निचरा : (शेतजमिनीतील पाण्याचा). शेतजमिनीत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, कमीअधिक प्रमाणात पाण्याचा अंश कायम असतो. पावसाद्वारे किंवा ओलिताचे पाणी जास्त दिल्यास जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढून ते पिकाच्या मुळांना अपायकारक झाल्यामुळे पिकाची वाढ खुंटते. त्यासाठी ते योग्य प्रमाणात निसर्गनियमाप्रमाणे जमिनीतून निघून जाईल अशी व्यवस्था करावी लागते किंवा कृत्रिमपणे जमिनीतून बाहेर काढून देऊन कमी करावे लागते. जमिनीतील या जादा पाण्याच्या झिरपून खाली जाण्याच्या क्रियेला ‘निचरा’ असे म्हणतात. जमिनीच्या पृष्ठभागावरून तळात खाली वाहणाऱ्या पाण्याची गती निचराशक्ती दर्शविते. जमीन सच्छिद्र असते. ही छिद्रे अगदी सूक्ष्म अथवा लहानमोठ्या आकारमानाची असल्याने जमिनीच्या एका थरातून पाणी दुसऱ्या थराकडे जात असताना त्याची गती आणि दिशा पाण्याच्या व त्यात मिसळलेल्या वा विरघळलेल्या पदार्थांच्या घनतेवर व चिकटपणावर अवलंबून असतात. झिरपणाऱ्या पाण्याच्या गतीची मोजदाद ‘झिरपक्षमता’ या संज्ञेने व्यक्त होते. निरनिराळ्या जमिनींचे पोत आणि सच्छिद्रता वेगवेगळी असल्याने जमिनीच्या या गुणधर्मांची माहिती असणे फायदेशीर ठरते.

शेतजमिनीतील पाण्याच्या निचऱ्याच्या आवश्यकतेची कल्पना इ. स. पूर्वीच्या काळीसुद्धा होती, असे मार्क्‌स पोर्शिअस केटो (इ. स. पू. २३४–१४९) या रोमन मुत्सद्यांच्या लिखाणावरून दिसते. माथ्यावरील जमिनीत ओलीत सुरू केल्यावर तेथील खोलगट भागातील जमिनीसाठी निचऱ्याची आवश्यकता लगेच निर्माण होते. शेतमालाचे उत्पादन वाढविण्याकरिता आधुनिक शेतीपद्धतीत ओलिताची गरज आहेच. जमिनीच्या जलधारणशक्तीपेक्षा ओलिताचा वापर प्रमाणाबाहेर केल्यास ज्या निरनिराळ्या समस्यांना तोंड देण्याची पाळी येते त्यांपैकी निचऱ्याच्या समस्येला जास्त महत्त्व आहे.

मूलभूत तत्त्वे : शेतजमिनीतील पाणी तीन निरनिराळ्या स्वरूपांत असते. (१) आर्द्रताशोषक पाणी : कोरड्या जमिनीतील मातीच्या कणांनी घट्ट धरून ठेवलेले पाणी. या पाण्याचा पिकाला उपयोग होत नाही. (२) केशाकर्षाणाचे पाणी : मातीच्या कणांभोवती केशाकर्षणामुळे (अतिशय लहान व्यासाच्या नलिकाकार मार्गांतून पाणी वर चढण्याच्या क्रियेमुळे) धरून ठेवलेले पाणी. याचा पिकाला उपयोग होतो. (३) गुरुत्वाकर्षणाचे पाणी : केशाकर्षणाच्या पाण्यापेक्षा जास्त असलेले आणि गुरुत्वाकर्षणामुळे काढून टाकता येण्याजोगे पाणी. मातीच्या कणांमधील पोकळीमध्ये हे पाणी साठते. गुरुत्वाकर्षाणामुळे होणारा पाण्याचा निचरा मंदगतीचा असेल, तर या पाण्यामुळे पिकाच्या मुळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो कारण त्यांना पुरेशी हवा मिळत नाही. जमिनीतील पाण्याचे प्रमाण जेव्हा तिच्या जलधारणाशक्तीइतके किंवा त्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्या जमिनीला परिपूर्ण जमीन म्हणतात.

जमिनीत वाजवीपेक्षा जास्त पाणी साठल्याने व त्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे जमिनी पाणथळ बनतात. जमिनीतील पाण्याची पातळी वाढत जाते त्या प्रमाणात खालील थरातील लवणे वर येतात व ज्या वेळी सूर्याच्या उष्णतेमुळे पृष्ठभागावरील पाण्याची वाफ होऊन ते उडून जाते त्या वेळी लवणे मागे राहतात व अशा रितीने जमीन पिकाच्या वाढीसाठी अयोग्य बनते.

कृत्रिम निचरा पद्धतीमुळे पिकाला आवश्यक असणारे केशाकर्षणाचे पाणी कमी होत नाही, फक्त जास्त असलेले गुरुत्वाकर्षणाचे पाणी कमी होते.

आर्द्र प्रदेशांत जमिनीतील अथवा जमिनीच्या पृष्ठभागावरील जास्त असलेले पाणी काढून टाकण्यासाठी निचऱ्याची आवश्यकता असते, तर कोरड्या प्रदेशांत बागायती जमिनीत जास्त प्रमाणात साचलेली लवणे काढून टाकण्यासाठी अथवा लवणांचे प्रमाण वाढू नये यासाठी निचऱ्याची आवश्यकता असते. उदा., पंजाब व पश्चिम उत्तर प्रदेशातील कालव्याचे पाणी विपुल असलेल्या भागांत जमिनीचा निचरा हा शेतकऱ्यांच्या व सरकारच्या चिंतेचा विषय झालेला आहे. रेतीयुक्त चिकण पोयट्याच्या जमिनीपेक्षा रेतीयुक्त पोयट्याच्या जमिनीतून नऊपट व रेतीयुक्त पोयट्याच्यापेक्षा वालुकायम पोयट्याच्या जमिनीतून तिप्पट पाण्याचा निचरा होतो. थोडक्यात कणांचे आकारमान जेवढे लहान व पोत भारी तेवढी पाणी झिरपण्याची शक्ती उत्तरोत्तर कमी होते. वालुकायम आणि पोयट्याच्या जमिनींत निचरा चांगला होतो. भारी खोल चिकण जमिनीत निचरा कमी होतो. चांगल्या निचऱ्याची जमीन घट्ट नसते.

आ. १. शेतातील पाण्याच्या निचऱ्याच्या वनस्पतींच्या मूळांच्या वाढीवरील परिणाम : (अ) निकृष्ट निचऱ्याची जमीन : (१) जमिनीच्या पाण्याची पावसाळ्यातील पातळी, (२) जमिनीच्या पाण्याची पावसाळ्यानंतरची पातळी, (आ) चांगल्या निचऱ्याची जमीन : (१) जमिनीच्या पाण्याची संपूर्ण वर्षातील पातळी,

चांगल्या निचऱ्याचे फायदे : जमिनीतील निचऱ्याचा व पिकांच्या योग्य वाढीचा घनिष्ठ संबंध असतो. पिकांच्या योग्य वाढीसाठी अन्नघटकांप्रमाणेच हवा, उष्णता यांचीही आवश्यकता असते. निचरा योग्य प्रमाणात झालेल्या जमिनी सतत ओल्या न राहिल्याने त्यांतील हवा व उष्णतामानाने प्रमाण योग्य प्रकारे टिकून राहते व त्याचा सुपरिणाम पिकांच्या वाढीवर होतो. जमिनीतील पाण्याचे प्रमाण मर्यादेबाहेर असल्यास रासायनिक क्रिया आणि सूक्ष्मजंतूंची विघटन क्रिया यांमुळे निर्माण होणारी उष्णता पाण्याचे उष्णतामान वाढविण्यात खर्ची पडते व जमिनीचे उष्णतामान पाहिजे तितके वाढत नाही. निचरा चांगला असलेल्या जमिनीत हवा खेळती रहात असल्यामुळे उष्णतेच्या अपुऱ्या पुरवठ्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. चांगल्या निचऱ्यामुळे वनस्पतीची मुळे खोल आणि दूरवर पसरून जास्त अन्न शोषून घेतात, जमिनीची घडण सुधारते, तिची धूप कमी प्रमाणात होते, मुळे व सुक्ष्मजंतू यांना आवश्यक हवा व उष्णता मिळते, मशागतीचे काम सोपे जाते, पेरणी वेळेवर करता येते, रोगामुळे रोपे मरत नाहीत, जमीन लवणमय बनण्याची शक्यता कमी होते, पेरणी लवकर करता येते त्यामुळे पिकाच्या वाढीला जास्त काळ मिळतो व परिणामी उत्पादन वाढते. जमिनीतील लवणांचे प्रमाण वाढलेले असल्यास निचऱ्यामुळे ते कमी होते. चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत नायट्रीकरणाची क्रिया जलद होते. निचऱ्याच्या अभावामुळे जमीन खराब होण्याचा धोका संभवतो. चांगल्या निचऱ्यामुळे मुळांच्या वाढीवर होणारा परिणाम आ.१ वरून स्पष्ट दिसून येईल.


कृत्रिम निचऱ्याची आवश्यकता : पिकांच्या वाढीला अपायकारक असलेले जमिनीतील जास्तीचे पाणी काढून लावणे हा कृत्रिम निचरा पद्धतीचा उद्देश आहे. पुरेसा चढउतार असलेल्या भागात जास्त असलेले पाणी पृष्ठभागावरून उताराच्या दिशेने वाहत जाते अथवा जमिनीतून उताराच्या दिशेने झिरपत जाते व नदी अथवा नाल्याला मिळते परंतु सपाट प्रदेशात आणि जेथे जमिनीच्या पृष्ठभागाखालील मातीचा थर अप्रवेश्य (पाणी झिरपण्यास अयोग्य) असतो तेथे नैसर्गिक निचरा पद्धती काम करीत नाही आणि त्यामुळे विशेषत: खोलगट भागात पाणी तुंबून राहते व ते अगदी हलके हलके बाष्पीभवनामुळे अथवा मंदगतीच्या निचऱ्यामुळे कमी होते. अशा प्रकारच्या जमिनीतील पाणी काढून देण्यासाठी कृत्रिम निचऱ्याची आवश्यकता असते. झिरपक्षमता चागंली असलेल्या जमिनीतील पाण्याची पातळी उंच वाढली असेल, तरच अशा जमिनीत कृत्रिम निचऱ्याची आवश्यकता असते. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्यास ते खालील गोष्टींवरून निदर्शनास येते. जमिनीतील पाण्याची पातळी फार वर येते, वनस्पतीची मुळे पाण्यात जाऊन गुदमरल्यामुळे पाने पिवळी पडतात, ओलितासाठी सोडलेले पाणी मंदगतीने जमिनीत मुरते, कोरड्या हवामानात जमिनीवर लवणाचे पट्टे दिसतात, जमीन घट्ट बनते व थंड पडते, पाणी दिल्यानंतर जमिनीला वापसा लवकर येत नाही, पिकाची वाढ खुंटून उत्पन्न घटते. अशी परिस्थिती भारी पोताच्या घट्ट घडणीच्या खोलगट भागातील जमिनित लवकर उद्‌भवते. निचऱ्याच्या प्रतिकूल परिस्थितीचे परिणाम जमिनीच्या गुणधर्मांवर व रोपांच्या वाढीवर दिसून येतात. अयोग्य निचऱ्यामुळे जमिनीतील ऑक्सिजनाचा पुरवठा कमी होऊ लागतो. त्यामुळे अवायुजीवी (ज्यांच्या जीवनास ऑक्सिजनाची जरूरी नसते अशा) जंतूंची वाढ होऊन नायट्रेटाचे नायट्रोजनामध्ये रूपांतर होते. अपुऱ्या ऑक्सिजनाचा पाणी व अन्नघटकांच्या शोषणावर परिणाम होतो, रोपांची वाढ खुंटून ती दुबळी बनतात आणि कीटक व रोगराईचा प्रतिकार करू शकत नाहीत. निचरा अपुरा असलेल्या जमिनीतील वनस्पतीमध्ये पोटॅशियम, मॅग्नशियम, नायट्रोजन आणि फॉस्फरस या अन्नघटकांचे प्रमाण बरेच कमी आढळते. निचऱ्यामध्ये सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारते.

ओलिताच्या जमिनीतून पाण्याचा निचरा न होण्याची जी अनेक कारणे आहेत त्यांत हलगर्जीपणाने मशागत केल्याने पाण्याचे पाट अकार्यक्षम बनणे, जमिनीत साठलेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी मार्ग न ठेवता शेताला मोठे बांध घालणे, खूपच खोल व भारी जमिनी आणि कोरडे हवामान, जमिनीतील खारट पाण्याची पातळी वर येणे, जमिनीच्या तळात घट्ट मातीचा, पाणी झिरपू न देणारा थर असणे वगैरेंचा समावेश होतो.

ओलीत शेतीमध्ये जमिनीच्या निचराशक्तीचा विचार न करता पिकाला भरमसाट पाणी देणे, जास्त पाण्याची आवश्यकता असणारी बारमाही पिके लागोपाठ लावणे यांमुळेही निचरा बिघडून जमिनी खराब होतात. उंच भागातील शेतात वाजवीपेक्षा जास्त पाणी भरल्यामुळे ते खालच्या पातळीतील जमिनींना अपायकारक ठरते.

निचऱ्याचे स्वरूप आणि त्यावर आधारलेल्या पद्धती : शेतजमिनीतील पाण्याचा निचरा दोन प्रकारचा असतो : (१) जमिनीच्या पृष्ठभागावरील साचलेल्या पाण्याचा निचरा आणि (२) पृष्ठभागाखाली साचलेल्या पाण्याचा निचरा. वास्तविक या दोन्ही प्रकारांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. पृष्ठभागावरील साचलेले पाणी शीघ्रगतीने वाहून न गेल्यास अगर कृत्रिम उपायांनी काढून न लावल्यास ते जमिनीत मुरते आणि तेथे ते मर्यादेबाहेरील प्रमाणात साठल्यास पिकांच्या मुळांना अपायकारक ठरते.

जमिनीच्या पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा : जास्त प्रमाणात पाऊस पडणाऱ्या भागात अथवा नदीकाठच्या भागात पुराचे पाणी शेतात शिरते पाणी साचल्याने मशागतीची कामे लांबतात आणि शेतात पीक असल्यास भाताखेरीज इतर उभ्या पिकांना ते अपायकारक ठरते. समुद्रकिनाऱ्यावरील भाताच्या सपाट खाचरात पावसाळ्यात पाणी साठते व पाणी काढून लावल्याशिवाय मशागत करता येत नाही. जमिनीच्या पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा पुढील उपायांनी करतात : (१) शेतापासून दूरवर पाट काढून पाणी काढून लावतात. (२) शेताभोवती बांध घालून पाणी शेतात शिरणार नाही अशी व्यवस्था करतात. (३) आवश्यक तेथे पंपाच्या साहाय्याने अगर इतर उपायांनी पाणी उपसून काढतात. (४) शेतात चर खणून पाणी काढून लावतात व पीक वरंब्यावर घेतात. पृष्ठभागावरील पाण्याचा काही भाग जमिनीत मुरतो. त्याचा नैसर्गिक तऱ्हेने निचरा न झाल्यास पुढे वर्णन केलेल्या विशेष उपायांनी तो करता येतो.

जमिनीच्या पृष्ठभागाखालील पाण्याचा निचरा : पिकांची मुळे वाढणाऱ्या जमिनीच्या भागात पाणी साचते तेव्हा त्याचा निचरा करण्याची आवश्यकता असते. अशी परिस्थिती यूरोप आणि अमेरिकेच्या आर्द्र हवामानाच्या प्रदेशात केवळ पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीतही असते. पृथ्वीच्या उष्ण आणि उपोष्ण कटिबंधातील देशांत व इतर रुक्ष आणि निमरुक्ष देशांत अशी परिस्थिती बागायती शेतीत (विशेषकरून तळ्याच्या अगर कालव्याच्या पाण्याखाली असणाऱ्या शेतीत) आणि सर्वसाधारणपणे नदीच्या मुखापाशी असलेल्या सपाट प्रदेशात आढळून येते. जमिनीच्या पृष्ठभागाखालील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याच्या पुढील निरनिराळ्या पद्धती आहेत : (अ) उघडे चर पद्धत, (आ) बंद चर पद्धत, (इ) खापरी नळ पद्धत आणि (ई) बीळ चर पद्धत. यांपैकी कोणतीही पद्धत कार्यवाहीत आणण्यापूर्वी संबंधित जमिनीची पहाणी करून आराखडा तयार करतात. यासाठी अनुभवी तज्ञाच्या साह्याने आराखडा करणे आवश्यक असते. मातीचा प्रकार, भूपृष्ठाखालील मातीच्या थरांची परिस्थिती, जमिनीचा चढउतार, तिची उत्पादनक्षमता वगैरे मुद्यांचा विचार करूनच कोणती निचरा पद्धत अवलंबावयाची त्याचा निर्णय घेतात. त्या वेळी एखाद्या विशिष्ट शेताचाच विचार न करता संबंध पाणपोट भागाचा विचार केल्यास फायदा अनेक पटींना वाढून त्या भागातील निचऱ्याचा प्रश्न सोडविता येतो. उघडे चर खणावयाचे झाल्यास त्यांची तळाची रुंदी, उंची, बाजूंचा उतार, दोन चरांमधील अंतर आणि चराचा तळाशी उतार या गोष्टींचा विचार करावा लागतो. खापरी नळ घालावयाचे झाल्यास नळाचा व्यास व लांबी, नळांच्या रांगांतील अंतर, उतार या गोष्टींचा विचार करावा लागतो. चरांचे अगर नळाचे पाणी एकत्र करून शेताबाहेर काढून देण्याच्या जागा निश्चित कराव्या लागतात. भूपृष्ठाखाली असलेल्या पाण्याच्या गतीचा व दिशेचा अंदाज फ्युओरेसिनाच्या (नारिंगी-तांबड्या रंगाच्या स्फटिकी व पाण्यात न विरघळणाऱ्या पदार्थाच्या) साहाय्याने करता येतो.

आ. २. तळाशी ७५ सेंमी. रुंदीच्या उघड्या चराचा छेद


(अ) उघडे चर : यात तीन पद्धती आहेत. नैसर्गिक पद्धत, परावर्तन पद्धत आणि समांतर चर पद्धत. नैसर्गिक पद्धतीमध्ये शेतामध्ये उताराच्या दिशेने अंदाजाने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चर काढतात परंतु असे चर काही ठिकाणी फार खोल असतात, तर काही जागी ते उथळ असतात. खोल असलेल्या जागी माती धुपून जाते व उथळ असलेल्या जागी पाणी पुरेशा वेगाने वाहून जात नाही. परावर्तन पद्धतीत उताराच्या पायथ्याशी एक आडवा खोल चर खणतात. त्यात चराच्या बाजूकडील शेतातील जास्त असलेले पाणी वाहून येते. समांतर उघड्या चरांच्या पद्धतीत एक मुख्य चर असून त्याला जोडलेले चर एकमेकांशी समांतर असतात. या चरांची तळाशी रुंदी व उंची सु. ३७·५ सेंमी. ते ७५ सेंमी. आणि भारी जमिनीत बाजू १/२ : १ या प्रमाणातील उताराच्या असतात. तळाशी ७५ सेंमी. रुंदी असलेल्या उघड्या चराचा छेद आ. २ मध्ये दाखविला आहे. महाराष्ट्रात बागाईताखालील शेतासाठी अशा प्रकारच्या चरांची शिफारस केली जाते. रेतीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत चरांच्या बाजू १ : १ अथवा २ : १ या प्रमाणातील उतारांच्या असतात व रेताड जमिनीत बाजूंचा उतार ३ : १ या प्रमाणात असतो. बाजू १/२ : १ या प्रमाणातील उताराच्या असलेल्या व तळाशी ६० सेंमी. रुंद असलेल्या चरातून ३० सेंमी. उंच पाणी वाहत असल्यास पाण्याने प्रवाहमान दर सेकंदाला ०·१४० घ. मी. असते (चराच्या तळाचा उतार : १०० मी. मागे ९०५ सेंमी.). जमिनीचा प्रकार, उतार आणि तीत घेण्यात येणारी पिके यांवर दोन चरांतील अंतर अवलंबून असते व ते १५ मी. पासून ४५ मी. पर्यंत असते. बाजूच्या चरांतील पाणी मुख्य चरांतून काढून ते नदीनाल्यात सोडतात. चरांतून पाणी वाहताना माती धुपून जाईल अशा तऱ्हेचा उतार जमिनीला असल्यास एक सलग चर न खणता त्यांचे कमी उताराचे तुकडे सांडव्याने जोडतात. उघड्या चरांच्या पद्धतीत जमिनीची मशागत चरांना समांतर अशी करणे आवश्यक असते.

(आ) बंद चर : १५ ते ४५ मी. अंतरावर ९० ते १२० सेंमी. खोल व तळाशी सुमारे १% उतार असलेले चर खणून त्यांत तळाशी ७·५ सेंमी. जाड वाळूचा थर पसरतात. ह्यावर मोठे दगड पसरून वर सु. १० ते १५ सेंमी. उंचीच्या लहान दगडांचा थर घालतात. जमिनीच्या पृष्ठभागापासून खाली सु. ३० सेंमी. पर्यंत लहानमोठ्या दगडांचा थर असतो. चराचा वरचा भाग मातीने झाकून घेतात. अशा प्रकारचे बंद चर काही वर्षे काम देतात परंतु खापरी नळाइतके ते कार्यक्षम असत नाहीत. ८ ते १० वर्षांनी हे चर उकरून त्यांतील मोठ्या दगडांत अडकून बसलेली माती काढावी लागते.

(इ) खापरी नळ पद्धत  : या कामासाठी सर्वसाधारणपणे १० सेंमी. व्यासाचे आणि ३० ते ४५ सेंमी. लांबीचे चांगले भाजलेले खापरी नळ वापरतात. ७५ ते ९० सेंमी. खोलीचे अरुंद चर खणून त्यांना १०० मी. मागे १६·५ सेंमी. या प्रमाणात उतार देऊन तळाशी घट्ट करतात. त्यात बसविलेले नळ खचून योजना बिघडू नये यासाठी ही खबरदारी घ्यावी लागते. या चरात खापरी नळ टोकाला टोक जोडून परंतु दोन टोकांमध्ये ३·५–७ मिमी. फट राहील अशा रीतीने एका रेषेत बसवून चर मातीने बुजवितात. जमिनीतील जास्त असणारे पाणी दोन नळांच्या सांध्यांमधील अरुंद फटीतून नळांत झिरपते. नळ किती खोलीवर बसवावयाचे व त्यांच्या दोन रांगांतील अंतर किती ठेवावयाचे या बाबी पावसाचे प्रमाण, मातीची झिरपक्षमता, जमिनीचा चढउतार व जमिनीत कोणते पीक घ्यावयाचे याचा विचार करून ठरवितात. सर्वसाधारणपणे जास्त असलेल्या पाण्याचा निचरा २४ तासांत झाला पाहिजे, अशा रीतीने नळांची आखणी केली जाते. चिकण व चिकण-दुमट प्रकारच्या जमिनीत ०·९० मी. पेक्षा जास्त खोलीवर नळ घालीत नाहीत व नळांच्या दोन रांगांतील अंतर २१ मी. पेक्षा जास्त नसते. गाळवट-दुमट जमिनीत १·२ मी. खोलीवर सु. ३३ मी. अंतरावर नळ बसवितात. वालुकीय (रेताड) जमिनीत नळ घालण्याची जास्तीत जास्त खोली १·३५ मी. असते व दोन रांगांतील अंतर ९० मी. असते. चरात नळ बसविल्यावर त्यांवर मातीचे थर मूळच्या क्रमाने घालणे आवश्यक असते. नाहीपेक्षा हलकी माती वर येऊन सुपीक माती खाली जाण्याचा संभव असतो. नळांच्या सांध्यात माती शिरून फट बंद होऊ नये म्हणून सांध्यावर डांबर लावलेला कागद लावतात अगर ते गवताने झाकून घेतात. नळांतून बाहेर काढलेले पाणी एकत्र करून नाल्यात सोडले जाते त्या जागी नळाच्या बाहेरच्या तोंडाला जाळी बसविणे आवश्यक असते. त्यायोगे उंदरांसारखे प्राणी नळाच्या आत शिरून पाणी वाहण्याच्या मार्गात अडथळा उत्पन्न करीत नाहीत. नळाच्या शेवटच्या ३·४ मी. अंतरातील सांध्यांच्या जागी सिमेंटने लिंपल्यास नळांचे आयुष्य आणि उपयुक्तता वाढते.

नळांच्या मांडणीची पद्धत जमिनीच्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असते. पृष्ठभागाखाली पाण्याची पातळी उंच असलेल्या सपाट जमिनीत जागोजागी मुख्य नळ असून त्यांना बाजूचे नळ जोडलेले असतात. बाजूच्या नळापेक्षा मुख्य नळ आकारमानाने थोडे मोठे असतात व त्यांची मांडणी अशा तऱ्हेने केलेली असते की, बाजूच्या नळांची लांबी ४०० मी. पेक्षा जास्त नसते. तसेच मुख्य नळांना बाजूचे नळ पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेशी काटकोनात न जोडता थोडा कोन करून जोडतात. मुख्य नळाशी बाजूचे नळ जोडण्याच्या सर्वसाधारणपणे प्रचलित असलेल्या दोन पद्धती आ. ३ मध्ये दाखविल्या आहेत. जमिनीच्या विशिष्ट परिस्थितीसाठी कोणती मांडणी पद्धत योग्य आहे, हे तज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवावे लागते. सर्व नळांतील एकत्रित पाणी ज्या ठिकाणी बाहेर पडते ती जागा शेतजमिनीच्या पातळीच्या खाली असल्यास असे पाणी पंपाने उपसून काढावे लागते.

आ. ३. खापरी नळांच्या मांडणीच्या दोन पद्धती : (अ) हेरिंग बोन पद्धत (आ) समांतर पद्धत : (१) मुख्य नळ, (२) बाजूचे नळ.

काळजीपूर्वक आराखडा करून खापरी नळ बसविण्याचे काम योग्य प्रकारे केल्यास व पुढे त्यांची निगा राखण्यास ही नळयोजना १०० वर्षांपर्यंत कार्यक्षम राहू शकते.

खापरी नळांची पद्धत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १८३५ मध्ये जॉन जॉन्स्टन यांनी प्रथम सुरू केली. त्यांनी घातलेले नळ अद्याप काम देत आहेत, असा उल्लेख आढळतो.

भारतात खापरी नळ पद्धतीचा वापर करण्याचे फारसे प्रयत्न झाले नाहीत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १९५० मध्ये सु. ४ कोटी १२ लक्ष हे. जमीन निचरा योजनेखाली होती. त्यात हजारो किमी. उघडे चर असून लाखो मी. लांबीचे खापरी नळ घालण्यात आले आहेत.


 आ. ४. बीळ चर अवजार : (१) धारदार पट्टी, (२) धारेची कडा, (३) दंडगोलाकार नळी.

(ई) बीळ चर : (मोल ड्रेन). जमिनीच्या पृष्ठभागाखालील पाण्याचा निचरा करण्यासाठी विशिष्ट अवजाराच्या (आ. ४) साहाय्याने मोल नावाच्या (चिचुंदरीसारख्या) प्राण्याच्या बिळाच्या आकाराचे अरुंद चर खणले जातात. दगडगोटे नसलेल्या, भारी व सपाट जमिनीत हे चर उपयोगी असतात. खर्चाला खापरी नळापेक्षा ते स्वस्त असतात. कमीतकमी ४५% चिकणमाती व २० टक्क्यांपेक्षा जास्त वाळू नसलेल्या जमिनीत ते खापरी नळाइतकेच परिणामकारक असतात. यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारात एक आडवी दंडगोलाकार आणि पुढील बाजूला निमुळती व टोकदार नळी असते. चाकूच्या पात्यासारख्या धारदार उभ्या पट्टीला खालच्या बाजूला ही नळी जोडलेली असते. यांत्रिक शक्तीच्या साहाय्याने उभ्या धारदार पट्टीने (याला फण म्हणता येईल) जमीन कापली जाते व तळाशी असलेल्या दंडगोलकार नळीच्या साहाय्याने ५० ते ७५ सेंमी. खोलीवर ७·५ ते १० सेंमी. रुंदीचा चर खणला जातो. भारी जमिनीत या चराच्या बाजू सहजासहजी ढासळत नाहीत व त्यांतून पाणी झिरपते. दोन चरांतील अंतर खोलीवर अवलंबून असते व ते २·७–४·५ मी. असते. सर्व बीळ चरांतील पाणी शेवटी एका उघड्या चरात अगर मोठ्या आकारामानाच्या खापरी नळात गोळा होऊन पुढे वाहात जाते.

आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूत उसाच्या क्षेत्रात बीळ चर उपयोगी ठरले आहेत. हे चर ४५ ते ६० सेंमी. खोलीवर असतात.

पृष्ठभागाखालील पाण्याच्या निचऱ्याच्या पद्धतींचे तुलनात्मक विवेचन : उघडे चर अथवा बंद चर खापरी नळ पद्धतीपेक्षा कमी खर्चाचे असतात. उघड्या चरांमुळे पिकाखालील जागा कमी होते व जमिनीची मशागत करणे अवघड जाते. चरांत तणांची आणि डास व इतर हानिकारक कीटकांची वाढ होते. तसेच चरांची वारंवार दुरुस्ती करावी लागते व गाळ, तण वगैरे काढून ते साफ ठेवावे लागतात. अशा चरांवरून वाहने जाऊ शकत नाहीत. खापरी नळाच्या मानाने बंद चर तात्पुरते काम देणारे असतात. खापरी नळ बसविण्याचा भांडवली खर्च फार जास्त असतो व ते बसविण्यासाठी पुष्कळ वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीकडून आराखडा तयार करून घेणे आवश्यक असते परंतु दुरुस्तीचा खर्च तुलनेने फारच कमी असतो. या नळामुळे मशागतीला अडथळा होत नाही आणि पिकाखालील जागाही वाया जात नाही. उघड्या चरांप्रमाणे तणे वाढत नाहीत व त्यांचा आजूबाजूला बियांमार्फत प्रसार होत नाही. खापरी नळ पद्धतीमध्ये मोठा दोष असा की, मुसळधार पावसामुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा झपाट्याने होत नाही. तसेच सर्वच प्रकारच्या जमिनींसाठी ही पद्धत उपयोगी नसते.

बीळ चराच्या कार्यक्षमतेविषयी उलटसुलट मते आहेत परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे काम देतात याविषयी दुमत नाही. काही वेळा चरात माती साठून ते निकामी होतात. तसेच धारदार पट्टीने जमीन कापली जात असताना तिच्या (जमिनीच्या) बाजू गुळगुळीत होऊन पाणी झिरपण्यास अडथळा उत्पन्न होतो, हा या पद्धतीवरील मुख्य आक्षेप आहे.

चरांची व खापरी नळांची देखभाल : उघड्या चरांची वारंवार पाहणी करून झुडपे, तणे वाहून आलेली माती आणि सर्व प्रकारचा कचरा काढून टाकणे आवश्यक आहे. त्यामुळे चरांच्या दुरुस्तीचा खर्च कमी होतो. शेतातील पाणी एकत्र ठिकाणी काढून लावण्याच्या मोठ्या चरांत योग्य प्रकारच्या ठोंबे वाढणाऱ्या गवताची वाढ होऊ दिल्यास दुरुस्तीचा खर्च कमी येतो.

खापरी नळाच्या रांगांवर चालत जाऊन वर्षातून दोन वेळा पाहणी करणे आवश्यक असते. विशेषत: जोराचा पाऊस पडल्यावर पाहणी केल्यास ज्या जागी नळातून पाणी योग्य तऱ्हेने झिरपत नाही तेथे जमीन जास्त ओली दिसेल. झाडांची मुळे नळाच्या सांध्यांत शिरतात त्यामुळे ती कापून काढणे आवश्यक असते. नळांच्या रांगेवर जमिनीला भोक पडले असल्यास त्याखालील नळ फुटला आहे असे समजावे. त्याचबरोबर पीक पद्धतीचाही नळाच्या कार्यक्षमतेशी संबंध असतो. खोल मुळे असलेली शिंबावंत (शेंगा येणारी) पिके नळांची कार्यक्षमता वाढवितात.

चरातील पाण्याचा फेरवापर : पाण्याची दुर्मिळता असलेल्या भागात चरामार्फत जमिनीतून बाहेर काढलेले पाणी जरूर तर यांत्रिक पंपाने उपसून अन्यत्र ओलितीसाठी वापरता येते. त्या पाण्यात लवणांचे प्रमाण फार असेल, तर ते चांगल्या गोड्या पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून वापरतात.

सामुदायिक उपाययोजना : पीक उत्पादन वाढीसाठी ओलिताचा वापर शक्य असेल तेथे मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यातूनच निचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. जमिनीतील पाण्याचा निचरा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावरील क्षेत्रात हाती घेणे फायद्याचे असते. लहानलहान क्षेत्रांत ते काम कष्टाचे आणि खर्चिक होते आणि सर्व क्षेत्रात ही योजना एकाच वेळी लागू केल्याखेरीज त्यापासून योग्य असा परिणाम दिसून येत नाही. यासाठी ओलितामुळे जमिनी बिघडू नयेत म्हणून आणि निचऱ्याअभावी बिघडलेल्या जमिनी सुधारण्यासाठी सर्व संबंधित शेतकऱ्यांनी सहकार्याने योजना राबविणे आवश्यक आहे.

संदर्भ : 1. Aiyer, A. K. Y. N. Principles of Crop Husbandry in India, Bangalore, 1957.

           2. Arakeri, A. R. Chalam, G. V. Satyanarayana, P. Donahue, R. L. Soli Management in India, Bombay, 1962.

           3. Millar, C. E. Turk, L. M. Foth, H. D. Fundamentals of Soil Science, New York, 1965.

           4. Nicholson, Principles of Field Drainage, London, 1953.

           5. Rama Rao, M. S. V. Soil Conservation in India, New Delhi, 1962.

झेंडे, गो. का.