पन्हेरी बाग: (नर्सरी गार्डन). ज्या जागेत फळझाडांची, शोभेच्या आणि सावलीच्या (छायेच्या) झाडांची, फुलझाडांची वा भाजीपाल्याची रोपे किंवा कलमे (पन्हेरी) तयार करून विक्री होईपर्यंत जोपासली जातात, तिला ‘पन्हेरी बाग’ म्हणतात. या बागेसाठी पाणीपुरवठा भरपूर आणि खात्रीशीर असावा लागतो. पन्हेरी बागेतील रोपे अथवा कलमे घेऊन शहरातील हौशी लोक आपल्या बंगल्याभोवती शोभेच्या झाडांच्या व फुलझाडांच्या बागा लावतात आणि शेतकरी फळबागा लावतात. या लागवडी यशस्वी होण्याकरिता घेतलेली रोपे किंवा कलमे खात्रीशीर व उत्कृष्ट दर्जाची असावी लागतात. यासाठी पन्हेरी बाग तयार करणाऱ्याला रोपे तयार करण्याचे, झाडाच्या अभिवृद्धीचे (उत्पत्ती करण्याचे) आणि झाडे जोपासण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असते. भारतामध्ये पन्हेरीचा व्यवसाय फार जुना आहे परंतु तो करणाऱ्यांवर भारतामध्ये अन्य देशांप्रमाणे शासनाचे नियंत्रण नाही. काही कृषि-उद्यानविज्ञानीय संस्था, शासकीय पन्हेरी बागा व खाजगी पन्हेरी बागा येथून निरनिराळ्या प्रकारची रोपे व कलमे तयार करून विकली जातात.

भारतात पुष्कळशा शेतकऱ्यांना आणि इतर लागवड करणाऱ्यांना आपल्या स्वतःच्या उपयोगासाठी फळझाडांची, फुलझाडांची इ. पन्हेरी तयार करणे शक्य होत नाही किंवा परवडत नाही. त्यामुळे त्यांना ती आयती विकत घेऊन लावणे भाग पडते शिवाय पुष्कळसे परिश्रम वाचून तुलनात्मक दृष्ट्या ते स्वस्तही पडते. सर्व प्रकारच्या वनस्पतींची अभिवृद्धी बी लावून करता येत नाही. बियांपासून वाढविलेल्या फळझाडांचे उत्पादन त्यांच्या मातृवृक्षासारखेच गुणधर्म असलेले मिळेल, अशी खात्री नसते. शिवाय रोपांपासून वाढविलेल्या फळझाडांना कलमांपासून वाढविलेल्या झाडांच्या तुलनेने फळे यावयाला फार काळ लागतो. म्हणून काही परिस्थितींत बियांपासून रोपे करून ती लावून तयार केलेली बाग किफायतशीर होत नाही. फळझाडांना उत्कृष्ट प्रतीची फळे लवकर येण्यासाठी विविध प्रकारची कलमे करून ती लावावी लागतात.

जमीन: पन्हेरी बागेसाठी जमीन पुरेशी खोल, कसदार व पाण्याचा निचरा उत्तम असलेली पाहून घेतात. खोल मुळ्यांची बहुवर्षायू (अनेक वर्षें जगणारी) तणे असलेली जमीन घेत नाहीत.

मशागत: जमिनीतील झाडझाडोरा काढून टाकून तिची खोल नांगरट करतात व तणांची मुळे, काशा (हरळी, कुंदा इत्यादींची मुळे) वगैरे काळजीपूर्वक वेचून काढतात. पन्हेरी बागेच्या लागणीपूर्वी तणांचे नियंत्रण करतात आणि जमिनीचा कस वाढविण्यासाठी तागासारखे हिरवळीचे खत शेतात गाडतात. तसेच भरपूर प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत भरखत म्हणून घालतात व ते जमिनीत चांगले मिसळून घेतात.

रोपे: पन्हेरी बागांतून कलमासाठी खुंट म्हणून आणि कायम जागी लावण्यासाठी अशा दोन उद्देशांसाठी रोपे तयार करतात. रोपे तयार करण्याचा पन्हेरी बागेचा भाग उघड्या जागी असावा लागतो. मशागत केलेल्या जमिनीत सपाट वाफे अगर गादी वाफे तयार करतात. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी सर्वसाधारणपणे गादी वाफे जास्त पसंत करतात. सपाट वाफे ३ x १·८ मी. आकारमानाचे आणि गादी वाफे १५–२० सेंमी. उंच, १·८ ते ३ मी. लांब आणि माथ्यावर १ मी. रुंद ठेवतात. माथ्यावरील मातीचा थर मऊ आणि भुसभुशीत करून सपाट करतात. त्यावर १०–१५ सेंमी. अंतरावर बोटाने बारीक पन्हळी करून त्यांत खात्रीलायक बी पेरून ते मातीने झाकतात. बी त्याच्या जाडीच्या तिपटीपेक्षा जास्त खोल पेरीत नाहीत. फार लहान आकारमानाचे बी सर्वत्र सारखे पडावे म्हणून त्यात बारीक वाळू समप्रमाणात मिसळतात. बी पेरल्यावर जमीन हाताने दाबून ते झाकून टाकतात आणि लगेच बारीक भोकांच्या झारीने पाणी देतात. बी उगवेपर्यंत दररोज पाणी देतात. पेरण्यापूर्वी बियांवर कवकनाशकाचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणाऱ्या पदार्थाचा) उपचार करणे फार आवश्यक असते. वाफ्यातील तण काढणे, दाट झालेली रोपे पातळ (विरळ) करणे, त्यांच्यावरील कीटक उपद्रव व रोगराई यांवर उपचार करणे, रोपांची वाढ जोमदार व्हावी म्हणून नायट्रोजनयुक्त खत देणे वगैरे बाबींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. फुलझाडांची अथवा भाजीपाल्याची रोपे १५–२० सेंमी. उंच वाढल्यावर ती शेतात अगर बागेत कायम जागी लावण्यासाठी शेतकऱ्यांना विकण्यात येतात.

लहान प्रमाणावर रोपे तयार करावयाची असल्यास मातीच्या कुंड्या किंवा लाकडी खोकी वापरतात.

कलमे: पन्हेरी बागांमधून कलमेही तयार करून विकण्याची व्यवस्था केलेली असते. त्यांत छाट कलमे (फाटे कलमे), दाब कलमे, डोळ्यांची कलमे वगैरे प्रकार असतात. ही कलमे जातिवंत आणि विश्वसनीय असावीत म्हणून ज्या झाडांचा कलमे करण्यासाठी वापर करावयाचा असतो, ती झाडे (मातृवृक्ष) उत्कृष्ट व खात्रीशीर असावी लागतात आणि ती पन्हेरी बागेतच स्वतंत्र जागी लावून त्यांची योग्य निगा राखावी लागते.

सर्व प्रकारची रोपे अगर कलमे एकाच पन्हेरी बागेत तयार केली जातात असे नाही. तसेच सर्व प्रकारच्या झाडांची कलमे एकाच पन्हेरी बागेत तयार होतात असेही नाही. महाराष्ट्राच्या कोकण भागात विशेषेकरून आंब्याची कलमे, नारळी-पोफळीची रोपे आणि वसई भागात (ठाणे जिल्हा) चिकूची कलमे जास्त प्रमाणात तयार करतात. पुणे व नगर जिल्ह्यांत संत्री, मोसंबी, लिंबू, पेरू, डाळिंब, द्राक्षे व काही प्रमाणात आंब्याचीही कलमे विक्रीकरिता पन्हेरी बागांमधून तयार केली जातात. कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे पन्हेरी बागांमधून आंब्याची, अनेक प्रकारच्या गुलाबांची, क्रोटन वगैरे शोभिवंत झुडपांची कलमे तयार करून अन्य राज्यांत विक्रीकरिता पाठविली जातात.

अलीकडे काही पन्हेरी बागांमधून काही जातींच्या झाडांची रोपे किंवा छाट कलमे (काजूची रोपे, कपाशीची रोपे, द्राक्षाची कलमे, मिऱ्याचे वेल वगैरे) विक्रीकरिता मडक्यांऐवजी पॉलिथिनाच्या पिशव्यांतच खत-माती भरून तयार करतात. अशी तयार केलेली रोपे किंवा कलमे दूरच्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविणे सोयीस्कर होते.

कोबी, फुलकोबी, नवलकोल, कांदा, मिरची, वांगी यांसारख्या भाजीच्या पिकांची रोपे एक ते सव्वा महिन्यात तयार होतात. छाट कलम, दाब कलम, गुटी कलम इ. ३-४ महिन्यांत तयार होतात. भेट कलम तयार होण्यास दोन वर्षे लागतात. हल्ली महाराष्ट्राच्या काही भागात भाताची रोपे तयार करून विकली जातात.

पहा : कलमे तण फलबाग वनस्पतींची अभिवृद्धी. 

संदर्भ : 1. Sing, Sham, et al, Horticulture in India, New Delhi, 1963.

   2. Venkataratnam, L. Fruit Nursery Practice in India, New Delhi, 1962.

पाटील, अ. व्यं.