गजराज गवत : (हत्ती गवत इं. एलेफंट ग्रास, जायंट नेपिअर ग्रास ल‍ॅ. पेनिसेटम पुरपुरिअम कुल-ग्रॅमिनी). दक्षिण आफ्रिकी संघराज्यातील केप प्रांतामधील नेपिअर शहरावरून त्याला नेपिअर ग्रास हे नाव मिळाले. ते खूप उंच वाढणारे, उसासारखे दिसणारे व दणकट बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत आहे. पूर्वी आफ्रिकेच्या जंगलात ते इतके उंच वाढत असे की, त्याच्यामधून वावरणारा हत्तींचा कळपसुद्धा दिसत नसे म्हणून त्याला एलेफंट ग्रास किंवा हत्ती गवत नाव पडले.

कापणी केल्यावर त्याची वाढ चांगली होऊन उत्पन्न वाढते. परंतु पाने चरबरीत, ताटे कठीण, वैरणीला गोडी कमी व ती पचण्यासही जड असल्यामुळे ती गुरांना खाऊ घातल्यास तिचा बराचसा भाग वाया जातो. हे दोष टाळण्यासाठी गजराज गवताचा त्याच श्रेणीतील पालेदार, नरम व गुळचट वैरण असणाऱ्या बाजरीच्या पिकाबरोबर संकर करून गजराज गवतातील जास्ती उत्पन्न व बहुवर्षायुत्व आणि बाजरीमधील चाऱ्याचा नरमपणा आणि गोडी यांचा संगम घडवून आणून गजराज गवताच्या नवीन जाती निर्माण करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आलेले आहेत व जवळजवळ ४० संकरित जाती निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यांच्यामधील इ.बी.एच. ३२–४ ही जाती अधिक उत्पन्न देणारी आढळली. पुणे कृषि महाविद्यालयात तिच्या संबंधी झालेल्या प्रयोगांवरून असे सिद्ध झाले की, प्रचलित कोणत्याही जातीच्या गवतांपेक्षा या जातीच्या गवतापासून जास्त उत्पन्न मिळते. जनावरानांही हा चारा फार आवडतो व त्याच्यापासून त्यांना काहीही अपाय होत नाही.

हवामान आणि जमीन : याला अतिशय थंड हवामान आणि दलदलीची जमीन मानवत नाही. उबदार हवामानात चांगल्या निचऱ्याच्या जमिनीमधून उत्पन्न चांगले येते. जास्तीत जास्त उत्पन्न उन्हाळी आणि पावसाळी हंगामांत मिळते. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंतच्या थंड हवामानात काळजी घेऊनसुद्धा त्याची वाढ होत नाही.

मशागत : निवडलेली जमीन २०–२५ सेंमी. खोल नांगरून, कुळवून, हेक्टरी ३०–३५ टन शेणखत घालून तयार करतात. एक मी. अंतरावर सऱ्या पाडून पाणी देण्याकरिता वाकुऱ्या करतात. पाऊस नसल्यास जून-जुलैमध्ये सऱ्यांत पाणी सोडून वरंब्याच्या एकाच बाजूला सु.१/३ भागावर याच्या मुळावलेल्या कांड्या एक मी. अंतरावर प्रत्येक जागी दोन-दोन प्रमाणे लावतात. हेक्टरमध्ये साधारणपणे २०,००० ते २५,००० अशा कांड्या लागतात.

कापणी : लागण केल्यापासून सु. दोन महिन्यांनी गवत कापणीला येते. कणसे दिसू लागली म्हणजे कापणीची सुरूवात करतात. साधारणपणे ३५–४५ दिवसांच्या अंतराने कापण्या करीत गेल्यास एका वर्षात हेक्टरी १५०–२०० टन ओली वैरण मिळते.

वरखत : जमिनीचा कस टिकवून इतके भारी उत्पन्न मिळविण्यासाठी भरपूर खत आणि पाणी देणे जरूर असते. हेक्टरी ७५ किग्रॅ. अमोनियम सल्फेट ऑगस्टमध्ये आणि तितकेच परत फेब्रुवारीच्या सुरुवातीला देऊन भरपूर पाणी देतात. प्रत्येक कापणीनंतर नांगराने सरी फोडतात आणि नंतर सरीचा नांगर चालवून माती चढवून पिकाला भर देतात.

आंतर मशागत : साधारणपणे पीक ९-१० महिन्यांचे झाले म्हणजे प्रत्येक ठोंबाला ५०–७० फुटवे येऊन तो फुगत जातो व सुरुवातीला उत्पन्न वाढते, पण पुढे या फुटव्यांची संख्या भरमसाट वाढल्याने ठोंबाच्या मध्यभागी पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा न मिळून तो भाग कुजू लागतो व उत्पन्न घटत जाते. अशा प्रसंगी ठोंब फोडून विरळ करणे कठीण जाते म्हणून लागणीनंतर एकदोन वर्षांनंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यांत थंडीमुळे पिकाची वाढ खुंटलेली असते त्या काळात ऊस तोडण्याच्या कोयत्याने हे ठोंब जमिनीसपाट छाटतात छाटणीत निघालेला माल तेथेच पसरून वाळू देतात. तो पूर्णपणे वाळला म्हणजे त्याला आग लावतात. दुसऱ्या दिवशी जमिनीला भरपूर पाणी देतात. ५-६ दिवसांनंतर ठोंबांमधून चांगली जोमदार फूट निघते आणि पीक नवीन लागण केल्याप्रमाणे वाढू लागते. पाणी दिल्यानंतर जमिनीला वाफसा आल्यावर सऱ्यांमधून नांगर चालवून नंतर सरीच्या नांगराने त्या नवसारून घेतात. हेक्टरी २०–२५ टन याप्रमाणे सऱ्यांतून शेणखत घालून पाणी देतात. दरवर्षी अशी काळजी घेतल्यास हे पीक आठ ते दहा वर्षे चांगल्या प्रकारे उत्पन्न देत राहते. याची इतर गवतांपेक्षा फार झपाट्याने वाढ होत असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणतेही तण वाढू शकत नाही. कोणत्याही कीटकाचा किंवा कवकजन्य (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींमुळे होणाऱ्या) रोगाचा त्याला उपद्रव होत नाही.

उत्पन्न : सांडपाणी मिळण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी ते वापरून दरसाल हेक्टरी २५० टनापर्यंत ओला चारा मिळविता येतो. सामान्यतः व्यवस्थित प्रमाणात खत घालून चांगली मशागत केल्यास दरसाल हेक्टरी १५०–२०० टनापर्यंत हिरवा चारा मिळतो. जास्त वाढून देता १·२५ ते १·५० मी. उंच असतानाच कापल्यास उत्तम प्रतीचा हिरवा चारा मिळतो. तो जनावरे आवडीने खातात. चाऱ्याची नासाडी होत नाही. 

 

चव्हाण, ई. गो.