कृषि अभियांत्रिकी: नांगरणी, कुळवणी, तण काढणे, पाणी देणे, पीक कापणे, धान्य मळणे व साठवणी इ. शेतीच्या कामांसाठी कमीतकमी माणसांचा उपयोग करून यंत्रांच्या साहाय्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणारी अभियांत्रिकीची विशेष शाखा.

मनुष्याला लागणारे अन्नधान्य व कापसासारख्या उपयुक्त पिकांच्या उत्पादन पद्धतींमध्ये सतत सुधारणा करणे, हेही कृषी अभियंत्यांचे महत्त्वाचे कार्य असते. अमेरिकेतील कृषी अभियंत्यांच्या प्रयत्‍नामुळे तेथील दर हेक्टरी उत्पन्न जवळजवळ ८० टक्क्यांनी वाढले आहे.

कृषी व्यवसाय हा जगातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा उद्योग आहे. कृषी अभियांत्रिकीच्या बहुतेक प्रश्नांत जैव वस्तूंचा व विक्रियांचा संबंध येतो आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी कृषी अभियंत्याला भौतिकशास्त्र व अभियांत्रिकीचा उपयोग करावा लागतो. कृषी व्यवसायात आता अनेक प्रकारची यंत्रे, रासायनिक द्रव्ये व माल वाहतुकीची साधने वापरावी लागतात व निरनिराळ्या प्रकारच्या इमारतीही बांधाव्या लागतात. अशा विविध कामांसाठी शेतकऱ्‍याला आता स्वतंत्र कृषी अभियंत्याची मदत घ्यावी लागते.

कृषी अभियांत्रिकीमध्ये अनेक स्वतंत्र विभाग आहेत. त्यामध्ये (१) यांत्रिक विभाग, (२) इमारत बांधणी, (३) पाणी पुरवठा व निचरा, (४) मृदा संधारण व सुधारणा, (५) पिकांवरील रोगराईवर उपचार, (६) जंगल सफाई व भूमि-उद्धार आणि (७) विद्युत् शक्तीचा वापर असे मुख्य विभाग आहेत.

(१) यांत्रिक विभागात यांत्रिक शक्ती उत्पन्न करण्याची एंजिने, विहिरी खोदण्याचे साहित्य, ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्रे, पीक कापण्याची व गोळा करण्याची यंत्रे, धान्य साफ करण्याची यंत्रे, वैरण कापण्याची यंत्रे, माल वाहून नेण्याची साधने अशा सर्व यांत्रिक विषयांचा समावेश होतो. (२) इमारत बांधणी विभागात शेतकऱ्यांची घरे, बी-बियाणे ठेवण्याच्या कोठ्या, धान्य साठविण्याची गुदामे, गुरांचे गोठे, वैरण साठविण्याच्या झोपड्या, कुंपणे वगैरे विषय येतात. (३) पाणी पुरवठा विभागात तलाव बांधणे, विहिरी खोदणे, पंप बसवून पाण्याचा पुरवठा करणे, जलसिंचन, जमिनीवरचा व जमिनीखालचा पाण्याचा निचरा वगैरे विषय असतात. (४) मृदा संधारण विभागात नदीच्या पुराने व पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबवणे आणि जमिनीमध्ये पाणी मुरविण्याची व्यवस्था करणे यांसंबंधीची कामे असतात. (५) पिकांवरील रोगराईच्या विभागात शेतातील उभ्या पिकावर करावयाच्या प्रक्रिया, कीटकनाशक रसायनांचा वापर आणि त्यांसाठी वापरावयाची उपकरणे असे विषय येतात. (६) जंगल सफाई व भूमिउद्धार विभागात जंगल तोडून जमीन साफ करून ती शेतीला योग्य होईल अशा स्वरूपात आणणे, खार जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उपाययोजना करणे वगैरे विषय येतात. (७) विद्युत् शक्तीच्या विभागात यंत्रांना लागणारी शक्ती विद्युत् चलित्रांच्या (मोटरींच्या) द्वारे पुरविण्याची व्यवस्था, जमिनीच्या पृष्ठाखाली केबली पुरून त्यांमधून विद्युत् प्रवाह पाठवून जमिनीचे तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था, कुंपणाच्या धातूच्या तारांना कमी विद्युत् दाबाचा पुरवठा करून शेतीचे रक्षण करण्याची व्यवस्था इ. विषय असतात.

शेताच्या जमिनीचे व वातावरणाचे तापमान व आर्द्रता यांचे उत्तम नियंत्रण करता आले, तर शेतातील पीक लवकर तयार करता येते व पिकाचे उत्पन्नही वाढते असे अनेक ठिकाणच्या प्रयोगांवरून प्रत्ययास आलेले आहे. हे काम सुरुवातीला बरेच खर्चाचे असले, तरी एकंदरीने फायद्याचेच होईल म्हणून त्याला व्यावहारिक रूप देण्याचे काम पुष्कळ ठिकाणी सुरूही करण्यात आले आहे.

इ. स. १९०० पासून अमेरिकेतील काही कृषी महाविद्यालयांत कृषी अभियांत्रिकीची स्वतंत्र शाखा सुरू करण्यात आली. १९६० पर्यंत अमेरिकेमध्ये ३४ कृषी महाविद्यालयांत कृषी अभियांत्रिकीच्या पदवीचे अभ्यासक्रम चालू झालेले होते. भारतामध्ये १९४२ साली अलाहाबाद ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटमध्ये कृषी अभियांत्रिकीच्या पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आणि त्यानंतर खरगपूर, पंतनगर,लुधियाना व उदयपूर येथेही तसेच अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. महाराष्ट्रातही राहुरी व पुणे येथे तसे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

पहा : ट्रॅक्टर नांगर पंप पीक संरक्षण मृदा संधारण शेतकामाची अवजारे व यंत्रे शेतवाडीतील बांधकाम सिंचाई.

संदर्भ : 1. McColly, H. F. Martin, J. W. Introduction to Agricultural Engineering, New York,

              1955.

    2. Richey, C. B. and Others, Agricultural Engineer’s Handbook, New York, 1961.

सोमण, ना. श्री.