कडधान्ये : (डाळीची धान्ये). डाळीच्या धान्याची बहुतेक सर्व पिके इतिहासपूर्व कालापासून लागवडीखाली आहेत. त्यांचे बी भरडल्यास त्याच्यावरील टरफल निघून जाऊन प्रत्येक दाण्याच्या दोन दोन डाळिंब्या होत असल्यामुळे त्यांना डाळीची धान्ये (द्विदल धान्ये) म्हणतात. कडधान्यांत उडीद, कुळीथ,घेवडा, चवळी, तूर, वाल, वाटणा, मटकी, मूग, सोयाबीन, हरभरा इत्यादींचा समावेश होतो.

कडधान्ये बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनींत येतात. परंतु चांगल्या प्रकारच्या जमिनीवरील पिकाचे उत्पन्न जास्त येते. हंगाम जातीपरत्वे खरीप, रब्बी किंवा उन्हाळी. बियांच्या आकारमानाप्रमाणे हेक्टरमध्ये ४०-९० किग्रॅ. बी दोन ओळींमध्ये सु. ४५ सेंमी. अंतर ठेवून मिश्रपीक किंवा स्वतंत्र पीक म्हणून पेरतात. साधारणत: पेरल्यापासून ९०-१२० दिवसांत पीक तयार होते. शेंगा पक्व होऊन त्यांच्यामधील बी कडक झाल्यावर झाडे बुंध्याजवळ विळ्याने कापून खळ्यावर वाळवून मळणी करतात. बियांचे आकार व रंग निरनिराळे असतात. बियांत २१-२५ टक्के प्रथिन, ५८-६४ टक्के कार्बोहायड्रेट, १.५ टक्के वसा आणि कॅल्शियम,फॉस्फोरिक अम्‍ल व ब१ जीवनसत्त्वही पुष्कळ असते.

मनुष्याच्या रोजच्या पिष्टमय अन्नात चौरस आहाराच्या दृष्टीने जरूरीची असलेली शाकीय (वनस्पतिजन्य) प्रथिने डाळीतून भरपूर मिळतात. त्यामुळे मानवाच्या आहारात डाळी फार महत्त्वाच्या समजतात. आहारात कडधान्याचे वाळलेले किंवा ओले दाणे आणि कोवळ्या शेंगांचाही उपयोग करतात.

यांच्या मुळ्यावरील गाठींतील सूक्ष्मजंतू हवेतील मुक्त नायट्रोजन जमिनीत स्थिर करतात. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता वाढते म्हणून तृणधान्याच्या पिकात द्विदलाची मिश्रपिके घेतात. काही जाती हिरवळीच्या खतासाठी वापरतात. त्यांच्यापासून गुरांना दाणावैरण मिळते. प्‍लॅस्टिकच्या धंद्यातही त्यांचा उपयोग करतात.

पहा : उडीद कुळीथ, घेवडा, चवळी, तूर, मटकी, मसूर, मूग, वाटणा, वाल, सोयाबीन, हरभरा.

चौधरी, रा. मो.