सनताग ( शण ) : फुलाफळांसह फांदी.

सनताग : ( ताग हिं. सन गु. क. सं. शण इं. सन हेंप, बाँबे हेंप  लॅ. कोटोलॅरिया ज्यून्सीया कुल – लेग्युमिनोजी, उपकुल – पॅपिलिऑनेटी ).  ही एक उपयुक्त उंच (१.५-३ मी.) सरळ वाढणारी आवृतबीज, द्विदल वर्गीय, पानांवर मऊ पांढरी लव असणारी, वर्षायू ( एक वर्षभर जगणारी ) ⇨ ओषधी आहे. ही मूळची उष्ण कटिबंधीय आशियातील असून मलाया, ऑस्ट्रेलिया आणि भारत येथे पसरलेली आहे. भारत आणि श्रीलंकेत ही मोठया प्रमाणात लागवडीत आहे पण क्वचित ही जंगलातही आढळते. ही भारतीय असावी कारण तिचे अनेक प्रकार भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. या वनस्पतीचा उल्लेख अथर्वसंहिता, शतपथ बाह्मण, पाणिनींचा अष्टाध्यायी, कौटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, सुश्रूतसंहिता इ. अनेक प्राचीन संस्कृत गंथांत शण ( ताग ) व भंगा ( शण ) असा हिचा उल्लेख आढळतो. हिचे खोड शाखायुक्त व रेषांकित असून त्यावर साधी, एकाआड एक लहान देठाची लांबट गोलाकृती पाने येतात. उपपर्णे ( तळाशी असलेली उपांगे) फार लहान किंवा नसतात. फुले मोठी, गर्द पिवळी पतंगरूप [→ अगस्ता ], छद व छदकयुक्त, तळाशी येण्याऱ्या उपांगांसह १२-२०, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत लांबट मंजरीवर येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात व पॅपिलिऑनेटी उपकुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. केसरदले दहा व एकसंध ( तळाशी एकत्र जुळलेली ) शिंबा ( शेंग ) लांबट (२·५- ३·५ सेंमी.) जाड सालीची भरलेली व गोलसर असते. ती आपोआप तडकते. तिच्यात बिया १०-१५ असतात.

खोड व पाने यांपासून ख त बनवितात  फुले आणि फळे भाजीकरिता वापरतात. पालापाचोळा  जनावरांना चारा म्हणून घालतात. मात्र बिया विषारी असतात. खोडापासून उपयुक्त बळकट धागा ( वाख  ) मिळतो. त्याचा वापर दोर, चटया, कापड  व  कागद  तयार  करण्यासाठी  करतात.  तो ⇨ तागा च्या ( ज्यूटच्या )  खालोखाल  उपयुक्त  आहे.  बिया  रक्तशुद्धीकारक, आर्तवजनक (  स्त्रियांची मासिक पाळी सुरू करण्याऱ्या ), विशिष्ट प्रकारच्या कंडूवर व पुरळावर ( विसर्पिका ) गुणकारी असतात.

परांडेकर, शं. आ.


लागवड : सनताग हे एक महत्त्वाचे वाख देणारे त्याचप्रमाणे हिरवळीच्या खतासाठी अतिशय उपयोगी पीक आहे. वाखाच्या बाबतीत त्याचा तागाच्या ( ज्यूटच्या ) खालोखाल कम लागतो. जून महिन्यापूर्वी कापून  त्याचा जनावरांना  ओला  चारा  म्हणून  उपयोग  करतात.

सनताग हे पीक उष्ण आणि समशातोष्ण कटिबंधांत घेतले जाते. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत  मुख्यत:  हे  घेतले  जाते.

सनतागाची मुळे जमिनीत खोलवर जातात. तंतुमय मुळांवर लहान लहान गाठी तयार होतात. त्या गाठींमध्ये सूक्ष्मजंतू ( बॅक्टिरिया ) असतात. हे सूक्ष्मजंतू हवेतील नायट्रोजन वायू शोषून जमिनीत प्रस्थापित करतात. ही मुळे   गाठींसह जमिनीत मिसळून एकजीव होऊन गेल्यावर मातीत प्रस्थापित झालेला नायट्रोजन त्या जमिनीत मागाहून लावलेल्या पिकाच्या वाढीला उपयोगी पडतो. सनतागाची पाने लंबगोलाकृती, भाल्यासारखी, टोकदार व लहान असतात. खोडाला शेंडयाकडच्या बाजूला थोडय फांदया फुटतात. या पिकाला मुख्यत्वेकरून पावसाळी हवामान चांगले मानवते परंतु पाणी देण्याची  सोय  असल्यास  रबी  हंगामातही  हे  पीक  घेता  येते.

सनतागाचे पीक भारी जमिनीत त्याचप्रमाणे मध्यम प्रतीच्या जमिनीतही वाढू शकते परंतु पाण्याचा निचरा होणारी, गाळाची जमीन या पिकाच्या वाढीला उत्तम समजली जाते. पाणथळ अथवा चिबड जमीन पिकाच्या वाढीला  योग्य  नसते.

इतर पिकांप्रमाणे या पिकासाठी जमिनीची पूर्वमशागत फार काळजीपूर्वक केली जात नाही, परंतु चांगले उत्पन्न येण्याकरिता चांगली पूर्वमशागत आवश्यक असते. वळवाच्या पावसानंतर जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यावर जमिनीची नांगरणी करतात. वळवाचा पाऊस पडला नाही, तर अगोदर जमिनीस पाणी देऊन वापश्यावर नांगरट करतात. त्यानंतर कुळवाच्या १-२ पाळ्या देऊन जमीन पेरणीयोग्य करतात. तयार झालेल्या जमिनीत सनतागाचे बी     हेक्टरी ४०-४५ किगॅ. या प्रमाणात पाभरीने पेरतात किंवा ७५-८५ किगॅ. बी हाताने फोकून पेरतात. बी जमिनीत झाकून टाकण्यासाठी कुळव फिरवि-तात. सनताग हिरवळीचे खत म्हणून घ्यावयाचे असल्यास बी दाट पेरतात. त्यासाठी हेक्टरी ७५ ते ८० किगॅ. बी वापरतात. पावसाळा सुरू झाल्याबरोबर पेरणी करतात. पावसाची उघडीप जास्त काळ टिकल्यास अंदाजे १५  दिवसांच्या  अंतराने  पिकास  पाणी  द्यावे.

या पिकाला बहुतेक वेळा आंतरमशागत दिली जात नाही. कारण पिकाची वाढ जलद होत असल्याने थोडयच काळात जमीन पिकाने पूर्णपणे झाकली जाऊन तागाच्या वाढीला वाव मिळत नाही. पाभरीने पेरणी केलेली असल्यास सुरूवातीला एकदा कोळपणी करणे फायदेशीर ठरते.

वाखासाठी पीक घ्यावयाचे असेल, तर शेंगा लागेपर्यंत पीक शेतात ठेवतात. नंतर झाडे उपटून किंवा जमिनीलगत विळ्याने कापून घेतात. कापलेले पीक पाण्यात कुजविण्यासाठी ठेवतात व नंतर त्यापासून वाख तयार करतात. कापून किंवा मुळांसह उपटून काढलेल्या पिकाची पाने झडून जाण्यासाठी ते बांधावर एक-दोन दिवस ठेवून देतात. पाने गळून गेल्यावर ताटांच्या पेंढय बांधून त्या पाण्यात २-३ दिवसांपर्यंत उभ्या बुडवून ठेवतात. पेंढय पाण्यात उभ्या ठेवण्याचे कारण असे की, तागाच्या ताटाच्या बुंध्याकडील भागावरची साल जाड व टणक असते. ती आधी कुजवायला घातल्यामुळे शेंडयाकडील भागाच्या सालीबरोबर चांगली कुजून सर्व ताटावरील साल एक-सारखी कुजून तयार होईल. २-३ दिवस उभ्या ठेवलेल्या पेंढय नंतर पाण्यात आडव्या बुडवून ठेवतात. वाख पूर्णपणे नरम पडण्यास व मोकळा सुटण्यासारखा होण्यास साधारणत: एक आठवडा लागतो. त्यानंतर पेंढया पाण्याबाहेर काढून त्यांच्यावरील वाख काढतात. हा वाख किंवा कुजविलेली साल           नंतर दगडावर आपटून धागे सुटे करतात व ते धागे स्वच्छ पाण्यात धुऊन घेतात. वाख चांगला वाळवून त्याच्या गाठी बांधून तो विक्रीसाठी बाजारात पाठविला जातो किंवा जरूरीप्रमाणे स्थानिक उपयोगासाठी वापरला जातो. या वाखाची प्रत व किंमत त्याच्या स्वच्छतेवर व शुभतेवर अवलंबून असते. पांढृया  स्वच्छ  वाखाला  बाजारात  चांगली  मागणी  असते.

सनतागाच्या वाखाचे उत्पन्न दर हेक्टरी साधारणपणे ३९० ते ४४५ किगॅ. पर्यंत असते. हिरवा पाला वगैरे हिरवळीच्या खतासाठी वापरलेल्या सनतागाचे हेक्टरी उत्पन्न  २५  ते  ३०  मे.  टन  असते.

बियांसाठी लावलेले पीक चार ते साडेचार महिने शेतात राहते. हिर-वळीच्या खताकरिता लावलेले पीक लागणीपासून सु. दोन महिन्यांत फुलांवर येऊ लागते.  फुले  दिसू  लागताच  ते  जमिनीत  गाडून  टाकतात.

सनतागामध्ये नायट्नोजन ०·७९ टक्के, फॉस्फोरिक अम्ल ०·१२ टक्के, पोटॅश ०·५१ टक्के आणि कॅल्शियम ०·३९ टक्के असते.

सनतागावरील कीड व रोग : (१) केसाळ अळी : या अळ्या तागाची पाने व कोवळ्या शेंगा खातात. केसाळ अळीच्या बंदोबस्तासाठी मशागत करून पीक स्वच्छ ठेवणे उपयोगी ठरते. अळ्या हाताने वेचून  त्यांचा नाश केल्यास किडीचा उपद्रव कमी करता येतो. रासायनिक पद्धतीने किडीचा बंदोबस्त करण्यासाठी विषारी आमिष वापरणे फायदयाचे ठरते. यासाठी औषधांची भुकटी ( फॉलीडॉल, एंडोसल्फान इ.) पिठात मिसळून हेक्टरी साधारणपणे १५ ते २० किगॅ. आमिष तयार करून ते पिकांच्या दोन ओळींमध्ये संध्याकाळी टाकतात. औषधांची भुकटी दर हेक्टरी १५ ते २० किगॅ. धुरळल्यास  किडीचा  बंदोबस्त  होतो.

(२) पिसू , भुंगेरे आणि ढेकण्या : यांच्या बंदोबस्तासाठी फॉलीडॉल किंवा एंडोसल्फान भुकटी हेक्टरी १५ ते २० किगॅ. धुरळावी म्हणजे किडीचा बंदोबस्त होतो.

रोग : सनतागावर रोगांचा फारसा प्रादुर्भाव आढळून येत नाही. तथापि काही वेळा ‘ मर ’ रोग आढळून येतो. बंदोबस्तासाठी रोगनाशकाची फवारणी करतात.[→ मर].

उत्तर प्रदेश, तमिळनाडू या राज्यांसाठी कानपूर -१२, मध्यप्रदेशासाठी एम -१८ व एम-३५, बिहारसाठी बी. ई.-१, महाराष्ट्रासाठी डी -९ या सनतागाच्या सुधारित जातींची शिफारस करण्यात आलेली आहे.

पहा : तंतु, नैसर्गिक ताग पिकांची फेरपालट.

काकडे, ज. रा.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw materials, Vol. II, New Delhi, 1950.

          2. Kirtikar K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. I, New Delhi, 1975.

           ३. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.