भुईमूग : (हिं. मुंगफली गु. भुईमूग चणा, मगफली क. नेलागदळे सं. शिंबिका, स्नेहबीजक, भूचानक, भूमुद्र इं. पीनट, ग्राउंडनट, मंकीनट लॅ. ॲरॅचिस हायपोजिया कुल-लेग्युमिनोजी). या सुपरिचित शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) वनस्पतीचे मूलस्थान ब्राझील (द. अमेरिका) असावे, असे मानले जाते. तेथून या पिकाचा प्रसार पेरू व अर्जेंटिना या देशांत व तेथून जमेका, क्यूबा आणि इतर वेस्ट इंडीज बेटांत झाला. पोर्तुगीजांनी हे पीक आफ्रिकेत नेले व तेथून ते उत्तर अमेरिकेत गेले (अमेरिकेचा शोध लागण्यापूर्वी या पिकाची मेक्सिकोत लागवड होत असे). भारतात त्याची आयात पॅसिफिक समुद्रातील एका बेटातून सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली, असे मानण्यात येते.
भुईमूग हे खाद्य तेलाचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक समजले जाते. मनुष्याच्या आहारात स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचा स्वस्त पुरवठा भुईमुगातून होत असल्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. शिवाय भारताला त्यापासून परकी चलन मिळते.
वनस्पतिवर्णन : ही वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणारी) वनस्पती लहान झुडपासारखी (०.३०-०.६० मी. उंच) किंवा वेलीप्रमाणे वाढते. पाने एकाआड एक, संयुक्त, सोपपर्ण (उपपर्णयुक्त), पिसासारखी, गर्द अथवा फिकट हिरवी (५ × ७.५ सेंमी.) असून पर्णकांच्या सर्वसाधारणपणे दोन जोड्या असतात. क्वचित पाचवे पर्णक बारीक देठावर असते. प्रत्येक पर्णक व्यस्त अंडाकृती (३ × १.८ सेंमी.) असते. फुलोरा पानांच्या बगलेत येतो. फुले लहान, पिवळी पतंगरूप [⟶ अगस्ता], एक एकटी अथवा सु. तीनच्या झुपक्यात असतात. केसरदलांचा संच असतो. परागणानंतर (परागसिंचनानंतर) किंजपुटाच्या तळाशी असलेला किंजधर (देठ) लांब वाढतो व तो किंजपुटाला हळूहळू जमिनीत पुढे ढकलतो [⟶ फूल]. किंजपुट गुरूत्वानुवर्तिनी (जमिनीच्या दिशेने वाढणारे) असतात व जमिनात शिरल्यावर त्यांचे रूपांतर फळांत (शिंबा, शेंगा) होते. शेंग फुगीर, लांबट (३.५ × १.५ सेंमी.), जाड अथवा पातळ टरफलाची, वाळल्यावर न तडकणारी असून तीत सर्वसाधारणपणे दोन-तीन व केव्हा केव्हा एक अथवा चार बिया (शेंगदाणे) असतात. दाण्याच्या बाह्यवरणाचा (बीज चोल) रंग प्रकाराप्रमाणे गुलाबी, लाल, पांढरा, जांभळा अथवा काळ्या ठिपक्यांनी युक्त असतो. इतर सामान्य लक्षणे ⇨लेग्युमिनोजी (फॅबेसी उपकुल-पॅपिलिऑनेटी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.
परांडेकर. शं. आ.
क्षेत्र व उत्पादन : जागतिक :जगातील सु. ८२ देशांत भुईमुगाची लागवड केली जाते. १९७८ साली जगात भुईमुगाखाली १.८९ कोटी हे. क्षेत्र होते आणि १.८८ कोटी टन शेंगांचे उत्पन्न झाले. त्यांपैकी सर्वात जास्त म्हणजे ७२ लक्ष हे. क्षेत्र (सु. ३८%) आणि ६२ लक्ष टन उत्पादन (सु. ३३%) भारतात होते. भुईमूग पिकविणाऱ्या इतर प्रमुख देशांतील क्षेत्र (लक्ष हेक्टर) व उत्पादन (लक्ष टन) पुढीलप्रमाणे होते : चीन २४.५५ व २८.८३ अमेरिकेची संयुक्त संस्थाने ६.१२ व १८.०९ सेनेगल ९.७ व १०.२१ नायजेरिया ९.५८ व ७.०० सूदान ८.११ व ८.५० ब्रह्मदेश ५.७ व ४.५० इंडोनेशिया ५.१ व ६.८७ अर्जेंटिना ४.२८ व ३.७०. खंडांचा विचार करता आशिया खंडात या पिकाखाली सर्वांत जास्त क्षेत्र आहे आणि त्याखालोखाल ते आफ्रिका खंडात आहे. भारतात भुईमुगाचे क्षेत्र सर्वांत जास्त असले, तरी हेक्टरी उत्पादनात त्याचा क्रमांक दहावा आहे. भारतात हेक्टरी उत्पादन सु. ९०० किग्रॅ. आहे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत ते २,७०० किग्रॅ आहे.
भारत : १८५० च्या सुमारास त्या वेळच्या मद्रास इलाख्यातील दक्षिण अर्काट जिल्ह्यात १,६०० हेक्टर क्षेत्रात या पिकाची लागवड होती. १८९० पर्यंत ती १ लक्ष हेक्टरपर्यंत पोहोचली. त्यानंतर ६-७ वर्षांनी रोगांमुळे उत्पादनात घट येऊ लागल्यामुळे क्षेत्र कमी होऊ लागले. त्यानंतर अमेरिकेतून आणि जपानमधून भुईमुगाच्या नवीन प्रकारांची आयात केली गेली. त्यापूर्वी लागवडीत असलेल्या ‘देशी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रकारांपेक्षा त्यांचे उत्पादन जास्त असल्यामुळे आणि परदेशात भुईमूग व भुईमुगाच्या पदार्थांना मागणी वाढत गेल्यामुळे देशातील क्षेत्र झपाट्याने वाढत गेले. १९५०-५१ मध्ये ४४.९४ लक्ष हेक्टर क्षेत्र आणि ३४.८१ लक्ष टन (शेंगा) उत्पादन होते. १९७८-७९ मध्ये ७५.४८ लक्ष हेक्टर क्षेत्र होते आणि ६३.८७ लक्ष टन उत्पादन झाले. त्या वर्षी गुजरात राज्यात सर्वांत जास्त क्षेत्र (२०,३९,००० हेक्टर) व उत्पादन (१८,२७,००० टन) होते. भुईमूग पिकविणारी इतर राज्ये आणि त्यांतील १९७८-७९ मधील क्षेत्र (हजार हेक्टर) व उत्पादन (हजार टन) पुढीलप्रमाणे होते : आंध्र प्रदेश (१,२६३ व १,१२९), उत्तर प्रदेश (३१८ व १८०), ओरिसा (१५१ व २२५), कर्नाटक (९४४ व ७७४), तमिळनाडू (९९० व १,१४६), पंजाब (१२९ व ११४), मध्य प्रदेश (४४८ व २३८). महाराष्ट्र (७९५ व ४७८) आणि राजस्थान (३८५ व २३८). वरील दहा राज्यांतच देशातील भुईमुगाखालील जवळजवळ सर्व क्षेत्र होते. हेक्टरी उत्पादन ओरिसात १,४९० किग्रॅ., तमिळनाडूत १,१५८ किग्रॅ. आणि गुजरात व आंध्र प्रदेशात ते सु. ८९० किग्रॅ. होते. महाराष्ट्रात ते बरेच कमी (६०१ किग्रॅ.) होते. एकूण भारताचे हेक्टरी उत्पादन ८३५ किग्रॅ. होते.
भारतातील गळित धान्यांच्या एकूण क्षेत्रापैकी सु. ५० % क्षेत्र आणि तेलाच्या उत्पादनापैकी सु. ७० % उत्पादन भुईमुगाचे असते. देशातील भुईमुगाच्या क्षेत्रात व उत्पादनात १९७०-८० या दहा वर्षांत फरक पडलेला नाही. १९३०-३१ या वर्षाशी तुलना करता हेक्टरी उत्पादन १,००३ किग्रॅ.वरून ८३० किग्रॅ.पर्यंत खाली घसरले आहे.
कोकणात आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत भुईमुगाखाली फारच थोडे क्षेत्र आहे. इतर सर्व जिल्ह्यांत ते कमी जास्त प्रमाणात आहे. धुळे, जळगाव, नासिक, सातारा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद हे भुईमुगाच्या उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आहेत. १९८१-८२ मध्ये महाराष्ट्रात एकूण उत्पादन ४,३४,८०० टन व हेक्टरी उत्पादन ६४३ किग्रॅ. होते.
प्रकार : भुईमुगाच्या लागवडीतील प्रकारांत उपट्या, निमपसऱ्या आणि पसऱ्या असे प्रमुख भेद आहेत. उपटे प्रकार हळवे (तीन ते चार महिन्यांत तयार होणारे) असून त्यांची झाडे सरळ वाढतात. पानांचा रंग फिकट हिरवा असतो. शेंगा झाडाच्या बुंध्यापाशी झुपक्यात धरतात व त्या लहान अथवा मध्यम आकारमानाच्या असून त्यांत एक ते दोन वाटोळे, फिकट गुलाबी अथवा लाल दाणे असतात. शेंगांचे टरफल पातळ असते. शेंगा तयार झाल्यावर त्यातील दाणे पेरल्यास १०-१५ दिवसांत उगवतात म्हणजेच त्यात ⇨प्रसुप्तावस्था नसते. पसरे आणि निमपसरे प्रकार गरवे (चार ते सहा महिन्यांत तयार होणारे) असून त्यांच्या झाडांच्या फांद्या जमिनीच्या पृष्ठभागावर कमीजास्त प्रमाणात पसरत जातात व त्यांना जागोजाग जमिनीत शेंगा धरतात. पाने गर्द हिरव्या रंगांची असतात. शेंगेत लांबट व तपकिरी रंगाचे एक ते तीन दाणे असून पीक तयार झाल्यावर प्रसुप्तावस्थेच्या काही काळानंतरच ते उगवू शकतात. शेंगांचे टरफल उपट्या प्रकारांपेक्षा जाड असते. पसरे व निमपसरे प्रकार उपट्या प्रकारांपेक्षा जास्त उत्पन्न देतात परंतु उपट्या प्रकारातील शेंगांचे टरफल पसऱ्या प्रकारापेक्षा पातळ असल्यामुळे त्यांतील शेंगांशी दाण्यांचे शेकडा प्रमाण पसऱ्या प्रकारांपेक्षा सर्वसाधारणपणे जास्त असते. केवळ पावसावर अवलंबून असणारे पीक साधारणपणे पसऱ्या प्रकारांचे व बागाईताखालील जमिनीत एकापेक्षा जास्त पिके घेतात तेथे बहुधा उपट्या प्रकारची केली जाते. महाराष्ट्रात सु. ८.५ लक्ष हेक्टर क्षेत्रात भुईमुगाची लागवड करण्यात येते. यापैकी सु. ८.५ लक्ष हेक्टर क्षेत्रात भुईमुगाची लागवड करण्यात येते. यापैकी सु. ५.५ लक्ष हेक्टर क्षेत्रात उपट्या प्रकारांची लागवड होते. खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग हे उपट्या प्रकारांच्या लागवडीचे महत्त्वाचे प्रदेश आहेत. मराठवाड्याच्या बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यांना दोन्ही मॉन्सून पावसांचा फायदा मिळत असल्यामुळे त्या जिल्ह्यांत पसऱ्या प्रकारांची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.
व्यापारी प्रकार : भारतातील भुईमुगाच्या लागवडीखालील प्रमुख व्यापारी प्रकारांची आयात विसाव्या शतकाच्या आरंभी करण्यात आली. यांपैकी कोरोमंडल व बोल्ड अथवा बिग जपान हे प्रकार पसरे असून पीनट व रेड नाताल हे प्रकार उपटे आहेत. कोरोमंडल प्रकाराचा दाणा मध्यम लांब, बोल्ड प्रकाराचा लांब व आकारमानाने मोठा व पीनट प्रकाराचा लहान व वाटोळा असतो. रेड नाताल प्रकाराच्या दाण्याची साल गर्द लाल रंगाची असून त्याच्या तेलालाही विशिष्ट रंग असतो. पीनट प्रकार बाजारात स्पॅनिश पीनट व खानदेश या नावांनीही निरनिराळ्या भागांत ओळखला जातो. हा प्रकार तेलाच्या उत्पादनाच्या बाबतीत श्रेष्ठ प्रतीचा समजला जातो कारण त्यात तेलाचे प्रमाण जास्त असते व तेलही इतर प्रकारांच्या तेलापेक्षा फिकट रंगाचे असते.
सुधारित प्रकार : महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेले भुईमुगाचे सुधारित प्रकार व त्यांचे गुणधर्म कोष्टकात दिलेले आहेत.
महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेले भुईमुगाचे सुधारित प्रकार |
|||||
प्रकार |
वाढीचीतऱ्हा |
पेरणीपासून पीकतयार होण्यास लागणारे दिवस |
हेक्टरीउत्पादन (शेंगा)(किग्रॅ) |
शेंगांशीदाण्यांचे प्रमाण % |
दाण्यांशीतेलाचे प्रमाण % |
एके १२-२४ |
उपट्या |
१०० |
१,२५० |
७०-७१ |
४९ |
एसबी-११ |
उपट्या |
१००-११० |
१,१०० ते १,२०० |
७९ |
५१ |
कोपरगाव-३ |
उपट्या |
१०५ |
९०० |
६६ |
४७ |
फुले प्रगती |
उपट्या |
८५-९० |
१,३०० ते १,८०० |
७५ |
५०.७ |
कोपरगाव-१ |
निमपसऱ्या |
१२० |
१,०२० |
७२ |
४७.५ |
टीएमव्ही-१० |
निमपसऱ्या |
१२०-१२५ |
२,००० ते २,१०० |
७३ |
४९.५ |
कऱ्हाड ४-११ |
पसऱ्या |
१४० |
१,७०० |
५७ |
४८ |
एम-१३ |
पसऱ्या |
१२०-१२५ |
१,६५० ते १,७०० |
७० |
४९ |
फुले प्रगती हा लवकर तयार होणारा व जास्त उत्पादन देणारा उपट्या प्रकार महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तैवान सिलेक्शन ९ या प्रकारापासून निवड पद्घतीने नव्याने विकसित केला आहे. याची पाने मोठी व गर्द हिरव्या रंगाची असतात. शेंगेचा पृष्ठभाग काहीसा गुळगुळीत असून टरफल मध्यम जाडीचे असते. शेंगेची चोच स्पष्ट असते व सर्वसाधारणपणे शेंगेत गुलाबी रंगाचे, मध्यम आकारमानाचे दोन दाणे असून १०० दाण्यांचे वजन ४२ ते ५६ ग्रॅ. असते. गुजरात राज्यात हा प्रकार जेएल २४ (बंच) या नावाने लागवडीसाठी शिफारस केला गेला आहे.
मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने किरणीयनाने (गॅमा किरणांसारखे अतिशय भेदक किरण टाकण्याच्या पद्धतीने) उत्परिवर्तन घडवून (आनुवंशिक लक्षणांत बदल घडवून) भुईमुगाचे नवीन प्रकार निर्माण केले आहेत. यांपैकी टीजी-१ (विक्रम) हा प्रकार मान्यताप्राप्त झाला असून १९७३ मध्ये तो लागवडीसाठी देण्यात आला. याच्या झाडाला फांद्या पुष्कळ येतात त्यामुळे तो ४५ × २० सेंमी. अंतरावर लावणे आवश्यक असते. पेरणीपासून शेंगा तयार होण्यास १३० दिवस लागतात. चांगला व नियमित पाऊस अथवा पाणी देण्याची सोय असलेल्या भागातच तो लागवडीसाठी योग्य आहे. हेक्टरी उत्पादन २,६५० किग्रॅ.पर्यंत मिळते. शेंगांशी दाण्यांचे प्रमाण ६७ ते ७२% आणि दाण्यातील तेलाचे प्रमाण ४७ ते ४८% असते. टीजी-३ हाही असाच आणखी एक प्रकार आहे. महाराष्ट्राखेरीज इतर राज्यांत लागवडीसाठी देण्यात आलेले भुईमुगाचे सुधारित प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : आंध्र प्रदेश-कादिरी २, ३ आणि ७१ – ७ तमिळनाडू-पिओएल १ आणि २, टीएमव्ही-८, ९, १०, ११ आणि १२, सीओ-१ कर्नाटक-एस-२०६ आणि २३०, डीएच ३३० व केआरजी १ गुजरात-जीएयूजी १ आणि १०.
हवामान : उत्तरेस ४५ व दक्षिणेस ३५ या अक्षांशांमधील उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत व समुद्रसपाटीपासून १,०५० मी.पर्यंतच्या उंचीवरील प्रदेशात भुईमूग पिकतो. वार्षिक ५० सेंमी.पासून १२५ सेंमी. पर्यंत पाऊस पडणाऱ्या प्रदेशात या पिकाची लागवड होऊ शकते परंतु विभागून पडणाऱ्या वार्षिक ६२ ते १२५ सेंमी. पावसाच्या प्रदेशात हे पीक चांगले येते. थंडीचा कडाका, जास्त मुदतीचा पाण्याचा अभाव अगर जमिनीत पाणी साचणे या गोष्टी या पिकाला अपायकारक आहेत. सतत व जास्त प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे झाडांची वाढ वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात होते व त्यामुळे त्यांना शेंगा कमी प्रमाणात धरतात. मात्र काळजीपूर्वक लागवड केल्यास कोकणातही भुईमुगाचे खरीप पीक चांगले येते, असे आढळून आले आहे.
जमीन : रेताड दुमट, दुमट अथवा चांगला निचरा होणाऱ्या काळ्या जमिनीत हे पीक चांगले येते. भारी चिकण जमीन या पिकाला योग्य नाही. परागणानंतर किंजपुट (आर) भुसभुशीत जमिनीत सुलभ रीतीने शिरते. शेंगांची वाढ चांगली होते. शेंगा खणून काढणेही सोपे जाते. जमिनीचे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] ६ ते ६.४ असावे.
हंगाम : सर्वसाधारणपणे हे पीक खरीप हंगामात कोरडवाहू घेतले जाते. पर्जन्यमानानुसार पेरणी एप्रिल-मे अगर जून-जुलैमध्ये करतात. महाराष्ट्रात व दक्षिणेकडील राज्यांत हे पीक खरीप हंगामाखेरीज जानेवारी-मार्चच्या आणि मे-जुलैच्या दरम्यान बागाईताखाली घेतात. कोकण भागात वरकस जमिनीत नागली, कोद्रा व इतर बारीक तृणधान्यांपेक्षा भुईमुगाचे पीक जास्त फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे.
फेरपालट : भुईमुगाचे पीक कापूस, ज्वारी, बाजरी, हरभरा, एरंड व भात या पिकांच्या फेरपालटीत घेतात आणि ते बहुधा स्वतंत्र पीक म्हणून घेतात परंतु केव्हा केव्हा याबरोबर एरंड, कापूस, तूर, बाजरी वगैरे पिके मिश्रपीक म्हणूनही घेतात. कापूस-ज्वारी-भुईमूग, अशी फेरपालट मध्य व दक्षिण भारतात विशेषेकरून आढळून येते. कमी पावसाच्या प्रदेशात लागोपाठ भुईमुगाचेच पीक घेतात.
पूर्व मशागत व खत : पूर्वीचे पीक काढल्यावर जमीन नांगरून पेरणीच्या आधी तीन-चार कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करतात. सर्वसाधारणपणे पेरणीपूर्वी हेक्टरी ५ ते १२.५ टन शेणखत व राख जमिनीत मिसळतात. रेताड जमिनीत गाळाची माती हेक्टरी ३७.५ ते ५० टन या प्रमाणात तीन ते पाच वर्षांतून एकदा घालतात. जेव्हा भुईमुगाचे पीक फेरपालटात घेतात त्या वेळी आधीच्या पिकाला खत देऊन जमिनीतील त्याच्या शेष भागावर (बेवडावर) भुईमुगाचे पीक घेण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील प्रयोगांवरून पेरणीपूर्वी हेक्टरी २५ किग्रॅ. नायट्रोजन व ५० किग्रॅ. फॉस्फरस देण्याची आणि पीक ४० ते ४५ दिवसांचे असताना हेक्टरी १० किग्रॅ. यूरिया १०० लि. पाण्यात मिसळून ते मिश्रण पानांवर फवारण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
पेरणी : पेरणीपूर्वी काही दिवस अगोदर पूर्ण वाळलेल्या व भरलेल्या शेंगा फोडून शेंगा फोडून बी (दाणे) काढतात. त्यांना १% पारायुक्त कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारे द्रव्य) १ किग्रॅ. बियांना २ ग्रॅम या प्रमाणात चोळून पेरणीसाठी वापरतात. भुईमुगीची लागवड नसलेल्या जमिनीत नव्याने भुईमूग पेरते वेळी बियांबरोबरच दाणेदार स्वरूपातील सूक्ष्मजंतुसंवर्धक (जीवाणू संवर्धक) स्वतंत्रपणे पेरतात. कारण बियांना पारायुक्त कवकनाशक चोळून त्यावर सूक्ष्मजंतुसंवर्धक लावल्यास त्यातील सूक्ष्मजंतूंचा नाश होण्याची शक्यता असते. खरीप हंगामाची पेरणी जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर करतात. उपट्या प्रकारांचे हेक्टरी बियांचे प्रमाण १०० ते १२५ किग्रॅ. असते. निमपसऱ्या व पसऱ्या प्रकारांचे हेक्टरी बी ८० ते ९० किग्रॅ. लागते. उपट्या प्रकारांसाठी दोन ओळींतील अंतर ३० सेंमी. व दोन झाडांमधील अंतर १० ते १५ सेंमी. आणि पसऱ्या प्रकारांसाठी दोन ओळींत ४५ सेंमी. व दोन झाडांत १५ सेंमी. अंतर ठेवतात. पेरणी पाभरीने अथवा टोकण पद्धतीने जमिनीला पुरेशी ओल असताना ५ सेंमी. खोल करतात.
आंतर मशागत, पाणी व तण काढणे : पीक पंधरा दिवसांचे झाल्यावर फुले येईपर्यंत एक निंदणी व दोन कोळपण्या देतात. झाडाला आरा आल्यावर कोणतीही आंतर मशागत करीत नाहीत. पीक ४० दिवसांचे झाल्यावर एकदा आणि त्यानंतर १०-१५ दिवसांनी पुन्हा एकदा तेलाचे मोठे रिकामे पिंप (ड्रम) पिकावर फिरविल्याने जमिनीत शिरणाऱ्या आरांचे प्रमाण वाढते.
पावसाने ताण दिल्यास पिकाला एक-दोन वेळा पाणी द्यावे लागते. जमीन कोरडी झाल्यास शेंगा नीट पोसत नाहीत व उत्पादन घटते. हलक्या जमिनीत ३०० मिग्रॅ. बोरिक अम्ल ५०० लि. पाण्यात मिसळून पीक ३० आणि ५० दिवसांचे असताना फवारल्यास उत्पादनात १५% वाढ होते.
तणाच्या बंदोबस्तासाठी लासो व टोक-२५ ही तणनाशके अतिशय प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.
रोग व किडी : रोग : यावर टिक्का, मूळकूज, तांबेरा व पर्णगुच्छ हे महत्त्वाचे रोग आढळून येतात.
टिक्का : सर्कोस्पोरा पर्सोनॅटा व स. अरॅचिडिकोला या दोन कवकांमुळे होणारा हा रोग भारतात सर्वत्र आढळून येतो आणि विविध रोगांमुळे भुईमुगाच्या पिकाचे जेवढे नुकसान होते त्यापैकी सु. ५०% नुकसान या रोगामुळे होते. पानांवर असंख्य तपकिरी रंगाचे व सभोवती फिकट पिवळ्या रंगाचे वलय असलेले ठिपके आढळतात आणि पाने गळून पडतात. हा रोग पीक फुलावर येण्याच्या सुमारास सुरू होतो व हळूहळू वाढत जातो. पावसाळी हवामानात हा रोग झपाट्याने वाढतो व त्यामुळे शेंगा नीट पोसत नाहीत.
उपाय : भुईमुगाचे पीक काढल्यावर शेतातील सर्व पालापाचोळा गोळा करून जाळून टाकतात. पिकाची फेरपालट करतात. पिकावर १% बोर्डो मिश्रण तीन ते चार आठवड्यांच्या अंतराने दोन ते तीन वेळा हेक्टरी ३०० ते ६०० लि. या प्रमाणात फवारतात (पीक लहान असताना ०.४% शक्तीचे बोर्डो मिश्रण फवारतात) किंवा ३०० मेश गंधक हेक्टरी २४ ते २९ किग्रॅ. प्रमाणे दोन ते तीन वेळा पिस्कारल्याने रोगाचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते. पहिली फवारणी अगर पिस्कारणी रोग पडण्यापूर्वी करणे आवश्यक असते.
मूळकूज : मॅक्रोफोमिना फेसिओलाय या कवकामुळे खोडाचा जमिनीलगतचा भाग आणि मुळांचा आतील भाग तपकिरी रंगाचा होतो, लहान लहान मुळे कुजतात व झाड एकाएकी संपूर्णपूणे वाळते. जास्त वयाच्या झाडाचा जमिनीलगतचा भाग काळा पडतो व पिंजल्याप्रमाणे दिसतो. काळ्या पडलेल्या भागावर कवकाच्या अतिशय बारीक गुठळ्या (जालाश्म) दिसून येतात.
उपाय : पिकांची फेरपालट, पेरणीपूर्वी बियांना पारायुक्त कवकनाशक लावणे व रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड हे उपाय आहेत.
तांबेरा : पक्सिनिया अरॅचिडिस या कवकामुळे होणाऱ्या रोगामुळे भारताच्या काही भागांत विशेष नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
उपाय : १ किग्रॅ. डायथेन एम ४५ हे कवकनाशक ५०० लि. पाण्यात मिसळून फवारतात. दोन आठवड्यांनंतर दुसरी फवारणी करतात.
पर्णगुच्छ : हा व्हायरसजन्य रोग आहे. रोगामुळे लहान आकारमानाची पाने व फांद्या येतात आणि शेंड्याजवळ अनेक लहान पिवळी पाने व फांद्या येऊन झाडाला गुच्छाप्रमाणे आकार प्राप्त होतो. रोगट झाडांची वाढ खुंटते व त्यांना शेंगा धरत नाहीत. रोगाचा प्रसार मावा या किडीमार्फत होतो.
उपाय : रोगट झाडे शेतात दिसू लागताच ती उपटून नष्ट करतात. माव्यासाठी कीटकनाशकांचा वापर केल्याने रोगाला आळा बसतो.
किडी : भुईमुगावर भारतात ४४ प्रकारच्या किडी आढळून येतात. महाराष्ट्रात या पिकावर मावा, पाने गुंडाळणारी अळी, ढेकण्या, हुमणी व वाळवी या प्रमुख किडी आहेत.
मावा : (ॲफिस कॅसिव्होरा). ही कीड अनेक पिकांवर आणि सर्व देशभर आढळून येते. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकात ती भुईमुगाच्या पानांतील रस शोषून नुकसान करते. किडीचे प्रमाण कमी असल्यास झाडे कमजोर बनतात व त्यांचे प्रमाण फार असल्यास झाडे वाळतात.
उपाय : पिकावर ५% बीएचसी भुकटी हेक्टरी २४-२९ किग्रॅ. पिस्कारतात अथवा ४०% निकोटीन सल्फेट १ : ८०० या प्रमाणात पाण्यात मिसळून हेक्टरी ४८० ते ७२० लि. याप्रमाणे फवारतात अथवा फॉस्फोमिडॉन ८५% प्रवाही किंवा डायमेथोएट ३०% प्रवाही किंवा मिथिलडिमेटॉन २५% प्रवाही किंवा थायोमेटॉन २५% प्रवाही किंवा मॅलॅथिऑन ५०% प्रवाही यांपैकी कोणतेही कीटकनाशक शिफारस केलेल्या प्रमाणात पाण्यात पाण्यात मिसळून पिकावर फवारतात.
पाने गुंडाळणारी अळी : (स्टेमोप्टेरिक्स नर्टेरिया ). आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांत ही कीड बरीच नुकसान करते व महाराष्ट्रातही या किडीचे प्रमाण वाढत आहे. अळी लहान असताना पानांच्या वरचा पापुद्रा पोखरते आणि मोठी झाल्यावर पानांची गुंडाळी करून तीत राहते व पानांवर उपजीविका करते. पाने वाळतात व उत्पादन घटते.
उपाय : ५% डीडीटी भुकटी हेक्टरी २४ ते २९ किग्रॅ. या प्रमाणात पिस्कारतात अथवा ५०% कार्बारिल २ किग्रॅ. ५०० लि. पाण्यात मिसळून फवारतात अथवा १०% कार्बारिल भुकटी १० किग्रॅ. आणि १०% बीएचसी भुकटी १० किग्रॅ. मिसळून पिस्कारतात. या अळीचे पतंग दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षिले जातात व या तत्त्वाचा फायदा घेऊन त्यांचा नाश करतात.
ढेकण्या : (अफॅनस सॉर्डिडस ). पूर्ण वाढलेले ढेकूण फिकट तपकिरी अथवा गर्द तपकिरी रंगाचे असून शेंगा काढल्यावर शेतात अथवा खळ्यात शेंगांतील स्निग्ध पदार्थ शोषून घेतात आणि त्यामुळे शेंगातील तेलाचे प्रमाण कमी होते. गुदामातही ही कीड आढळून येते.
उपाय : शेंगा काढल्यावर त्यांचा ढीग रचतात व तो ताडपत्रीने अथवा गवताने झाकून ठेवतात. [⟶ मकळी].
हुमणी : (स्फेनोप्टेरा परोटेट्टी ). ही भुंगेरे वर्गातील कीड असून केव्हा केव्हा फार नुसकान करते. भुईमुगाखेरीज इतर पिकांवर आणि बाभळीच्या व कडुनिंबाच्या झाडांवर या किडीचा प्रौढावस्था उपजीविका करते. भुईमुगाच्या पिकाचे नुकसान किडीची अळी करते. ती मळकट पांढऱ्या रंगाची असून तिचे डोके पिवळसर व चपटे असते. ती जमिनीत राहून भुईमुगाच्या जमिनीलगतच्या खोडाचा भाग व सोटमूळ पोखरते आणि त्यामुळे झाड वाळते.
उपाय : पीक काढल्यावर खोल नांगरट करून किडीच्या अळ्या वेचून जाळतात. पेरणीपूर्वी शेतात बीएचसी १०% भुकटी हेक्टरी ११५ किग्रॅ. किंवा ५% क्लोरोडेन किंवा हेप्टॅक्लोर भुकटी हेक्टर ६५ किग्रॅ. या प्रमाणात जमिनीत मिसळतात. शेणखताच्या खड्ड्यावर पावसाळ्यापूर्वी बीएचसी भुकटी टाकतात.
वाळवी : पोयट्याच्या अथवा वाळुसर पोयट्याच्या जमिनीत पावसाच्या पाण्यावर घेतल्या जाणाऱ्या पिकावर या किडीचा जास्त उपद्रव होतो.
उपाय : पेरणीपूर्वी १०% बीएचसी, ५% क्लोरोडेन, आल्ड्रीन किंवा हेप्टॅक्लोर हेक्टरी ४० ते ५० किग्रॅ. या प्रमाणात जमिनीत मिसळतात.
उन्हाळी हंगामातील लागवड : भारतातील खाद्य तेलांचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने भुईमुगाच्या उन्हाळी हंगामातील लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे काम शासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासनाने याकरिता बियाणे, बीज प्रक्रिया, कीटकनाशके व त्यांची फवारणी याबाबतींत काही सवलत व अनुदाने जाहीर केली आहेत. १९७९-८० साली महाराष्ट्रात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र २४,००० हेक्टर होते. १९८०-८१ मध्ये ते ६५,००० व १९८१-८२ मध्ये १,२१,००० हेक्टरपर्यंत वाढले.
उन्हाळी हंगामात उपट्या व पसऱ्या (किंवा निमपसऱ्या) प्रकारांची लागवड करतात. एसबी -११ या १००-११० दिवसांत तयार होणाऱ्या उपट्या प्रकाराची पेरणी जानेवारी-फेब्रुवारी थंडीचे प्रमाण कमी झाल्यावर करतात. कोकणात थंड कमी असल्यामुळे १५ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत पेरणी करता येते. सोलापूर, अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यांत पाटाच्या पाण्याखाली मार्च-एप्रिलमध्ये पेरणी करून ऑगस्टमध्ये पीक काढतात. १३५-१४५ दिवसांत तयार होणाऱ्या टीएमव्ही-१० अथवा एम १३ या निमपसऱ्या आणि कऱ्हाड ४-११ या पसऱ्या प्रकारांची वरील जिल्ह्यांत लागवड करतात. जमिनीची मशागत, हेक्टरी बी, खताची मात्रा व ते देण्याची पद्धत खरीप पिकाप्रमाणेच असतात. पिकाला जरूरीप्रमाणे पाणी देतात. साधारणपणे ८-१० वेळा पाणी द्यावे लागते. उन्हाळी पिकावर रोग व किडींचा उपद्रव खरीप पिकापेक्षा बराच कमी असतो. पाने गुंडाळणारी अळी वाढत्या प्रमाणात आढळून येत आहे. मावा, ढेकण्या, हुकमी यांचाही प्रादुर्भाव कमीजास्त प्रमाणात आढळून येतो.
उन्हाळी पिकीचे उत्पादन खरीप पिकापेक्षा दीड ते दोन पटीने (हेक्टरी १८-२० क्विंटलपर्यंत) मिळते.
काढणी : पिकांची खालची पाने पिवळी पडून कोमेजून गळू लागल्यावर आणि बहुसंख्य शेंगांतील दाण्यांवर तांबूस झाक आल्यावर अथवा शेंगेच्या टरफलांची आतील बाजू काळी पडल्यावर पीक काढणीस तयार झाले असे समजतात. यासाठी शेतातील काही झाडे उपटून पाहतात. अपक्व शेंगा काढल्यास त्या वाळल्यावर पोचट होतात. उपट्या प्रकारातील शेंगा काढावयास उशीर झाल्यास त्यांतील दाण्यांना जमिनीतच कोंब फुटून मालाचा दर्जा खालावतो.
जमिनीत पुरेशी ओल असल्यास उपट्या प्रकारांची झाडे सर्व शेंगांसह हाताने उपटून निघतात. जमीन वाळली असल्यास कुळवाने अगर कोळप्याने शेंगांसह झाडे काढतात. झाडे वाळल्यावर शेंगा हाताने तोडतात अथवा झाडे आपटून शेंगा मोकळ्या करतात. पसऱ्या प्रकारांच्या शेंगांची काढणी उपट्या प्रकाराइतकी सोपी नसते फावड्याने, नांगराच्या अथवा कुळवाच्या साहाय्याने झाडे खणून काढावी लागतात. नंतर झाडांना लागलेल्या तसेच जमिनीतील शेंगा वेचून काढतात. जमीन वाळलेली असल्यास शेतात पाणी देऊन काढणी करतात. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेंगा खणून काढण्याची यंत्रसामग्री पंजाब कृषी विद्यापीठाने तयार केली आहे. या यंत्राने शेंगा काढल्या जातात व त्यांना लागलेली माहिती अलग केली जाते. काढणीनंतर शक्य तेवढ्या लवकर शेंगा वाळविणे आवश्यक असते. वाळविलेल्या शेंगातील जलांश ८% पेक्षा कमी असावा.
साठवणी : काढणीनंतर शेंगा सर्वसाधारणपणे तीन-चार आठवड्यांत विकल्या जातात. फक्त सधन शेतकरी जास्त किंमतीच्या अपेक्षेने तीन-चार महिन्यांपर्यंत माल ठेवून देतात.
पुढील हंगामात पेरणीसाठी सात ते आठ महिन्यांपर्यंत शेंगा साठवून ठेवाव्या लागतात. त्या रांजणात अथवा शेणाने सारविलेल्या बांबूच्या कणग्यांत तोंडे बंद करून व वर मातीने लिंपून ठेवतात. ही पद्धत फार चांगली असल्याचे आढळून आले आहे. मोठ्या प्रमाणावर साठविण्यासाठी शेंगदाण्यांपेक्षा शेंगा जास्त पसंत करतात व त्या चांगल्या वाळवून ठेवतात (दाण्यांत जलांश ५% पेक्षा जास्त नसावा). दाणे साठवावयाचे असल्यास ते कमीत कमी मुदतीसाठी साठवितात व त्यांतील तुटके दाणे बाजूला काढतात. फरशीवर वाळूचा ३० सेंमी. जाडीचा थर पसरून त्यावर पोत्यांची थप्पी रचतात. थप्पीमध्ये सर्वसाधारणपणे १० पेक्षा जास्त पोती ठेवल्यास वजनामुळे दाणे दबले जातात. पोत्यांच्या निरनिराळ्या थप्प्यांमध्ये आणि भिंत व पोत्यांची थप्पी यांमध्ये ४५ ते ६० सेंमी. अंतर ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
उत्पादन : उपट्या प्रकारांचे हेक्टरी उत्पादन सर्वसाधारणपणे ८०० ते १,००० किग्रॅ. असते. निमपसऱ्या प्रकारांत ते १,००० ते १,२०० किग्रॅ. आणि पसऱ्या प्रकारांत १,५०० ते १,७०० किग्रॅ. असते. बागायती पिकाचे उत्पादन सु. ३,००० किग्रॅ.पर्यंत असते. शेगांशी दाण्यांचे प्रमाण ७० ते ७५% असते व दाण्यातील तेलाचे प्रमाण प्रकाराप्रमाणे ४५ ते ५५% असते. ओल्या शेंगा वाळल्यावर त्यांचे वजन ४० टक्क्यांनी घटते.
शेंगा फोडणे : शेंगा फोडून त्यांतील दाणे काढण्याचे काम हाताने अगर यंत्राच्या साहाय्याने करण्यात येते. हाताने शेंगा फोडण्याच्या पद्धतीत अर्धवट वाळलेल्या अथवा पाण्यात प्रथम भिजविलेल्या शेंगा खळ्यावर पसरून काठ्यांनी बडवून सुपात पाखडून दाणे वेगळे काढण्यात येतात परंतु या पद्धतीत छकले झालेल्या दाण्यांचे प्रमाण जास्त असते, दाणे काढावयास वेळ लागतो व मेहनतीच्या मानाने काम थोडे होते. शिवाय दाण्यांत जलांशाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते लवकर खराब होतात. शेंगा फोडण्याची हातयंत्रे आणि एंजिनावर चालणारी यंत्रे भारतातच तयार होतात व ती मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. यंत्रामुळे वेळेत व मेहनतीत बचत होते, दाणे जास्त प्रमाणात फुटत नाहीत आणि त्यांच्यावरील पातळ सालपट दुखावले जात नाही. हातयंत्राने दररोज सु. ४०-५० किग्रॅ. व एंजिनावर चालणाऱ्या यंत्राने सु. ४०० ते ५०० किग्रॅ. शेंगा फोडल्या जातात.
शेंगदाण्याचे संघटन व उपयोग : शेंगदाण्यात सर्वसाधारणपणे ७.९% जलांश २६.७% प्रथिने ४०.१% स्निग्ध पदार्थ (तेल) २०.३% कार्बोहायड्रेटे ३.१% तंतू आणि १.९% खनिज पदार्थ असतात. भाजलेल्या शेंगदाण्यात जलांश ४.०% असतो व प्रथिनांचे प्रमाण ३१.५% असते. दाण्यातील सु. ९६% अन्नसत्त्वांचे शरीरात पचन होते व १०० ग्रॅ. दाण्यांपासून सु. ५५० कॅलरी ऊर्जा मिळते. शेंगदाण्यात व गटातील थायामीन, रिबोफ्लाविन व निकोटिनिक अम्ल ही जीवनसत्त्वे, तसेच फॉलिक अम्ल व ई जीवनसत्त्व ही पुष्कळ प्रमाणात असतात. अ, क आणि ड ही जीवनसत्त्वे विशेष प्रमाणात नसतात. फॉस्फरस, कॅल्शियम व लोह पुष्कळ प्रमाणात असतात. त्यातील प्रथिने वनस्पतिजन्य प्रथिनांत वरच्या दर्जाची असून ती दूध अथवा मांस आणि अंडी यांतील प्रथिनांच्या बरोबरीची आहेत. शेंगदाण्यांचे पीठ करून वापरल्यास अथवा ते शिजविल्यास ते पचनास सुलभ होतात. मात्र ते जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास पित्ताचे विकार होतात. मुडदूस, मूळव्याध, मलावरोध वगैरे तक्रारींवर शेंगदाणे योग्य प्रमाणात खाल्ल्यास उपयुक्त ठरतात.
भुईमुगाची प्रत पुढील गुणधर्मांवरून ठरविली जाते : (१) दाण्यातील तेलाचे शेकडो प्रमाण, (२) शेंगांशी दाण्यांचे प्रमाण, (३) शेंगांचा व दाण्यांचा रंग आणि आकारमान.
खाण्यासाठी बोल्ड हा व्यापारी प्रकार पसंत केला जातो. त्यात तेलाचे प्रमाण कमी असते व त्याला परदेशातही चांगली मागणी असते.
जी. डब्ल्यू. कार्व्हर (१८६४-१९४३) या अमेरिकन संशोधकांनी शेंगदाण्यापासून चीज, दूध, पीठ, शाई, रंजकद्रव्ये, साबण इ. सु. ३०० उपयुक्त पदार्थ तयार केले होते.
तेल : शेंगदाण्याचे तेल निरनिराळ्या पद्धतींनी काढण्यात येते. बैलाच्या साहाय्याने चालणारी घाणी, यंत्र घाणी, दाबयंत्रे (एक्सपेलर) व विद्रावक निष्कर्षण यांचा त्यात समावेश होतो [⟶ तेले आणि वसा निष्कर्षण]. बैलाच्या घाणीतून दाण्यांच्या वजनाच्या ३५-३९% तेल मिळते. हे तेल काढल्यावर गाळण्यात येत नाही. खाण्यासाठी ते सर्वात चांगल्या प्रतीचे समजले जाते. तेल काढताना बियांवर उष्णतेची प्रक्रिया होत नसल्याने तेलातील जीवनसत्त्वांचा नाश होत नाही. यंत्र घाणीत दाण्यांच्या वजनाच्या ३६-४२% तेल मिळते. दाबयंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर तेल काढण्याच्या कारखान्यात करण्यात येतो. तेल काढण्यापूर्वी दाण्यांचे पीठ गरम केले जाते. यात ४०-४४% तेल मिळते व ते काहीसे पिवळ्या रंगाचे असते. विद्रावक निष्कर्षण पद्धतीत दाण्यातील तेलापैकी सु. ८०% तेल काढले जाते.
उपयोग : खाद्य तेल म्हणून भुईमुगाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तीळ, मोहरी व सरसू यांसारख्या जास्त किंमतीच्या तेलांत मिसळण्यासाठीही या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचप्रमाणे वनस्पती तूप तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व इतर कमी प्रतीची तेले व वसा (स्निग्ध पदार्थ) यांत मिसळून साबणनिर्मितीसाठी याचा थोड्या प्रमाणावर वापर केला जातो. सौंदर्यप्रसाधने, तसेच दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारे क्रीम, पोमेड व कोल्ड क्रीम यांच्या निर्मितीत व चामड्यांना लावण्यासाठी तेलाचा उपयोग केला जातो. खनिज तेलात मिसळून यंत्रांच्या वंगणासाठी या तेलाचा उपयोग होऊ लागला आहे. लिंबाचा रस, शेंगदाणा तेल व मध यांचे मिश्रण दम्यावर गुणकारी आहे. पशुवैद्यकात हे तेल पौष्टिक, सारस व त्वचादाहनाशक म्हणून वापरले जाते.
पेंड : शेंगदाण्याच्या पेंडीचे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत : (१) घाणी-पेंड व (२) दाबयंत्र-पेंड. घाणी पेंडीत तेलाचे प्रमाण (११.२%) दाबयंत्र पेंडीपेक्षा जास्त असते त्यामुळे जनावरांना खाऊ घालण्यासाठी ती जास्त पसंत करतात. पशुखाद्य म्हणून ज्या निरनिराळ्या पेंडींचा वापर केला जातो त्यात भुईमुगाची पेंड सर्वांत श्रेष्ठ प्रतीची आहे. तीत प्रथिनांचे प्रमाण पुष्कळ असते व दुभत्या जनावरांसाठी ती फार उपयुक्त आहे.
सेंद्रीय खतांसाठी ही पेंड फार महत्त्वपूर्ण आहे. तीत सु. ८% नायट्रोजन, १.४% फॉस्फरिक अम्ल आणि १.२% पोटॅश ही असतात. भात, ऊस, भाजीपाला, केळी आणि इतर फळे यांसाठी या पेंडीचा वापर विशेष फायदेशीर आढळून आला आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या मिश्रखतांत भुईमूग पेंडीचा वापर केला जातो. खतासाठी दाबयंत्र-पेंड जास्त पसंत करतात. विद्रावक निष्कर्षण पद्धतीने तेल काढल्यावर राहिलेल्या पेंडीत तेलाचे प्रमाण फक्त १% ते २% असते परंतु प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. पशुखाद्यात मिसळण्यासाठी या पेंडीचा वापर करतात.
मनुष्याचे खाद्य म्हणून भुईमुगाच्या पेंडीचा वापर करण्यास पुष्कळ वाव आहे. मात्र ती चांगल्या साफ केलेल्या दाण्यांपासून स्वच्छ वातावरणात काढलेली असावी. ती पचनास हलकी असून तिच्यातील कार्बोहायड्रेटांच्या अल्प प्रमाणामुळे मधुमेही रुग्णांच्या आहारात ती वापरण्याची शिफारस केली जाते. पेंडीचे पीठ गव्हाच्या व इतर पिठांत चांगल्या तऱ्हेने मिसळते आणि त्यापासून केक, बिस्किटे व मिठाई बनवितात पेंडीच्या पिठाचा वापर आईस्क्रीम आणि लहान मुलांच्या तयार खाद्यपदार्थांत तयार करतात. म्हैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने भुईमुगाची खाद्य पेंड तयार करण्यासंबंधीची तत्त्वे निश्चित केली आहेत.
प्लायवुडचे थर चिकटविण्यासाठी पेंडीतील प्रथिनांपासून गोंद तयार केला जातो. तसेच प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थांच्या निर्मितीत भुईमुगाच्या पेंडीचे पीठ वापरले जाते. पेंडीतील प्रथिनांपासून सारेलॉन नावाचा कृत्रिम धागा तयार करतात व तो रेयॉनच्या अथवा लोकरीच्या धाग्यात मिसळून त्यापासून विशिष्ट उपयोगासाठी कापड बनवितात. [⟶ पेंड].
पाला : शेंगा काढून घेतल्यावर राहिलेली झाडे (ओली अथवा वाळलेली) जनांवरांना खाऊ घालतात. त्यांतील प्रथिनांमुळे ती फार पौष्टिक असतात.
टरफले : भूईमुगाच्या शेंगांत सर्वसाधारणपणे ३०% (वजनाने) टरफल असते. त्यांचा जळणासाठी अथवा भात खाचरातील भारी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वापर करण्यात येतो. ती लवकर कुजत नसल्यामुळे त्यांचा खतासाठी वापर करता येत नाही.
निर्यात व्यापार : दुसऱ्या महायुद्धापूर्वी भुईमुगाला भारताच्या निर्यात व्यापारात महत्त्वाचे स्थान होते. जगातील भुईमुगाच्या निर्यात व्यापारापैकी ६०% व्यापार भारतातून होत असे व देशातील भुईमुगाच्या एकूण उत्पादनापैकी ४०% उत्पादन निर्यात होत असे. महायुद्धानंतर ही परिस्थिती संपूर्णपणे बदलली. ऑक्टोबर १९४३ पासून देशातील तेलबिया आणि वनस्पतिजन्य तेले यांचा व्यापार शासनाच्या नियंत्रणाखाली आला. देशातील खाद्य तेलाची वाढती मागणी आणि परकीय चलनाची चलनाची गरज या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन निर्यात धोरण वेळोवेळी ठरविले जाते. एचपीएस या नावाने व्यापारात ओळखल्या जाणाऱ्या हाताने वेचलेल्या मोठ्या आकारमानाच्या दाण्यांची निर्यात केली जात असे पण १९५६ मध्ये त्यावर बंदी घालण्यात आली.
इ. स. १९७९-८० साली ५.६४ लक्ष टन शेंगदाण्याची पेंड आणि संपूर्णपणे तेल काढून घेतलेल्या शेंगदाणा पिठाची निर्यात करण्यात आली व त्यापासून देशाला ७३.६ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले.
संशोधन : तेलबियांसंबंधीच्या संशोधनासाठी भारत सरकारने ३.८ कोटी रु. खर्चाचा प्रकल्प मंजूर केला आहे. यात भुईमुगाच्या संशोधनासाठी लुधियाना (पंजाब), तिंडिवनम् (तमिळनाडू) व राजेंद्रनगर (आंध्र प्रदेश) येथे अनुक्रमे उत्तर विभाग, आग्नेय विभाग आणि दक्षिण विभागासाठी प्रधान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मैनपुरी (उत्तर प्रदेश), पोल्लाची (तमिळनाडू), काद्रिया व संबळपूर (मध्य प्रदेश) आणि रायचूर व धारवाड (कर्नाटक) येथे दुय्यम दर्जाची संशोधन केंद्रे आहेत. महाराष्ट्रात जळगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली तेलबिया संशोधन केंद्र असून तेथे भुईमुगावर संशोधन करण्यात येते.
संदर्भ:1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, New Delhi, 1948.
2. I. C. A. R. Handbook of Agriculture Delhi, 1980.
3. Indian Central Oilseeds Committee. Study of Groundnut in India, Hyderabad, 1963.
4. Reddy, D. B. Plant Protection in India, Bombay. 1968.
5. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Poona. 1972.
चौधरी, रा. मो. गोखले, वा. पु.
“