नासपती : (नाश्‌पाती इं. पेअर कुल-रोझेसी). ह्या स्थानिक नावाने भारतात विकली जाणारी खाद्य फळे थोडीफार सर्वांना परिचित आहेत, पण भारतात त्यांना फारसे महत्त्व नाही आणि अल्प प्रमाणातच ती काही ठिकाणी पिकविली जातात. ज्या झाडांपासून ती मिळतात त्यांचा अंतर्भाव फुलझाडांपैकी रोझेसी कुलातील (गुलाब कुलातील) पायरस या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या वंशात करतात. ह्या वंशात एकूण वीस जाती असून भारताबाहेरील देशांत त्यांची फळे ‘पेअर’ या नावाने ओळखतात. ती तेथे अत्यंत लोकप्रिय असून त्यांच्याच वंशातील सफरचंदाखालोखाल त्यांचा क्रमांक आहे. गुलाब कुलातील (व प्रूनस वंशातील) पीच (सप्ताळू), प्लम (अलुबुखार) व चेरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकप्रिय फळांपेक्षा पेअरचे उत्पादन बरेच अधिक आहे. सर्व पेअरची झाडे मूळची युरोप ते पूर्वेकडे आशियातून चीन व उ. आफ्रिका या प्रादेशिक पट्ट्यातील आहेत त्यांपैकी कोणतीही जाती मूळची द. गोलार्ध आणि अमेरिकेतील नाही. ज्याला ‘सामान्य पेअर’म्हणतात ती (पायरस कॉम्यूनिस) आग्नेय यूरोप व प. आशिया येथील असून आजचे लुसलुशीत व रसाळ प्रकार तिच्यापासून निघालेले आहेत. ‘पेरी’या मद्ययुक्त पेयाचे उत्पादन तेथील एका भिन्न (पायरस निव्हॅलिस) जातीच्या अनेक प्रकारांतून केले जाते. आशियातील बहुतेक जाती चिनी सँडपेअर (पायरस पायरिफोलिया) पासून निघाल्या आहेत हिच्या फळांतील मगज (गर) चरबरीत आणि रेवाळ असतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर लागवडीत असलेल्या अनेक प्रकारांचा उगम याच जातीतून झालेला आहे. ही आणि इतर पौर्वात्य जाती यांना करपा रोगाची बाधा फारशी होत नाही, असा अनुभव आहे परंतु या संदर्भात सामान्य पेअर ह्या यूरोपीय जातीपासून निघालेले प्रकार अधिक नाजूक असतात, ही गोष्ट महत्त्वाची आहे.

इतिहास : इ. स. पू. अनेक वर्षांपासून पेअर लागवडीत असावे, अशी साधार माहिती मिळते. ग्रीक कवी होमर यांनी (इ. स. पू. १००० वर्षांपूर्वी असलेल्या) ॲल्सिनसच्या बागेतील फळांच्या यादीत पेअरचा उल्लेख केला असून त्यांच्या वेळच्या ग्रीकांना त्याची माहीत होती, असे दर्शविले आहे. कलमांनी अभिवृद्धी (लागवड) केलेले काही सुधारित प्रकार ख्रिस्तपूर्व काळात माहिती होते. त्या वेळेपासून युरोपात शेकडो नवीन प्रकार काढले जाऊन त्यांना नावेही दिली गेली आहेत. अमेरिकेत पेअरचा प्रवेश तेथे वसाहतींची स्थापना झाल्यावर ब्रिटिश आणि उ. यूरोपियन लोकांकडून झाला. तत्पूर्वी स्पेनमधील धर्मोपदेशकांनी मेक्सिकोत व कॅलिफोर्नियात पेअरची लागवड सुरू केली होती.

सामान्य स्वरूप : सामान्यपणे पेअरची पानझडी झाडे डेरेदार व सु. १०–१५ मी. उंच व सरळ वाढतात आणि त्यांंवर गोलसर लांबट, चिवट, तळाशी पाचरीसारखी आणि एकाआड एक पाने सु. २–२·५ सेंमी. व्यासाच्या पांढऱ्या फुलांबरोबरच येतात. फुलांची सामान्य संरचना रोझेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असते. सफरचंदाच्या फुलाशी तुलना केल्यास येथे पाच किंजळे सुटी असतात, असा फरक दिसतो. पेअरची आक्रांत मृदुफळे (पुष्पस्थलींनी पूर्णपणे वेढलेली) सफरचंदापेक्षा अधिक नरम व गोड असतात मगजात (काही जातींत) रेवाळ कण (कठक कोशिका कठीण पेशी) असतात बहुधा ती फळे लांबट व काहीशी पेरूसारखी (देठाजवळ निमुळती परंतु दुसऱ्या टोकास रुंदट गोलसर) परंतु काही जातींत व प्रकारांत सफरचंदासारखी गोलसर (देठाजवळ खोलगट) असतात. बीजके सु. दहा, परंतु बीजे कमीजास्त असतात जास्तीत जास्त दहा असतात. पेअरच्या फळात थोडे अधिक प्रथिन आणि अधिक खनिजे व साखर असतात मात्र त्यात जीवनसत्त्वे कमी असून पाणी व कॅलरीमूल्य दोन्हींत सारखे असते.

प्रकार : आशियाबाहेरील देशांत ‘विल्यम्स (अमेरिकेत ‘बार्टलेट) प्रकाराची लागवड सर्वाधिक आहे. कॅनडा व संयुक्त संस्थानांत ‘ब्यूरे बॉस्क, ‘ब्यूरे द अँजौ’आणि ‘विटर नेलिस’यांची लागवड करतात. इंग्लंड व नेदरलंड्समध्ये ‘कॉन्फरन्स’आणि इटलीत विल्यम्सशिवाय ‘क्यूरेटो, ‘कोसिया’इत्यादींवर भर आहे. फ्रान्स इटलीत ‘पासे क्रासने’हा प्रकार विशेष लागवडीत आहे. १८४९ मध्ये फ्रान्समध्ये ‘डॉयने दू कॉमिस’ह्या अत्युत्तम जातीचे उत्पादन केले गेले. आशियाई देशांत स्थानिक जातींचे प्रकार लावले जातात परंतु ते इतरांहून कमी प्रतीचे मानले आहेत. पेअरची झाडे साधारणपणे लावल्यापासून सु. चार ते सात वर्षांत फळे धरतात आणि त्यांचा आयुःकाल ५०–७५ वर्षे असतो. काळजीपूर्वक खुडणे, आधार देणे इ. प्रक्रिया केल्यास आकार भरमसाट वाढत नाही. –२९°से. ते –३५°से. इतक्या कमी तापमानात ती झाडे जगत नाहीत. मध्यम प्रकारच्या उन्हाळ्यात त्यांचे फलोत्पादन चांगले होते.

भारतात ‘यूरोपीय (पायरस कॉम्यूनिस) व ‘पौर्वात्य (पायरस पायरिफोलिया) या दोन जातींपासून निघालेल्या प्रकारांची (नाश्पाती) मिळतात. यूरोपीय जातीचे चायना, बार्टलेट, विंटर नेलिस, ओल्ड होम, बगुगोशा इ. प्रकार आहेत पौर्वात्य जातीचे नाख व सँडपेपर हे दोन मुख्य प्रकार आहेत ह्या प्रकारांत काटेकोर फरक नाहीत. काश्मीर, हिमालय प्रदेश, उत्तर प्रदेशचा काही भाग, ईशान्य भारतातील काही भाग, निलगिरी टेकड्या इ. ठिकाणी काही प्रकारांची लागवड केली जाते. बाजारात विकल्या जाणाऱ्या नासपती फळांमध्ये कमीअधिक चांगले प्रकार आढळतात व त्यांचा उगम वर उल्लेख केलेल्या यूरोपीय व पौर्वात्य जातींपासून झालेला आहे पुढे दिलेली वर्णने ह्या जातींना स्थूलमानाने लागू पडतात.


आ. १. यूरोपीय पेअर : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फळ.

यूरोपीय पेअर : (कॉमन पेअर पा. कॉम्यूनिस). हा रुंद माथ्याचा लहान वृक्ष असून त्याची पाने गोलसर अंडाकृती किंवा लंबगोल व ५–१० सेंमी. असतात त्यांची किनार सूक्ष्म दातेरी असते. गुलुच्छ प्रकारच्या फुलोऱ्यावर [⟶ पुष्पबंध] थोडी, पांढरी व २–२·५ सेंमी. व्यासाची फुले येतात. भिन्न प्रकारांतील पानांत, फुलांत व फळांत फरक असून ते सर्व प्रकार नैसर्गिक किंवा कृत्रिम संकरज आहेत. ह्या जातीतील फळे सु. २ सेंमी. किंवा अधिक, आकाराने बहुधा लांबट व लहान पेरूसारखी, चवीला गोड व मगज कमी रेवाळ असतो. फळावर बहुधा सतत संवर्ताचे अवशेष असतात. बियांची संख्या कमीजास्त असते.

पौर्वात्य पेअर : (सँडपेअर पा. पायरिफोलिया, प्रकार कल्टा पा. सायनेन्सिस). हा सु. ९–१५ मी. उंचीचा वृक्ष असून त्याला सु. १०–१५ X ७–१० सेंमी. व गर्द हिरवी पाने, पांढरी फुले आणि सु. ९ सेंमी. व्यासाची बहुधा गोलसर व सफरचंदासारखी फळे येतात ती कमी प्रतीची व जास्त रेवाळ असतात संवर्ताचे अवशेष आधी गळून पडलेले असतात. निलगिरी भागात ‘बेरीकाई’ हे स्थानिक नाव आहे.

उपयोग : ताजी व पक्क फळे तशीच खातात त्यांचा रस काढून पेये बनवितात फळे डबाबंद करून विक्रीस ठेवतात. पाश्चात्त्य देशांत फळे सुकवून नंतर स्वयंपाकात वापरतात तसेच रसापासून मद्ययुक्त पेये बनवितात. फळात साखर बेताची असल्याने मधुमेही लोकांना खाण्यास ती उपयुक्त असतात. फळात प्रथिन कमी असते. रेवाळ मगजाची फळे शिजवून खातात. फळांचे मुरंबे घालतात. फळे स्तंभक (आकुंचन करणारी), शामक (दाह कमी करणारी) व ज्वरनाशी असतात. युरोपीय जातीच्या काही प्रकारांत पाने खंडित व चित्रित असल्याने शोभेकरिता ते प्रकार बागेत लावतात.

आ.२. पौर्वात्य पेअरचे फळ.

लागवड, मशागत इत्यादी : नासपतीच्या झाडांना सफरचंदापेक्षा काहीसे उबदार हवामान लागते. पाणी धरून ठेवणाऱ्या खोल व उबदार जमिनी त्यांना मानवतात. कमी प्रतीच्या जातीवर (पा. पाशियावर) चांगल्यांची (युरोपीय जातींची) कलमे करण्याची प्रथा आहे डोळे भरूनही अभिवृद्धी करतात. निलगिरी भागात यूरोपीय जातींची कलमे पौर्वात्य प्रकारांवर करतात. एक वर्षाची कलमे उत्तरे कडील भागात ऑक्टोबरमध्ये आणि निलगिरी भागात जानेवारीत लावतात. दोन झाडांतील अंतर सु. ४–७ मी. ठेवतात. खत आणि मशागत बहुतांशी सफरचंदाप्रमाणे असते. छाटणी करून भिन्न आकार देतात त्यामुळे फळेही मोठी होतात व दरवर्षी फळे मिळण्याचा संभव वाढतो. बहुतेक प्रकार स्वयंफलित नसल्याने बागेत भिन्न प्रकार लावणे आवश्यक असते. फुलांचे परागण (परागसिंचन) मधमाश्यांद्वारे घडून येते. झाडे कायम जागी लावल्यापासून सु. सात वर्षांनंतर फळे धरण्यास सुरुवात होते. पुढे ६० ते ७० वर्षांपर्यंत व्यापारी दृष्ट्या फायदेशीर होईल इतक्या संख्येने फळे मिळतात. उत्तरेकडे फळांची तोडणी जून ते नोव्हेंबर आणि दक्षिणेकडील भागांत मे ते सप्टेंबरपर्यंत असते. दर झाडामागे सु. ७० ते १२० किग्रॅ. फळे दरवर्षी मिळतात. पंजाबात व आसाममध्ये पौर्वात्य जातीची लागवड होते. पंजाबात सु. ४०० हेक्टर क्षेत्र आहे. पीक भरपूर येते मात्र फळे कमी प्रतीची असतात ती पौर्वात्य जातीची असतात व यूरोपीय जातीपेक्षा जास्त टिकतात. निलगिरी भागात ‘बेरीकाई’ प्रकार सु. २०० हेक्टर क्षेत्रात लागवडीत आहे. फळे कुरकुरीत व गोड असतात.

रोग व कीड :नेक्ट्रिया वंशातील कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होणारा सालीवरील खैरा रोग आणि व्हेंचुरिया पायरिना कवकामुळे होणारा खपली (खवडा स्कॅब) रोग हे प्रमुखपणे आढळतात. खैरा रोग झालेली मृत झाडे जाळून टाकणे, जिवंत झाडांच्या रोगट फांद्या कापून टाकणे व इतर भागांवर बोर्डो पेस्ट लावणे हे उपाय आहेत. खपली रोगासाठी चुना-गंधक मिश्रण फवारतात. सॅन ओझे या नावाच्या खवले कीटकांवर सफरचंदावरील त्या किडीप्रमाणे उपाययोजना करतात. पानावरील भुंगेरे डीडीटीच्या फवाऱ्याने नाहीसे करता येतात.

पहा :अलुबुखार चेरी रोझेसी सप्ताळू सफरचंद.

संदर्भ :1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials,  Vol. VIII. New Delhi, 1969.

           2. I. C. A. R. Fruit-Culture in India, New Delhi, 1963.

परांडेकर, शं. आ. चौधरी, रा. मो. रुईकर, स. के.