सफरचंद : (हिं. सेव, सेब क. सेवू , सेबू इं. कॉमन अपल लॅ. मॅलस प्युमिला, पायरस मॅलस, मॅलस सिल्व्हेस्ट्रीस कुल-रोझेसी ). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा सु. १५ मी.उंच व घुमटासारख्या माथ्याचा लहान पानझडी वृक्ष मूळचा पूर्व यूरोप व पश्चिम समशीतोष्ण आशिया येथील असून तो वायव्य हिमालयात सस. २,७९० मी. उंचीपर्यंत जंगली अवस्थेत आढळतो. पश्चिम हिमालय आणि कॉकेशस व आशिया मायनर यांमधील डोंगराळ प्रदेशांत त्याचे मूलस्थान असावे, असेही मानतात. कॉकेशस आणि तुर्कस्तान येथील काही भागांत जंगली सफरचंदाच्या वृक्षांची प्रचंड वने आहेत. तसेच तुर्कस्तानातील वृक्षांची फळे लागवडीतील झाडांच्या फळांपेक्षा मोठी आणि त्यांपैकी कित्येक गुणधर्मांच्या बाबतीत कमी प्रतीची नसलेली अशी असून, लहान आंबट फळांपासून ते मोठय व गोड फळांपर्यंत सर्व प्रकार तेथे आढळतात. मॅलस प्युमिला ( इं. कल्टिव्हेटेड अपल ) या नावाने हल्ली ओळखली जाणारी ही सफरचंदाची जाती व तिचे अनेक संकरज प्रकारच फार पूर्वीपासून समशीतोष्ण प्रदेशात लागवडीत आहेत. स्वित्झर्लंडमधील इतिहासपूर्व सरोवरांभोवती राहणाऱ्या मानवी वस्त्यांच्या भग्नावशेषांत फळांचे व बियांचे भाग आढळतात. या वृक्षाच्या वर्गीकरणातील स्थानाबद्दल मतभेद आहेत. ग्रीक भाषेतील मॅलस या शब्दाचा अर्थ अपल ( सफरचंद ) असा आहे. पायरस या लॅटिन शब्दाचा अर्थ पेअर ( नासपती ) आहे. पूर्वी जॉर्ज बेंथॅम व सर जोसेफ डाल्टन हूकर आणि आडोल्फ एंग्लर व कार्ल फोन प्रँट्ल यांनी सफरचंदाचा अंतर्भाव ⇨नासपती बरोबर पायरस प्रजातीत केला होता श्नायडर यांच्या मताप्रमाणे हल्ली मॅलस या भिन्न प्रजातीत फक्त सफरचंदाचा समावेश करतात. या प्रजातीतील जाती दोन्ही गोलार्धांच्या उत्तर समशीतोष्ण क्षेत्रात पसरलेल्या असून एकूण ३५ जातींपैकी भारतात फक्त तीन (किंवा चार ) आढळतात सफरचंद त्यांपैकी एक जाती आहे. पायरसमॅलस यांच्या भिन्न जातींत संकरण होत नाही परंतु मॅलस प्रजातीतील भिन्न जातींत होते. सफरचंद हे फळ लोकप्रिय खाद्य असून काही झाडे शोभिवंत आहेत. समशीतोष्ण प्रदेशातील फळांत सफरचंदाला फार मोठे महत्त्व आहे. सर्व जगातील अनेक प्रदेशांत त्याची लागवड केलेली आढळते. त्याच्या कणखरपणामुळे उत्तरेस ६५ अक्षांशापर्यंत त्याची लागवड होऊ शकते. भारतात हिमाचल प्रदेश, कुमाऊँ, पंजाब, कुलू , वायव्य सरहद्द प्रदेश, मध्य प्रदेश, काश्मीर, आसाम, कर्नाटक ( बंगलोर व निलगिरी ) इ. ठिकाणी याची लागवड आहे.

सफरचंद : (१) पानाफुलांसह फांदी, (२) फुलाचा उभा छेद, (३) फळाचा आडवा छेद, (४) फळाचा उभा छेद, (५) बीज.

वनस्पतिवर्णन : या वृक्षाच्या कोवळ्या भागांवर दाट लव असते. पाने साधी, एकाआड एक, वर गुळगुळीत, खाली लवदार, दीर्घवृत्ताकृती किंवा अंडाकृती टोकदार, दातेरी, ४·५ ते १० सेंमी. लांब, नरम व लहान मर्यादित फांद्यावर व इतर बारीक फांदयांवर झुबक्यांनी येतात. फुले मोठी, पांढरी किंवा फिकट गुलाबी, आकर्षक व पानांबरोबरच ५-६ च्या झुबक्यात [वल्लरीत → पुष्पबंध] फेब्रूवारी-मार्चमध्ये येतात. फुलात संदले व प्रदले प्रत्येकी पाच असून केसरदले सु. २० असतात [→ फूल]. पुष्पस्थलीने वेढलेल्या ( आकांत ) खऱ्या फळावर [→ फळ] टोकास संवर्त ( पुष्पकोश ) सतत राहतो. फळ गोलसर पण वरून व खालून काहीसे चपटे, खोलगट, पिवळसर लाल किंवा गडद तांबडे असते. मगज गोड असून त्यात रेवाळ कण नसतात ( नासपतीत असतात ). बिया सु. १०, फुलांची संरचना व वनस्पतीची इतर शारीरिक लक्षणे ⇨रोझेलीझ ( गुलाब ) गणातील रोझेसी ( गुलाब ) कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

लागवडीचे देश : आज जगातील सफरचंद पिकविणारे अत्यंत महत्त्वाचे प्रदेश म्हणजे अमेरिका ( संयुक्त संस्थाने ), यूरोप, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे होत. भारतातील याची लागवड अठराव्या शतकाच्या मध्यापासून ( सपाट प्रदेशात व डोंगराळ भागात ) स्थिर झाली असून हल्ली व्यापारी दृष्टीने होत असलेले उत्पादन काश्मीर, कुलू आणि कुमाऊँ या ठिकाणी आहे. दक्षिणेत बंगलोर व निलगिरी भागांतही लागवडीचे प्रयोग केले गेले होते परंतु १८९७ मध्ये ‘ ऊली अफिस ’ ( माव्याच्या किडीचा एक प्रकार ) या किडीमुळे पिकांचा नाश झाला. आता रोगप्रतिबंधक जातींची लागवड सुरू झाली आहे. फळे व वृक्ष यांच्या लक्षणावरून सफरचंदाचे सु. ६,५०० बागायती प्रकार ओळखले जातात व ते सर्व जगभर कोठे ना कोठे लागवडीत आहेत. फळांचा आकार व आकारमान, रंग, स्वाद व इतर गुण यांत विविधता आढळते वृक्षात फळे धरण्याचा व पिकण्याचा काळ, भिन्न प्रकारचे हवामान व जमिनी यांच्याशी अनुयोजन यात फरक आढळतात.

उपयोग : मुखशुद्धीकरिता (जेवणाच्या शेवटी किंवा नंतर खाण्याकरिता ) सफरचंदाचा प्रमुख वापर होतो. फार आंबट फळे स्वयंपाकात वापरतात. भावी उपयोगाकरिता काप काढून आणि सुकवून त्यांचे परिरक्षण करतात. डबाबंद फळे, मुरंबे, जेली हे प्रकारही बनवितात. ताज्या फळांचे सरबत, रस किंवा रसापासून यीस्टच्या साहाय्याने ‘ वाइन ’ व ‘ सायडर ’ नावांची मदये व शिर्का ( व्हिनेगर ) बनवितात सायडरचे ऊर्ध्वपातन करून ‘ अपल बँडी ’ ( मदय ) तयार करतात. फळे स्कर्व्ही रोगविरोधक असून त्यातील पेक्टिनामुळे ती अतिसारावर चांगली असतात. सफरचंदाचा रस, पाक आणि शिर्का यांमुळे लहान ( तान्ह्या ) मुलांना दूध पचण्यास सोपे जाते. भारतात सफरचंदाचा मुरंबा लोकप्रिय असून तो ह्दयास उत्तेजक असतो. तसेच त्यामुळे मानसिक ताण व शारीरिक जाडया यांपासून सोडवणूक होते. खोडाची किंवा मुळाची साल कृमिनाशक, संमोहक व प्रशीतक ( थंडावा देणारी ) असते. सालीचा फांट ( गरम पाणी ओतून काढलेला रस ) पाळीचा, सतत येणारा ताप आणि पित्तासंबंधीचा ताप यांवर देतात. पानांपासून फ्लोरेटीन हा सूक्ष्मजंतुविरोधक पदार्थ काढतात. सफरचंदाचे लाकूड कठीण, मजबूत व घट्ट असते त्याचा वापर हत्यारांचे दांडे, नळ्या, आखण्या, छडया, लाकडी हातोडयची डोकी इत्यादींकरिता करतात.

रासायनिक संघटन : सफरचंदाचा प्रकार, जेथे लागवड होते तेथील हवामान आणि फळांची पक्वावस्था यांवर त्याचे रासायनिक संघटन अवलंबून असते. त्याच्यातील साधारण भिन्न घटकांच्या प्रमाणांचा प्रतिशत पल्ला पुढे दिला आहे : एकूण घनभाग १३·६-२६·० एकूण शर्करा    (पर्यस्त शर्करा ) ९.५-१७·४ ग्लुकोज २·५-५·६ फुक्टोज ६·५-११·८ सुकोज १·५-६·० अम्ले ( मॅलिक ) ०·३-१·० आणि टॅनीन ०·०२-०·१५. जीवनसत्त्वे, लवणे आणि कार्बनी अम्ले यांची अधिकाधिक संहती (प्रमाण ) सालीत व तिच्या आत असल्याने खाण्यात तिचा अंतर्भाव करणे गरजेचे असते. साखरेशिवाय यात स्टार्च, डेक्स्ट्रीन, पेक्टिक पदार्थ, तूलीर ( सेल्युलोज ), अर्धतूलीर ( हेमीसेल्युलोज ) व पेंटोसॅने असतात. सरासरीने पूर्ण पिकलेल्या फळांत पेंटोसॅन ०·६० लिग्निन ०.४० तूलीर ०.९० टक्का असतात यांशिवाय कॅल्शियम ६-९, पोटॅशियम १११ मॅग्नेशियम ६ सोडियम २ फॉस्फरस ११ क्लोरीन ४ गंधक ५ लोह ०·३ मिगॅ./१०० गॅ. आणि इतर धातू व आयोडीन लेशमात्रच असतात सर्व खनिजे मानवी पोषणाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. सफरचंदाच्या बियांत ०·६२-१·३८ टक्के अमिग्डॅलीन असते. तसेच १८-२३ टक्के पिवळेधमक, अर्धवट सुकणारे तेल असून त्याला कडू बदामाचा वास येतो त्याचा व्यावहारिक उपयोग फारसा नसतो. सुकविलेल्या फळांपासून काढलेले चूर्ण ( पीठ ) आणि सुकट फळांचे चॉप्स, वलये आणि खिरीसारखे पदार्थ बाजारात मिळतात. सुक्या फळांचा उपयोग बेकरी व्यवसायातही करतात.

परांडेकर, शं. आ.


लागवड, मशागत, संवर्धन इ. : जगात सफरचंदाचे पुष्कळ प्रकार आहेत. त्यांच्यापैकी काही प्रकारांची भारतात लागवड करतात. काश्मीरमधील ‘ आंबी ’ प्रकार मध्य आशियामधून आलेला आहे. त्याला चांगली गोड फळे येतात. फळांना बाजारात भावही चांगला येतो. बंगलोरकडील भागांत ‘ रोमब्युटी ’ प्रकारची फळे चांगली येतात. तो प्रकार तेथे लोकप्रिय असून त्याची लागवड मोठया प्रमाणावर करतात. बाकीचे व्यापारासाठी लावलेले प्रकार वेळोवेळी परदेशांतून आणलेले आहेत. भारतातील समशीतोष्ण भागांतील फळांच्या क्षेत्रांपैकी सफरचंदाचे क्षेत्र ३/४ इतके आहे. सफरचंदाचे पुष्कळसे प्रकार १८८७ साली सिमल्यात आणले गेले.

सफरचंदाच्या प्रकारांचे पुढील दोन वर्ग करतात : एक द्विगुणित  ( रंगसूत्रांचे दोन गट असलेले ) व दुसरा त्रिगुणित ( रंगसूत्रांचे तीन गट असलेले ). पहिल्यात परागकण बहुसंख्य असून फुले स्वफलित असतात. दुसऱ्यात ती स्वफलित नसतात पण पहिल्या वर्गाच्या परागकणाने ती फलित होतात. द्विगुणित प्रकारामध्ये सुद्धा एकाच वेळी फुले येणारे प्रकार एका क्षेत्रात लावल्यास परफलनकियेने पुष्कळ आणि चांगली फळे मिळतात.

पंजाबमधील कुलू खोरे, सिमला टेकडयांतील कोटागड आणि उत्तर प्रदेशांतील कुमाऊँ टेकडयंमधील यूरोपीय वसाहतवाल्यांनी व धर्मोपदेशकांनी प्रयोग करून पुष्कळ चांगले प्रकार तयार केले. त्यांपैकी हिमाचल प्रदेशात – तांबडी, नारिंगी पिपीन काश्मीर खोऱ्यांत-आंबी काश्मिरी पेप्सू-मध्ये – शानबरी कुमाऊँ टेकडयांत – नारिंगी पिपीन कुलू खोऱ्यांत – तांबडी अस्ट्रचन निलगिरी आणि दक्षिण भारतात – रोमब्युटी वगैरे प्रकार प्रामुख्याने तयार केलेले आहेत. शिवाय याच भागांतून इतर २०-२१ चांगले प्रकार आहेत.

स्थानिक सफरचंदाच्या फळांतील बियांपासून रोपे तयार करून त्यांच्यावर जातिवंत सफरचंदाच्या एक वर्षाच्या फांदयावरील पूर्ण वाढ झालेले डोळे भरून कलमे करतात. उंच वाढणाऱ्या प्रकारापेक्षा ठेंगणा प्रकार खुंट म्हणून घेतात. ही कलमे एक वर्षाची झाली की, लागणीसाठी घेतात. कारण त्यांना पाहिजे तसा आकार देता येतो. ती लवकर संस्थापित होतात. कडक थंडी टाळण्याकरिता झाडे वसंत ऋतूत लावणे चांगले. लागण उंच किंवा ठेंगण्या प्रकाराप्रमाणे ९ ते १२ मी. किंवा ६ ते ९ मी अंतरावर करतात. लागणीनंतर प्रत्येक झाडाला ३० गॅ. नायट्रोजन व जरूरीप्रमाणे सुपरफॉस्फेट व पोटॅशियम खत देतात.

पहिल्या काही वर्षांत अशा तऱ्हेने छाटणी करतात की, फांदया जाड व मजबूत होऊन न मोडता त्यांच्यावरील फळांचे वजन सहन करतील, असा त्यांचा मंच तयार करतात. एक वर्षाचे कलम लावतानाच जमिनीपासून एक मी. उंचीवर त्यांचा शेंडा कापतात आणि खोडाभोवती ३-६ प्रमुख फांदया निरनिराळ्या दिशांनी वाढू देऊन बाकीच्या छाटतात. त्यावरील नवीन अंकुरांपैकी चांगले जोरदार अंकुर ठेवून बाकीचे चिमटतात.

पहिल्या सुप्तावस्थेत ज्या उंचीवर दुय्यम फांदया पाहिजे असतील त्यामानाने मंचाकरिता निवडलेल्या फांदया खोडापासून ३० ते ६० सेंमी. लांब ठेवून कापतात. दुसऱ्या उन्हाळ्यात मंचाच्या फांदयांवर नवीन फुटलेल्या फांदयांपैकी काही दुय्यम फांदया अशा तऱ्हेने कापतात की, झाड समतोल राहील. ही छाटणी चांगली झाली म्हणजे दुसऱ्या सुप्तावस्थेत वाजवीपेक्षा जास्त असलेल्या कमी दर्जाच्या, रोगट किंवा आकाराबाहेर जाणाऱ्या फांदया कापतात. तिसऱ्या उन्हाळ्यात छाटणीची जरूरी नसते.

तिसऱ्या व चौथ्या सुप्तावस्थेत जरूर नसलेल्या व आडव्या येणाऱ्या फांदया छाटतात. चार-पाच वर्षांत फांदया कापून, आकार देऊन ८-१० मंचाच्या फांदया बनून झाडास घडयाचा आकार येतो. फांदया मात्र फार जवळजवळ राहू देत नाहीत. झाडांच्या फांदया फार वाढून फळे कमी येऊ नयेत म्हणून व समतोलपणा राखून आत भरपूर सूर्यप्रकाश प्रवेश करील, अशा तऱ्हेने ती छाटतात. फारच छाटल्यास झाडाचा जोर कमी होतो.

जुन्या झाडांना पुष्कळ लहान लहान फळे येऊन वाढ खुंटली म्हणजे नव्या झाडांपेक्षा त्यांची भरपूर छाटणी केल्यावर फळधारणा करणारी नवीन जोरदार फूट फुटते. छाटलेल्या भागावर बोडार्पेस्ट लावतात. फळे विरळ केल्याने ती रंगाने गडद होतात व आकारमानाने वाढतात. मे-जूनमध्ये फळे नैसर्गिक तऱ्हेने गळण्याआधी १० ते १५ सेंमी. अंतराने विरळ करतात.

फळे तोडण्याची वेळ जात, हंगाम व ठिकाणाप्रमाणे बदलते म्हणून नक्की ठरविणे कठीण असते. लवकर तोडल्यास फळाचा दर्जा कमी होतो. तोडण्यास उशीर झाला तर गराचे मोडून तुकडे तुकडे होतात व जास्त दिवस टिकविता येत नाहीत. लांबच्या बाजारपेठेकरिता पूर्ण पिकण्यापूर्वीच फळे तोडतात, पण जवळच्या बाजारपेठेकरिता योग्य अशी पिकलेली फळे तोडतात. रंग हिरव्याचा पिवळसर झाला म्हणजे फळ तोडण्यास योग्य समजतात. हिरव्या जाती चवीवरून समजतात. गर थोडा घट्ट व आंबसर असून पिठूळ असू नये. फळे एकदम न हासडता वर उचलून सावकाश तोडतात. नंतर प्रतवारी करून ४५ × २९ × २६ सेंमी. मापाच्या खोक्यात व्यवस्थितपणे भरतात. सफरचंद शीतगृहात ०° ते २° से. तापमानात आठ महिन्यांपर्यंत टिकू शकते.

पहा : नासपती फळ बिही.

चौधरी, रा. मो.

संदर्भ : 1. Bailey, L. H. Standard Cyclopedia of Horticulture, Vol. III, New York, 1961.

    2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

    3. I. C. A. R. Fruit Culture in India, New Delhi.