शेतीची कामे: शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लावणी, आंतर मशागत, मळणी, औषध फवारणी, सिंचन, बीजप्रकिया इ. कामे म्हणजे शेतीची कामे होत. पिकाच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमीन चांगली तयार करणे नितांत गरजेचे असते. जमिनीचा वरचा थर, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने पीक वाढते, तो थर हलवून भुसभुशीत करणे, त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे, जमिनीत पीक पेरणे, पिकांत आंतर मशागत करून वाढीला पोषक वातावरण निर्माण करणे इ. कामे योग्य प्रकारे केली तर पीक जोमदार येऊन उत्पादनही चांगले येते. यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व शेतकामांना ‘ मशागत ’ म्हणतात.

मशागतीने जमिनीचे थर खालीवर होतात. जमीन भुसभुशीत व रवाळ होते. तसेच पावसाचे पाणी वरून वाहून न जाता ते जास्त प्रमाणात जमिनीत मुरते आणि जमिनीत ओलावा साठून राहतो. मशागतीमुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, खत चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळते आणि कीटकांना व कवकीय रोगांना आळा बसतो. जमिनीत हवा खेळती राहून ती पिकांनापोषक ठरते. जमिनीत रासायनिक किया जास्त चांगल्या प्रकारे होऊन जमिनीतील पोषक अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात. पिकाची उगवण आणि वाढ चांगली होऊन उत्पन्नात वाढ होते.

मशागतीचे पूर्वमशागत, पेरणी किंवा लावणी आणि आंतर मशागत असे मुख्य प्रकार आहेत.

पिकाची पेरणी अगर लावणी करण्यापूर्वी शेतीची जी कामे केली जातात त्यांना पूर्वमशागत म्हणतात. त्यांत जमीन नांगरणे, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमीन सपाट करणे, सऱ्या किंवा वाफे तयार करणे, पाण्यासाठी पाट काढणे इ. कामे येतात. जमीन उघडी करून मातीचे थर खालीवर करणे हा नांगरणीचा उद्देश आहे. असे केल्यामुळे जमिनीतील आधीच्या पिकाची धसकटे, इतर अवशेष, पालापाचोळा वगैरे जमिनीत गाडले जाऊन ते कुजतात आणि मातीतील सेंद्रिय पदार्थांत वाढ होते. त्याचबरोबर जमिनीत असलेले हानिकारक जीवजंतू, कीटक इत्यादींचा उन्हाने तापल्यामुळे नाश होतो. जमिनीवरील आधीचेपीक, नंतर घ्यावयाचे पीक, तणांचा प्रकार व प्रमाण, स्थानिक हवामान आणि जमिनीचा प्रकार या बाबींवर जमीन नांगरणे आवश्यक आहे किंवा नाही हे मुख्यत्वे अवलंबून असते. आधी उसासारखे बहुवर्षायू बागायती पीक असल्यास नांगरट आवश्यक असते. त्यामुळे उसाची धसकटे, खोडक्या वगैरे निघून जमीन स्वच्छ होते. त्याबरोबरच पिकाच्या कालावधीत दिलेल्या पाण्यामुळे घट्ट झालेली जमीन मऊ करता येते. बटाटा, कपाशी, भुईमूग, बाजरी, ज्वारी व कडधान्ये यांसारखी पिके काढल्यावर पुढच्या पिकासाठी नांगरट न करतासुद्धा जमीन तयार करतात. ज्वारीसारखे पीक घ्यायचे असेल, तर नांगरटीची जरूरी नसते परंतु भुईमुगासारख्या काही पिकांना जमीन भुसभुशीत लागते, त्यासाठी नांगरट करणे आवश्यक असते. दीर्घ मुदतीच्या काही पिकांसाठी खोल नांगरट करावी लागते. काही पिकांना मात्र खोल नांगरटीची गरज नसते. जमिनीत पोसणाऱ्या कंदमूळ वर्गीय पिकांसाठी तसेच मुळे खोलपर्यंत असणाऱ्या तणांच्या बंदोबस्ताकरिता खोल नांगरट आवश्यक असते. चिकण मातीचे प्रमाण ५० टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा जमिनीतील निचराक्षमता सुधारण्याकरिता तीन-चार वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी लागते. मध्यम आणि भारी जमिनी पिकांची काढणी झाल्याबरोबर नांगरतात. त्यावेळी जमिनीत ओल असल्यामुळे नांगर ओढण्याकरिता बैलांना कष्ट कमी पडतात, ढेकळे कमी निघतात, नांगरलेली जमीन जास्त दिवस उन्हात तापल्यामुळे निर्जंतुक होऊन तिची सुपीकता वाढते व पोत सुधारतो. पिकाची काढणी झाल्याबरोबर ज्या जमिनी नांगरता येत नाहीत, त्या वाळून कठीण बनतात. अशा जमिनी वळवाच्या पावसानंतर अगर पावसाळ्यातील पहिल्या पावसानंतर नांगरतात. उन्हाने नांगरटीत निघालेली ढेकळे ठिसूळ होतात व ती नंतर औताने फोडणे सोपे जाते. नांगरटीमुळे लहान-मोठी ढेकळे निघतात, जमिनीचा पृष्ठभाग सपाट रहात नाही आणि मग पेरणी करण्यापूर्वी तिची अनेक प्रकारच्या अवजारांनी मशागत करावी लागते.

ज्या भागात फक्त कोरडवाहू पिकेच घेतली जातात, अशा जिराइत जमिनीत नांगरट केल्यानंतर निघणारी ढेकळे कुळवाच्या पाळ्या देऊन फोडतात. बागायती क्षेत्रात निघणारी ढेकळे तुलनात्मक दृष्टया जास्त कठीण असल्याने ढेकळे फोडण्यासाठी लोड किंवा मैंद ही देशी अवजारे आणि तव्यांचा कुळव किंवा नॉर्वेजियन कुळव यांसारखी सुधारित अवजारे वापरतात. ढेकळे फोडून झाल्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन मऊ भुसभुशीत केली जाते. कुळवाच्या पाळ्या दिल्यामुळे जमिनीचा वरचा थर मोकळा व भुसभुशीत होऊन तणही निघून जाते.

पूर्वमशागतीनंतर जमीन चांगल्या प्रकारे सपाट झाली नसल्यास सपाटीकरणाची अवजारे वापरून ती सपाट करून घेतात. यासाठी मातीची हलवाहलव मोठया प्रमाणात करण्याची गरज असेल, तर केणी किंवा पेटारी यांसारखी अवजारे वापरतात. जमिनीत ओलिताखालील पीक घ्यावयाचे असल्यास सपाटीकरणाचे काम फार महत्त्वाचे असते.

हिवाळी (रब्बी) हंगामात भुसभुशीत केलेल्या जमिनीत हवा जास्त खेळती राहिल्यामुळे तिच्यातील ओलावा लवकर नष्ट होतो. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जमीन घट्ट करणे आवश्यक असते. पावसाळी हंगामात हा प्रश्न उद्‍भवत नाही, कारण पावसाच्या माऱ्याने जमीन आपोआपच घट्ट होते. शिवाय पाऊस पडत असल्याने ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याचीही आवश्यकता नसते. कमी पावसाच्या प्रदेशात जमिनीतील ओलीवर रब्बीचे पीक घेताना पेरणीअगोदर जमिनीवर मैंद फिरवून जमीन थोडी घट्ट करतात.

पेरणी : धान्य, भाजीपाला, फुले, फळे यांसारख्या कोणत्याही पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी त्या त्या वनस्पतीची पद्धतशीर लागवड करणे आवश्यक असते. लागवडीमध्ये बी पेरणे हे एक महत्त्वाचे शेतकाम असते. पूर्वी माती उकरून तिच्यात हाताने बी फोकून पेरणी केली जात असे. पुढे बी योग्य पमाणात आणि योग्य खोलीवर पेरले जावे म्हणून वेगवेगळी औते, अवजारे तयार करून ती पेरणीसाठी वापरण्यात येऊ लागली. पेरणीच्या अवजारात सतत सुधारणा होत आलेल्या आहेत. भारतात आणि इतर देशांतही बी फोकून पेरणे, विवक्षित जागी खळगा करून त्याच्यात टोकून बी लावणे किंवा पाभरीसारख्या औताचा वापर करून ओळीत बी पेरणे अशा पध्दती सामान्यपणे प्रचारात आहेत. अलीकडच्या काळात स्वयंचलित पेरणी यंत्राचाही वापर करण्यात येतो.

बीज-विकिरण (बॉडकास्टिंग) हा पूर्वापार चालत आलेला पेरणीचा प्रघात आजही काही विशिष्ट कारणासाठी आणि विशिष्ट पिकाच्या बाबतीत वापरला जातो. डोंगरउतारावर नाचणीसारखी पिके औत वापरणे शक्य नसल्याने बीज-विकिरण पद्धतीने पेरतात. खार जमिनीत जेथे भाताचे बी औताने पेरता येत नाही किंवा रोपे तयार करून लावणी करता येत नाही, तिथे भिजवून मोड आणलेले बी फोकून पेरणी करतात. अमेरिकेतील कुरणांत गवताचे बी बीज-विकिरण यंत्राच्या (बॉडकास्टर) साहाय्याने पेरतात. अशा पेरणीचे काम व्यवस्थित, कमी खर्चात व वेगाने होते. कुरणामध्ये गवताचे बीज-विकिरण विमानातूनही करण्यात येते. त्यासाठी गवताचे काही बी घालून वडया बनवितात आणि त्या निवड केलेल्या कुरणात विमानांतून टाकतात. त्याचप्रमाणे तेथील काही राज्यांत पूरगस्त विस्तीर्ण क्षेत्रातील भातशेतीत भिजवून ठेवलेले भाताचे बी विमानातून फोकून पेरतात. थोड्या प्रमाणावर गहू , बार्ली यांसारखी पिकेही अमेरिकेमध्ये विमानातून बी फोकून पेरतात. अशा वेळी विमान जमिनीपासून ६ ते ९ मी. उंचीवरून चालवितात. बियांचा आकार आणि वाऱ्याचा वेग यांचा अशा वेळी अवश्य विचार करावा लागतो.


 बी फोकून पेरण्याचा प्रघात तसा मर्यादितच आहे. या पद्धतीत काम लवकर उरकते हा एकमेव फायदा सोडला, तर तोटेच मात्र अधिक आहेत. फोकून पेरणी करण्याच्या पद्धतीमध्ये बी वाया जाण्याचे प्रमाण अधिक असते. त्याचप्रमाणे पिकातील तण काढणे कठीण जाते, आंतर मशागतीसाठी औते, अवजारे वापरता येत नाहीत, त्यामुळे खर्च वाढतो, तसेच पीक सर्व क्षेत्रात सारखे उगवून येत नाही. फोकून पेरलेले बी मातीखाली झाकून टाकणे शक्य होत नाही, त्यामुळे जमिनीवर उघडे पडलेले बी पाखरे खाऊन टाकतात, काही बियाणे रूजण्यासाठी अनुकूल परिस्थिती न मिळाल्यामुळे उगवत नाही आणि वाया जाते. अशा अनेक तोटयांमुळे बी फोकून पेरणे व्यवहार्य ठरत नाही. तथापि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पेरणीचा हा पर्याय उपयोगी ठरतो.

पेरणीचा दुसरा प्रकार म्हणजे जमिनीत बी टोकून लावणे. भाजीपाल्याचे बी टोकून लावण्याची पद्धत आपल्या देशात रूढ आहे. इतर काही धान्यांच्या आणि पिकांच्या बाबतीत भारतात आणि इतरत्रही टोकण पद्धत प्रचारात आहे. धान्यपिकामध्ये ज्वारी, मका, तेलबियांमध्ये भुईमूग, भाजीपाल्यामध्ये पडवळ, दोडका, भोपळा, घोसाळी, कारली इत्यादींसाठी बी टोकून लावले जाते. कपाशीचे बीसुद्धा मोठया प्रमाणात टोकून लावले जाते. या पद्धतीमध्ये बी ठराविक अंतरावर हाताने लावले जाते. त्यामुळे पिकाच्या दोन ओळींत आणि ओळीतील दोन रोपांत जरूर तेवढे अंतर ठेवता येते. या पद्धतीने पेरणी केलेल्या पिकाची औताच्या साहाय्याने आंतर मशागत करून खर्चात मोठया प्रमाणात बचत करता येते. शिवाय पिकाला हवा, पाणी, सूर्यपकाश यांसारख्या सर्व नैसर्गिक बाबी योग्य प्रमाणात मिळत राहिल्याने उत्पादनात वाढही होते. सुधारित टोकण यंत्राच्या साहाय्याने हे काम कमी खर्चात, कमी वेळात व योग्य प्रकारे करता येते.

औताला जनावरे जुंपून बी पेरण्याचा प्रघात ज्या वेळी सुरू झाला, त्या वेळी मागील अनुभवावरून पिकाच्या दोन ओळींत किती अंतर सोडावे, हे ठरविण्यात आले. ओळीतील दोन बियांमधील अंतर बी पेरणाऱ्याच्या अनुभवावर आणि कौशल्यावर अवलंबून राहते. अलीकडे मात्र शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांनी ओळीत बी ठराविक अंतरावर पेरणारी औते तयार केलेली आहेत. भारतात अशा प्रकारची सुधारित यांत्रिक साधने उपलब्ध झालेली आहेत. अशा सुधारित औतांच्या साहाय्याने भात, ज्वारी, गहू , मका, भुईमूग इ. पिकांची पेरणी करता येते. या यंत्रामध्ये बी ठेवण्याकरिता एक पत्र्याची पेटी असते. तिच्यातील बी पेटीखाली जोडलेल्या फिरक्यांमधून पाहिजे त्या प्रमाणात, प्लॅस्टिकच्या नळ्यांतून, फणांमधून मातीत योग्य खोलीवर पडते.

भारतामध्ये सामान्यतः बी पेरण्यासाठी वापरली जाणारी औते पिकाप्रमाणे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि हंगामांनुसार निरनिराळ्या प्रकारची, हलकी अगर वजनदार आणि बैल ओढू शकतील अशी बनविलेली असतात. महाराष्ट्रात त्यांपैकी मोघे, दुसे, तिफण, चौफणी पाभर, पाच आणि सहा फणी पाभर अशी औते वापरली जातात.

एकाच शेतात मिश्र पिकाची पेरणी करणे अनेक दृष्टींनी फायद्याचे ठरत असल्याने मिश्र पीक पेरणीचा प्रघात पूर्वापारपासून चालत आलेला आहे. पाभरीने पेरणी करीत असताना पाभरीच्या पाठीमागे ‘ मोघे किंवा मोघण ’ जोडून अशी पेरणी करतात. एका नळीला वरच्या बाजूला लाकडी वाटी आणि खालचे टोक निमुळते केलेले अशा प्रकारचे साधेच अवजार म्हणजे ‘ मोघे ’. बाजरीच्या किंवा भुईमुगाच्या पिकात दोन किंवा तीन ओळी मुख्य पिकाच्या आणि एक ओळ तुरीसारख्या पिकाची पेरण्याचा प्रघात आहे. तुरीच्या पिकाची एक ओळ पेरण्याकरिता मोघे वापरतात. चाड्याचे एक भोक बंद करून त्या फणाच्या ओळीत मोघ्याच्या साहाय्याने एक मजूर तुरीची पेरणी करतो. कपाशीच्या पेरणीसाठीही काही ठिकाणी दुश्यामागे दोन मोघे जोडून बी पेरतात. काही वेळा हरभऱ्याची पेरणी करण्यासाठी लहान नांगरीचा वापर करतात. नांगरीने तयार होणाऱ्या तासात मागून हाताने बी टाकून पेरणी केली जाते. हिवाळी किंवा रब्बी हंगामात जमिनीत खोल गेलेल्या ओळीत बी टाकण्यासाठी अशी पद्धत वापरली जाते. नांगर परत येताना उलटणाऱ्या मातीने अगोदरच्या तासातील बी आपोआपच झाकले जाते. दुसे किंवा दोन फणी पेरणी अवजार कपाशीच्या आणि मसुराच्या पेरणीसाठी वापरले जाते. पिकाच्या गरजेनुसार दुश्याच्या दोन फणांत अंतर ठेवून औत तयार केले जाते.

तिफण आणि चौफणी पाभर ज्वारी, बाजरी, गहू , भात, भुईमूग इ. पिकांची पेरणी करण्यासाठी वापरतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत भाताची पेरणी करण्यासाठी पाच आणि सहा फणी पाभरीही वापरल्या जातात. पाचफणी पाभरीच्या दोन फणांतील अंतर २२ सेंमी. आणि सहा फणीच्या दोन फणांत १५ सेंमी. अंतर ठेवतात. पेरणी सरळ रेषेत होण्यासाठी शेताच्या कडेला दोरी धरून किंवा दोरीने रेषा आखून घेऊन त्यावरून पाभरीचा पहिला कडेचा फण चालेल अशी काळजी घेतली, तर त्या क्षेत्राची सर्व पेरणी सरळ रेषेत करता येते.

पेरणी करताना त्याबरोबर रासायनिक खत पेरून दिल्याने उत्पादनात वाढ होते हे सिद्ध झाल्यामुळे आता दोन चाडी असलेली पाभर वापरण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. 

पेरणी करण्यापूर्वी काही बाबींची विशेष दखल घेणे आवश्यक असते. त्यात जमीन, जमिनीची मशागत, पीक, लागवडीचा किंवा पेरणीचा उद्देश, हंगाम वगैरे बाबी महत्त्वाच्या आहेत. पिकाचे उत्पादन चांगले येण्यासाठी त्या पिकासाठी पोषक जमिनीत पेरणी करणे महत्त्वाचे आहे. उदा., गव्हाला दमदार, भारी (काळी, खोल, कसदार) प्रकारची जमीन आवश्यक असते. कपाशीलाही भारी जमीन लागते. कडधान्ये मध्यम ते हलक्या जमिनीत येऊ शकतात. मध्यम प्रकारच्या जमिनीत बाजरी येऊ शकते. त्यामुळे जमिनीनुसार पिकाची निवड करून मगच पेरणी करणे योग्य ठरते.

तसेच जमिनीची पूर्वमशागत न करता पेरणी केल्यास जमीन चांगली असूनही पीक चांगले येत नाही. काही पिके विशिष्ट हंगामात चांगली येतात, म्हणून त्यांचे बी त्याच हंगामात आणि विशिष्ट महिन्यात पेरतात. बाजरी खरीप हंगामातजूनच्या दुसऱ्या पंधरवडयात पेरतात, तर रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान करतात. गहू ऑक्टोबरअखेर पेरावयास सुरूवात करतात.

पेरणी करताना जमिनीत योग्य प्रकारची घात साधून पेरणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ओल नसलेल्या कोरड्या जमिनीत किंवा खूप ओल्या असलेल्या जमिनीत पेरणी करणे अयोग्य आहे. जमीन वापशावर असतानाच पेरणी करतात. योग्य प्रकारचा वापसा आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी वरची माती मुठीत घेऊन तिचा मुटका करावा व तो जमिनीवर टाकावा. मुटका फुटून माती मोकळी झाल्यास ती जमीन वापशावर आहे असे समजावे. ओलीचे प्रमाण जास्त असल्यास मुटका फुटत नाही. वापशावर पेरणीची सुरूवात करणे म्हणजेच जमिनीची घात साधणे. अशी योग्य घात थोडेच दिवस टिकत असल्याने त्या मुदतीत पेरणी करावी लागते. पुढे येणाऱ्या पावसाच्या आशेवर पूर्ण कोरड्या जमिनीत केलेल्या पेरणीस ‘ धूळवाफ पेरणी ’ म्हणतात. भात पिकाची धूळवाफ पेरणी करण्याची पद्धत काही भागांत प्रचलित आहे.


 बी पेरताना ते विशिष्ट खोलीवर पेरावे लागते. बाजरीसारखे बारीक बी १ ते २ सेंमी. खोलीवर, तर त्यापेक्षा मोठे बी ४ ते ५ सेंमी. खोलीवर पेरतात. चांगला पाऊस पडून जमिनीत खोलपर्यंत ओल पोहोचली म्हणजे पेरणी करणे योग्य ठरते. पाऊस उघडल्यानंतर जमिनीचा वरचा थर उन्हाने आणि वाऱ्याने वाळून जातो. अशा वेळी ओल असलेल्या खालच्या थरांत बी पडेल याची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात किंवा खरीप हंगामात वरचेवर पाऊस पडत असल्याने आणि हवेत गारवा असल्याने जमिनीतील ओल लवकर उडून जात नाही. अशा वेळी पेरणी उथळ किंवा वरच्या थरात करता येते परंतु हिवाळी किंवा रब्बी हंगामात जमिनीत ओलखालच्या थरात असल्याने खोल पेरणी करावी लागते. त्यामुळेच पावसाळी हंगामासाठी वापरली जाणारी पेरणीची औते वजनाने हलकी, तर हिवाळ्यात वापरली जाणारी औते वजनाने जड असतात.

जमिनीतील ओलीच्या खोलीप्रमाणे पेरणी करता यावी म्हणून औताला जोडलेल्या बैलांचे जू मागे घेऊन किंवा पुढे नेऊन पेरणीची खोली कमी किंवा जास्त करतात. काही वेळा औतावर दगडाचे वजन ठेवून पेरणी खोलवर करतात. खोल पेरणी करीत असलेल्या औताला स्थानिक भाषेत ‘ काटस ’ औत तर उथळ पेरणीसाठी कमी खोल जाणाऱ्या औताला ‘ शेव ’ औत असे म्हणतात.

पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाभरीने दोन ओळींतील अंतर ठराविकच ठेवता येते परंतु ओळीतील दोन रोपांमधील अंतरावर कुठलेच नियंत्रण नसल्याने पीक उगवून आल्यानंतर ओळीत जास्त झालेली रोपे उपटून काढावी लागतात. यालाच विरळणी म्हणतात. विरळणी करून एकरी निर्धारित रोपांची संख्या ठेवल्यास उत्पादनात वाढ होते.

पेरणी केल्यानंतर बी मातीखाली झाकणे महत्त्वाचे आहे. अन्यथा उघडे पडलेले बी पक्षी खाऊन टाकतात किंवा ते रूजत नाही व वाया जाते. बी मातीखाली झाकण्यासाठी पेरणीनंतर लगेच रासणी नावाचे हलके औत जमिनीवरून फिरवितात. त्यासाठी सरळ दिंड असलेल्या (ज्याला स्थानिक भाषेत ‘ रेगाडा ’ असे म्हणतात) कुळवाचा जानोळी काढून वापर केला जातो.

पेरणीसाठी वापरावयाचे बी काही प्रकिया करून वापरणे योग्य असते. त्यासाठी बी उफणून चाळून साफ करून घेतात. बियांना रोगप्रतिबंधक कवकीय औषधे लावून ते पेरल्यास रोगांवर नियंत्रण ठेवता येते. काही पिकांचे बी पाण्यात टाकून पाण्याच्या तळाशी गेलेले जड बी पेरणीसाठी वापरतात. कपाशीच्या बियांवरील लव (तुलोणी) काढण्यासाठी त्यावर अम्लाची प्रकिया करतात. कपाशीचे बी मोकळे, सुटसुटीत करण्यासाठी शेणमातीच्या लगदयात अगर खळीत घोळतात व वाळवून ते पेरणीसाठी वापरतात. जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणारे जीवाणू असतात. या जीवाणूंची बियांवर प्रकिया करून ते पेरल्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून उत्पादन वाढते. त्यासाठी ऱ्हायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टर या जीवाणूंचा वापर आता केला जातो. ‘ बीज प्रकिया ’ हे एक महत्त्वाचे शेतकाम आहे.

आंतर मशागत : पिकाच्या पेरणीनंतर काढणीपर्यंत करावयाच्या सर्व शेतकामांना आंतर मशागत म्हणतात. यात विरळणी, खुरपणी, कोळपणी, खांदणी, भर देणे इ. कामांचा समावेश होतो. आंतर मशागतीमुळे पिकांत वाढणारी तणे काढली जातात, जमिनीत हवा खेळती राहते. पिकांच्या ओळीमधील घट्ट झालेली मोकळी जमीन भुसभुशीत करता येते. जमिनीत हवेचे प्रमाण वाढल्यामुळे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची वाढ झपाटयाने होते आणि पिकांना पोषक असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. कधीकधी जमिनीतील ओलावा कमी करण्यासाठीसुद्धा आंतर मशागत करतात. आंतर मशागतीच्या उद्दिष्टाबद्दल आता नवी माहिती पुढे येत आहे. उदा., पूर्वी अशी समजूत होती की, आंतर मशागतीमुळे जमिनीवर कोरडया मातीचा थर तयार होऊन, जमिनीतून बाष्पीभवनाव्दारे होणारा ओलीचा नाश कमी होतो. परंतु प्रयोगान्ती असे दाखविण्यात आले आहे की, आंतर मशागतीने जमिनीतून बाष्पीभवनाने होणारा ओलीचा नाश कमी होत नाही, तर तण निघून गेल्यामुळे त्याव्दारे होणारे बाष्पीभवन थांबविले जाते. आंतर मशागतीमुळे जमिनीतील ओलीची बचत होते, एवढे मात्र खरे आहे.

कोणत्या पिकाची किती वेळा आंतर मशागत करावी याबद्दल निश्चित असे नियम नाहीत तथापि जमिनीचा प्रकार, तणांचा प्रकार व प्रमाण आणि स्थानिक हवामान विचारात घेऊन जरूर तितक्याच वेळा आंतर मशागत करावी म्हणजे तिच्यावर होणाऱ्या खर्चात बचत होते. ज्या जमिनीचा पोत चांगला असतो, तिच्यामध्ये वरचेवर आंतर मशागत करावी लागत नाही. ज्या जमिनीतील माती कोरडी झाल्यावर धुळीसारखी होते आणि पावसाने घट्ट बनते, तिला साधारणतः प्रत्येक पावसानंतर आंतर मशागतीची गरज असते. तणांचा फार प्रादुर्भाव असलेल्या जमिनीत वारंवार आंतर मशागत करावी लागते. मिरची, ऊस, कापूस, तंबाखू यांसारख्या दोन ओळींमधील अंतर जास्त असणाऱ्या पिकांना बरेच दिवस आंतर मशागत चालू ठेवावी लागते परंतु गहू , मका, ज्वारी आणि बाजरी यांसारखी पिके थोडयाच दिवसांत जमीन झाकून टाकतात आणि आंतर मशागतही थोडाच काळ करावी लागते. भुईमुगाची आंतर मशागत दोन ते तीन वेळा केल्यास ती पुरेशी ठरते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत गेल्याबरोबर आंतर मशागत थांबवावी लागते, अन्यथा आऱ्या तुटून उत्पादनात घट येते. त्याचप्रमाणे वारंवार पाऊस पडणाऱ्या भागात तणांची वाढ खूप होत असल्याने आंतर मशागतही बऱ्याच वेळा करावी लागते. फार जोराचा किंवा वादळी पाऊस पडल्याने जमीन घट्ट होते, अशा परिस्थितीत वापसा आल्याबरोबर मशागत करावी लागते.

आंतर मशागतीची खोली पिकाच्या व तणांच्या वाढीवर अवलंबून असते. पीक लहान असताना आंतर मशागत उथळ करतात. खोल मशागतीमुळे लहान रोपे उपटून येण्याची किंवा मातीखाली दबून सडण्याची शक्यता असते. पिकाची मुळे खोल गेल्यानंतर खोल आंतर मशागत केल्यास मुळे मोठया प्रमाणात तुटली जाऊन त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. पिकाच्या वाढीच्या मधल्या काळात खोल आंतर मशागत केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. 


 ऊस, बटाटे, वांगी, हळद यांसारख्या काही पिकांना खांदणी करून भर द्यावी लागते. पिकाच्या दोन ओळींमधील मोकळी जागा कुदळीने खणून किंवा पिकाच्या दोन ओळींत पुरेसे अंतर असल्यास जमीन नांगराने उघडून दोन्ही बाजूंकडील ओळींतील रोपांच्या बुंध्यांशी माती लावून भर दिली जाते. त्यामुळे रोपांना आधार मिळून त्यांची जोमदार वाढ होते. उसासारख्या पिकाची जुनी मुळे तुटून नवीन मुळे फुटतात. त्यामुळे पिकाला जमिनीतून पाणी आणि पोषक अन्नद्रव्ये जास्त शोषून घेता येतात आणि पिकाची वाढ चांगली होते. खांदणीनंतर पिकाला पुरेसे पाणी देता येते. बटाट्याच्या पिकाची खांदणी करून पिकाच्या बुंध्याशी मातीची भर देतात. त्यामुळे लागलेले सर्व बटाटे मातीत झाकले जाऊन चांगले पोसतात. बटाटे उघडे पडल्यास हिरवे पडतात व त्यावरील अळीचा उपद्रव वाढतो. हिरवे पडलेले बटाटे चांगले शिजत नाहीत. त्यांना बाजारात भावही कमी मिळतो.

कोळप्यांचा वापर करून पिकाच्या दोन ओळींतील तण काढता येते पण पिकाच्या ओळीतच उगवलेले तण खुरप्याच्या साहाय्याने काढावे लागते. जेथे बैलांच्या साहाय्याने कोळप्याचा वापर करता येत नाही अशा जागी हात कोळपे वापरून किंवा खुरप्याच्या साहाय्याने आंतर मशागत करतात. हाताने बी फोकून पेरणी केलेल्या पिकात फक्त खुरप्याने जमीन हलवून तण काढावे लागते. एकापेक्षा अधिक वेळा हे शेतकाम करावे लागते.

जमिनीची मशागत करण्याकरिता जी निरनिराळी औते आणि अवजारे वापरण्यात येतात ती पुढीलप्रमाणे : (१) नांगर-लाकडी किंवा लोखंडी (वा पोलादी), लहान वा मोठे, एकतर्फी किंवा दुतर्फी, सरीचे, फाळाचे, तव्यांचे इत्यादी. (२) ढेकळे फोडण्यासाठी -लाकडी-मैंद, तव्यांचा कुळव, नॉर्वेजियन कुळव इत्यादी. (३) कुळव -लाकडी-हलके आणि भारी-फासेचे कुळव, लोखंडी (वा पोलादी) तव्यांचा कुळव. (४) जमीनसपाट करण्यासाठी-पेटारी, केणी. (५) पेरणीची अवजारे-मोघे, दुसे, तिफण, चौफणी पाभर, पाच व सहा फणी पाभर, खत व बी पेरणी यंत्र, टोकण यंत्र वगैरे. (६) आंतर मशागतीची अवजारे-फासेचे कोळपे, फटीचे कोळपे, बडोदा कोळपे, अकोला कोळपे इत्यादी. (७) हात अवजारे-खुरपे, हात कोळपे, कुदळ, पिकाला भर देण्यासाठी फावडे, पिके खणून काढण्याची साधने इत्यादी.

कीटकनाशकांची फवारणी: शेतीच्या कामात कीटकनाशकांच्या फवारणीचे कामही करावे लागते. त्यासाठी निरनिराळ्या साधनांचा वापर करण्यात येतो. कीड व रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन फवारणीची वेळ ठरवावी लागते. द्राक्षासारख्या नगदी पिकात रोग व कीड नियंत्रणाचे काम महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या काळात व्यापारी तत्त्वावर आंबा, नारळ, काजू , संत्री, मोसंबी इ. फळपिकांची मोठया प्रमाणावर लागवड करण्यात आलेली आहे. या पिकांतही योग्य वेळी कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक ठरते. भाजीपाल्याच्या नगदी पिकातही हे काम महत्त्वाचे आहे.[→ कीटकनाशके].

पिकाची काढणी व मळणी : तृणधान्यांच्या, कडधान्यांच्या व वैरणीच्या पिकांची काढणी विळ्याने कापून करतात. अलीकडे काही पिकांची कापणी यांत्रिक अवजारानेही करतात. कापूस हाताने वेचून काढतात. अमेरिकेत कापसाच्या वेचणीसाठी यंत्रांचा वापर करतात. भुईमूग, बटाटा यांसारख्या पिकांची काढणी कुळव किंवा लहान नांगर वापरून करतात. जमिनीवर आलेले भुईमुगाचे वेल, बटाटे इ. हाताने वेचून गोळा करतात. रताळे, कोनफळ, सुरण, आले, हळद इ. कंदमुळे कुदळीचा वापर करून खणून काढतात. फळे, फळभाज्या, शेंगभाज्या, पालेभाज्या इ. हाताने काढतात. निरनिराळ्या पिकांच्या काढणीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात.

काढणीनंतर तृणधान्ये आणि कडधान्ये यांसारख्या पिकांची मळणी आणि उफणणी करून दाणे गोळा करतात. मळणी करण्याचे अनेक प्रकार आहेत. तृणधान्याची कणसे, कडधान्याच्या शेंगा, गव्हाचे पीक इ. वाळल्यानंतर खळ्यात पसरून त्यावरून बैलांची पाथ धरून पीक त्यांच्या पायाखाली तुडविले जाते. तुडविल्यामुळे त्याचे दाणे वेगळे होतात. गव्हाची मळणी करण्यासाठी ओलपाड गहू मळणी यंत्राचा वापर काही प्रमाणात केला जातो. ज्वारीच्या, बाजरीच्या कणसावरून दगडी रूळ फिरवूनही मळणी केली जाते. भात पिकाच्या पेंढया बांधून त्या बाकडयावर किंवा लोखंडी खाटेवर झोडपून मळणी करण्याचा प्रघात आहे. भात मळणीसाठी ‘ अन्नपूर्णा ’ या जपानी पद्धतीच्या मळणी यंत्राचा वापरही केला जातो. मळून तयार झालेले धान्य व भुसा नैसर्गिक वाऱ्याच्या साहाय्याने उफणून दाणे वेगळे केले जातात. यासाठी यांत्रिक उफणणी पंख्याचा वापरही करतात. तयार झालेले स्वच्छ धान्य पोत्यांत भरून साठवून ठेवतात. 

पहा : शेतकामाची अवजारे व यंत्रे. 

संदर्भ : 1. Lee, Warren F. and others, Farm Management Handbook, 1991.

            2. Stone, Archie A. Gulvin, Harold E. Farm Machinery and Equipment, 1976.

            ३. चौधरी, रा. मो. शेतीची मूलतत्त्वे, पुणे, १९६२.

            ४. तेली, तु. ग. अभिनव शेतकीशास्त्र, पुणे, १९६५.

पाटील, ह. चिं. राहाटे, वि. ना. शिंगटे, मा. ब.