मॅगोस्टीन : (१) फांदी, (२) फळ, (३) बियांसह अर्धे फळ.मँगोस्टीन : (हिं. मंगुस्तान, मंगुस्ता इं. मँगोस्टीन लॅ. गार्सीनिया मँगोस्टना कुल–गटिफेरी क्लुसिएसी). सुमारे ६–१४ मी. उंच व सदापर्णी वृक्ष. उंडण, कोकम, नागचाफा, सुरंगी, मॅमे ॲपल इ. उपयुक्त वृक्ष यांच्या कुलातील व कोकम, आमली, तामील आणि हळदी ही झाडे याच्याच प्रजातीतील (गार्सीनिया) आहेत ह्या प्रजातीत एकूण सु. ४२५ (जे. सी. विलिस यांच्या मते ४००) जाती असून त्यांपैकी सु. २२ भारतात आहेत. मँगोस्टीनची पाने साधी, गर्द हिरवी, चिवट, १५–२५ सेंमी. लांब व ६–१०·५ सेंमी. रुंद, चकचकीत, लंबगोल-आयत व टोकदार असतात. फुले एकएकटी किंवा जोडीने, फांद्यांच्या शेंड्यांवर येतात ती सु. ३–५ सेंमी. व्यासाची, लालसर व बहुधा एकलिंगी असतात. संदले ४ व पिवळट प्रदले (पाकळ्या) ४, मांसल व लालसर केसरदले १५–२०, सुटी आणि स्त्री-पुष्पातील सर्वच वंध्य असतात. किंजपुटात ४–८ कप्पे असून त्यावर किंजल नसतो किंजल्क ४–८, किरणांसारखा व पिवळा असतो. नर-पुष्पातील किंजमंडल वंध्य असते [⟶ फूल]. फळ गोलसर बसके, ७·५ सेंमी. व्यासाचे, गर्द तपकिरी किरमिजी असून त्याची साल जाड, आतून लाल व बिया काहीशा सपाट व ५–८ असतात. बियांभोवती खाद्य, रसाळ, पांढरा व गोडसर मगज (गर) असतो. मँगोस्टीनची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ गटिफेरी अथवा कोकम कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

फळाच्या सालीचे चूर्ण आमांश व अतिसारात, तसेच तापावर देतात. खोडाची साल व कोवळी पाने आमांश व अतिसार, मूत्रमार्गातील विकार आणि तोंडातील पुरळ इत्यादींवर वापरतात त्यांचा काढा स्तंभक (आकुंचन करणारा) म्हणून बाहेरून लावण्यासही उपयुक्त असतो. फळे उत्तम खाद्य म्हणून प्रसिद्ध असून ती सरबत, मुरंबे इत्यादींकरिता वापरतात.

परांडेकर, शं. आ.

उष्ण कटिबंधातील फळांत सर्वांत स्वादिष्ट आणि रुचकर अशा या फळाची लागवड जावा आणि मलाया द्वीपकल्पाच्या काही विवक्षित प्रदेशांत आणि ब्रह्मदेश, थायलंड, इंडो-चीन आणि श्रीलंकेमध्ये लहान बागांतून केली जाते. उष्ण आणि उपोष्ण कटिबंधांतील पुष्कळ देशांत या फळाच्या लागवडीचे पुष्कळ प्रयत्न करण्यात आले परंतु मोठ्या प्रमाणावर त्याचा विस्तार होऊ शकला नाही. दक्षिण भारतात निलगिरीच्या खालील बाजूच्या उताराच्या ४०० ते १,१०० मी. उंचीच्या प्रदेशात आणि तिनेवेल्ली जिल्ह्यात कोर्टालमजवळ या फळझाडाची लागवड यशस्वी झाली आहे परंतु दक्षिण भारतात त्याचे एकूण क्षेत्र १० हेक्टरपेक्षा जास्त नाही. या प्रदेशात १२७ ते १५२ सेंमी. पर्जन्यमान आणि २१° ते २८° से. तापमान असते. तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र व पश्चिम बंगालची किनारपट्टी हे प्रदेश ही झाडे लावण्यास योग्य आहेत, असे मानले जाते परंतु पश्चिम किनारपट्टीत या फळाची लागवड अद्याप यशस्वी झाली नाही. पावसाळ्याचे महिने सोडून इतर महिन्यांतील उच्च तापमान आणि कमी आर्द्रता याला कारणीभूत आहेत.

पाणी धरून ठेवणारी परंतु निचऱ्याची व खतावलेली जमीन या पिकासाठी योग्य असते. सर्वसाधारणपणे झाडाची अभिवृद्धी (लागवड) बियांपासून रोपे वाढवून करतात. संपूर्ण पिकलेल्या फळातील निरोगी बिया निवडून त्यांवरील गर काढून ५ दिवसांच्या आत निचऱ्याच्या व खतावलेल्या जमिनीत रूजत घालतात. रोपांना सोटमूळ असल्यामुळे आणि त्यावर फार थोडी उप-मुळे अथवा मूलरोम (मुळावरील केसासारखी वाढ) असल्यामुळे रोपांचे स्थलांतर करणे अवघड असते. सुमारे दोन वर्षांची रोपे काळजीपूर्वक खणून मातीच्या मोठ्या गोळ्यासह जुलै-ऑगस्ट महिन्यांत थोडीफार सावली असलेल्या जागी ९ मी. X ९ मी. अगर जास्त अंतरावर लावतात. पुढील दोन वर्षांत रोपांना उन्हाळ्याच्या दिवसांत सावली व गरजेनुसार पाणी देणे आवश्यक असते. सेंद्रिय खताचा पुरवठा केल्याने उन्हाळ्यात जमिनीतील ओल टिकून राहते व पावसाळ्यात जास्त पाण्याचा निचरा होतो.

झाडाची वाढ फार मंद गतीने होते. रोपांपासून वाढविलेल्या झाडांना सु. ८–१० वर्षांनी फलधारणेस सुरुवात होते व साधारणपणे १५ वर्षांनी जास्त फलधारणा होते.

दक्षिण भारतात फळाचे दोन हंगाम असतात : पहिला एप्रिल ते जून आणि दुसरा ऑगस्ट ते ऑक्टोबर. प्रत्येक झाडाला प्रतिवर्षी सुरुवातीला २०० ते ३०० फळे लागतात व पुढे वाढत वाढत १,२०० ते १,५०० पर्यंत फळे लागतात. सर्वसाधारण उत्पन्न प्रतिवर्षी २०० ते ५०० फळे असे धरले जाते. फळाचे वजन सु. ५५ ग्रॅ. असते. फक्त तयार फळे काढतात. अपक्व फळांना स्वाद नसतो. झाडाचे आयुष्य १०० वर्षांपर्यंत असते परंतु १५ ते ३० वर्षे या काळात जास्त उत्पन्न मिळते.

भारतात या झाडावर महत्त्वाची कीड व कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे होणारे) रोग आढळून येत नाही परंतु दोन इतर उपद्रवांमुळे फळांचे नुकसान होते. यांपैकी गँबोज रोग फार नुकसानकारक आहे. या रोगात फळांतून आणि फांद्यांतून पिवळा चिकट पदार्थ बाहेर पडतो. तो डिंक व रेझीन यांचे मिश्रण असलेल्या गँबोज या पदार्थासारखा [⟶ तामील] असतो म्हणून या रोगाला गँबोज रोग म्हणतात. या रोगाचे निश्चित कारण अद्याप माहीत नाही. सूर्यप्रकाश, तापमान व पाऊस यांच्याशी त्याचा संबंध असावा, असे मानण्यात येते. दुसऱ्या रोगात बीजक धानीतून जास्त प्रमाणात पाणी शोषिले गेल्यामुळे फळे भेगाळतात. या दोन रोगांमुळे मलबारमध्ये या फळझाडाचे क्षेत्र विस्तृत होण्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

फळाचा खाद्य भाग ३१% असतो आणि त्यात ८४·९% जलांश, ०·५% प्रथिन, ०·१% वसा, १४·३% कार्बोडायड्रेट व ०·२% क्षार असतात.

चौधरी, रा. मो. गोखले, वा. पु.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, New Delhi, 1956.

             2. Singh, Sham Krishnamurthi, S. Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.