राजगिरा : (हिं. चुआ, चौलाई क. राजगिरी गु. राजगिरो इं. ॲमरँथ लॅ. ॲमरँथस पॅनिक्युलॅटस कुल-ॲमरँटेसी ). पालेभाजी व बियांसाठी लागवडीत असलेल्या या वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणाऱ्‍या.) ⇨ओषधीचे मूलस्थान पूर्व व पश्चिम आशिया व आफ्रिका असून महाराष्ट्रात सर्वत्र लागवडीत आहे. १·३ ते २ मी. अथवा त्याहून जास्त उंच वाढणाऱ्या या शोभिवंत वनस्पतीचे खोड जाडजूड व गुळगुळीत अथवा काहीसे लोमश (केसाळ) असून फांद्यांवर खोल रेषा असतात. पाने एकांतरित (एकाआड एक), ५ ते १५ ×२·५ ते १० सेंमी. आकारमानाची, २·५ ते १० सेंमी. लांब देठाची, दीर्घवृत्ताकृती–भाल्यासारखी, टोकदार व ब्राँ झ अथवा लालसर रंगाची असतात फुले एकलिं गी तांबड्या अथवा सोनेरी पिवळ्या रंगाच्या कणिशांमध्ये [⟶ पुष्पबंध] व बहुसंख्येने असतात. मध्यभागी असणारे कणिश सर्वांत लांब असते. कणिशांच्या आकर्षक रंगामुळे राजगिऱ्याची शेते सभोवारच्या परिसराला फारच शोभा देतात. छदके (फुलाच्या तळाकडील उपांगे) लहान, दोन, सुबक, सुईंसारखी टोकदार व संदलापेक्षा लांब परिदल मंडल २·५ ते ३ मिमी लांब संदले पाच, आयताकार ते भाल्यासारख्या आकाराची व टोकदार त्यांवरील प्रशुके आखूड केसरदले (पुं-केसर) पाच, केसरतंतू सुटे किंजपुट ऊर्ध्वस्थ, एक कप्प्याचा व त्यात एकच बीजूक असते किंजले तीन, आखूड [⟶फूल]. फळ शुष्क व करंडरूप बीज फार लहान आकारमानाचे (१·५ ते १·९ मिमी. व्यासाचे), आकाराने काहीसे गोल व रंगाने तांबडे, काळे अथवा पांढरे असते. बियांत उत्तम प्रतीचे प्रथिन असते. बियाही राजगिरा या नावानेच ओळखल्या जातात. पिठाच्या भाकरी व लाह्यांपासून लाडू, वड्या वगैरे पदार्थ बनवितात. बिया पाण्यात उकडून त्यात दूध व साखर घालून खीर करतात. को वळ्या पानांची भाजी करतात.

ही वनस्पती मूत्रल (लघवी साफ करणारी) असून गंडमाळा, लघवीची जळजळ, रक्तदोष, मूळव्याध इत्यादींवर उपयोगी आहे.

चौगले, द. सी. परांडेकर, शं. आ.

या पिकाची लागवड हिमालयात काश्मीरपासून सिक्कीमपर्यंतच्या प्रदेशात १,००० ते ३,२५० मी. उंचीपर्यंत, तसेच मध्य व द. भारताच्या तसेच ब्रम्हदेशाच्या डोंगराळ भागात आणि उ. आणि प. भारताच्या सपाट प्रदेशात हिवाळी पीक म्हणून केली जाते. सोनेरी पिवळी व चकाकणारी जांभळी कणिशे असलेले असे दोन मुख्य प्रकार आढळून येतात. सोनेरी पिवळ्या कणिशांचा प्रकार जास्त लागवडीत आहे.

या पिकाची पेरणी मे-जूनमध्ये करून कापणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करतात. सपाटीच्या प्रदेशात मात्र कापणी फेब्रुवारी-मार्चमध्ये करतात. हे स्वतंत्र पीक अथवा इतर पिकांबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात.

पालेभाजीसाठी या पिकाची उन्हाळ्यात व पावसाळ्या त पेरणी करतात. हेक्टरी सु. २२ क्विटंल भाजी मिळते. भाजीत अ आणि क ही जीवनसत्वे व लोह असते.

ॲमरँथस प्रजातीतील ॲ. कॉडॅटस या जातीची उत्तर भारतातील डोंगराळ भागात बियांसाठी लागवड करतात. बियांना त्या भागात ‘रामदाना’ हे नाव असून त्याचा उपयोग राजगिऱ्याप्रमाणेच केला जातो. या जातीच्या पानांची टोके विशालकोनी (गोलसर टोकांची) असतात व ॲ. पॅनिक्युलॅटस जातीत ती भाल्याच्या टोकाप्रमाणे असतात. तसेच ॲ. कॉडॅटस जातीची कणिशे लोंबती असतात ॲ. पॅनिक्युलॅटस जातीत ती सरळ वाढणारी असतात.

तमिळनाडूत ॲमरँथस प्रजातीतील पुढील तीन राजगिरासदृश जाती लागवडीत आहेत : ॲ. ट्रिस्टिस (त. अराक्केराई), ॲ. गँजेटिकस (त. थंडुक्केराई), ॲ. पॉलिगोनॉइडीस (त. सिरूक्केराई). वरील जातींमध्ये १३·३ ते १६·३% प्रथिने आणि ६० ते ६२·२% कार्बोहायड्रेटे असल्याचे आढळून आले आहे.

मेक्सिको, ग्वातेमाला आणि पेरू या देशांच्या डोंगराळ भागात ॲमरँथस प्रजातीतील वनस्पतींची दाण्यासाठी लागवड करतात. झाडे रागिऱ्‍याच्या झाडांप्रमाणेच दिसतात. ॲमरँथ या नावानेच या वनस्पती ओळखल्या जातात. क्रिस्तोफर कोलंबस यांच्या अमेरिकेतील आगमनाच्या वेळी मेक्सिकोत या पिकाची हजारो हेक्टरांमध्ये लागवड होत असे. ॲझटे क लोकांच्या आहारात त्याला महत्त्वाचे स्थान असे. तसेच बादशहाला वार्षिक खंडणी या पिकाच्या स्वरूपात दिली जात असे. निसर्गातील विनाशकारी शक्तीपासून रक्षण करण्यासाठीही या पिकाची लागवड केली. जाई. स्पॅनिश सेनापती एर्नांदो कोर्तेझ यांनी १५१९ मध्ये मेक्सिकोत आल्यावर ॲझेटक लोकांची संस्कृती व धार्मिक उत्सव नष्ट करण्यासाठी ॲमरँथ पिकाच्या लागवडीवर बंदी घातली आणि हजारो शेतांतील पीक नष्ट करण्यात आले. बंदी आदेश मोडून या पिकाची लागवड करणाऱ्‍यांचे हात तोडले जात व प्रसंगी देहांताची शिक्षाही दिली जाई परंतु मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या डोंगराळ भागात कोठे या पिकाची लागवड चालूच राहिली.

इ. स. १९७२ मध्ये जॉन डाउंटन या आस्ट्रेलियातील वनस्पतिशरीरक्रिया वैज्ञानिकांनी महत्त्वाचा शोध लावला. या शोधामुळे ॲमरँथ पिकाला आंतरराष्ट्रीय संशोधनात कुतूहलाचे स्थान प्राप्त झाले आहे. डाउंटन यांना ॲमरँथच्या दाण्यातील प्रथिन पुष्कळ प्रमाणात व उच्च प्रतीचे असल्याचे आढळून आले (प्रथिनातील लायसीन हे ॲमिनो अम्ल गव्हाच्या दुप्पट, मक्याच्या तिप्पट आणि दुधातील लायसिनाच्या जवळ जवळ बरोबरीने असते). असे असले, तरी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी पुष्कळ संशोधन करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने कार्य चालू आहे. निरनिराळ्या शाखांतील वैज्ञानिक या कामात गुंतले आहेत. कॅलिफोर्निया, पेनसिल्व्हेनिया, आयोवा, कार्नेल आणि मिशिगन या राज्यांतील विद्यापिठे या कामात सहकार्य देत आहेत. पर्यावरणाशी जुळते घेऊन, अत्यंत कार्यक्षम अशा प्रकारच्या प्रकाशसंश्लेषणामुळे (सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांपासून गुंतागुंतीची कार्बोहायड्रेटे बनविण्याच्या क्रियेमुळे) प्रतिकूल परिस्थितीतही जोमदार वाढ होते, ही या वनस्पतीच्या बाबतीतील उल्लेखनीय बाब आहे.

पहा : ॲमरँटेसी.

संदर्भ : 1. Aykroyd, W.R. Nutritive Value of Indian Foods and the Planing of Satisfactory Diets, NewDelhi, 1966.

2. Vietmeyer, N. D. Amaranth : Return of the Aztec Mystery Crop, 1983 Year Book of Science and the Future, Encyclopaedia Britannica, Chicago, 1982.

 

पाटील, ह. चिं गोखले, वा. पु.