आले : (हिं. अद्रक, अडा गु. आदू क. अला, हसिसुंठी) सं. आर्द्रक, शृंगबेरा इं. जिंजर लॅ. झिंजिबर ऑफिसिनेल, गण सिटॅमिनी, कुल – झिंजिबरेसी).  बाजारात मिळणारे आले (किंवा  सुंठ) हे त्याच नावाच्या लहान ओषधीचे मूलक्षोड [→ ओषधी खोड] होय.  ही वनस्पती मूळची आग्नेय आशियातील (बहुधा भारत व चीन) ती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) असून जमिनीत आडव्या वाढणाऱ्या शाखित मांसल खोडापासून जमिनीवर सु. ०·५ ते १·५ मी. उंच फांद्या येतात पाने लांबट, २० × १·८ सेंमी. साधी, आवरक (वेढणाऱ्या) तळाची व जिव्हिकावंत फुले अनियमित, द्विलिंगी, अपिकिंज, सच्छद, पिवळट हिरवी असून मार्च-एप्रिलमध्ये कणिशावर येतात. [→ फूल सिटॅमिनी] मोठी पाकळी जांभळी व तिच्यावर पिवळे ठिपके फुले क्वचित व फळे त्याहून क्वचित बोंडात अनेक बिया असतात.

ओले मूलक्षोड ‘आले’ व सुकविलेले मूलक्षोड ‘सुंठ’  ह्याचा उपयोग औषधाकरिता व मसाल्याकरिता फार प्राचीन कालापासून केला जात आहे.  आले तिखट, उष्ण, उत्तेजक, वायुनाशक असून अग्निमांद्य, उदरवायू, शूल (तीव्र वेदना) इत्यादींवर गुणकारी असते. ‘आलेपाक’ आणि ‘सुंठसाखर’ पडसे-खोकल्यावर गुणकारी समजतात.  तसेच जिंजर बीर व जिंजर एल ही पेये बनविण्यासाठी आल्याचा उपयोग होतो.

जमदाडे, ज. वि.

आल्याचे गड्डे हाताच्या पंजासारखे असून त्यांची बरीचशी बोटे जवळजवळ व एकमेंकाना चिकटलेली असतात.  भारत, इंडोनेशिया, वेस्ट इंडीज, विशेषतः जमेका, उत्तर व पश्चिम आफ्रिका या उष्णकटिबंधातील प्रदेशांत आल्याची प्रामुख्याने लागवड होते.  समुद्रसपाटीपासून ते हिमालयाच्या उतारावरील १,६७०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात सर्व भारतात व विशेषतः दक्षिणेकडील भागात आल्याची लागवड केली जाते.  केरळात मोठ्या प्रमाणात याची लागवड होते.  आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांतही आल्याखाली बरेच क्षेत्रफळ आहे.  महाराष्ट्रात मुख्यत्वे सातारा जिल्ह्यात आल्याची लागवड होते.

हवामान : मुख्यतः दमट व उष्ण हवामानात चांगले वाढणारे पीक असल्यामुळे मलबारसारख्या २२५–२५० सेंमी. पावसाच्या प्रदेशात पावसाच्या पाण्यावरच ते घेतात.  परंतु पर्जन्यमान साधारणच असेल तर पाणी देऊन त्याची लागवड करता येते.  त्याला सावली मानवते म्हणून काही ठिकाणी पिकात केळी, तूर, एरंडी, गोराडू वगैरे मिश्रपिके म्हणून लावतात.

जमीन : मुरूम नसलेली भुसभुशीत जांभ्या दगडाची जमीन आल्याच्या लागवडीस सर्वात चांगली.  रेताड पोयट्याची, मध्यम काळी किंवा गाळाची जमीनही चांगली.  तसे पाण्याच निचरा चांगला होणाऱ्या व लवणता नसलेल्या साधारणतः कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आल्याचे पीक घेता येते.

मशागत : आधीचे पीक निघाल्याबरोबर जमीन १८–२० सेंमी.  खोल नांगरून काही दिवस  उन्हात चांगली तापू देतात.नंतर ढेकळे फोडून २·३ वखर पाळ्या देऊन, काडीकचरा वेचून जमीन भुसभुशीत करतात. आल्याच्या पिकात पाणी साचणार नाही, पाण्याचा निचरा चांगला होईल अशी काळजी घ्यावी लागते.  त्यासाठी शेताच्या चोहोबाजूंनीही चर काढतात. तसे ठराविक अंतरावर ४५–६० सेंमी. खोल व २० सेंमी,  रुंद चर शेतात खोदतात.

खत : या पिकाला भरपूर खताची आवश्यकता असते.  प्रतिहेक्टर ३५–५० टन शेणखत देऊन ते वखराने शेतात चांगले मिसळवून घेतात किंवा गादीवाफ्यावरील लागणीत ३० × ३० सेंमी.  अंतरावर लहान लहान खड्डे ओळीत करतात आणि त्यात प्रत्येकी मूठमूठ खत घालतात.  शेणखताशिवाय प्रतिहेक्टर ७५ किग्रॅ.  नायट्रोजन मिळेल इतके वरखत समान दोन हप्त्यांत देतात.

लागण: मेच्या मध्यावक किंवा जूनच्या सुरुवातीला लागण करतात. लागणीसाठी निरोगी, भरीव व कमीतकमी एक चांगलाडोळा असलेले

आ. १. आले : (१) स्थानिक जातीचे झाड, (२) परदेशी जातीचे झाड.

आल्याचे तुकडे बेणे म्हणून वापरतात. साधारणतः ३० × ३० सेंमी. या अंतराने गादीवाफ्यावर ओळीत केलेल्या खड्ड्यात प्रत्येकी एक याप्रमाणे ५ सेंमी. खोलीवर बेणे लावतात.  कमी पावसाच्या प्रदेशातील लागवडीमध्ये किंवा लहान आकारमानाचे बेणे असल्यास ते १५ × १५ सेंमी किंवा २२ × २२ सेंमी. अंतरावर लावतात.  बेण्याच्या लहान मोठ्या आकारमानानुसार आणि लागणीमधील अंतराप्रमाणे प्रतिहेक्टर २,५००–४,००० किग्रॅ.  बेणे लागते.

पाणी व खत: लागण केल्याबरोबर पाणी देतात.  काही ठिकाणी पाण्याच्या पाटाच्या कडेने साधारणपणे ३·५ मी. अंतरावर सावलीसाठी एरंडाचे किंवा तुरीचे बी टोकतात.  जोरदार पावसाच्या माऱ्याने गादीवाफ्यावरील माती वाहून जाऊ नये म्हणून जास्त पावसाच्या प्रदेशात लागणीनंतर वाफे पानांनी अगर कोवळ्या फांद्यांनी झाकून घेतात.  १०–१२ दिवसांत बेण्याचे अंकुर जमिनीवर दिसू लागतात व पुढील १०–१२ दिवसांत बेण्याची उगवण साधारणतः पूर्ण होते.  उगवण होण्याच्या काळात पिकात पाणी बिलकूल साचू देत नाहीत कारण पाणी साचल्यास बेणे सडू लागते. नंतर आवश्यकतेप्रमाणे तण काढतात व पाणी देतात. वरखताचा पहिला हप्ता लागणीनंतर एक महिन्याने आणि दुसरा पहिल्याच्यानंतर एक महिन्याने देतात. वरखताचा दुसरा हप्ता दिल्यानंतर उथळ खांदणी करून पिकाला भर देतात.

 

काढणी: हे ७-८ महिन्यांचे पीक आहे. पीक तयार झाले की, पाने पिवळी पडून वाळू लागतात. त्यावेळी कुदळीने खणून आल्याचे गड्डे गोळा करतात, त्यांना चिकटलेली माती त्याचप्रमाणे त्यांच्यावरील मुळ्या काढून टाकतात. काही वेळा पीक तयार झाल्याबरोबर सगळे पीक एकदम काढून न घेता जसजसे लागेल तसतसे काढीत जातात. सुंठ करावयाची असल्यास पीक एकदम काढणे श्रेयस्कर असते.

उत्पन्न: या पिकाचे दोन परदेशी प्रकार केरळ राज्यात लावतात. एक ‘रीओ दे जानेरो’ आणि दुसरा ‘चायना’ आले. तेथे हे दोन्ही प्रकार फार चांगले उत्पन्न देणारे ठरतात असे आढळून आले आहे. तेथे त्यांच्यापासून दर हेक्टरी अनुक्रमे २२,५०० किग्रॅ. आणि २८,००० किग्रॅ. इतके उत्पन्न ओल्या आल्याच्या रूपात मिळते.

       स्थानिक पिकापासून हेक्टरमधून ७,५०० ते १२,५०० किग्रॅ. आले किंवा २,०००–३,००० किग्रॅ. सुंठ मिळते. सुंठ व आले यांचे प्रमाण साधारणपणे १:३ पासून १:५ पर्यंत पडते.

सुंठ: ही तयार करण्यासाठी आल्याच्या गड्ड्यांना चिकटलेली माती, मुळ्या व गड्ड्यांवरील साल काढून टाकावी लागते. त्यासाठी आले काही वेळ पाण्यात भिजत घालून धुऊन साफ करून त्यावरील साल शिंपल्याने किंवा बांबूच्या धारदार पात्याने खरवडून काढतात. नंतर धुऊन ते ७-८ दिवस उन्हात वाळवितात. वाळत असताना ते एकदोन वेळा हाताने घासतात. वाळल्यानंतर सामान्य प्रतीची भुरकट रंग असलेली सुंठ तयार होते. ही सुंठ दिसण्यात जरी विशेष आकर्षक नसली तरी तिच्यामधील सुवास त्याचप्रमाणे आवश्यक घटक उडून न जाता टिकून राहतात.

काही ठिकाणी हळदीप्रमाणेच आल्याचे गड्डे शिजवून, वाळवून, चोळून सुंठ तयार करतात. शिजविण्यासाठी साधे किंवा थोडी चुन्याची निवळी घातलेले पाणी वापरतात. या पद्धतीद्वारा तयार होणारी सुंठसुद्धा भुरकट रंगाची असून विशेष आकर्षक नसते.

चांगल्या प्रतीची सुंठ पांढरी व भरीव असते. वरीलप्रमाणे नुसते आले धुऊन व वाळवून ती तयार होत नाही. त्यासाठी आले पहिल्याने काही वेळ पाण्यात भिजत घालून त्यावरील साल वर वर्णन केल्याप्रमाणे खरवडून काढतात. नंतर एक दिवस पाण्यात भिजत ठेवतात. तेथून काढून घेऊन ते चुन्याच्या निवळीत थोडा वेळ भिजत ठेवतात. चुन्याचा विद्राव घराच्या भिंतीना सफेदी देताना जितक्या प्रमाणात दाट वापरतात तितकाच दाट या कामासाठी वापरतात. नंतर ८–१० दिवस ते आले उन्हांत चांगले वाळवितात. वाळल्यावर त्याला सुंठ म्हणतात. ही सुंठ गोणपाटाच्या तुकड्यात घालून घासून काढतात म्हणजे तिच्यावर काही सालीचे तुकडे राहिले असल्यास ते काढून टाकले जातात. या पद्धतीने सुंठ चांगली बनते. एवढे करूनही सुंठ चांगली पांढरी आणि आकर्षक बनली नसेल तर ती पुन्हा चुन्याच्या पाण्यात काही वेळ बुडवून काढून वाळवून चोळतात.

      उत्तम प्रतीची पांढरी व आकर्षक सुंठ बनविण्यासाठी गंधकाची धुरी द्यावी लागते. वर वर्णन केल्याप्रमाणे आल्याचे गड्डे चुन्याच्या पाण्यात भिजवून काढल्यावर धुरी देण्याच्या खोलीमध्ये नेतात. या खोल्या ३·६ × ३·६ × ३·६ मी. मोजमापाच्या असून त्यांच्यात भिंतींना ०·९ मी. अंतराने एकावर एक पळ्या बसविलेल्या असतात. त्यांच्यावर बांबूच्या लहान लहान टोपल्यांमधून धुरी द्यावयाचे आले ठेवून गंधकाची धुरी देतात. साधारणतः १२ तासांपर्यंत धुरी दिल्यानंतर खोलीचे दार उघडून खोलीत हवा खेळू देतात. आले काढून घेऊन एक दिवस उन्हात वाळवितात. दुसरी आणि शेवटची धुरी ६ तास देतात. तिच्यामुळे चांगली पांढरी आणि आकर्षक दिसणारी सुंठ तयार होते. ती उन्हात चांगली वाळवून विक्रीसाठी पाठवितात.

 

बियाणे साठविणे : पीक काढताना निरोगी व जोमदार गड्डे वेगळे काढून ठेवतात. नेहमी सावली राहील अशा थंड जागी खड्डा खोदून त्याच्या तळाशी रेतीचा अथवा साळीच्या तनसाचा थर करतात व त्यावर हे आले पसरतात. खड्डा जवळजवळ भरत आल्यावर त्यावर फळ्या घालून वर ओल्या मातीचा थर पसरून खड्डा पूर्णपणे बंद करतात. खड्ड्याऐवजी उघड्या सपाट जागेवरसुद्धा आच्छादनाखाली आल्याचे बेणे राखून ठेवता येते. लागणीच्या वेळी वरील आच्छादन काढून टाकून अंकुरलेले बेणे लागवडीकरिता घेतात. या पद्धतीमुळे खात्रीशीर उगवणारे बेणे लागवड करणाऱ्याला मिळविता येते.

रासायनिक घटक : सुंठीमध्ये स्टार्चचे प्रमाण बरेचसे असते. सुंठीला किंवा आल्याला जो एक विशिष्ट वास येतो तो त्यामध्ये असलेल्या बाष्पनशील तेलामुळे येतो. या तेलाचे प्रमाण शेकडा २-३ इतके असते. त्या तेलामध्ये आल्याच्या किंवा सुंठीच्या तिखटपणाला कारणीभूत असलेले रेझीन विरघळलेले असते. आल्याचे रासायनिक पृथक्करण खाली दिल्याप्रमाणे असते :

शेकडा प्रमाण 

पाणी 

प्रथिन 

वसा 

स्टार्च 

तंतुमय पदार्थ 

राख 

८१·०० 

२·३० 

१·०० 

१२·२० 

२·३० 

१·२० 

       

आल्यामधील तिखटपणा, स्वाद, आणि तंतुमय भाग या गुणांवर त्याची प्रत अवलंबून असते.

 

भारतामधील आल्याच्या उत्पादनापैकी सु. १५ टक्के आल्याची सुंठ बनविली जाते व ती आशिया, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया वगैरे प्रदेशांत पाठवून दरसाल एक कोट रुपयांपेक्षा अधिक परदेशी चलन भारताला मिळते. १९६७-६८ साली भारतात आल्याखाली २२,००० हेक्टर क्षेत्र होते.

नानकर, ज. त्र्यं.

रोग : आल्याची कूज हा रोग पिथियम ॲफानिडरमेटम  व पिथियम मायरिओटिलम  या कवकांमुळे उद्भवतो. तो मुख्यत्वे करून दक्षिण भारतात

आ. २. आले : (१) निरोगी झाड, (२) रोगट झाड.

आढळतो. रोगामुळे प्रथम पानांची टोके व कडा पिवळ्या पडतात व हळूहळू सर्व पानच पिवळे पडते. थोड्याच दिवसांत झाडाचे खोड, बुंधा, गड्डे व मुळे पिवळी पडून सडू लागतात. पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या प्रकारच्या जमिनीत हा रोग सहसा पडत नाही पण मध्यम काळ्या जमिनीत पाणी साचल्यामुळे तसेच पावसामुळे रोगाचे प्रमाण वाढते. रोगकारक कवक सडलेल्या गड्ड्यात व मुळात सापडते. जमिनीत सडलेल्या गड्ड्यांच्या व मुळांच्या अवशेषातील कवक पुढील हंगामापर्यत जिवंत राहू शकते, म्हणून असा जमिनीत निरोगी  बेणे लावले तरी रोगोद्भव होतो. रोगप्रतिबंधक उपाय म्हणून पिकांची फेरपालट करतात. निरोगी बेणे वापरणे श्रेयस्कर असते. तसेच बेणे लावण्यापूर्वी त्या वाफ्यात बोर्डो मिश्रण (६ : ६ : ५०० कसाचे) दर चौ.मी ला ७० लि. या प्रमाणात फवारतात.

बेणे उगवून आल्यानंतर पुन्हा बोर्डो मिश्रणासारखी (५ : ५ : ५०० कसाचे) कवकनाशके १५ ते २० दिवसांच्या अंतराने पिकावर फवारतात. लागवडीच्या आधी बियाणे ६ टक्के पारायुक्त कवकनाशकाच्या विद्रावात बुडवून लावतात. शिवाय रोग उद्भवू नये म्हणून जमिनीतील पाण्याचा निचरा चांगला होईल अशी काळजी घेतात.

कुलकर्णी, य. स.

संदर्भ: 1. Aiyadurai, S. G. Review of Research on Spices and Condiments in India, Ernakulam, 1966.

            2. Kumar, Arkeri et al. Agriculture In India, Vol. II, Bombay.