मूग : (१) शिंबांसह (शेंगांसह) फांदी, (२) तडकलेली शेंग, (३) दाणे (मूग).

मूग : (हिं. मुंग गु. मग क. हेसरू सं. मुग्द इं. ग्रीन ग्रॅम, गोल्डन ग्रॅम लॅ. विग्ना रेडिॲटा कुल- लेग्युमिनोजी). एक परिचित व लोकप्रिय कडधान्य. मूग मटकी व उडीद यांचा अंतर्भाव हल्ली विग्ना या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रजातीत करतात पूर्वी फॅसिओलस या प्रजातीत करीत. विग्ना प्रजातीत एकूण सु. १०० जाती असून त्यांपैकी सु. १५ भारतात आढळतात मूग ही जाती त्यांपैकी असून ती मूळची भारतातील व मध्य आशियातील असावी, असे मानतात. तिची एक उपजाती (सब्लोबॅटा) हिमालयात जंगली अवस्थेत आढळून येते व तिच्यापासून बहुधा मूग व उडीद यांची उत्पत्ती झाली असावी, असे मानतात. मुगाचा निर्देश वैदिक वाङ्‌मयात आढळतो त्याचा विनीयोग यज्ञकर्मात दिलेला आहे. पाणिनींच्या अष्टध्यायीत त्याचा उल्लेख असून इतर धान्यांबरोबर त्याच्या पेरणीचा ऋतू सांगितला आहे. कौटिलीय अर्थशास्त्र, बृहतसंहिता, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता इ. संस्कृत ग्रंथांतही त्याचा उल्लेख आढळतो. मूग हा भारतीयच असावा असे मानण्यास हे सर्व उल्लेख उपयुक्त आहेत. भारतात मुगाची लागवड जवळजवळ सर्वत्र आढळते.

ही वर्षायू (एका हंगामात आयुष्यक्रम पूर्ण होणारी) वेल सु. ४५–१२० सेंमी. उंच वाढते व तिच्या खोडावरच्या काही वरच्या फांद्या आधाराभोवती वेढे देत चढतात. पाने संयुक्त, त्रिदली, लांब देठाची व सोपपर्ण (तळाशी लहान उपांगे असलेली) असून दले तीन अंडाकृती व क्वचित पुन्हा विभागून त्यांचे तीन भाग (खंड) झालेले असतात त्यांच्या तळाशीही उपपर्णके (लहान उपपर्णे) असतात. फुले लहान, पिवळी किंवा पिवळट हिरवी असून लांबट देठांवर ती १०–२५ च्या झुबक्यात येतात. शिंबा ५·५–१० सेंमी. लांब, बारीक, दंडगोलाकृती, काहीशी लवदार किंवा गुळगुळीत असून तीत १०–१५ गोलसर, हिरव्या, कधी हिरव्या-काळपट, पिवळ्या, तपकिरी किंवा जांभळट तपकिरी बिया (दाणे) असतात त्यांच्या पृष्ठभागावर फार सूक्ष्म नागमोडी कंगोरे स्पष्टपणे, परंतु बहुधा अस्पष्टपणे दिसतात.

मुगाचे अनेक प्रकार भारतात लागवडीत आहेत त्यांचा अंतर्भाव सहा गटांत केला असून त्यांतील चार प्रमुख गट पुढे दिले आहेत : (१) रेडिॲटा : याची पाने गर्द हिरवी असून शिंबा पसरट आणि त्यांत हिरवे दाणे असतात (२) ऑरिया : पाने फिकट हिरवी असून शिंबा बहिर्नत (बाहेरच्या बाजूस वळलेल्या) व त्यात पिवळे दाणे असतात (३) ग्रँडिस : पाने मध्यम हिरवी असून मोठ्या पसरट शिंबा आणि त्यांत काळे दाणे असतात (४) ब्रुनिया : पाने मध्यम हिरवी असून पसरट शिंबा आणि त्यांत तपकिरी दाणे असतात. मुगाच्या फुलाची संरचना (पतंगरूप) आणि या वनस्पतीची इतर सामान्य लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

मुगांचा उपयोग स्वयंपाकात फार करतात त्यांना मोड आणून त्यांची ऊसळ व आमटी करतात. डाळ उत्तम खाद्य असून पिठाचे लाडू करतात डाळ थंड, पौष्टिक, हलकी, सारक, पित्तशामक, व पचनास सुलभ असते. मुगाचे सार तहान भागविण्यास ज्वरात देतात ते आजाऱ्यास पथ्यकर आहे. पिठाचे पोटीस स्तनावर लावल्यास दूध कमी येते.

परांडेकर, शं. जा.


भारतातील कडधान्यांच्या पिकांपैकी मूग हे महत्त्वाचे पीक आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा व राजस्थान या चार राज्यांत या पिकाची लागवड इतर राज्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर होते. मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार व तामिळनाडू या राज्यांत त्या खालोखाल आणि इतर राज्यांत पुष्कळ कमी होते. उपलब्ध आकडेवारीप्रमाणे १९७३–७४ साली भारतात मुगाखाली २२·७८ लक्ष हेक्टर क्षेत्र व ७·८१ लक्ष टन उत्पादन होते. औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नासिक, सातारा, धुळे, पुणे, सोलापूर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी हे या पिकाच्या उत्पादनाचे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आहेत.

प्रकार : निवड पद्धतीने उत्पादन केलेले सुधारित प्रकार निरनिराळ्या राज्यांसाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासाठी शिफारस केल्या गेलेल्या सुधारित प्रकारांची वैशिष्ट्ये कोष्टकामध्ये दिली आहेत.

हवामान : उडीद व चवळीपेक्षा हे पीक जास्त रुक्षताविरोधी आहे परंतु ते मटकी एवढे नाही. वर्षभरात विभागून पडणाऱ्या ६२·५ ते ८७·५ सेंमी. पावसात हे पीक चांगले येते. पीक फुलावर असताना अथवा शेंगा तोडणीच्या वेळी जोरदार पावसामुळे नुकसान होते. या पिकाला उष्ण हवामान लागते. थंडी मानवत नाही.

हंगाम : हे मुख्यतः खरीप हंगामाचे पिक आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या काही भागांत ते रब्बी हंगामात भात पिकानंतर घेतात. भात कापणीपूर्वी काही दिवस शेतात मुगाचे बी फोकून पेरतात. हिमालयाच्या पायथ्याशी २,००० मी. उंचीपर्यंतच्या भागात हे उन्हाळी हंगामातील पीक आहे. कर्नाटकात व बिहारमध्ये मुगाची वर्षातून तीन पीके घेतात.

हे सलग पीक म्हणून अथवा खरीप हंगामात मका, तूर, जोंधळा, बाजरी, नाचणी व कोठेकोठे कापसाबरोबरही मिश्रपीक म्हणून घेतात. गहू, जोंधळा, ऊस व बागायती पिकांच्या आधी खरीपात जमीन पडठेवण्याऐवजी मुगाचे पीक घेतात. कारण त्यामुळे तणांची वाढ होत नाही व उत्पन्नही मिळते.

जमीन : चांगल्या निचऱ्याच्या दुमट अथवा भारी काळ्या जमिनीत हे पीक चांगले येते. हलक्या जमिनीत पिकाची वाढ चांगली होत नाही.

मशागत व खत : पावसाच्या सुरुवातीस नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या देतात. काही भागांत नुसत्याच कुळवाच्या पाळ्या देतात. मशागतीच्या वेळी हेक्टरी ३ ते ५ टन शेणखत, १५–२० किग्रॅ. नायट्रोजन

आणि ४०–५० किग्रॅ. फॉस्फरस (फॉस्फोरिक अम्लाच्या स्वरुपात) पेरणीपूर्वी जमिनीत मिसळतात.


महाराष्ट्रासाठी मुगाचे सुधारित प्रकार

प्रकार 

पेरणीपासून पीक तयार होण्याचा काळ (दिवस) 

१०० दाण्यांचे वजन (ग्रॅम) 

हेक्टरी उत्पादन (किग्रॅ.) 

दाण्याची वैशिष्ट्ये व लागवडीस योग्य विभाग 

जळगाव ७८१ 

६५–७० 

५·५–५·८ 

५००–६०० 

दाणा चमकदार, हिरवट, मोठा पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासाठी.

कोपरगाव 

६५–७० 

४·६–४·८ 

५००–६०० 

दाणा चमकदार व मोठा विदर्भासाठी.

एस-८ 

६०–६५ 

३·०–३·२ 

७००–८०० 

चमकदार, हिरवा व मध्यम आकारमानाचा पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासाठी.

पुसा वैशाखी 

(टी-४४) 

६०–६५ 

३·२–३·४ 

६००–७०० 

चमक नाही. दाणा बारीक. उन्हाळी हंगामात योग्य. 

टी-१ 

६०–६२ 

३·५–३·७५ 

७००–८०० 

चमक नाही. विदर्भात उन्हाळी हंगामासाठी. 

सोना 

(एन. पी. ३६) 

८० 

३·५ 

९१४ 

पिवळा. 

चिनी मूग १/४९

६२–६७ 

– 

४६० 

मोठा, हिरवट रंगाचा व तेजदार. हिरवळीच्या खतासाठी योग्य. 

पेरणी : खरीप पिकांची पेरणी जून-जुलैमध्ये व रब्बी पिकाची सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करतात. पेरणी पुढील निरनिराळ्या प्रकारांनी करतात : (१) बी फोकून, (२) नांगराच्या तासात मोघडीच्या साहाय्याने व (३) पाभरीने २० ते ३० सेंमी. अंतरावर ओळीत. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम सूक्ष्मजंतूसंवर्धक द्रव्य चोळतात. सलग पिकासाठी हेक्टरी १८ ते २० किग्रॅ. व मिश्रपिकासाठी २·५ ते ७·५ किग्रॅ. बी लागते. पेरणीपासून तीन आठवड्यांनी पहिली व नंतर १० ते १२ दिवसांनी दुसरी कोळपणी करतात.

उन्हाळी मूग : बहुविध पीक पद्धतीत उन्हाळी मुगाचे पीक घेता येते. पेरणी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाभरीने दोन ओळींत ३० सेंमी. अंतर ठेवून करतात. हेक्टरी १२–१४ किग्रॅ. बी लागते. पुसा वैशाखी, एस-८ व टी-१ या प्रकारांची शिफारस केली जाते. पाण्याच्या ५–६ पाळ्या द्याव्या लागतात. उन्हाळा संपण्यापूर्वी मुगाचे पीक काढून नंतर खरीप हंगामात दुसरे पीक घेता येते. हेक्टरी ७०० किग्रॅ. उत्पन्न मिळते.

वरील प्रकारांखेरीज पी एस-१६, पी एस-७ व के ८५१ या प्रकारांचीही उन्हाळी पिकासाठी शिफारस करण्यात येते. लागवडीचे इतर तपशील पावसाळी पिकाप्रमाणेच आहेत.


रोग व किडी : मुगावर भुरी, खोडकूज, मूळकूज व तांबेरा हे निरनिराळे कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग आढळून येतात. बियांना पारायुक्त कवकनाशक चोळल्यास खोडकूज व मूळकूज रोगांना आळा बसतो. भुरी व तांबेरा या रोगांसाठी ३०० मेश गंधक भुकटी हेक्टरी २० किग्रॅ. अथवा डायथेन एम–४५ हेक्टरी एक किग्रॅ. ५०० लि. पाण्यात मिसळून पिस्कारतात अथवा फवारतात. तसेच या पिकावर मुख्यतः मावा, पाने खाणारी अळी आणि पिसू भुंगेरे या किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी १०% बी एच सी भुकटी हेक्टरी २० किग्रॅ. वारा शांत असताना पिस्कारतात.

शेंगांची तोडणी व उत्पादन : पीक ९ ते १० आठवड्यांचे असताना हिरव्या शेंगा तोडणीलायक बनतात. या अवस्थेत भाजीसाठी पुष्कळ शेंगा तोडतात. पुढील तीन आठवड्यांत वाळलेल्या शेंगा तोडतात. हळवे प्रकार ६० दिवसांत तयार होतात. शेंगा तडकण्यापूर्वी त्या काढणे आवश्यक असते. सलग पिकात शेंगा हाताने खुडतात आणि मिश्रपिकात झाडे उपटून त्यांच्या शेंगा तोडतात. तोडलेल्या शेंगा खळ्यावर वाळवून त्यांची मळणी करून दाणे उफणून साफ करतात. सलग पिकाचे हेक्टरी उत्पादन सर्वसाधारपणे ३७५ ते ६२५ किग्रॅ. व मिश्रपिकाचे १२५ ते २५० किग्रॅ. मिळते. भुशाचे उत्पादन जवळजवळ तेवढेच मिळते. दाणे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ करण्यासाठी आणि भुसा जनावरांना चारण्यासाठी वापरतात.

रासायनिक संघटन : दाण्यात जलांश १०·४%, प्रथिने २४%, वसा (स्निग्ध पदार्थ) १·३% आणि कार्बोहायड्रेटे ५६·७% असतात. मोड आलेल्या दाण्यात ८८·८% जलांश, ३·८% प्रथिने आणि ६·६% कार्बोहायड्रेटे असतात.

आरगीकर, गो. प्र गोखले, वा. पु.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

             2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1980.

             3. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Poona, 1962.

             ४. अरकेरी, एच्‌. आर् (म. मा.) पाटील, ह. चिं. पिकांच्या उत्पादनाची तत्त्वे व प्रघात, नागपूर   १९६०.