गवार : (बावची गु. गुआर क. गोरीकाई, चवळीकाई हिं. गुआर, गोवार सं. बकुची इं. क्लस्टर बीन लॅ. स्यामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा  कुल-लेग्युमिनोजी उपकुल-पॅपिलिऑनेटी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) सु. १–३ मी. उंचीच्या ⇨ ओषधीची लागवड भारताच्या बहुतेक भागात होत असून जावा व द. अमेरिका येथेही तिची लागवड होते. खोड खाचदार पाने त्रिदली, दले दीर्घवृत्ताकृती, लघुकोनी दातेरी व केसाळ फुले लहान, किरमिजी छदे दीर्घस्थायी (सतत राहणारी) संवर्त तिरपा व त्याचे दाते त्रिकोनाकृती पुष्पमुकुट वर्तुळाकार, पक्ष लांबट नौकातल उभेकेसरदले एकसंध परागकोश एकसारखे किंजपुट अवृंत[→ फुल] बीजुके ६–८ शिबा (शेंग) जाड, मांसल, चौकोनी व लवदार असून ती १५ सेंमी. पर्यंत लांब असते. बिया ५-६, चौकोनी व चापट असतात. शेंग रेचक असून ती पित्तप्रकोप व रातांधळेपणा यांवर देतात. तीत अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात.

गवारीची लागवड भाजी, हिरवा चारा, दाणे , हिरवळीचे खत व डिंक (खळ) यांसाठी करतात. दाणे पौष्टिक असल्यामुळे ते भरडून, शिजवून अगर काही वेळ पाण्यात भिजत ठेवून त्यांचा जनावरांना खुराक देतात. दाण्यांत ३५–४२ टक्के मगज (गर) असतो. त्यांतील अंकुर काढून, दळून पांढरे पीठ मिळते. त्याला गवार डिंक हे व्यापारी नाव आहे. त्याचा उपयोग खाणकाम, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, कागद, स्फोटक पदार्थ इ. धंद्यांत होतो [→ डिंक] .

हवामान व जमीन : या पिकाच्या वाढीसाठी उबदार हवामान आवश्यक असते. ४३·३° से. पर्यंत तापमान असलेल्या प्रदेशात गवारीचे पीक उत्तम येते. तिची खरीप आणि उन्हाळी अशी दोन पिके घेतात. उन्हाळी पीक शेंगभाजीसाठी घेतात. पाण्याचा निचरा उत्तम असलेली पोयट्याची जमीन गवारीला मानवते.

मशागत व पेरणी : लोखंडी नांगराने जमीन १५–२० सेंमी. खोल नांगरून प्रती हेक्टर १२–१३ टन कुजलेले शेणखत जमिनीतमिसळून घेतात. कुळवाच्या आडव्या उभ्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करतात. काडीकचरा, धसकटे वगैरे वेचून घेऊन जमीन साफ करतात. खरीप पीक जुलै महिन्याच्या पहिल्या पंधवरड्यात दोन फणांत ४५ सेंमी. अंतर असलेल्या पाभरीने हेक्टरमध्ये १२–१५ किग्रॅ. बी शेंगभाजीच्या पिकासाठी व सु. २८ किग्रॅ. दाण्याच्या पिकासाठी आणि सु. ३० किग्रॅ. बी हिरवळीच्या खताच्या पिकासाठी पेरतात.

उन्हाळी पिकाची लागवड फेब्रुवारी महिन्यात करतात. त्यासाठी  नांगरून, खतवून, कुळवून, तयार करून ठेवलेल्या जमिनीत ६० सेंमी. अंतरावर सऱ्यावरंबे तयार करतात. प्रत्येक वरंब्याच्या दोन्ही बगलांवर ३० सेंमी. अंतरावर प्रत्येक जागी दोनदोन बिया हाताने टोकून लावतात. लगेच त्या जमिनीला पाण्याची हलकी पाळी देतात.

आंतर मशागत : खरीप पिकाला दोनदा खुरपणी आणि कोळपणी देतात. उन्हाळी पिकाला दोनतीन वेळा खुरपणी देतात.

वरखत : हेक्टरला ४४ किग्रॅ. नायट्रोजन मिळेल इतके वरखत दोन समान हप्त्यांनी देतात. पहिला हप्ता पेरणीनंतर तीन आठवड्यांनी आणि दुसरा पहिल्या हप्त्यानंतर तीन आठवड्यांनी देतात.

पाणी : पावसाळी पिकाला पाणी देण्याची गरज पडत नाही. उन्हाळी पिकाला लागवड केल्याबरोबर पाणी देऊन नंतर पुढे ८–१० दिवसांच्या अंतराने एकूण १२ ते १४ पाण्याचा पाळ्या द्याव्या लागतात.

प्रकार : देशी, माखनिया, सोटीया हे स्थानिक प्रकार असून सदाबहार क्रमांक ५२, ९३ व ४७ ही सुधारलेली वाणे आहेत. पुसा सदाबहार व पुसा नौबहार हे प्रकार दोन्ही हंगामांत पेरण्यास योग्य आहेत. महाराष्ट्रात देशी (सु. १·८ मी. उंच), सोटीया (सु. २·४–३ मी.) व विदेशी (सु. १·३–१·५ मी.) असे तीन प्रकार मानण्यात येतात. विदेशी प्रकार शेंगांकरिता, सोटीया हिरवळीच्या खतासाठी व शेंगांसाठी आणि देशी मुख्यत्त्वे बियांसाठी कोरडवाहू पीक म्हणून लावतात.

काढणी : बी पेरल्यापासून सातआठ आठवड्यांनी पोसलेल्या पण कोवळ्या लुसलुशीत शेंगा भाजीसाठी तोडण्याची सुरुवात होते. दर तीनचार दिवसांच्या अंतराने शेंगा तोडतात. हे काम पुढे आठ-दहा आठवडे चालू राहते. या अवधीत एकूण १२ ते १४ तोडे मिळतात. या हिरव्या शेंगांचे हेक्टरी उत्पन्न ६२ ते ७४ क्विंटलपर्यंत मिळते. दाण्यासठी लावलेला कोरडवाहू पिकाच्या शेंगा झाडावरच पिकू देतात. त्या ऑक्टोबरमध्ये पिकून वाळू लागतात. त्यावेळी पीक कापून खळ्यावर आणून ठेवतात. वाळल्यावर त्याची मळणी करतात. हेक्टरी ९–१२ क्विंटल दाण्यांचे उत्पन्न येते.

रोग : जंतुजन्य करपा : हा बागायती व आर्द्र भागात सर्वत्र आढळतो. त्यामुळे पानांवर फार लहान पारभासी (दुधी काचेप्रमाणे अर्धपारदर्शक) व ओलसर ठिपके येतात. त्याचा प्रसार बी व जमीन यांद्वारा होतो. नियंत्रणासाठी रोगमुक्त बियाणे वापरतात व दीर्घ मुदतीची फेरपालट करतात.

भुरी : त्यामुळे पानांच्या खालच्या बाजूवर पांढरे डाग पडतात. त्यासाठी पिकावर बोर्डो मिश्रण फवारतात वा गंधक भुकटी पिस्कारतात.

कीड : माव्याच्या बंदोबस्तासाठी या पिकावर १०% बीएचसी भुकटी पिस्कारतात.

संदर्भ : Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.

भोसले, रा. जि. चौधरी, रा. मो. जमदाडे, ज. वि.