हिरवळ : (लॉन) . उद्याने किंवा व्यावसायिक व निवासी संकुलांमधील मोकळ्या जागा व परिसर सुशोभित करण्याकरिता विशिष्ट प्रकारच्या गवतांपासून किंवा गवतांच्या मिश्रणापासून व्यवस्थित नीट-नेटकेपणाने छाटणी केलेली जी आच्छादने बनवितात त्यांना ‘हिरवळ’ असे म्हणतात. खेळांच्या मैदानासाठी देखील हिरवळीची (टर्फची) निर्मिती केली जाते. हिरवळीचा आढळ पूर्वी फक्त गवताळ प्रदेश, कुरणे व माळरानांपुरताच मर्यादित होता. आता मात्र ‘हिरवळ निर्मिती’ हा एक जगभर पसरलेला मोठा व्यवसाय आकाराला येत आहे. जगभर विशेषतः अमेरिकेतील काही राज्यांत हरळी गवताचा (टर्फग्रास) व्यवसाय हा कृषिव्यवसायात पहिल्या तीन क्रमांकात गणला जातो. एवढे व्यापक व आर्थिक दृष्ट्या महत्त्व हिरवळीला आले आहे. हरळी गवतासाठी वापरल्या जाणाऱ्या काही जाती लॉनसाठी तसेच पशुचराई कुरणाच्या लागवडीसाठी उपयुक्त असतात. हिरवळीसाठी पुनःपुन्हा पर्णन छाटणी करता येणारे गवतच वापरले जाते. कारण त्यांचा विभज्या किंवा उगवणबिंदू हा तळाशी असतो आणि अधिकाधिक भागातील पर्णसंभाराच्या फक्त अग्रांची हानी होते. नैसर्गिक हिरवळीचा आढळ वाळवंटी प्रदेश वगळता बहुतांशी जगभर सर्वत्र असतो. 

 

उद्याने, बंगले, निवासी व व्यावसायिक संकुले यांचे देखणेपण व सौंदर्य वाढविण्यासाठी हिरवळ ही अत्यावश्यक बाब आहे. बंगल्याभोवतीची हिरवळ ही निश्चितच नेत्रसुखद व आल्हाददायी असते. तिचा वापर खेळणे, संमेलन, सहली आदी मौजेसाठी होतो. हिरवळीमुळे धुळीचे तसेच घरात येताना पायाला लागून माती व चिखल येण्याचे प्रमाण कमी होते. ती वातावरणा-तील वायूंचे व पाण्याचे अपक्षरण कमी करते तसेच वादळ, सोसाट्याचा वारा इ. आल्यास धूळ उडण्याचे प्रमाण कमी करते. हिरवळ ऊष्म्याचे प्रमाण कमी करून सभोवताली गारवा निर्माण करण्यास मदत करते. 

 

हिरवळीचे इतर देखील पर्यावरणीय उपयोग आहेत. सामान्य हिरव्या वनस्पती व गवतांप्रमाणेच हिरवळीतील गवते सूर्यापासून ऊर्जा घेतात, हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेतात, जमिनीतून पाणी व क्षार घेतात आणि त्यापासून शर्करा, स्टार्च, मेद, प्रथिने आणि इतर घटक तयार करतात. या अन्न व ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियांतून ऑक्सिजन वायूची निर्मिती होते. थोडक्यात हिरवळी (विशेषतः शहरी भागांत) ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड वायूंची वातावरणातील सरासरी संतुलित राखण्यास मदत करतात. तसेच काही वायू प्रदूषित करणाऱ्या घटकांचाही निचरा करतात. 

 

हिरवळ गवतांची निवड : हिरवळ तयार करण्यासाठी जी गवते वापरली जातात, त्याचे थंड ऋतुमानातील गवते व उष्ण ऋतुमानातील गवते असे ऋतुमानानुसार वर्गीकरण होते. 

 

लागवडीसाठी हिरवळीच्या गवतांची निवड करताना हवामान विचारात घेणे आवश्यक असते. तसेच लागवडीसाठी मर्यादा ठरू शकणाऱ्या मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, हिरवळीला आच्छादणारी सावली अशाबाबी असतात. खते, चुनखडी व पाणी यांचा वापर करून तसेच सावली घालणाऱ्या गोष्टी काढून टाकून या अडचणी दूर करता येतात. हवा-मानानुसार (विशेषतः अमेरिकेत) कोणकोणती गवते वापरली जातात त्यांची काही उदाहरणे पुढे दिलेली आहेत. 

 

थंड ऋतुमानातील गवते : केंच्युकी ब्ल्यू ग्रास (पोआ प्रॅटेन्सिस), रेड फेस्कू (फेस्टूका रुब्रा), बेंट ग्रास (ॲग्रोस्टिस टेन्युइस), रायग्रास (लोलियम पेरेनी), रफ ब्ल्यू ग्रास (पोआ ट्रायव्हिॲलिस), टॉल फेस्कू (फेस्टूका आरुंडिनॅशिया), फेअर वे व्हीटग्रास (ॲग्रोपायरॉन क्रिस्टॅटम) इ. बहुवर्षायू गवते आणि लोलियम मल्टिफ्लोरम हे वर्षायू गवत. 

 

उष्ण ऋतुमानातील गवते : बर्म्युडा ग्रास (सिमोडॉन जाती), झोयसिया ग्रास (झोयसिया जाती), सेंट ऑगस्टिन ग्रास (स्टेनोटॅफ्र्म सेकुंडॅटम), कार्पेट ग्रास (ॲक्झोनोपस ॲफिनिस), सेंटिपेड ग्रास (एर्मोक्लोआ ओफियुरॉयड्स), बाहिया ग्रास (पॅस्पॅलम नोटॅटम), ब्ल्यू ग्रामा ग्रास (बुटेलुआ ग्रॅसिलिस), बर्फेलो ग्रास (बुक्लोई डाक्टिलॉयड्स) इ. बहुवर्षायू गवते. 

 

लागवडकर्त्यांसाठी हरळी गवताचे उत्पादन आणि विपणन ही ठराविक गोष्ट नसते. लागवडीसाठी वापरलेल्या कीटकप्रतिबंधक वा रोगप्रतिबंधक औषधाची क्षमता कमी झाल्यास सातत्याने नवीन वाणांची निवड करावी लागते. सुदैवाने इतर कृषी पिकांसारखे हरळी गवतांचे संचयित व संकरित वाण फार त्रासदायक नसतात. बऱ्याचदा उत्पादक जुन्या वाणांचीच लागवड पुनःपुन्हा करतात. कारण बियाण्यांसाठी खर्च करावा लागत नाही आणि तरी देखील त्यांना उत्तम वाण उपलब्ध असतात. 

 

नैसर्गिक गवत हिरवळीसाठी (लॉनसाठी) वापरात असले तरी उत्तम टर्फसाठी (खेळ मैदानावरील हिरवळीसाठी) विशेष प्रकारचे निर्माण केलेले संकरित गवत वापरतात. त्याकरिता शाऊल (कुरण) किंवा पशुचराईच्या कुरणातील गवत वापरीत नाहीत. हरळी गवतांची तुलना त्यांच्या प्राकृतिक पूर्ववर्ती गवतांशी केली असता ती कमी उंचीची असतात. या कमीउंचीमुळे कापणीनंतर देखील त्यांचा अधिक पर्णसंभार शिल्लक राहतो.तसेच ते फुटण्याचे प्रमाण जास्त असल्याने अधिक घनदाट असते. त्यामुळे त्यात तणप्रतिबंधक क्षमताही जास्त असते. निवड करते वेळी त्यांची रोगप्रतिबंधक व कीडप्रतिबंधक क्षमता तपासून पाहिली जात असल्याने त्यांवर रोग व किडीचा फार प्रादुर्भाव होत नाही. इतर बाबींमध्ये गवताच्या बीजात सकस हिरवा रंगधारणक्षमता, सौंदर्यपूर्ण दिसणे (सुरेख पोताचे बीज मुख्यतः स्वीकारले जाते) तसेच पसरण्याची (देहांकुर वा मूलक्षोड अंकुरण) क्षमता लागवडकर्त्यास तपासून घ्यावी लागते. बीजाचा लवकर उगवण्याचा गुण, रोपाचे सुरुवातीचे ओज, झिजेचा दर्जा, विविध मिश्रणांत सामावण्याची अनुरूपता, हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आदी बाबींकडे लक्ष पुरवावे लागते. 

 

लागवड : हिरवळ (लॉन) तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला जातो. हिरवळीची लागवड करायची असल्यास शक्यतो इमारत, संकुले वा घरे यांच्या बांधकामास सुरुवात करण्याआधीच तिची जागा निश्चित करणे आवश्यक असते. कारण पावसाळ्यात साचणाऱ्या व अतिरिक्त पाण्याची वाहून जाण्याची व्यवस्था करणे सोपे जाते आणि जमिनीला आवश्यक तसा उतार देता येतो. पाण्याचा निचरा होऊ न शकणारी जमीन असल्यास योग्य ती उपाययोजना करता येते. अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासंबंधी जो चढ-उतार असतो तो तपासून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार चुनखडी-फॉस्फेट आदी वरखतांचा, जोरखतांचा वापर केला जातो. योग्य तर्‍हेच्या लागवडीस तसेच गवताच्या वाढीस पोषक आणि पूरक अशी विविध रसायने व खते वापरली जातात. खतांच्या वापरानंतर पृष्ठभाग समतल व व्यवस्थित करून त्यावरील पायाचे ठसे, छोटे खड्डे वगैरे नाहीसे केले जातात. तद्नंतर जमीन हिरवळींच्या गवतासाठी पूर्ण तयार होते. 

 

गवताच्या बियांची पेरणी हाताने (फोकून) अथवा यंत्राद्वारे केली जाते. यंत्राद्वारे पेरणी केल्यास बियांचे वितरण एकसमान होते. नियमा-प्रमाणे प्रति १,००० चौरस फूटात बियांचे मिश्रण हे वापरलेली खते व रसायनांचे उच्च प्रमाण यांवरून ठरविले जाते. साधारणपणे थंड ऋतु-मानातील गवतांच्या बियांची लागवड वसंत ऋतूच्या शेवटी तापमान वाढायला सुरुवात झाल्यावर करतात. 


व्यवस्थापन : हरळी गवताच्या व्यवस्थापनात कापणी, वेळोवेळी सफलीकरण, कोरड्या ऋतूत जलसिंचन आणि काही प्रमाणात कीटक नियंत्रण यांचा समावेश होतो. 

 

प्रत्येक गवताची कापणी करण्यासाठी एक निश्चित उंची निर्धारित करण्यात आलेली असते. त्या उंचीपर्यंत गवत वाढले की कापणी करणे आवश्यक असते. सुदृढ व चांगल्या हिरवळीसाठी पाण्याचा योग्य पुरवठा व निचरा आवश्यक असतो. त्यामुळे गवताची वाढ व हानिकारकतणांची वाढ रोखण्यास मदत होते. हरळीच्या वाढीसाठी योग्य प्रकारचीखते योग्य त्या प्रमाणात पुरविणे आवश्यक असते. काही ठिकाणी सुकल्यामुळे हिरवळीत कोरडे धब्बे पडून जमीन दिसायला लागते. या जमिनीत शक्यतो पानगळी ऋतूत बियांची पुनर्पेरणी करणे चांगले असते. 

 

तण, कवक इत्यादींचे नियंत्रण : हिरवळीवरील (लॉनवरील) सर्वांत त्रासदायक गोष्ट तण असते. वापरण्यास अतिशय सहज अशी तणनाशके बाजारात उपलब्ध असून त्यांचा वापर मुख्यतः वर्षायू व बहुवर्षायू तणांचा नाश करण्यासाठी करतात. कीडनाशकांचा वापर पर्यावरणास होणाऱ्या हानीच्या अनुषंगाने केला जातो. हानीकारक किडीपासून पर्यावरणास उपयुक्त असणारे कीटक देखील रासायनिक कीटकनाशकांद्वारा नष्ट होतात. प्रशासनाने विहित केलेली पंजीकृत कीटकनाशके मार्गदर्शक सूचनांनुसार वापरल्यास साधारणतः सुधारणा चांगली होते. 

 

लॉनमधील रोगकारक अंतःक्रामी जीव कायम योग्य हवामानाची, गवताची प्रतिकारक्षमता कमी होण्याची, योग्य ऋतूची आणि गवताच्या योग्य तणाची वाट पाहत असतात. हेल्मिंथोस्पोरियम या कवकाच्या जातीमुळे पानांवर उद्भवणाऱ्या डागांवर थंड ऋतूत उपचार करणे जवळजवळ अशक्यच असते, तर डॉलर स्पॉट (स्क्लेरोशिनिया होमिओकार्पा) आणि फ्युजेरियम यांमुळे उष्ण ऋतुमानात रोग होतात. मोठ्या प्रमाणावर फलन झालेल्या हरळी गवतावर उद्भवणाऱ्या रोगांची तीव्रता जास्त असते परंतु काही (उदा., डॉलर स्पॉटसारखे) रोग कमी गंभीर असतात. अननुभवी लोकांना हिरवळीवरील रोग ओळखणे शक्य नसते. अगदी विकृतिविज्ञानाच्या तज्ञास देखील प्रयोगशाळेत तपासणी केल्याशिवाय रोग समजत नाहीत. पर्यावरणीय तुलनेसाठी गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय कवकांमुळे होणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन केले जात नाही. 

 

बऱ्याचदा घराभोवती असणाऱ्या हिरवळीवर कवकांमुळे पडणाऱ्या रोगांची लक्षणे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. बहुतांश वेळेस रोग आपला क्रमविकास पूर्ण करतो किंवा हवामानातील बदलामुळे कवकनाशकांचा वापर न करताही रोग नाहीसे होतात. त्यामुळे शक्यतो रोगप्रतिकारक्षमता असणाऱ्या हिरवळीची लागवड करणे योग्य असते. 

 

हिरवळीची लागवड ही निगा व व्यवस्थापन या अर्थाने त्रासदायक ठरत असल्याने संश्लेषित (कृत्रिम) हिरवळीची निर्मिती करण्यास संशोधकांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. परंतु, असे असले तरी संश्लेषित हिरवळींचा वापर मर्यादितच होत आहे. 

 

संश्लेषित हिरवळ : संश्लेषित हिरवळ पहिल्यांदा १९६५ मध्ये निर्माण करण्यात आली. सुरुवातीची हिरवळ प्लॅस्टिकपासून बनलेली बिछायतीसारखी (कारपेटसारखी) होती. तद्नंतर नैसर्गिक गवत नीटवाढत नाही अथवा त्याचे व्यवस्थापन किचकट व खर्चिक असल्याने त्याच्या बदली दुसरा पर्याय शोधण्याचा विचार पुढे आला. तसेच व्यावसायिक खेळांच्या मैदानांचे व्यवस्थापन करणाऱ्यांना दुसरा पर्याय असणे आवश्यक वाटू लागले. 

 

संश्लेषित हिरवळ वापरण्याचे काही फायदे नमूद केले जातात. अतिवापराने देखील संश्लेषित हिरवळ खराब होत नाही. खूप पाऊस पडल्यानंतरही लगेचच ती वापरता येते. पाण्याचा निचरा करणे व तिची नीट मांडणी करणे सोपे जाते. नैसर्गिक हिरवळी इतके व्यवस्थापन संश्लेषित हिरवळीचे करावे लागत नाही. तुलनेने संश्लेषित हिरवळ आर्थिक दृष्ट्या स्वस्त असते. संश्लेषित हिरवळीचे असे फायदे सांगितले जात असले तरी त्याच्या वापराबाबत अनेक वाद आहेत. 

 

संश्लेषित हिरवळ प्लॅस्टिकच्या चटयांसारखी बनविली जाते. अशा चटयांवर सिलिकॉनयुक्त पॉलिएथिलिनापासून बनविलेले तंतू चिकटवून खेळाच्या मैदानासाठी वापरली जाणारी हिरवळ (टर्फ) बनविली जाते. धक्काशोषणक्षमता वाढविण्यासाठी पॉलिप्रोपिलीन किंवा रबरच्या कणां-पासून (मुख्यतः मोटारींच्या वापरलेल्या टायरींचा पुनर्वापर केलेल्या रबरापासून) आणि वाळूपासून एक स्तर (भरणपट्टी) बनविलेला असतो. ही भरणपट्टी वेळोवेळी बदलण्याचे सुचविलेले असते. 

 

संश्लेषित हिरवळींच्या वापरामुळे होणाऱ्या दीर्घकालीन परिणामां-विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तसेच संश्लेषित हिरवळ वापरण्या-संबंधी शासकीय नियम, बंधने व मार्गदर्शन निश्‍चित करण्यात आलेले नाहीत परंतु, शासनाचा कृषी विभाग आणि पर्यावरणविषयक संस्था नैसर्गिक हिरवळ वापरासंबंधी प्रचार-प्रसार करतात. 

 

नैसर्गिक वा संश्लेषित हिरवळ यांपैकी कोणती हिरवळ वापरावी, याबाबत निर्णय घेताना काही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. यांमध्ये आर्थिक बाबी, वापर आणि टिकाऊपणा, पर्यावरणावर होणारे परिणाम, मानवी आरोग्य तसेच मानसिक व भावनिक परिणाम आदींचा समावेश होतो. या गोष्टी लक्षात घेऊन हिरवळीची निवड करण्याबाबत सल्ला दिला जातो. त्यामध्ये मानवी आरोग्य तसेच पर्यावरणीय परिणाम महत्त्वाचे ठरतात. हिरवळ, टर्फ आदी सूक्ष्मजंतूंच्या नैसर्गिक अधिवासाच्या जागा असतात. तुलनेत संश्लेषित हिरवळीत अधिक सूक्ष्मजंतू साचून राहतात. संश्लेषित हिरवळीच्या वापरामुळे खेळाडूंवर मेथिसिलीन रेझिस्टंट स्टॅफिलोकॉकस ऑरियस (एमआरएसए) या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळतो. हा रोग कधीकधी जीवघेणा सुद्धा ठरू शकतो. रबराच्या वापरामुळे संश्लेषित हिरवळीतील विषाक्तता वाढते. तसेच सिलिकॉसीस या रोगाची भीती-देखील वाढते. त्वचा आणि फुप्फुस यांवर देखील रबराच्या वापराचा परिणाम होऊ शकतो. कर्करोग होण्याची शक्यता देखील संश्लेषित हिरवळीमुळे वाढते. 

 

पर्यावरणीय दृष्ट्या विचार केल्यास नैसर्गिक गवतांच्या वापरामुळे ऑक्सिजन वायुनिर्मिती, मातीचे अपक्षरण नियंत्रण, धुळीचे स्थिरीकरण, पाणी शुद्धीकरण, पूर नियंत्रण (वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करणे), हवा प्रदूषण रोखणे, हरितगृह वायूंचे परिणाम रोखणे आदी फायदे स्पष्टपणे दिसून येतात तर संश्लेषित हिरवळीच्या वापरातून कोणतेही पर्यावरणीय फायदे होत नाहीत. नैसर्गिक हिरवळींवर उघड्या पायांनी चालण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे मनःशांती मिळते आणि रक्तदाब व हृदयविकारासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येते आणि प्रतिबंध करता येतो. 

 

संदर्भ : 1. Beard, J. B. Turfgrass Science and Culture, 1973.

           2. Daniel, W. H. Freeborg, R. P. Turf Manager’s Handbook, 1999.

           3. Turgeon, A. J. Turfgrass Managment, 1998.

          4. Turfgrass Resource Centre, Facts About Artificial Turf and Natural Grass, 2007. 

वाघ, नितिन भरत