ज्वारी : (जोंधळा हिं. जवार गु. जुवार क. जोळा तमिळ चोलम तेलुगु जोन्ना सं. दीर्घमाला, यावनाल इं. ग्रेट मिलेट, ग्रेन सोर्घम लॅ. सोर्घम व्हल्गेर कुल-ग्रॅमिनी). एक सुपरिचित तृणधान्य मूलस्थानाबद्दल मतैक्य नाही परंतु ते मध्य आफ्रिकेच्या पूर्व भागात असावे. ईजिप्तमध्ये या धान्याची फार प्राचीन काळापासून लागवड होत असल्याचे आढळून आले आहे. ॲसिरियामध्ये त्याची लागवड इ. स. पू. सातव्या शतकात होत असे. प्लिनी यांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातून रोमला ज्वारी नेल्याचा उल्लेख आहे. तेराव्या शतकापर्यंत ज्वारीचा चीनमध्ये प्रवेश झाला नव्हता. ज्वारीची लागवड आफ्रिका खंडात सर्वत्र आणि भारत, चीन, मँचुरिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे मोठ्या प्रमाणावर होते. आशिया मायनर, इराण, तुर्कस्तान, पाकिस्तान, कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, द. युरोप, मध्य अमेरिका, द. अमेरिका, ईस्ट इंडीज आणि वेस्ट इंडीजमधील काही बेटे यांमध्येही ज्वारीची थोड्याफार प्रमाणावर लागवड होते. चीनच्या फार मोठ्या भागात, आफ्रिकेत आणि द. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये ते धान्य जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते. भारतात समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.

ज्वारीचे ताट : (१) आगंतुक मूळे, (२) आधार मुळे, (३) खोड, (४) पान, (५) कणीस.वनस्पती वर्णन : ही वर्षायू (एक वर्ष जगणारी ) वनस्पती ३ ते ४·५ मी. उंच वाढते. मुळ्या तंतुमय असतात. संधिक्षोड [⟶ खोड] भरीव, वाटोळे आणि प्रकारानुसार रसदार वा भेंडयुक्त असते. प्रत्येक कांडीवर एक उभी खाच असते. पाने ७–१८, एकांतरित (एका आड एक), साधी, खोडाला पर्णतलाने वेढणारी, ६०–१०५ X ५–८ सेंमी., पट्टाकृती, मध्यशीर रुंद आणि पांढरी ⇨पुष्पबंध  परिमंजरी (दाट, मध्यम दाट, विरळ अगर मोकळा) दंडगोलाकार, अंडाकृती अथवा गोलसर, १५–६० सेंमी. लांब पुष्पबंधाक्ष २५ ते २५० सेंमी. लांब असून तो सरळ उभा अथवा हंस पक्ष्याच्या मानेप्रमाणे वाकलेला असतो. परिमंजरीमध्ये अनेक शाखा व उपशाखा असतात आणि त्यांवर टोकाकडील कणिशके सोडून इतर कणिशके जोडीने येतात. जोडीतील एक कणिशक सवृंत (देठासह) व दुसरे अवृंत असते. सवृंत कणिशकात सहसा दाणा भरत नाही. अवृंत कणिशकात दोन बाह्यतुषांच्या मध्ये दोन पुष्पके असतात. त्यांतील खालचे पुष्पक वंध्य व वरचे फलनक्षम असते. फलनक्षम पुष्पकात एक परितुष, एक अंतस्तुष, दोन लघुतुषे, तीन केसरदले आणि द्विशाखित, तुऱ्यासारखा किंजल्क असलेला किंजपुट एवढे भाग सामान्यपणे असतात. किंजल्क बाहेर डोकावणारे असतात [⟶ ग्रॅमिनी फूल]. सस्यफल (दाणा) लंबगोल, मुख्यत्वेकरून पांढरा, परंतु लाल, पिवळा, तपकिरी हे रंगही आढळतात. दाण्यावरील तुसांचे रंगही निरनिराळ्या प्रकारांमध्ये भिन्न असतात. दाणा कोवळा असताना भाजून ‘हुरडा’ व पूर्ण जून झाल्यानंतर जोंधळा (ज्वारी) म्हणून वापरतात. लाह्या, कण्या व पिठाच्या भाकरी करून खातात बी मूत्रल (लघवी साफ करणारे), शामक व वाजीकर (कामोत्तेजक) असते. खोडांचा व पानांचा जनावरांना वैरणीसाठी उपयोग करतात. फुले येण्यापूर्वीची ओली वैरण जनावरांना विषारी असते.

चौगले, द.सी. गोखले, वा. पु.

ज्वारीचे (ग्रेन सोर्घमचे) पीक जगात सु. सहा कोटी हेक्टर क्षेत्रामध्ये पिकविले जाते. क्षेत्रवारीप्रमाणे ज्वारीचा जगातील क्रमांक पाचवा आहे परंतु गहू, भात आणि मका यांच्या तुलनेने ज्वारीचे जागतिक उत्पादन बरेच कमी असते.

भारतात अन्नधान्याचे महत्त्वाचे पीक म्हणून ज्वारीच्या पिकाचा क्षेत्रवारीप्रमाणे तिसरा क्रमांक लागतो आणि तृणधान्याखालील एकूण क्षेत्रापैकी सु. २० टक्के क्षेत्र ज्वारीखाली आहे. १९६८ सालापर्यंत भारतात ज्वारीचे क्षेत्र गव्हाखालील क्षेत्रापेक्षा जास्त होते, परंतु त्यानंतर गव्हाचे क्षेत्र वाढून ते ज्वारीपेक्षा जास्त झाले. सुमारे १ कोटी ७० लक्ष हेक्टरमध्ये हे पीक घेतले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या सहा राज्यांत मिळून भारतातील ज्वारीखालील एकून क्षेत्राच्या सु. ९०% क्षेत्र आहे. उत्तर प्रदेश, तमिळनाडू, हरियाणा, ओरिसा, केरळ आणि दिल्ली या राज्यांत थोड्याफार प्रमाणावर ज्वारीचे पीक घेतले जाते. सर्वांत जास्त क्षेत्र महाराष्ट्रात (सु. ३४%) आहे. ज्वारी पिकविणाऱ्या प्रमुख राज्यांतील १९७२–७३ मधील ज्वारीचे क्षेत्र आणि उत्पादन कोष्टक क्र. १ मध्ये दिले आहे.

अवर्षणामुळे १९७२–७३ साली भारतात ज्वारीखाली एकूण क्षेत्र आणि उत्पादन बरेच कमी होते. त्यामागील पाच वर्षांत एकूण क्षेत्र सरासरीने १ कोटी ७८ लक्ष हे. आणि उत्पादन ९०·२५ लक्ष टन होते. १९७४–७५ मध्ये एकूण उत्पादन ८५ लक्ष टन झाले. महाराष्ट्रात १९६०–६१ ते १९७१–७२ या काळात ज्वारीखाली वार्षिक सरासरी क्षेत्र ६०·१७ लक्ष हे. आणि उत्पादन २९·४ लक्ष टन होते. अवर्षणामुळे १९७२–७३ साली एकूण क्षेत्र आणि उत्पादन यांत बरीच घट झाल्याचे कोष्टक क्र. १ वरून दिसून येईल.


इ. स. १९७३–७४ मध्ये ६१·४६ लक्ष हे. क्षेत्र होते त्यापैकी २७·४८ लक्ष खरीपात व ३३·९८ लक्ष रबी हंगामात होते. जिल्हावार क्षेत्र कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहे.

रत्नागिरी व कुलाबा जिल्ह्यांत ज्वारीची लागवड होत नाही.ठाणे जिल्ह्यात फक्त ५०० हे. क्षेत्र खरीपात होते. विदर्भात रबी ज्वारीचे क्षेत्र खरीप क्षेत्राच्या मानाने फार कमी आहे. मराठवाड्यात औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत मुख्यत्वेकरून रबी ज्वारी पिकते. परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत खरीप व रबी हंगामांतील क्षेत्रात फारसा फरक नाही. नांदेड जिल्ह्यात मुख्यत्वे खरीप लागवड होते. सोलापूर, अहमदनगर व पुणे या तीन जिल्ह्यांत महाराष्ट्रातील रबी ज्वारीच्या क्षेत्रापैकी सु. ५५% क्षेत्र आहे.  

ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.

कोष्टक क्र.१. भारतातील ज्वारी पिकविणाऱ्या प्रमुख राज्यांतील

ज्वारीखालील क्षेत्र आणि उत्पादन (१९७२–७३).

राज्य 

क्षेत्र (लक्ष हेक्टर) 

उत्पादन (लक्ष टन) 

आंध्र प्रदेश

उत्तरप्रदेश

कर्नाटक

गुजरात

तमिळनाडू

मध्य प्रदेश

महाराष्ट्र

राजस्थान

२५·२६

६·५९

१७·९३

१०·१४

६·५८

१९·५६

४९·९४

९·७६

१०·१७

४·४६

१०·८१

२·१३

५·०५

१५·५४

१२·४६

३·०३

एकूण भारत

(इतर राज्यांसहित)

१४८·१०

६४·४२

कोष्टक क्र. २. महाराष्ट्रातील ज्वारीचे जिल्हावार 

क्षेत्र (१९७३–७४) (शे. हेक्टर).

जिल्हा

खरीप

रबी

अकोला

अमरावती

अहमदनगर

उस्मानाबाद

औरंगाबाद

कोल्हापूर

चंद्रपूर

जळगाव

धुळे

नांदेड

नागपूर

नासिक

परभणी

पुणे

बीड

बुलढाणा

भंडारा

यवतमाळ

वर्धा

सांगली

सातारा

सोलापूर

२,७१९

१,९०५

२,५६९

८१८

५५०

३५३

१,३७५

५१५

२,७०९

१,५७९

६४

१,९७७

१७४

९०६

२,९३८

१७

२,८५६

१,२९५

१,३०९

८३०

५,८८०

१,९५६

३,१६०

२५

१,७८५

२०९

६७६

३९०

५४७

३३३

२,०२७

४,०९३

२,२७१

२७

५३२

१,०१७

१,२२४

७,९९८

महाराष्ट्र

भारत

२७,४७९

१,०६,५३०

३३,९७९

६३,१२०


हवामान : विषुववृत्तापासून ४५ अक्षांशांपर्यंत या पिकाची लागवड होते. आफ्रिका, आशिया, उ. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या उष्ण हवामानात या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या पिकाला साधारणतः २७° ते ३२° से. तापमान लागते, परंतु काही प्रकार ३८° ते ४४° से. तापमानातही वाढू शकतात. हिवाळी हंगामातील प्रकारांना १६° से. पर्यंत किमान तापमान चालते. सर्वसाधारणपणे हे पीक सपाट प्रदेशात वाढणारे आहे, परंतु कर्नाटकात काही प्रकार ९०० मी. उंचीवरील प्रदेशातही लागवडीखाली आहेत. वार्षिक ५० ते १०० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात ज्वारीचे पीक चांगले येते. ३० ते ४५ सेंमी. वार्षिक पर्जन्यमानाच्या विभागात दुर्जल शेती पद्धतीनुसार ज्वारीचे पीक घेतात. यापेक्षा कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात ओलीताखाली ज्वारीचे पीक घेतात.

जमीन : ज्वारीचे पीक अगदी रेताड व चोपण जमिनी सोडून बहुतेक सर्व प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या अगर दुमट जमिनीत चांगले येते. काही मर्यादेपर्यंत क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनीत व pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] ५·५ असेपर्यंत अम्लीय जमिनीतही हे पीक वाढू शकते.

फेरपालट : ज्वारीच्या पिकाच्या बाबत पिकांच्या फेरपालटीची आवश्यकता असते. त्याकरिता ज्वारीच्या पिकाची कडधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट करणे जास्त उपयुक्त ठरते. फेरपालटीमुळे जमिनीच्या एकाच पातळीतील वनस्पतीपोषक द्रव्यांचे शोषण होत नाही. मुळे खोलवर जाणाऱ्या पिकानंतर ज्याची मुळे जास्त खोलवर जात नाहीत, असे पीक त्याच जमिनीत लावल्यास दोन्ही पिके चांगली येतात. कडधान्याच्या मुळांवरील गाठींमुळे त्या पिकाखालच्या जमिनीतील नायट्रोजनाचे प्रमाण वाढून नंतरचे त्याच शेतातील ज्वारीचे पीक चांगले येते. उत्तर भारतात बार्ली, गहू अगर भात व वाटाण्यानंतर ज्वारी पेरतात. मध्य व दक्षिण भारतात कापूस अगर कडधान्याच्या पिकाबरोबर ज्वारीच्या पिकाची फेरपालट करतात. बागायती ज्वारीची फेरपालट मिरची, तंबाखू, भुईमूग वगैरे पिकांबरोबर करतात [⟶ पिकांची फेरपालट].

मिश्रपीक : ज्वारीचे पीक मिश्रपीक म्हणून अगर स्वतंत्रपणे घेतात. उत्तर व मध्य भारतात ते तूर, जवस अगर करडईबरोबर आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांच्या काही भागांत चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी अगर कुळीथाबरोबर मिश्रपीक म्हणून घेतात. काही शेतकरी ज्वारीबरोबर गवार अगर अंबाडीचेही पीक घेतात. रबी ज्वारीत हरभऱ्याचे मिश्रपीक घेतात.

मशागत : या पिकाकरिता जमीन दर वर्षी नांगरीत नाहीत. तीन-चार वर्षांतून एकदा नांगरली तरी चालते. मे महिन्यात दोन-तीन वेळा १०–१२ सेंमी. खोलीपर्यंत जमीन कुळवाने मोकळी करतात.

हंगाम आणि पेरणी पद्धती : एकूण हंगाम तीन असतात. पावसाळी (खरीप), हिवाळी (रबी) व उन्हाळी. पावसाळी हंगामातील जाती जून-जुलैमध्ये व हिवाळी हंगामातील जाती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरतात. खरीप व रबी पिके दाणे आणि वैरणीसाठी लावतात. उन्हाळी पिके ओल्या वैरणीसाठी लावतात. पीक लावण्याचे जिरायत (कोरडवाहू) व बागायत (ओलीताखालचे पीक) असे दोन प्रकार आहेत. जिरायत पिकाच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

(१) स्थानिक रुढ पद्धत : जमिनीत पुरेशी ओल झाल्यावर पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे जमीन चांगली भिजून वाफसा आल्यावर पाभरीने बी पेरतात.

(२) दुर्जल शेती पद्धत : यात पावसाचे पाणी शक्य तितके मुरवून नंतर जमिनीची मशागत करून पाभरीच्या दोन फणांत ४५ सेंमी. अंतर ठेवून बी पेरतात [⟶ दुर्जल शेती].

(३) टोकण पद्धत : जमिनीत पुरेशी ओल होऊन वाफसा आला म्हणजे ४५ x ४५ सेंमी. अंतरावर सरळ ओळीत ५-६सेंमी. खोल (ओलीपर्यंत) भोके पाडून त्यांमध्ये प्रत्येकी ६–८ ज्वारीचे दाणे टाकून ओल्या मातीने ती भोके झाकून टाकतात. बी उगवल्यावर बी विरळणीच्या वेळी प्रत्येक टोकणीच्या जागी दोन-तीन जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटतात. खरीप पिकात दोन ओळींमधील अंतर ३०–४५ सेंमी. आणि रबी (कोरडवाहू आणि बागायती) पिकांच्या बाबतीत ते ४५ सेंमी. ठेवतात. पेरणीसाठी निवडक बी वापरतात. त्यासाठी बी चाळून पाखडून घेतात. पिकात पुढे कवकीय (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे होणारे) रोग उद्‌भवू नयेत म्हणून पेरण्यापूर्वी बियांना पारायुक्त कवकनाशक अथवा गंधक चोळून घेतात. त्याचप्रमाणे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारलेल्या प्रकारांचे बी वापरणे आवश्यक असते. भारतातील वेगवेगळ्या राज्यांसाठी तसेच वेगवेगळ्या जमिनींस व हवामानांस अनुकूल असे ज्वारीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. धान्याच्या पिकासाठी हेक्टरी ९–१० किग्रॅ. आणि वैरणीच्या पिकासाठी ५०–६० किग्रॅ. बी पेरतात.

आंतर मशागत : पेरणीनंतर (अगर बी टोकल्यानंतर) सु. तीन आठवड्यांनी पिकाला कोळपणी देतात. निंदणी करून ओळीतील तण काढून घेतात. पुढे तर पंधरा दिवसांनी पिकाला कोळपणी देतात. पिकात तण वाढू देत नाहीत. कोळपणीमुळे जमीन भेगाळत नाही, पिकाच्या मुळांना हवेचा, वनस्पतिपोषक द्रव्यांचा व पाण्याचा पुरेसा पुरवठा होतो. एकूण ३–४ कोळपण्या व दोन-तीन खुरपण्या देतात. दुष्काळी अगर कमी पावसाच्या विभागात अकोला कोळप्यासारख्या कोळप्याने कोळपणी करतात.

खत : वार्षिक ७५ ते ८२ सेंमी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात ज्वारीच्या कोरडवाहू पिकाला हेक्टरी ६ टन आणि बागायती पिकाला १२ ते १८ टन शेणखत अगर कंपोस्ट पूर्व मशागतीच्या वेळी देतात. हेक्टरी ८० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल असे कोणतेही रासायनिक खत आणि १९० किग्रॅ. सुपरफॉस्फेट पेरणीच्या वेळी देतात. निरनिराळ्या प्रयोगांवरून असे आढळून आले आहे की, हेक्टरी २० ते ४० किग्रॅ. पेक्षा जास्त नायट्रोजन आणि २०–३० किग्रॅ. पेक्षा फॉस्फोरिक अम्ल दिल्यास भारतातील स्थानिक प्रकारांच्या उत्पन्नात वाढीव खताच्या प्रमाणात वाढ होत नाही. मात्र संकरित (हायब्रीड) ज्वारीच्या प्रकारांना जास्त खत दिल्यास स्थानिक जातींच्या तुलनेने जास्त उत्पन्न येते. निरनिराळ्या राज्यांतील बागायत आणि कोरडवाहू तसेच स्थानिक आणि संकरित प्रकारांसाठी रासायनिक खतांच्या वेगवेगळ्या मात्रा प्रयोगान्ती ठरविण्यात आल्या आहेत. बागायती पिकाला कोरडवाहू पिकापेक्षा जास्त आणि स्थानिक प्रकारांपेक्षा संकरित प्रकारांना जास्त खतांची मात्रा ठरविण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी कृत्रिम खतांतील घटकांचे हेक्टरी प्रमाण कोष्टक क्र. ३ मध्ये दिल्याप्रमाणे शिफारस करण्यात आले आहे.


कोष्टक क्र. ३. महाराष्ट्रासाठी ज्वारीच्या पिकाकरिता खतातील घटकांचे

हेक्टरी प्रमाण (किग्रॅ. मध्ये).

खतातील घटक

बागायत ज्वारीचे पीक

कोरडवाहू पीक

स्थानिक प्रकार

संकरित प्रकार

नायट्रोजन

५०

७४

२५

फॉस्फॉरिक अम्ल

२५

४९

१२

पोटॅश

३७

कोरडवाहू पिकाला सर्व नायट्रोजन आणि फॉस्फोरिक अम्ल एकाच हप्त्यात पेरणीपूर्वी देतात. बागायती पिकाला नायट्रोजनाची निम्मी मात्रा आणि फॉस्फोरिक अम्ल आणि पोटॅश यांची पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी आणि नायट्रोजनाची राहिलेली निम्मी मात्रा पेरणीनंतर ३०–४५ दिवसांनी (पीक ५०–६० सेंमी. उंच झाल्यावर) देतात. ज्या भागात पाऊस खात्रीचा असतो आणि जमिनीतील ओल ज्वारीच्या पिकाची गरज पुरी होईपर्यंत टिकेल अशी शाश्वती असते किंवा पिकाला खत दिल्यानंतर पाणी देण्याची सोय असते, अशा ठिकाणीच रासायनिक खते (वरखते) देणे श्रेयस्कर असते. अन्यथा अशा प्रकारची खते देत नाहीत.

पिकाची राखण : ज्वारीच्या दाण्यासाठी लावलेल्या पिकाचे पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. पिकाच्या दाणे भरलेल्या कणसांवर चिवळ, भोरड्या, चिमण्या वगैरे जातींची पाखरे मोठ्या थव्याने सकाळी व संध्याकाळी उतरतात आणि कणसांतील दाणे टिपून खाऊन पिकाचे नुकसान करतात, म्हणून ती पिकावर उतरल्याबरोबर पिकातून हाकलून द्यावी लागतात.

काढणी : ज्वारीचे पीक तयार व्हावयाला सु. पाच महिने लागतात. पीक काढणीलायक होण्याच्या आधी २०–२५ दिवस त्याच्या ताटांवरील खालची बुंध्याकडची दोन-चार पाने काढून घेतल्यामुळे पिकात हवा खेळती राहून अकार्यक्षम पानांमध्ये जाणारा अन्नरस वाचून त्याचा ताटाला उपयोग होऊन कणसात दाणे चांगले भरतात. दाणे चांगले पक्व झाले म्हणजे ज्वारीची ताटे कापून किंवा उपटून काढून घेतात. कापून वा उपटून काढलेली ताटे शेतातच ३–४ दिवस वाळत ठेवतात. नंतर पेंढ्या बांधून त्या खळ्यावर रचून ठेवतात.

मळणी : कणसे पूर्ण वाळल्यानंतर पेंढ्या खळ्यात पसरून ताटांवरची कणसे कापून घेऊन ती खळ्यात पसरून बैलांची पात धरून अगर त्यांच्यावरून बैलगाडी हाकून ती चोळवटून मळून त्यांच्यातले दाणे मोकळे करतात. खळ्यातल्या कणसांच्या थरावरून दगडी रूळ चालवूनही मळणीचे काम लवकर आणि सुलभतेने करून घेता येते. हा मळलेला माल वाऱ्याच्या अगर उफणणीच्या पंख्याच्या किंवा उफणणीच्या यंत्राच्या साहाय्याने उफणून दाणे वेगळे काढून साफ करून पोत्यात भरून साठवून ठेवतात. हल्ली संपूर्ण मळणीचे काम शक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने थोड्याच वेळात करता येते व अशा प्रकारच्या मळणी यंत्रांची उपयुक्तता शेतकऱ्यांना पटल्यामुळे या यंत्रांचा वापर वाढत्या प्रमाणावर होत आहे. मळणी व उफणणी ही दोन्ही कामे एकाच यंत्रात होतात. एका तासात ८ ते १२ क्विंटल ज्वारीची मळणी होते.

उत्पन्न : जमिनीचा दर्जा, पर्जन्यमान (अथवा पाणी पुरवठ्याची साधने), खताची मात्रा आणि मशागत यांवर ज्वारीचे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे गावोगावी त्यात फरक आढळतो. १९६८–६९ ते १९७२–७३ या पाच वर्षांच्या काळात ज्वारीचे भारतातील सरासरी हेक्टरी उत्पन्न ४८१ किग्रॅ. होते. कोरडवाहू खरीप ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न सर्वसाधारणपणे ४०० ते ५०० किग्रॅ. असते व दाण्याच्या तीन ते साडेतीन पट कडब्याचे उत्पन्न मिळते. कोरडवाहू रबी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी ६५० ते ७५० किग्रॅ. असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न १,२०० ते १,८०० किग्रॅ. असते. भारी जमिनीत ते हेक्टरी ४,००० किग्रॅ.पर्यंतही असते. ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी २० टन आणि भारी जमिनीत ३० ते ३५ टन मिळते.

सुधारित प्रकार : स्थानिक ज्वारीच्या प्रकारांतून निवड पद्धतीने आणि संकर पद्धतीने सुधारित प्रकार निर्माण करण्याचे काम ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या राज्यांत गेली ४० ते ५० वर्षे चालू आहे. हे प्रकार त्या त्या भागातील हवामानास योग्य असे आहेत आणि त्यांतील काही प्रकार दाणा आणि वैरण या दोन्हीसाठी उपयुक्त आहेत. आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, गुजरात वगैरे राज्यांत अशा प्रकारे ज्वारीचे सुधारित प्रकार निर्माण केले गेले आहेत. परंतु या सुधारित प्रकारांमुळे ज्वारीच्या उत्पन्नात फारशी वाढ झाली नाही भारतातील ज्वारीचे हेक्टरी सरासरी उत्पन्न (स्थानिक जातींचे) १९७० पूर्वीच्या १५ वर्षांत सु. ३८० किग्रॅ. एवढेच होते. ज्वारीच्या भारतातील प्रजननामध्ये एकसूत्रता आणून त्याला गती देण्यासाठी वेगवान संकरित ज्वारी प्रकल्प भारतीय कृषी संशोधन संस्थेने निरनिराळ्या राज्यांतील कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे व रॉकफेलर फाउंडेशन यांच्या सहकार्याने १९६० मध्ये सुरू केला. प्रथम जगातील आणि भारतातील ज्वारीचे वेगवेगळे प्रकार आणि शुद्ध वाणे गोळा करण्यात आली. अशा प्रकारे गोळा केलेल्या प्रकारांची संख्या ७,००० हून जास्त आहे. १९५० मध्ये अमेरिकेत मिलो आणि काफीर या दोन ज्वारींच्या प्रकारांच्या संकरामधील प्रजेमध्ये काही वाणे पुं-वंध्य (ज्यामध्ये पराग कार्यक्षम नसतात असे) असल्याचे आढळून आले. या शोधामुळे ज्वारीमध्ये कृत्रिम तऱ्हेने संकर करण्याचे काम (जे त्या वेळेपर्यंत अवघड मानले जात असे) सुलभ झाले. सीके ६० एमएस या परदेशी पुं-वंध्य प्रकाराचा फेटेरिटा आणि हेगारी या प्रकारांशी संकर करून अनुक्रमे सीएसएच क्र. १ व सीएसएच क्र. २ हे संकरित प्रकार प्रथम भारतात लागवडीसाठी देण्यात आले. या प्रकारांत संकरानंतरच्या पहिल्या पिढीतील प्रजा लागवडीखाली असते. अशा प्रकारच्या प्रजेत संकरज ओज (जोम) असल्यामुळे उत्पन्न जास्त येते. निवड पद्धतीने निर्माण केलेल्या प्रकारांचे शुद्ध बी कापणीच्या वेळी गोळा करून ते पुढील वर्षी बियांसाठी उपयोगात आणता येते. परंतु सीएसएच क्र. १ ते ५ या आणि इतर संकरित प्रकारांचे बी वाढीव उत्पन्न मिळविण्यासाठी दर वर्षी संकरित असेच वापरावे लागते. संकरित प्रजेच्या झाडांचे बी गोळा करून ते पुढील वर्षी पेरल्यास संकरानंतरच्या पहिल्या पिढीएवढे उत्पन्न मिळत नाही. व्यापारी प्रमाणावर वरील प्रकारांचे संकरित बीजोत्पादन नॅशनल सीड कॉर्पोरेशनच्या खास देखरेखीखाली तयार करून शेतकऱ्यांना दर वर्षी नव्याने वाटण्यात येते. निवड पद्धतीप्रमाणे महाराष्ट्रात तयार केलेले ज्वारीचे सुधारित प्रकार आणि संकरित ज्वारीचे प्रकार यांची माहिती कोष्टक क्र. ४ मध्ये दिली आहे.


ज्या स्थानिक प्रकरांतून सुधारित प्रकार निर्माण करण्यात आले त्यांचा उल्लेख पुढील कोष्टकात आला आहे. यांखेरीज मोतीचूर, काळबोंडी, लालबोंडी, पिवळी या नावांनी ओळखले जाणारे स्थानिक प्रकार महाराष्ट्रात लागवडीत आहेत.

लाह्यांसाठी कावळी नावाचा स्थानिक प्रकार लागवडीत आहे. वणी (जि. यवतमाळ) येथील ज्वारीचे प्रकार हुरड्यासाठी प्रसिद्ध आहेत.

वैरणीसाठी महाराष्ट्रात पुढील प्रकार लागवडीत आहेत : खरीपासाठी निळवा व उतावळी रबीसाठी मालदांडी व दगडी उन्हाळी वैरणीसाठी हुंडी व काळबोंडी. गुजरातेत सुंधिया १०४९ व कर्नाटकात पिवळी फुलगार व काकी जोळा हे प्रकार लागवडीत आहेत. हे सर्व प्रकार पेरणीपासून ६० ते ७५ दिवसांत फुलावर येतात. इतर ज्वारी पिकविणाऱ्या राज्यांतही वैरणीसाठी उपयुक्त असे ज्वारीचे प्रकार निर्माण करण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये ज्वारीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते व ती जनावरांसाठी खाद्य (दाणा आणि वैरण) या उद्देशाने करण्यात येते. सु. ५० हून अधिक ज्वारीचे प्रकार लागवडीत आहेत. यांत बरेच संकरित प्रकार आहेत. आफ्रिका आणि आशियामधून सर्व प्रथम धान्यासाठी ज्वारीचे प्रकार अमेरिकेत लागवडीसाठी निर्यात करण्यात आले. त्यांची पुढीलप्रमाणे सात समूहांत वर्गवारी करण्यात आली आहे : (१) काफीर, (२) मिलो, (३) फेटेरिटा, (४) डुरा, (५) शाळू, (६) काओलिआंग आणि (७) हेगारी. लागवडीखालील प्रकारांपैकी ९८ टक्के प्रकार बुटके (१६० सेंमी. पेक्षा कमी उंचीचे) असून ते यंत्राच्या साहाय्याने कापणीसाठी योग्य आहेत. हे प्रकार १९४० नंतर लोकप्रिय झाले. १९५६ नंतर संकरित प्रकारांची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊन जुने प्रकार लागवडीतून कमी झाले. संकरित प्रकारही बुटकेच आहेत. सोर्गो हाही एक प्रकार लागवडीत आहे. त्याचे खोड (ताट) गोड रसयुक्त असते. जनावरांसाठी वैरण व रसापासून साखरेचा पाक करण्यासाठी या प्रकाराची लागवड करतात. या प्रकाराला स्वीट सोर्घम असेही नाव आहे.

प्रकार

पेरणीपासून

कापणीपर्यंत

दिवस

हंगाम

दाण्याचे

गुणधर्म

उत्पन्न हेक्टरी

किग्रॅ.

इतर माहिती

(अ) निवड पद्धतीने तयार केलेले प्रकार :

सुधारित सावनेर

१४५–१५० 

खरीप 

टपोरा, पिवळसर पांढरा.

१,५०० ते २,००० 

विदर्भातील मध्यम ते काळ्या भारी जमिनीत लागवडीस योग्य.

सुधारित रामकेल

१३५–१४०

खरीप

टपोरा, पांढरा.

१,००० ते १,५००

वरीलप्रमाणे या प्रकारची वैरण चांगली असते.

एन. जे. १३४

१३०–१५०

खरीप

विदर्भासाठी.

टेसपुरी

१२०–१२५

खरीप

दुधाळ, पांढरा.

१,००० ते १,५००

खानदेश भागासाठी उपयुक्त.

सातपानी

खरीप

मलईच्या रंगाचा, चवीला गोड.

८०० ते १,२००

खानदेश भागासाठी उपयुक्त.(विशेषतः जळगांव जिल्हा), वैरण चांगली असते.

पी. जे. ४ के ८ के

१६ के २४ के

११५–१५०

खरीप

मराठवाडा विभागासाठी योग्य.

पी. जे. ३ आर ४ आर ७ आर

रबी

वरीलप्रमाणे.

मालदांडी ३५–१

१२५–१३०

रबी

टपोरा, मोत्यासारखा पांढरा.

कोरडवाहू 

१,२०० ते १,५०० 

बागायती 

२,००० ते २,५००.

वैरण चांगली असते. हा प्रकार गेली ३०–४० वर्षे फार लोकप्रिय आहे. सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांसाठी.

मालदांडी  ४७–३

१२०

रबी

टपोरा, मोत्यासारखा.

नगर दगडी १५

रबी

नगर जिल्ह्यासाठी.

दगडी ३६

रबी

पुणे, सातारा.

सुवर्णा

११५–१२०

खरीप (हमखास पावसाच्या भागासाठी)

टपोरा, मोत्यासारख्या रंगाचा.

सीएसएच पेक्षा २० ते २५ टक्क्यांनी कमी.

आय. एस. ३९२४ वाणातून निवड पद्धतीने निर्माण केलेला प्रकार. बी पेरणीसाठी पुन्हा वापरता येते. पावसाचा ताण सहन होत नाही. बुटका खोडमाशी व इतर कीटकांना बळी पडणारा प्रकार.

३०२

११०

खरीप

टपोरा, पिवळसर पांढरा.

३,५०० ते ३,६००

मराठवाडा व विदर्भ भागासाठी. पावसात सापडल्यास दाणे लालसर होतात. खोडमाशी व केवडा रोगाला बळी पडणारा प्रकार.

६०४

१२०

खरीप

चपटा, पिवळसर टपोरा.

वरीलप्रमाणे

जळगाव जिल्हा व लगतच्या भागासाठी. खोडमाशीला बळी पडणारा व उंच वाढणारा प्रकार.

३७०

१००

खरीप

पिवळसर, चमकदार, मध्यम टपोरा.

३,३००

पीक पावसात सापडल्यास दाणे लाल होत नाहीत. उशीरा पडणाऱ्या पावसात तयार पीक सापडल्यास बुरशीचा प्रादुर्भाव होतो.

१४८

११०

खरीप

गोल, मध्यम आकाराचा, पिवळसर, पांढरा.

वरीलप्रमाणे

काही प्रमाणात खोडमाशी, टारफुला व केवडा प्रतिबंधक.

३५४१

११०

खरीप

पिवळसर, पांढरा, मध्यम आकाराचा.

३,२००

उशीरा पडणाऱ्या पावसामुळे बुरशीने दाणे खराब होत नाहीत. केवडा प्रतिबंधक.

आर. १६

१२०–१२५

रबी

टपोरा, पिवळसर पांढरा, मोत्यासारखा चमकदार.

जवळजवळ मालदांडीएवढे कडब्याचे उत्पन्न कमी मिळते.

प्रचलित वेळेपेक्षा ३ आठवडे आधी पेरणे अवश्य आहे. आय. एस. २९५० व मालदांडी ३५–१ यांच्या संकरात निवड पद्धतीने तयार केलेला खोडमाशी व खडखड्या रोगाला बळी पडणारा प्रकार.

आर. २४

आर. १६ पेक्षा थोडा उशिरा तयार होतो.

रबी

आर. ३०

वरीलप्रमाणे

रबी

टपोरा

एफ. आर. १६९

१२५–१३०

रबी

लहान, चकाकणारा.

मालदांडी ३५–१ पेक्षा जास्त.

खोडमाशीला प्रतिबंधक.

(आ) संकरित प्रकार :

सीएसएच क्र. १

खरीप १००,

रबी  ११०–१२०

खरीप, रबी  व उन्हाळी

(खरीपाला जास्त उपयुक्त). 

मोत्यासारखा

३,७०० पर्यंत

ताटांची सरासरी उंची १०० ते १२० सेंमी. निरनिराळ्या हवामानांत व निरनिराळ्या जमिनींत लागवडीस योग्य परंतु किडी व रोगाचा उपद्रव जास्त. खरीपानंतर खोडव्याचे पीक उत्तम येते. पीक उशीरा पडणाऱ्या पावसात सापडल्यास दाण्यावर बुरशी येते.

सीएसएच क्र. २

खरीप ११०–१२०

रबी १००

रबी हंगामात विशेष उपयुक्त, खरीपातही येतो.

मोत्यासारखा

३,४०० ते ३,५०० (खरीप)

ताटांची सरासरी उंची १२० ते १३० सेंमी. वरकस व हलक्या जमिनीसाठी योग्य नाही.

सीएसएच क्र. ३

क्र. १ पेक्षा १०–१२ दिवसांनी उशीरा येतो. नं. २ पेक्षा ३–५ दिवसांनी लवकर.

मोत्यासारखा

३,८२१

ताटांची सरासरी उंची १५० ते १६० सेंमी. खोडमाशीचा उपद्रव कमी. तांबेरा व दाण्यावरील बुरशी रोगास प्रतिबंधक.

सीएसएच क्र. ४

(पीएसएच क्र. २)

सीएसएच क्र. १ पेक्षा एक आठवडा जास्त (खरीप).

खरीप व रबी

चवीला स्थानिक प्रकाराप्रमाणे

सीएसएच क्र.१ पेक्षा १०%जास्त (३,९०० किग्रॅ.पर्यंत)

ताटांची उंची १८० सेंमी. सीएसएच क्र. १ पेक्षा या प्रकारची भाकरी चांगली होते. खोडमाशीचा आणी दाण्यावरील बुरशीचा उपद्रव तुलनेने कमी.

सीएसएच क्र. ५

११०–११२

खरीप व रबी

तेजदार

४,००० ते ४,२०० (खरीप).

कडबा चांगल्या प्रतीचा असतो. उशीरा पडणाऱ्या पावसात दाणे खराब होत नाहीत. सर्व संकरित प्रकारांत अधिक उत्पादनक्षम.

३६ ए X क्र १४८

११०–११५

रबी

मघ्यम टपोरा, पिवळसर पांढरा.

मालदांडी ३५–१ पेक्षा १०–१५% जास्त.

जमिनीला भेगा पडल्या तरी ताटे लोळत नाहीत.

३६ए X पी. डी. ३ –१

११०–११५

रबी

टपोरा, पिवळसर पांढरा.

मालदांडी ३५–१ पेक्षा २५% जास्त.

वरीलप्रमाणे.

मालदांडी ३५–१ या प्रकाराला खोडकिडा आणि खोडमाशी या किडींचा उपद्रव कमी प्रमाणात होतो. पीएसएच क्र. २ हा प्रकार महाराष्ट्रात परभणी येथील संशोधन केंद्रावर निर्माण करण्यात आला आहे. अलीकडे तो सीएसएच क्र. ४ या नावाने ओळखला जातो.


रोग : ज्वारीवर काणी, काजळी, तांबेरा, केवडा, अरगट आणि करपा हे कवकांमुळे होणारे रोग पडतात.

काणी : याचे तीन प्रकार आहेत. (१) दाणे काणी, (२) झिपऱ्या काणी व (३) लांब काणी. दाणे काणी (स्पॅसिलोथिका सोरघाय ) आणि काजळी (स्पॅ. क्रुएंटा) या दोन्ही रोगांमध्ये कणसात दाण्यांच्या जागी काळी भुकटी असते. त्यांत रोगाचे बीजाणू (प्रजोत्पादक सूक्ष्म पेशी) असतात. बी पेरण्यापूर्वी त्याला गंधकाच्या सूक्ष्म कणांची पूड (प्रमाण १ किग्रॅ. बियांना ४ ग्रॅ. गंधक) चोळल्यास या दोन्ही रोगांना आळा बसतो. झिपऱ्या काणी (स्पॅ. रैलियाना ) आणि लांब काणी (टॉलिपोस्पोरियम एहरेनबर्गाय ) हे फारसे महत्त्वाचे रोग नाहीत. कारण रोगाचे प्रमाण बहुधा तुरळक असते. या दोन्ही रोगांत रोगट कणसे कापून नष्ट करणे हाच एक उपाय आहे [⟶ काणी रोग].

तांबेरा : (पक्सिनिया पुर्पुरिया ). हा रोग पानावर पडतो. लाल ठिपके प्रथम दिसून येतात आणि पाने वाळतात. या रोगाचा प्रसार हवेतून होतो. उपाय म्हणून गंधकाची भुकटी पिकावर पिस्कारतात.

केवडा : स्क्लेरोस्पोरा सोरघाय  कवकामुळे होणारा रोग. पावसाळ्याच्या हंगामात आढळून येतो. कवकाची वाढ पानाच्या खालच्या बाजूवर दिसून पाने पिवळी पडतात. पाने वाळून त्याच्या लांब चिरट्या होतात. रोगट झाडांच्या कणसांत बी धरत नाही अथवा दाणे पोचट राहतात. कवकाचे बीजाणू पिकाखालच्या जमिनीवर पडून राहतात. तेथे पुढील वर्षी ज्वारी लावल्यास तिच्यावर रोग पडतो.

अरगट : क्लॅव्हिसेप्स  वंशातील कवकाद्वारे होणारा रोग. अलीकडेच तुरळक प्रमाणावर महाराष्ट्रात आढळतो. कणसातील काही दाण्यांच्या जागी लांबट आणि टणक स्क्लेरोशियम (कवकजाल) आढळते. स्क्लेरोशियममध्ये एर्गोटॉक्सिनासारखे विष असते. रोगाचा प्रसार कीटक, वारा, पाऊस, दूषित बी यांच्याद्वारा होतो. दूषित बी स्क्लेरोशियमपासून मुक्त करण्यासाठी ३० टक्के मिठाच्या पाण्यात भिजवतात. स्क्लेरोशियम हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगते. ते काढून घेऊन नष्ट करतात. स्क्लेरोशियम काढून निरोगी बनविलेले बी स्वच्छ पाण्यात धुवून वाळवून पेरतात. त्यायोगे रोगाला प्रतिबंध होतो [⟶ अरगट].

करपा : हा रोग हेल्मिंथोस्पोरियम टर्सीकम  या कवकामुळे होतो. यामुळे पानावर काळपट चट्टे पडलेले दिसतात. याचा प्रादुर्भाव संकरित वाणांच्या पिकावर आढळतो. प्रतिकारासाठी ताम्रयुक्त कवकनाशक फवारतात.

कीड : स्थानिक तसेच संकरित वाणांच्या ज्वारीच्या पिकावर पुढे नमूद केल्याप्रमाणे कीटकांचा उपद्रव आढळतो.

खोडमाशी : (अँथेरिगोना इंडिका ). या माशीमुळे ताटांचे पोंगे मरतात, खालच्या बाजूवर फुट येते. पेरणीच्या वेळी जमिनीत १० टक्के फोरेट (थायमेट) दर हेक्टरी १५–१६ किग्रॅ. या प्रमाणात मिसळतात. चांगला पाऊस होऊन गेल्यानंतर १५–२० दिवसांच्या आत पेरणी केल्यास उपद्रव कमी होतो. एंड्रिनाची फवारणी करतात.

खोडकिडा : (कायलो झोनेलस ). अळ्या खोडे पोखरतात त्यामुळे ताटे वाळून फार हानी होते. उपाय म्हणून पिकातील वाळलेली ताटे मुळासकट उपटून जाळतात. एंड्रिनाची फवारणी करतात.

लष्करी अळी : (सिर्फीस यूनिपंक्टा ). या अळ्या रात्री ज्वारीची पाने कुरतडून खातात. दिवसा पोंग्यात लपून राहतात व रात्री पिकावर आक्रमण करतात. १० टक्के बीएचसी भुकटी पिकावर पिस्कारतात किंवा पाण्यात विरघळणारी बीएचसी पिकावर फवारतात.

मिज माशी : (काँटॅरिनिया सोर्घीकोलाय ). पोटरीतून बाहेर निघालेल्या कणसावर या माशीचा उपद्रव होऊन कणसात दाणे भरत नाहीत. उपाय म्हणून ५ टक्के डीडीटी हेक्टरी ७–८ किग्रॅ. प्रमाणात पिकावर पिस्कारतात [⟶ मिज माशी].


दक्षिणेकडील बिनपंखी टोळ : हे कीटक ज्वारीच्या पानांचा देठ व शिरा सोडून बाकीचा सर्व भाग खातात. १० टक्के बीएचसी भुकटी पिकावर पिस्कारतात.

मावा व तुडतुडे : पिकाच्या सुरुवातीपासून ते पीक पूर्ण तयार होईपर्यंत पिकावर मावा व तुडतुड्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु पीक साधारणपणे ३० ते ४० दिवसांचे झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत या किडींचा उपद्रव जास्त असतो. मावा पानाच्या खालच्या बाजूस आणि पोंग्यात एकाच ठिकाणी बसून पानांमध्ये सोंड खुपसून रसाचे शोषण करतो. डेल्फासीड जातीचे तुडतुडे ज्वारीच्या पोंग्यामध्ये आढळून येतात. ते पानामधील रस सुईसारख्या तीक्ष्ण सोंडेने शोषून घेतात. या किडीची विष्ठा साखरयुक्त असते. त्यामुळे पानावर चिकटपणा येतो. त्याचप्रमाणे या किडींच्या रस-शोषणामुळे पानाच्या जखम झालेल्या पेशीतून चिकट, गोड स्राव पाझरतो. त्यामुळे याला ‘चिकटा’ असे म्हणतात. चिकट्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ज्वारीची पाने चिकट होतात. चिकट भागावर काळी बुरशी वाढते. या बुरशीमुळे पानात अन्न तयार करण्याचे काम नीटपणे होत नाही. परिणामी पीक पिवळे पडून वाढ खुंटते. काही वेळा कणसे नीट निसवत नाहीत व निसवलेली कणसे आकारमानाने लहान असतात. त्याचप्रमाणे पाने अकाली वाळून चाऱ्याची प्रत बिघडते व उत्पादनात घट येते. चिकट्याच्या नियंत्रणासाठी औषधी द्रव्याची पहिली फवारणी पेरणीनंतर ३०–४० दिवसांनी करतात. २० टक्के प्रवाही एंड्रीन ५०० मिलि. अथवा ३५ टक्के एंडोसल्फान ४३० मिलि. ५०० लि. पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारतात किंवा १० टक्के बीचसी भुकटी दर हेक्टरी २० किग्रॅ. या प्रमाणात उडवितात. दुसरी फवारणी किंवा उडवणी पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी करतात.

 

परोपजीवी वनस्पती : टारफुला (स्ट्रायगा एशिॲटिका  आणि स्ट्रायगा डेन्सीफ्लोरा ) या सपुष्प वनस्पती ज्वारीच्या मुळांतून अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे ज्वारीची झाडे खुरटतात. त्यावर ५०० लिटर पाण्यात २·५ लिटर ब्लॅडेस्क सी हे रसायन मिसळून तो विद्राव ज्वारीच्या पिकावर फवारतात. यासाठी वापरलेला फवारणी पंप दुसऱ्या पिकावरील औषध फवारणीसाठी वापरीत नाहीत.

दक्षिण आफ्रिकेतील बोंगनहिलो हा ज्वारीचा प्रकार टारफुलारोधक असल्यामुळे कोईमतूर येथे या प्रकाराशी स्थानिक प्रकारांचे संकर करून टारफुलारोधक व स्थानिक हवामानात लागवडीस योग्य असे ज्वारीचे प्रकार निर्माण करण्यात आले आहेत. उदा., को २०. याच पद्धतीने सुरत येथेही स्थानिक ज्वारीच्या बी. पी. ५३ या प्रकाराशी बोंगनहिलोचा संकर करून टारफुलारोधक प्रकार निर्माण करण्यात आले आहेत. कर्नाटकात लागवडीत असलेल्या बिळिचिगन हा ज्वारीचा प्रकार अंशतः टारफुलारोधक आहे.

पृथक्करण : ज्वारीच्या दाण्याचे प्रमुख घटक सर्वसामान्यपणे पुढील प्रमाणे आहेत. जलांश ११·९%, प्रथिन १०·४%, कार्बोहायड्रेट ७२·६.%, वसा १·९%, लवणे १·६%. ज्वारीतील प्रथिन गव्हातील प्रथिनापेक्षा जैवमूल्याच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे परंतु प्रथिन, ब जीवनसत्त्व व लवणे यांचा एकत्रित विचार केला असता ज्वारी गव्हापेक्षा कमी दर्जाची ठरते.

उपयोग : नेहमीच्या आहाराचा एक प्रमुख भाग म्हणून ज्वारीचा भारतात, विशेषतः कमी पर्जन्यमानाच्या भागात, उपयोग करतात. शिवाय कणसे काढून घेतल्यावर राहिलेली वाळलेली ताटे (कडबा) यांचा जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग होतो. दाण्याचे पीठ करून त्याच्या भाकरी करतात अथवा लाह्या, हुरडा व लापशी या स्वरूपांतही दाण्याचा वापर करतात. दाण्यापासून ‘माल्ट’ तयार करतात व त्याचा उपयोग लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी अथवा बिअर तयार करण्यासाठी करतात. पावासाठी गव्हाच्या पिठात ज्वारीचे पीठ २५% पर्यंत मिसळून वापरता येते. तसेच दाण्यातील स्टार्चापासून किण्वनाने (आंबवून) एथिल अल्कोहॉल, ॲसिटोन व ब्युटिल अल्कोहॉल तयार करतात. ज्वारीचा स्टार्च मक्याच्या स्टार्चाप्रमाणे असून त्याचा खाद्य पदार्थांच्या उद्योगांत आणि कापडधंद्यात खळीसाठी उपयोग होतो. कागद आणि पुठ्ठा तयार करण्याच्या उद्योगातही ज्वारीच्या स्टार्चाचा खळीसाठी वापर होतो. वॅक्सी सोर्घम नावाच्या ज्वारीच्या प्रकारापासून पाकिटे व तिकिटे चिकटविण्यासाठी आसंजक (चिकट पदार्थ) तयार करतात. मिलो आणि काफीर या ज्वारीच्या प्रकारांपासून साबुदाण्यासारखा पदार्थ आणि ज्वारीचे पोहे तयार करतात.

ज्वारीच्या काही प्रकारांच्या तुसांत लाल रंगद्रव्य असते आणि त्याचा चामड्याला रंग देण्यासाठी ईजिप्त आणि भारतात उपयोग करतात. 

ज्वारीच्या ताटांपासून रासायनिक कृतीने तयार केलेला लगदा आणि लाकडापासून तयार केलेला लगदा यांच्या मिश्रणापासून लिहिण्याचा, वृत्तपत्राचा आणि वेष्टनाचा कागद तयार करतात.

ज्वारीच्या दाण्यांत ऱ्हायझोपस निग्रिकँस  या कवकाचा एक प्रकार काही विशिष्ट परिस्थितीत वाढतो. अशा प्रकारची कवकामुळे दूषित झालेली ज्वारी खाण्यात आल्यास त्याचे अनिष्ट परिणाम म्हणजे तहान लागणे, बहुमूत्रता, भूक मंद होणे, थकवा येणे ही लक्षणे दिसून येतात. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी अशा रोगाची साथ पसरली होती.

वैरण : फुलावर आल्यावर ज्वारीची ताटे कापून ती ओली वैरण म्हणून अथवा मुरघास करून जनावरांना खाऊ घालतात. फुलावर येण्यापूर्वी ओली वैरण जनावरांना खाऊ घातल्यास त्यांतील धुरीन या सायनाइड वर्गातील विषारी पदार्थांमुळे विषबाधा होऊ शकते. लक्षणे सायनाइड विषबाधेची असतात व त्वरित उपचार न केल्यास जनावर मृत्युमुखी पडते. पीक फुलावर आल्यावर धुरीनाचे प्रमाण फारच अल्प असते. कडबा उन्हात वाळविल्याने अथवा ओल्या वैरणीचा मुरघास केल्याने राहिलेले अल्प प्रमाणातील धुरीन नाहीसे होते. बागायती पिकात कोरडवाहू पिकापेक्षा धुरिनाचे प्रमाण कमी असते तसेच खोडामध्ये ते पानांपेक्षा कमी असते. 

आरगीकर, गो. प्र. रुईकर, स. के. गोखले, वा. पु.

संदर्भ :

1. Aiyer, Yegna Narayan A. K. Field Crops of India, Bangalore, 1958.

2. C. S. I. R. The Wealth of India,  Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

3. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1967.

4. Leonard, W. H. Martin, J. H. Cereal Crops, New York, 1963.

5. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.


सीएसएच क्र. १सीएसएच क्र. २सीएसएच क्र. ४सीएसएच क्र. ७सीएसएच क्र. ८आर १६मालदांडी ३५–१आर १६९