पाल, बेंजामिन पिअरी : (२६ मे १९०६ – ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषि-वनस्पतिवैज्ञानिक व ख्यातनाम संशोधक.⇨ तांबेऱ्यासारख्या  रोगांना दाद न देणारे आणि अधिक प्रमाणात उत्पादन देणारे गव्हाचे अनेक उत्तम प्रकार त्यांनी शोधून काढले. शोभिवंत वनस्पतींवरही त्यांनी महत्त्वाचे संशोधन करून गुलाबाचे अनेक प्रकार निर्माण केले.

त्यांचा जन्म पंजाबमधील मुकुंदपूर येथे झाला. त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून विद्यापीठाची बी.एस्‌सी . (ऑनर्स) ही पदवी १९२८ मध्ये व एम्‌.एस्‌सी . (ऑनर्स) ही पदवी १९२९ मध्ये संपादन केली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात रोलँड बिफेन व फ्रँक एंगलडो यांच्यासारख्या गव्हावरील संशोधनाकरिता प्रसिद्ध असलेल्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाच्या नवीन प्रकारांचे प्रजनन व आनुवंशिकी यांविषयी संशोधन करून १९३२ मध्ये पीएच्‌.डी पदवी मिळविली. १९३३ मध्ये ते ब्रह्मदेशात परत आले आणि म्हावबी येथील सेंट्रल राइस रिसर्च स्टेशन या संस्थेत साहाय्यक भात संशोधक अधिकारी म्हणून रुजू झाले. ह्याच वर्षी पुढे त्यांची बिहारमधील पुसा येथील इंपीरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संशोधन संस्थेत दुय्यम आर्थिक (अनुप्रयुक्त) वनस्पतिवैज्ञानिक या हुद्यावर नेमणूक झाली. १९३७ मध्ये ते ह्याच संस्थेत शाही आर्थिक वनस्पतिवैज्ञानिक व वनस्पतिविज्ञान विभागाचे प्रमुख झाले. १९५० मध्ये ते ह्या संस्थेचे (स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ह्या संस्थेचे नाव इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट असे बदलले गेले) संचालक झाले. या हुद्यावर १५ वर्षे काम केल्यानंतर पाल यांची १९६५ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेचे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक झाली. या पदावरून १९७२ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते त्याच संस्थेत गुणश्री शास्त्रज्ञ (एमेरिटस् सायंटिस्ट) या नात्याने काही संशोधनात मार्गदर्शन करीत आहेत.

बेंजामिन पिअरी पाल पाल यांनी आनुवंशिकी आणि वनस्पतींचे प्रजनन या विषयांवर मूलभूत, महत्त्वपूर्ण व उपयुक्त संशोधन केले. त्यांनी गव्हासंबंधी विशेष संशोधन करून तांबेरा या अतिशय उपद्रवकारक रोगाला प्रतिकार करणाऱ्या गव्हाच्या प्रकारांचा अधिक उत्पादन देणाऱ्या दाणेदार गव्हाच्या प्रकारांशी संकर घडवून आणून अधिक उत्पादन देणाऱ्या व रोगांना न जुमानणाऱ्या दाणेदार गव्हाच्या अनेक प्रकारांची निर्मिती केली. त्यांत एन.पी. ७१०, ७१८, ७६१, ७७०, ७९९ व ८०९ हे प्रकार भारतीय शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय व यशस्वी झाले. तांबेरा या रोगाच्या तिन्ही प्रकारच्या उपद्रवांना न जुमानणारा व अधिक प्रमाणात फलित होणारा एन.पी ८०९ हा गव्हाचा सुप्रसिद्ध प्रकार पाल यांनी १९५४ मध्ये शोधून काढला. नंतरही असेच काही प्रकार त्यांनी शोधून काढले. ह्या प्रकारांनी गव्हाच्या उत्पादनात क्रांती केली. नॉर्मन बोर्‌लॉग या मेक्सिकन शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या बुटक्या गव्हाच्या प्रकारानंतरच पाल यांच्या गव्हाच्या प्रकारांची लोकप्रियता थोडी कमी झाली, पण जेव्हा भारताची अन्नधान्य-उत्पादनक्षमता कमी होती व अन्नधान्यसमस्या बिकट होती त्या काळात त्यांनी शोधून काढलेल्या गव्हाच्या अनेक वाणांमुळे भारतात गव्हाचे पीक वाढले हे नक्की [→ गहू].

गव्हाशिवाय पाल यांनी बटाटा व तंबाखू यांच्यावरही अधिक उत्पादनाच्या दृष्टीने संशोधन केले. विविध पिकांत आढळून येणाऱ्या संकरज ओजासंबंधीही (भिन्न प्रकारच्या वनस्पतींच्या संकरामुळे निर्माण झालेल्या नव्या प्रकारात मूळ वनस्पतींमध्ये आढळतो त्यापेक्षा अधिक जोम, अधिक रोगप्रतिकारक्षमता आणि परिसराशी जुळवून घेण्याची अधिक क्षमता यांसंबंधीही) त्यांनी खूप संशोधन केले. भारतात वनस्पतिप्रवेशन संघटना स्थापन करण्यात त्यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले. या संघटनेने भारतात ४०,००० च्या वर उपयुक्त वनस्पतींचे प्रकार प्रचारात आणले. आर्थिक दृष्ट्या त्यांतील काही वनस्पती भारताची उत्पादनक्षमता व समृद्धी वृद्धींगत करू शकतात, असे दिसून आले आहे.

पाल यांनी १९५६ साली जपानमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय आनुवंशिकी परिसंवादात आपले गव्हावरचे संशोधन प्रविष्ट केले. रोगांच्या प्रतिकारक्षमतेच्या बाबतीत संकरित गव्हाच्या प्रत्येक प्रकारात जनुकांचे [आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या गुणसूत्रावरील एककांचे  →जीन] दोन गट असतात. एका गटाची जनुके रोगाच्या जंतूंशी सरळ सामना करतात, तर दुसऱ्या गटातील जनुके रोगप्रतिकारक विक्रियांचेच दमन किंवा अंतर्निरोधन करतात. त्यामुळे गव्हाच्या कोणत्याही प्रकारात जनुकांच्या कोणत्या गटाचे आधिक्य आहे ह्यावरच त्या संकरित गव्हाच्या प्रकाराची रोगप्रतिकारक्षमता अवलंबून असते, असे त्यांनी या परिसंवादात सांगितले. त्याचप्रमाणे संकरज ओजाचा मक्यासारख्या परपरागित [→ परागण] वनस्पतींच्या बाबतीतच समुपयोग करता येतो असे नव्हे, गव्हासारख्या स्वपरागित वनस्पतींच्या बाबतीतही संकरज ओजाचा समुपयोग करता येतो, असेही पाल यांनी त्या परसंवादात सिद्ध करून दिले. तांबेरा रोगाची साथ पसरलेली असतानासुद्धा एन.पी. ८०० मालेतील गव्हाचे काही प्रकार पेरून दाणेदार गव्हाची निपज करता येते, हा त्यांच्या संशोधनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या संशोधनाने प्रभावित होऊन लंडनच्या रॉयल सोसायटीने १९७२ मध्ये पाल यांना सदस्य (फेलो) करून घेऊन त्यांचा सन्मान केला. खाद्यान्न देणाऱ्या वनस्पतींशिवाय पाल यांनी काही अलंकारिक किंवा शोभिवंत फुले देणाऱ्या वनस्पतींवरही संशोधन केले. द ब्युटिफुल क्लाइंबर्स ऑफ इंडिया हे त्यांचे पुस्तक १९६० मध्ये प्रकाशित झाले. गुलाबाच्या अनेकविध जाती त्यांनी संकरक्रियेने निर्माण केल्या. गुलाबांच्या अनेक प्रदर्शनात त्यांनी पारितोषिके मिळविली. ‘देहली प्रिन्सेस ’ व ‘द पंजाब बेल ’ हे गुलाबाचे प्रकार अतिशय लोकप्रिय झाले आहेत. द रोझ इन इंडिया   (भारतातील गुलाब) नावाचे गुलाबावरील पुस्तक त्यांनी १९६६ मध्ये प्रसिद्ध केले. व्हीट  (१९६६), कॅरोफायटा  (१९६६), फ्लॉवरिंग श्रबस  (१९६७) व बुगनविलियाज  (१९७४) ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. ह्या सहा पुस्तकांशिवाय त्यांचे १६० च्या वर संशोधनात्मक व माहितीपूर्ण लेख मान्यवर शास्त्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत.

संशोधन करण्याबरोबरच त्यांनी इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील कृषिविज्ञानाच्या व वनस्पततिविज्ञानाच्या पदव्युत्तर शिक्षणाचा उपयुक्त आकृतिबंध तयार केला. खेडोपाडी जाऊन कृषिविज्ञानातील संशोधित निष्कर्ष सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अनेक तरुण कृषि-पदवीधरांना प्रवृत्त केले. ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड, इटली, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हिएट रशिया या देशांत भरलेल्या अनेक शास्त्रीय संमेलनांत, परिषदांत, परिसंवादांत व चर्चासत्रांत भाग घेऊन पाल यांनी भारतीय कृषिवैज्ञानिक प्रतिनिधींचे नेतृत्व केले. फिलिपीन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन मंडळाचे ते एक विश्वस्त असल्यामुळे १९६७-७० या कालावधीत त्यांनी फिलिपीन्सला अनेकदा भेटी दिल्या.

अनेक मान्यवर शास्त्रीय संस्थांनी त्यांना आपले सदस्य करून घेतले आहे. लिनीअन सोसायटी ऑफ लंडन, रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटी (यू.के.), इंडियन बोटॅनिकल सोसायटी, इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग, फायटॉलॉजिकिल सोसायटी ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी यांसारख्या नामांकित संस्थांचे ते सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. ऑल-युनियन लेनिन ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, जेनेटिक्स सोसायटी ऑफ जपान आणि द जपान ॲकॅडमी ह्या संस्थांचे ते सन्माननीय सभासद आहेत. जपानमध्ये 1968 मध्ये भरलेल्या बाराव्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ जेनेटिक्सचे ते उपाध्यक्ष होते. पॅरिसमधील 1966 च्या युनेस्कोच्या कृषि-शैक्षणिक व कृषि-वैज्ञानिक मंडळाचे ते सभासद होते. द रोझ सोसायटी ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत. अनेक गुलाबपुष्पांच्या ज्ञानाबद्दल जाणत्यांनी त्यांना ‘द बेस्ट-नोन रोझेरियन’ अशी कौतुकास्पद उपाधी प्रदान केली आहे.

इ.स. १९४६ व १९५४ च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पतिविज्ञान व कृषिविज्ञान विभागाचे पाल अध्यक्ष होते. ह्याच संस्थेच्या बंगलोर येथे जानेवारी १९७१ मध्ये भरलेल्या वार्षिक अधिवेशनाचे ते मुख्य अध्यक्ष होते. इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडमीचे १९७५ मध्ये ते मुख्य अध्यक्ष होते.

पाल यांनी अनेक पारितोषिके, सन्मानचिन्हे, सन्माननीय पदव्या मिळविल्या. कृषिविज्ञान व वनस्पतिविज्ञानाचे रफी अहमद किडवाई मेमोरियल प्राइझ (१९६०), वनस्पतिविज्ञानाचे बिरबल सहानी सुवर्णपदक (१९६२), श्रीनिवास रामानुजन सुवर्णपदक (१९६४), ग्रँट पदक (१९७१) व बार्कली पदक (१९७१) ही त्यांतील काही महत्त्वाची मानचिन्हे होत. अनेक भारतीय शासकीय, शैक्षणिक व शास्त्रीय समित्यांचे ते सभासद आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते प्रथमपासून सभासद होते. भारत सरकारने १९५८ मध्ये पद्मश्री व १९६८ मध्ये पद्मभूषण हे किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९७० मध्ये पंजाब कृषी विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली. यानंतर सरदार पटेल विद्यापीठ, उत्तर प्रदेश कृषी विद्यापीठ आणि हरियाना कृषी विद्यापीठांनीही त्यांना सन्माननीय डी. एस्सी . ही पदवी दिली.

  चोरघडे, शं.ल.