मामफळ : फळासह फांदीमामफळ :(ते.मुंडला इं. सॉवर सॉप लॅ. नोमा म्यूरिकॅटा कुल-ॲनोनेसी). हा लहान व सदापर्णी वृक्ष मूळचा अमेरिकेच्या उष्ण कटिबंधी प्रदेशातील असून  सध्या  तो आशिया, यूरोप व आफ्रिका खंडांतील उष्ण कटिबंधात सर्वसाधारणपणे लागवडीत आहे. आसाम, बंगाल, द. भारत, ब्रह्मदेश व श्रीलंकेत घरगुती बागांत हा लावलेला  आढळतो.  उत्तर भारतात  हे  झाड  वाढत  नाही. झाडाची उंचीसु. ६·५ मी. पेक्षाजास्त नसते. पानेसाधी, रूदंट, लंब- गोल, टोकदार व  चिवट असतात.ती अप्रिय वासाचीअसून वरच्याबाजूला गुळगुळीतव खालच्या बाजूलाकेशहीन असतात.फुले मोठी (सु.२·५ सेंमी. लांब),हिरवट पिवळी वसुंगधी असूनफांद्यांच्या टोकांस मंजऱ्यांवर येतात. फुलांची रचना व इतर लक्षणे ⇨ॲनोनेसी अथवा सीताफल कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पाकळ्या सहा, त्यांतील बाहेरच्या तीन जाड, मांसल, अंडाकृति-लघुकोनी असून आतल्या तीन काहीशा लहान, पातळ, अंतर्गोल व वाटोळ्या असतात. फळे मोठी (१२·२० सेंमी. लांब आणि ७·५–१२·५ सेंमी. रुंद), २ ते २·५ किग्रॅ. वजनाची, अंडाभ अथवा हृदयाकृती व गर्द हिरवी असतात. फळाची साल केशहीन असून तिला अप्रिय वास येतो. सालीवर मागे वाकलेले व मांसल असे असंख्य काटे असतात. फळातील मगज (गर) पांढरा, तंतुमय व रसाळ असून चवीला आंबट गोड असतो. त्याला काहीसा आंब्याचा स्वाद असतो. फळात सीताफळापेक्षा २-३ पट जास्त अम्ल असते. बिया काळ्या व मोठ्या आकाराच्या असतात. फळे जुलै ते ऑगस्ट महिन्यात बाजारात येतात. फळात ८१% जलांश, १२·७% शर्करा व ०·४% प्रथिन असते. फळातील रसापासून पेय आणि मगजापासून मुरंबा, जेली वगैरे पदार्थ तयार करतात. फळांचा उपयोग आइस्क्रीम तयार करण्यासाठीही करतात. फळाचा खाण्यासाठी उपयोग करण्यापूर्वी त्यावरील साल काढून टाकणे आवश्यक असते. बिया वांतिकारक (ओकारी आणणाऱ्या), स्तंभक (आकुंचन करणाऱ्या), कीटकनाशक व माशांना विषारी असतात. पानांत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल अंशमात्र असून अल्कलॉइडही असते. झाडांच्या सालीत ०·०५ टक्के अल्कलॉइड असते.

क्यूबा व ब्रह्मदेशात हे फळ फार लोकप्रिय आहे. जावात कोवळ्या फळांची भाजी करतात.

झाडांची लागवड बियांपासून करतात. सीताफळ आणि मारुतीफळ (चेरिमोया) यांच्यावर केलेली याची कलमे फार वर्षे जगत नाहीत.

दक्षिण भारतातील कोरड्या हवामानाच्या सपाटीवरील प्रदेशात हे झाड चांगले वाढते. चांगल्या निचऱ्याची भारी दुमट जमीन या पिकाला फार चांगली मानवते. जमिनीत पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असले, तरी झाडावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही. ५ ते ७ मी. हमचौरस अंतरावर रोपे लावून लागवड करतात. झाडाला चौथ्या वर्षी फळे येण्यास सुरुवात होते आणि पुढे दर वर्षी दर झाडाला सु. १५ ते २० फळे येतात. नैसर्गिक परिस्थितीत परागण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे दर झाडाला २५ पेक्षा जास्त फळे धरत नाहीत व त्यांपैकी काही वेडी-वाकडी असतात. परागणात सुधारणा केल्यास व झाडाला खत दिल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.

सध्या भारतात या फळाची व्यापारी प्रमाणावर लागवड कोठेही केली जात नाही.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I. Delhi, 1948,

             2. Naik, K. C. South Indian Fruits and Their Culture, 1949.

             3. Sham Singh Krishnamurti, S. Katyal, S. L. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

             4. Singh, R. Fruits, New Delhi, 1969.

गुप्ता, पु. कि.