनी देतात. दुसरी मात्रा पिकाला भर लावण्याच्या आधी म्हणजेच लागवडी नंतर ३–३·५ महिन्यांनी देतात. नंतर लगेच पिकाला मातीची

भर देतात.

पाणी : पिकाची लागवड केल्याबरोबर जमिनीला पाणी देतात व नंतरचे प्रत्येक पाणी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ७–१० दिवसांच्या अंतराने देत राहतात. या पिकाला एकूण १४—१६ वेळा पाणी द्यावे लागते.

काढणी : लागवडीनंतर ७-८ महिन्यांनी पीक काढणीस तयार होते. पीक तयार होत असताना त्याची पाने पिवळी होतात व नंतर सर्व रोप आपोआप वाळून जमिनीवर पडते. त्यानंतर कंद कुदळीने खणून काढतात. त्यावरील माती व मुळे काढून ते स्वच्छ करुन त्यांतील काही बियाण्यासाठी साठवून ठेवतात.

पहा : ॲरॉइडी अळू.

भोसले, रा. जि.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, New Delhi, 1948.

            2. Kirtikar, K. R Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. IV, 2nd Ed., New Delhi, 1975.

            ३. काशीकर, चिं. ग., भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४. 

            ४. देसाई, वा. ग., ओषधिसंग्रह, मुंबई, १९७५.