एरंड :(हिं. अरंड गु. तिकी, एरंडी क. हरळू सं. एरंड, चित्रबीज, त्रिपुटीफल इं.कॅस्टर ऑईल प्लँट लॅ.रिसिनस कम्युनिस, कुल-यूफोर्बिएसी). हे ३-५ मी. उंचीचे लहान वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणारे) झाड मूळचे आफ्रिकेतील असून उष्णकटिबंधातील बहुतेक देशांत लागवडीत आहे. खोड ठिसूळ पाने हस्ताकृती, थोडीफार विभागलेली पण साधी, खंड दातेरी, देठ लांब, खालच्या बाजूवर, देठांवर व खोडावर राखी छटा दिसते. शेंड्याकडे उभ्या मंजरीवर एकलिंगी हिरवट फुले डिसेंबर – मार्चमध्ये येतात पुं-पुष्पे खालच्या भागात व स्त्री-पुष्पे वरच्या भागात [→यूफोर्बिएसी ] केसरदले बहुसंघ, अनेकांचा झुबका स्त्री-पुष्पे त्यापेक्षा मोठी, किंजपुट ऊर्ध्वस्थ, तीन कप्प्यांचा, किंजले तीन, लालसर पसरट [→फूल ]. फळ (पालिभेदी) त्रिपूटक, काटेरी बोंड एकबीजी कुड्या तीन. बी कठीण, लांबट, पिंगट व त्यावर चित्रविचित्र ठिपके व एका टोकास लहान बीजोपांग असते [→ बीज ]. तांबड्या रंगाचा दुसरा एक प्रकार शोभेकरिता बागेत लावतात त्याचे खोड, देठ, शिरा व फुले हे भाग तांबडे असतात.

एरंड : (१) फांदी, (२ ) पान, (३) फुलोरा, (४) पुं-पुष्प, (५) स्त्री-पुष्पे, (६)फळ, (७) बीज, (८) बीजोपंग.

एरंडाचे सर्व भाग औषधी आहेत. मूळ दाहक व वातनाशक ते सूज, जलोदर, ज्वर, दमा, कफ, आतड्यातील कृमी, मूत्ररोग यांवर उपयुक्त पाने गरम करून स्तनावर बांधल्यास किंवा त्यांचा काढा प्याल्यास दुग्धवर्धक गुरांना पाजल्यास त्यांचेही दूध वाढते. फळे गुल्म (गाठ) मूळव्याध, यकृत,प्लीहा (पानथरी) यांच्या विकारावर गुणकारी. बिया रेचक, तेल कृमिसारक, आरोग्य पुन:स्थापक, हस्तिरोग, आकडी इत्यादींवर उपयुक्त. तेलात केरोसीन (१:७ प्रमाणे) मिसळून इंधन म्हणून वापरतात त्याचा प्रकाश इतर तेलांपेक्षा चांगला पडतो. घड्याळे साफ करण्यास व यंत्रांत वंगण म्हणूनही तेल उपयुक्त असते विमानांतील यंत्रांनाही उपयुक्त ठरले आहे साबण, मेणबत्त्या, सुवासिक तेले यांसाठीही वापरतात कापूस रंगविणे, छपाई, नायलॉन धागे बनविणे, कातड्याचे उद्योगधंदे ह्यांकरिता उपयोगात आहे. एरंडीची पेंड उत्तम खत आहे. बियांतील रिसीन हे द्रव्य विषारी आहे. एरंडाच्या खोडापासून जाड पुठ्ठे (कार्डबोर्ड) बनवितात. एक विशिष्ट प्रकारचे रेशीम देणाऱ्या रेशमाच्या किड्यांच्या पोषणासाठी एरंडाच्या पानांचा उपयोग होतो. एरंडीची पेंड वापरून पिकातील वाळवी कीटकांचा प्रतिकार करता येतो.

पटवर्धन, शां. द.

या पिकाखालील क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात या पिकाखाली १९६८­­­–६९ साली ३,८४,००० हेक्टर क्षेत्र होते व उत्पादन सु. १,११,००० टन झाले. महाराष्ट्र राज्यात हे पीक ऊस, हळद व मिरची या पिकांच्या सभोवती घेतात. सलग अथवा मिश्रपीक फार थोड्या ठिकाणी घेतात. महाराष्ट्र राज्य शेतकी खात्यातर्फे शेताच्या बांधावर लावण्यासाठी एरंडीचे बी मोफत देण्याची योजना हाती घेण्यात आलेली आहे.

हवामान : समुद्र सपाटीपासून १,२००­­­–२,१०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात हे पीक येऊ शकते. २७­­­–३२ से. उष्ण हवामान आणि ५००­­­–७५० मिमी. पाऊस सारख्या प्रमाणात वर्षभर चांगला विभागून पडतो अशा ठिकाणी हे पीक उत्तम येते.

जमीन : सर्व प्रकारच्या जमिनींत हे पीक येऊ शकते. परंतु रेताड चिकण जमीन किंवा काळी कसदार जमीन या पिकाला चांगली असते, पण ती चांगल्या निचऱ्याची असावी. जमीन हलकी असल्यास ती उन्हाळ्यात नांगरतात व पावसाची सर पडून गेल्यावर वखराने ढेकळे फोडून ती भुसभुशीत बनवितात. जमीन चिकण असल्यास फक्त २­­­–३ वेळा वखरतात व भुसभुशीत बनवितात.

लागण : ऊस, हळद, मिरची यांसारख्या बागायती पिकांभोवती एरंडीची लागवड फेब्रुवारी-मार्चमध्ये करतात. प्रत्येक जागी २ बिया सु. १­­­·८ मी. अंतराने टोकतात. उगवणीनंतर विरळणी करून प्रत्येक जागी फक्त एकेक रोप ठेवतात. बांधावर एरंडी लावण्याचे काम जुलै­­­–ऑगस्टमध्ये करतात. बांधाच्या उतारावर सु. ०­­­·९ मी. अंतराने प्रत्येक जागी २­­­–३ बिया टोकतात. उगवणीनंतर विरळणी करून प्रत्येक जागी फक्त एक रोप ठेवतात. बांधाच्या दोन्ही बाजूंकडील उतारावर बी लावणे फायदेशीर ठरते. बी टोकताना जमिनीकडून १५ सेंमी. अंतर सोडतात. सु. ६० मी. लांबीच्या बांधास ७० ग्रॅ. बी पुरेसे होते. सलग पिकासाठी पेरण्याकरिता दर हेक्टरला ६­­­–८ किग्रॅ. बी पुरेसे होते. पेरणीत अंतर ९० X ९० सेंमी. ठेवतात.

खत : सलग पीक म्हणून एरंडीला दर हेक्टरला २५ किग्रॅ. नायट्रोजन, २५ किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल मिळेल इतके खत देतात. सुपर फॉस्फेट पाभरीने पेरतात. नायट्रोजन दोन सारख्या हप्त्यांत, पेरणीच्या वेळेस आणि पेरणीनंतर एक महिन्याने देतात. तीनचार वेळा कोळपणी करतात. त्यामुळे जमिनीत ओल टिकून राहते व तणांचा नाश होतो. एक अगर दोन निंदण्याही करतात. पिकाला चौथ्या महिन्यापासून फुले येतात.

काढणी व उत्पन्न : बांधावरील पिकांची आणि शेतातील सलग पिकांची पहिली फळे काढणी नोव्हेंबर महिन्यात म्हणजे पेरणीपासून ११५ दिवसांनी करतात. नंतर वीस दिवसांच्या अंतराने दोनतीन वेळा पक्व फळांचे घोस काढून घेतात. एरंडीची काढणी संपल्यावर फळांचे सर्व घोस एकत्र करून खळ्यात ढीग करतात व त्यावर वजन घालून ४­­­–५ दिवस दाबून ठेवतात. नंतर काठ्यांनी बडवून त्याची मळणी करतात. मळलेला माल उफणून स्वच्छ बिया गोळा करतात. सलग पिकाचे उत्पन्न हेक्टरला १२­­­–१५ क्विंटल येते.

तेल : एरंडीचे तेल देशी घाण्यातून किंवा यांत्रिक घाण्याच्याद्वारा काढण्यात येते. बारीक बियांपासून औषधोपयोगी आणि जाड्या बियांपासून दिव्यात जाळण्यायोग्य तेल मिळते. परदेशी पाठविले जाणारे तेल तयार करण्याकरिता बिया चरकात घालून पिळतात. नंतर तो सर्व माल जाड्याभरड्या कापडात भरून तो द्रवचालित दाबकयंत्रामध्ये दाबतात. त्यामधून निघालेले तेल पाण्यात मिसळतात व ते पाणी उकळी फुटेपर्यंत तापवितात. नंतर ते गाळून त्यामधील अशुद्ध पदार्थ वेगळे करतात. गाळून घेतलेले तेल सूर्यप्रकाशात स्वच्छ करतात व साठवून ठेवतात. तेलाचे प्रमाण वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळे असते. ते सरासरीने ४५­­­–४६ टक्के असते.


सुधारलेल्या जाती : ‘एस-२०’ या जातीस तयार होण्यास २४० दिवस लागतात. या जातीचे बी स्थानिक जातीच्या बियांपेक्षा लहान आकाराचे असून त्याचा रंग ठिपकेदार करडा असतो. फळांचे घोस भरगच्च असतात. झाड १.८­­­–२.१ मी. उंच वाढते. या जातीच्या बियांत तेलाचे प्रमाण सरासरीने ५१ टक्के असते. अलीकडे १८०­­­–२०० दिवसांत तयार होणाऱ्या ‘एस २४८­­­–१’ व ‘एस २४८­­­–२’या जाती जळगाव संशोधन केंद्रात उपलब्ध झाल्या आहेत. शेताच्या बांधावर लावण्याकरिता त्या योग्य आहेत.

कुलकर्णी, य. स.

कीड : या पिकावर उंट अळी आणि बोंड अळी असे दोन कीटकउपद्रव प्रामुख्याने आढळतात.

उंट अळी : एकिआ जॅनेटा (कुल-नॉक्ट्युइडी, गण लेपिडॉप्टेरा). ही अळी पोक काढून चालते म्हणून तिला उंट अळी म्हणतात. मादी पतंग पानाच्या मागील बाजूवर अंडी घालते. ती ६­­­–७ दिवसांत उबून त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या दोन आठवड्यांत पूर्ण वाढतात. अळ्या पानांच्या मागील बाजूस राहून पाने खातात. त्यामुळे पानांच्या फक्त शिराच उरतात व पिकावर अनिष्ट परिणाम होतो. त्यांची कोशावस्था जमिनीवरील पालापाचोळ्यात १०­­­–१२ दिवस टिकते. नियंत्रणासाठी पाच टक्के बीएचसी भुकटी पिकावर पिस्कारतात.

बोंड अळी : डायकोक्रॉसिस पंक्टिफेरॅलिस (कुल-पायरॅलिडी, गण लेपिडॉप्टेरा). मादी खोडावर व बोंडांवर अंडी घालते. त्यातून निघालेल्या अळ्या खोड व बोंडे पोखरतात. अळीचे अस्तित्व बोंडातून बाहेर पडणाऱ्या तिच्या काळ्या विष्ठेवरून ओळखता येते. पूर्ण वाढलेली अळी २­­­·५ सेंमी. लांब व गुलाबी रंगाची असून तिच्या शरीरावर राठ केस असतात. एक पिढी पूर्ण व्हावयास ४­­­–५ आठवडे लागतात. अळीमुळे उत्पन्न घटते. अळी लागलेली बोंडे व झाडांचे शेंडे काढून नष्ट केल्यास अळीचा उपद्रव कमी होतो.

याखेरीज पाने खाणाऱ्या अळ्या (युप्रॉक्टिस स्पिसीज) आणि प्रोडेनिया लिक्युरा  व तुडतुडे (एन्फोएस्का डिस्टिंग्वे) यांचाही थोडासा उपद्रव या पिकास पोहोचतो.

दोरगे, सं. कृ.

रोग : करपा, तांबेरा व मूळकूज हे रोग एरंडीवर आढळतात.

करपा : हा रोग आल्टरनेरिया  जातीच्या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. रोगामुळे बीजदलावर प्रथम लहान ठिपके दिसतात. रोग वाढल्यास रोपटे मरते. पावसाळ्यात पानावर अनियमित आकाराचे तपकिरी रंगाचे ठिपके आढळतात व त्यावर कवकाची वाढ दिसून येते. रोगाचे ठिपके एकमेकांत मिसळून मोठे बनतात. त्यांच्यामुळे पाने गळून पडतात आणि झाड मरते. फुलावर रोग आल्यास फुले गळतात. फळांवरही तपकिरी रंगाचे डाग आढळतात. त्यामुळे फळातील बिया सुरकुततात. रोगाचा प्रसार बियांमधून आणि हवेतून होतो. रोग निवारण्यासाठी निरोगी बी वापरतात. बी पेरण्याआधी एक टक्का पारायुक्त कवकनाशक बियांना चोळतात.

तांबेरा : हा रोग मेलँप्सोरा रिसिनाय  कवकामुळे होतो. रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूवर नारिंगी रंगाचे बारीक ठिपके दिसतात. रोगाचा प्रसार वाऱ्याद्वारे होतो. या रोगामुळे फारसे नुकसान होत नाही. 

मूळकूज : मॅक्रोफोमिना फॅसिओलाय  कवकामुळे होणाऱ्या तिळाच्या मूळकूज रोगाप्रमाणे हा रोग असून यावर उपाय उपलब्ध नाही.

कुलकर्णी, य. स.

संदर्भ : Kulkarny, L. G. Castor, Hyderabad, 1959.