टोमॅटो : (वेलवांगी हिं. टमाटर, विलायती बैंगन गु. विलायती वेंगण लॅ. लायकोपर्सिकॉन लायकोपर्सिकम कुल-सोलॅनेसी). ही मूळची बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) परंतु लागवडीतील वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पती आहे. हिच्या वन्य जातीचे मूलस्थान द. अमेरिकेतील पेरू-एक्वादोर-बोलिव्हिया भागात असून लागवडीतील प्रकार मेक्सिको आणि द. अमेरिकेत अस्तित्वात आले असावेत. मेक्सिकोतून सोळाव्या शतकात ही वनस्पती यूरोपात नेण्यात आली, असे मानण्यात येते. प्रथम टोमॅटो फळ खाण्यासाठी वापरण्यास विरोध होता, परंतु सतराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास यूरोप खंडातील पुष्कळ देशांत या फळाचा खाण्यासाठी वापर होऊ लागला. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत या वनस्पतीच्या लागवडीचा प्रथम उल्लेख १७८१ मधील आहे. जरी या वनस्पतीचा वापर या देशात वाढत गेला, तरी १९०० सालापर्यंत ही वनस्पती विषारी आहे, अशी पुष्कळ लोकांची समजूत होती.

सध्या जगातील सर्व भागांत ही वनस्पती लागवडीत आहे. बटाटा आणि रताळी यांच्या खालोखाल टोमॅटो हे जगातील महत्त्वाचे भाजीपाल्याचे पीक आहे. विषववृत्तापासून ६५ उ. अक्षांशापर्यंत या पिकाची लागवड होते. उत्तर यूरोपात हे पीक काचघरात लावतात कारण या पिकाला कडाक्याची थंडी मानवत नाही. क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने टोमॅटोचे जगातील प्रमुख लागवडीचे देश पुढीलप्रमाणे आहेत : अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इटली, मेक्सिको, ईजिप्त आणि ब्राझील. उत्पादनात अमेरिकेचा प्रथम क्रमांक असून जगातील टोमॅटोचे एक तृतीयांश उत्पादन त्या देशात होते. भारतात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड १९०० च्या सुमारास सुरू झाली आणि लहान-मोठ्या शहरांच्या आसपास सध्या हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकाखालील भारतातील एकूण क्षेत्रासंबंधी माहिती उपलब्ध नाही.

टोमॅटो : फळांसह फांदी

वनस्पती वर्णन : ही पसरणारी अथवा सरळ वाढणारी वनस्पती असून तिच्या सर्वांगावर केस असतात. वनस्पतीच्या सर्व भागांना व विशेषतः पानांना विशिष्ट प्रकारचा उग्र वास येतो. खोडावर आगंतुक मुळे सुलभ रीत्या येतात. पाने पिच्छाकृती (पिसासारखी) असून दले असमान आकाराची असतात. फुलोरा मंजिरी प्रकारचा असून त्यावर ४–१२ पिवळी, लोंबणारी फुले गुच्छात असतात. फळे (मृदुफळे) १·२५ ते ७·५० सेंमी. व्यासाची अथवा त्याहून मोठी सर्वसाधारणपणे लाल, पिवळी अथवा शेंदरी रंगाची असतात. काही प्रकारांत ती पांढरी, गुलाबी अथवा अंजिरी रंगाची असतात अपक्व फळांवर मऊ, लांब व विरळ केस असतात. पक्व फळे गुळगुळीत आणि चकचकीत असतात. फळांचा आकार प्रकाराप्रमाणे गोल, अंडाकृती अथवा लांबट व टोकाकडे निमुळता असतो आतील भाग मांसल असून त्यात अनेक बारीक अंडाकृती बिया असतात. त्यांच्या पृष्ठभागावर चिकट पदार्थाचे आवरण असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨सोलॅनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

हवामान : उबदार व बेताचे सर्द हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश या गोष्टी या पिकाला आवश्यक आहेत. मासिक सरासरी तापमान २१°–२३° से. असावे परंतु १८°–२७° से. तापमानात या पिकाची लागवड होऊ शकते. फार दमट आणि उष्ण हवामानात पिकावर रोग जास्त प्रमाणात पडतात. फार कोरड्या व गरम हवामानात फुले झडतात. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. फळांना चांगला रंग येण्यासाठी दिवसा उबदार हवामान व भरपूर सूर्यप्रकाश आणि रात्री बेताचे थंड हवामान असावे लागते.

हंगाम : भारतात हे पीक वर्षभर देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात लागवडीत असते. डोंगराळ भागात मार्चपासून मे अगर जूनपर्यंत बी पेरतात. सपाट प्रदेशात वर्षातून तीन पिके घेतात. यांतील दोन पिके अल्प मुदतीची (हळवी) व एक मुख्य पीक (गरवे) असते. पहिल्या पिकाच्या बी पेरणीचा हंगाम जून ते ऑगस्ट, दुसऱ्या पिकाचा ऑगस्ट ते ऑक्टोबर आणि तिसऱ्याचा ऑक्टोबर ते नोव्हेंबर असतो.

जमीन : पाण्याचा चांगला निचरा होणारी, सुपीक, दुमट प्रकारची जमीन या पिकाला लागते. जमिनीच्या वरच्या थरात थोड्या प्रमाणात वाळू असावी व खालच्या थरात पाणी धरून ठेवणारी चिकण माती जास्त प्रमाणात असावी. जमिनीचा पोत चांगला असणे या पिकासाठी फार महत्त्वाचे आहे. हळव्या प्रकारांसाठी वालुकामय दुमट प्रकारची जमीन चांगली. वार्षिक ७५ सेंमी. पेक्षा जास्त पाऊस नसलेल्या प्रदेशांत चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत टोमॅटोचे कोरडवाहू पीक चांगले येते.

लागवडीच्या पद्धती : सर्वसाधारणपणे टोमॅटोची रोपे प्रथम वाफ्यांत तयार करून पेरणीपासून ४–६ आठवड्यांनंतर शेतात लावतात. अमेरिकेतील काही राज्यांत (विशेषतः कॅलिफोर्नियात) रोपे न लावता शेतातच बी पेरून पीक घेण्याची पद्धत आहे. रोपे लावून लागवडीची पद्धत भारतात सर्वत्र प्रचलित आहे. ⇨ मृद्‌हीन कृषी पद्धतीनेही टोमॅटोचे पीक घेता येते. या पद्धतीने एका झाडाला १०–२१ किग्रॅ.पर्यंत टोमॅटो मिळू शकतात.

मशागत : १५ सेंमी. खोलीपर्यंत जमीन नांगरून हेक्टरी २५ टन शेणखत अगर कंपोस्ट खत मिसळून भुसभुशीत करतात. शेणखत अगर कंपोस्ट खताऐवजी ताग, चवळी, धैंचा अगर गवार या पिकांचे हिरवळीचे खत जमिनीत गाडतात (हिरवळीच्या पिकाला पेरणीपूर्वी हेक्टरी १७० किग्रॅ. सुपरफॉस्फेट दिल्यास त्याचा टोमॅटोच्या पिकाला चांगला फायदा होतो.) हिरवळीचे खत न दिल्यास रोपांच्या लागणीपूर्वी हेक्टरी २२० किग्रॅ. सिंगल सुपरफॉस्फेट, ११० किग्रॅ. अमोनियम सल्फेट आणि ७० किग्रॅ. पोटॅशियम सल्फेट देतात.


रोपे तयार करणे : एक हेक्टर क्षेत्राला पुरेशा रोपांसाठी १०० चौ. मी. क्षेत्रातील रोपवाटिकेत गादी वाफ्यांवर ५ सेंमी. अंतरावर ओळींमध्ये हाताने बी पेरतात व मातीने ओळी झाकतात. एका हेक्टरसाठी ४००–५०० ग्रॅ. बी लागते. टोमॅटोचे बी लहान असते. १० ग्रॅ. वजनात प्रकाराप्रमाणे सु. ३,५०० ते ५,००० बिया असतात. बियांसाठी निवडक आणि पूर्णपणे पिकलेल्या फळांतील बियांसहित मांसल भाग काढून तो २ ते ५ दिवस ठेवतात. या अवधीत किण्वनामुळे (आंबण्याच्या क्रियेमुळे) बी तळाला बसते. नंतर ते धुवून वाळवून ठेवतात. सौम्य हायड्रोक्लोरिक अम्ल अथवा कपडे धुण्याचा सोडा यांच्या साहाय्यानेही मांसल भागापासून बी वेगळे करता येते. पेरणीपासून ४ ते ६ आठवड्यांनी रोपे लागणीसाठी तयार होतात. ७·५ ते १० सेंमी. उंचीची व जोमदार रोपे लागणीसाठी योग्य असतात. परंतु ती १२–१५ सेंमी. पेक्षा जास्त उंचीची नसावीत. रोपामध्ये काटकपणा येण्यासाठी लागणीपूर्वी पाणी जास्त अंतराने देतात. वाफ्यात १२% पोटॅश दिल्यानेही रोपे काटक आणि जोमदार बनतात. रोपे काढण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांवर १०% सारखेचा विद्राव फवारल्यास लागणीनंतर रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते व रोपांची वाढही चांगली होते, असे आढळून आले आहे.

लागण : वाफ्यात अथवा सऱ्यांच्या बगलेत रोपांची लागण करतात. दोन ओळींतील अंतर दोन झाडांतील अंतरापेक्षा जास्त ठेवण्याचा प्रघात आहे. उन्हाळी पिकासाठी ७५ X ४५ सेंमी. आणि पावसाळी-हिवाळी पिकासाठी ७५ X ६० सेंमी. अंतर ठेवतात. काही भागांत दोन ओळींत ६० सेंमी. आणि दोन झाडांत ४५–६० सेंमी. अंतर ठेवतात. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांच्या मिश्रणाचा सौम्य विद्राव रोपे लावण्यापूर्वी घातल्यास फायदा होता, असे आढळून आले आहे. तसेच रोपे सरळ न लावता तिरपी लावल्याने जास्त मुळे फुटून उत्पन्नही जास्त येते.

पाणी : पावसाळी हंगामातील पिकाला पावसाचे मान पाहून गरजेप्रमाणे पाणी देतात. हिवाळी आणि उन्हाळी हंगामांतील पिकांना दर दहाव्या दिवशी अगर गरजेनुसार ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देतात. टोमॅटोचे झाड नाजूक असल्यामुळे वाजवीपेक्षा जास्त अगर कमी पाणी देणे ही दोन्ही पिकाला नुकसानकारक आहेत. पाण्याची पाळी लांबल्यामुळे मागाहून भरपूर पाणी दिल्यास फळे फुटतात. फळे तोडण्याच्या सुमारास पाणी दिल्यास फळांत पाण्याचा अंश वाढतो.

आधार : पावसाळी आणि बागायती पिकातील झाडाच्या खालच्या बाजूच्या खोडाचा व फळांचा ओल्या मातीशी संपर्क आल्याने ती कुजण्याची शक्यता असते झाडांना आधार दिल्याने ती कमी होते. झाडे २५ ते ४० सेंमी. उंचीची झाल्यावर आधार देतात. आधारासाठी आडव्या तारांचा अगर बांबूच्या तुकड्यांचा वापर करतात.

वरखत : हेक्टरी ५०–६० किग्रॅ. नायट्रोजन दोन समान हप्त्यांनी, पहिला लागणीपासून २० दिवसांनी आणि दुसरा त्यानंतर ३० दिवसांनी देतात. या पिकाला नायट्रोजन वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात दिला गेल्यास झाडे उंच वाढतात, फुले झडतात आणि धरणारी फळे आतून घट्ट असत नाहीत. यूरिया आणि ट्रिपल सुपरफॉस्फेट पाण्यात मिसळून पानांवर फवारल्यास उत्पन्न वाढते. मात्र विद्राव्य (विरघळणाऱ्या) पदार्थाचे प्रमाण १ टक्क्यापेक्षा जास्त असल्यास पानांना इजा होते. हेक्टरी ३५ किग्रॅ. नायट्रोजन आणि ४५ किग्रॅ. फॉस्फरस वरील खतांच्या स्वरूपात ४–५ फवारणींमध्ये विभागून देतात.

आंतर मशागत : वरचेवर कोळपणी करून वरच्या थरांतील माती भुसभुसीत ठेवतात. विशेषतः पाणी दिल्यावर याची जास्त आवश्यकता असते. लागणीनंतर ३–४ आठवड्यांनी सऱ्या फोडून झाडांना भर देतात. 

फलधारणा : रात्रीचे तापमान १३° से. च्या खाली असल्यास व दिवसाचे तापमान ३८° से. च्या वर असल्यास परागण (परागसिंचन) आणि फलधारणा यांवर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी वनस्पतिवाढनियंत्रकाची फवारणी केल्यास फळांची संख्या वाढते. १% यूरिया आणि २-४ डी (दहा लक्ष भाग पाण्यात १ ते २ भाग) यांच्या मिश्रणाची फवारणी सर्वांत जास्त परिणामकारक आणि स्वस्त असल्याचे आढळून आले आहे. पेरण्यापूर्वी त्याच्या विद्रावात टोमॅटोचे बी २४ तास बुडवून ठेवल्यासही ते फायदेशीर ठरते. विद्रावातील वनस्पतिवाढनियंत्रकाचे प्रमाण टोमॅटोचा प्रकार आणि हवामान यांवर अवलंबून असते.

रोग : टोमॅटोच्या पिकावर कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), सूक्ष्मजंतू आणि व्हायरस यांमुळे पुष्कळ प्रकारचे रोग पडतात. यांपैकी रोपांची कूज, फळकूज, मर, करपा हे कवकामुळे होणारे रोग सूक्ष्मजंतूंमुळे होणारा मर रोग आणि व्हायरसामुळे होणारे मुरड्या, केवडा आणि इतर रोग महत्त्वाचे आहेत. रोपांची कूज हा रोग एक अगर जास्त कवकांमुळे होतो. यासाठी गादी वाफ्यांत बी पेरणे, पाण्याचा योग्य निचरा होईल अशी तजवीज करणे, वाफ्यांत बी दाटीने न पेरणे, पेरणीपूर्वी मातीत कवकनाशकांचा वापर करणे, बियांना कवकनाशक चोळणे आणि रोपे उगवून आल्यावर वाफ्यांत आणि रोपांवर ०·४% कसाचे बोर्डो मिश्रण फवारणे हे उपाय आहेत. जमिनीलगतची फळे रायझोक्टोनिया सोलॅनी या कवकामुळे काळे गोल डाग पडून कुजतात. झाडांना आधार देणे, जमिनीतील पाण्याचा निचरा चांगला होईल अशी तजवीज करणे आणि जरूरीप्रमाणे १% कसाचे बोर्डो मिश्रण फवारणे हे उपाय आहेत. मर हा रोग पावसाळ्यात लावलेल्या पिकावर जास्त प्रमाणात पडतो. २७° ते ३२° से. तापमानात या रोगाची वाढ झपाट्याने होते. जमिनीत वास्तव्य करून राहणाऱ्या रोगकारक कवकाचा अथवा सूक्ष्मजंतूंचा मुळांवाटे झाडात प्रवेश होतो. रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हा एकच उपाय आहे. सू व मार्ग्लोब हे प्रकार मर रोगप्रतिकारक आहेत. करपा रोगामुळे पानावर तपकिरी काळपट रंगाचे लहान-मोठे ठिपके दिसतात. यासाठी १% बोर्डो मिश्रण अगर झायनेब पिकावर फवारतात. व्हायरसजन्य रोगांपैकी काहींचा प्रसार बीजावाटे होतो व काहींचा कीटकांमार्फत होतो. केवळ रोगट झाडाच्या स्पर्शामुळेही काही व्हायरसजन्य रोगांचा निरोगी झाडात प्रवेश होऊ शकतो. निरोगी झाडांचे बी वापरणे, कीटकनाशके वापरून रोगवाहक कीटकांचा नाश करणे आणि शेतातील व्हायरसजन्य रोगाच्या प्रसारास मदत करणारी झाडे आणि तणे यांचा नाश करणे आणि रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हे व्हायरसजन्य रोगांच्या बाबतीत उपचार आहेत तसेच रोपांच्या वाफ्यांची वारंवार तपासणी करून रोगट रोपे वेळीच उपटून नष्ट करणे आवश्यक आहे.

किडी : टोमॅटोच्या रोपांवर एपिलाक्ना वंशातील भुंगेरे आढळतात. किडीची अंडी, डिंभक (अळ्या) आणि भुंगेरे हाताने वेचणे व २% डीडीटी पूड पिसकारणे हे उपाय आहेत. टोमॅटोची झाडे फुलावर असताना अळ्यांचा उपद्रव होतो. हाताने अळ्या वेचणे, अळ्यांनी पोखरलेली फळे काढून नष्ट करणे ०·१% डीडीटी फवारणे हे उपाय योजतात.

तोडणी : लागणीपासून अडीच ते तीन महिन्यांनी फळांची पहिली तोडणी करता येते, त्यानंतर दर ३–४ दिवसांनी तोडणी करावी लागते. तोडणी १–२ महिने चालू राहते. पिकाचे आयुष्य प्रकाराप्रमाणे ४ ते ५ महिने असते. फळांचा रंग तांबूस दिसू लागला म्हणजे ती तयार झाली असे समजतात. झाडावर पूर्णपणे पिकलेली परंतु मऊ न झालेली फळे खाण्यास उत्तम आणि चवदार असतात व त्यांत क जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. लांबच्या बाजारांत पाठविण्यासाठी तयार परंतु हिरवी वा तांबूस रंगाची फळे तोडतात. फळांची तोडणी सर्वसाधारणपणे हातानेच करतात परंतु कॅलिफोर्नियात यंत्राच्या साहाय्याने फार मोठ्या प्रमाणावर तोडणी केली जाते. झाडावर जास्तीत जास्त फळे तयार झाल्यावर झाडे जमिनीलगत यंत्राने कापली जातात आणि दुसऱ्या यंत्राच्या साहाय्याने झाडांपासून फळे अलग केली जातात. कॅलिफोर्नियात १९६९ मध्ये टोमॅटोचे टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी लावण्यात आलेल्या ८० ते ९०% पिकाची तोडणी यंत्राच्या साहाय्याने करण्यात आली.


साठविणे : टोमॅटोची फळे साठविण्यासाठी १२° ते १५° से. तापमान योग्य असते. या तापमानात तयार परंतु हिरवे टोमॅटो ३० दिवसांपर्यंत टिकतात. पिकलेले टोमॅटो ४·५° से. तापमान आणि ८५ ते ९०% सापेक्ष आर्द्रता असल्यास १० दिवसांपर्यंत टिकतात. ४·५° से. च्या खालील तापमान टोमॅटोच्या साठवणीसाठी योग्य नसते. तयार हिरवी फळे तोडल्यावर ती १५°–२०° से. तापमानात ठेवल्यास चांगली पिकतात व त्यांचा रंगही चांगला आकर्षक होतो.

प्रकार : भारतात लागवडीत असलेले टोमॅटोचे प्रमुख प्रकार खालील प्रमाणे आहेत :

सू : फळे मोठी (सरासरी वजन ११० ग्रॅ.), गोलसर, लाल भडक रंगाची, काहीशी आंबट असतात. हळवे पीक १०० दिवसांत आणि गरवे पीक १६० दिवसांत तयार होते. सुधारित मीरती : फळे मध्यम आकाराची (सरासरी वजन ५५ ग्रॅ.), लाल भडक रंगाची, आंबट, जास्त दिवस टिकणारी. व्हायरसजन्य रोगांचा प्रादुर्भाव या प्रकारावर कमी होतो. पुसा रुबी : ही सू आणि सुधारलेली मीरती यांच्या संकरापासून निर्माण करण्यात आली आहे. फळे मध्यम आकारमानाची, लाल रंगाची, काहीशी आंबट, जास्त दिवस टिकणारी असतात. हळवे पीक ६० दिवसांत व गरवे पीक १२० दिवसांत तयार होते. स्थानिक प्रकारापेक्षा या प्रकारात व्हायरसजन्य रोगांचे प्रमाण कमी असते. प्रतिकूल हवामानाला प्रतिकारक्षम. पुसा रेड प्लम : (हायब्रीड ६). फळे लहान आकारमानाची (सरासरी वजन फक्त १०–१२ ग्रॅ.), चवीला गोड (५% शर्करा असलेली), क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असलेली. हा प्रकार व्हायरसजन्य रोगांना प्रतिकारक आहे. लार्ज रेड : फळे मध्यम आकारमानाची, लाल असून आंबट नसतात. फळांवर पन्हाळी असतात व ती काहीशी चपटी असतात. बेस्ट ऑफ ऑल : (टी-२९). फळे मध्यम आकारमानाची, गोल आणि लाल रंगाची. बॉनी बेस्ट : (टी-२८). फळे मध्यम आकारमानाची, गोल अथवा लांबट, लाल रंगाची काहीशी आंबट असतात. उन्हामुळे फळे करपतात अथवा त्यांना तडे जातात. भरपूर उत्पन्न देणारा हा प्रकार आहे. कडाक्याची थंडी अथवा कडक ऊन याला मानवत नाही. मार्ग्लोब : फळे मध्यम अथवा मोठ्या आकारमानाची, गोल, लाल भडक रंगाची टिकविण्यासाठी हा प्रकार चांगला आहे.

यांशिवाय पाँडेरोझा, ऑक्स्हार्ट, प्रिचर्ड, पीअर्सन, पुसा अर्ली ड्‌वार्फ, इटालियन रेड पेअर आणि रोमा हेही सुधारलेले प्रकार लागवडीत आहेत. शेवटच्या दोन प्रकारांची फळे लांबट निमुळती (नासपतीसारखी) असून दूर अंतरावर पाठविण्यासाठी योग्य आहेत.

उत्पन्न : पिकाच्या हंगामाप्रमाणे व प्रकाराप्रमाणे हेक्टरी सरासरीने १०,००० ते १२,५०० किग्रॅ. फळांचे उत्पन्न मिळते. एका झाडाला २ ते ४ किग्रॅ. फळे धरतात. लहान प्रमाणावरील चाचणीमध्ये सू या प्रकाराचे हेक्टरी उत्पन्न ५०,००० किग्रॅ. मिळाले आहे. त्याखालोखाल पुसा रुबी हा जास्त उत्पन्न देणारा प्रकार आहे.

रासायनिक संघटन : पिकलेल्या फळातील खाद्य भागात सर्वसाधारणपणे पाणी ९४·५%, प्रथिन १%, कार्बोहायड्रेट ३·९% आणि लवणे ०·५% असतात. याशिवाय त्यात अ,ब, आणि क ही जीवनसत्त्वे असतात. सावलीत तयार झालेल्या फळांपेक्षा सूर्यप्रकाशात तयार झालेल्या फळांमध्ये आणि लागवडीखालील प्रकारांपेक्षा रानटी प्रकारांमध्ये क जीवनसत्त्व जास्त असते.

मनुष्याच्या रोजच्या आहारात जेवढे अ जीवनसत्त्व असावयास पाहिजे त्याच्या दीड ते दोन पट जीवनसत्त्व ‘कॅरो रेड’ या अमेरिकेतील टोमॅटोच्या प्रकाराच्या एकाच फळात असते.

उपयोग : कच्च्या आणि पिकलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या फळांचा आहारात उपयोग करण्यात येतो. कच्चे टोमॅटो शिजवून आणि पिकलेले टोमॅटो न शिजविता अगर शिजवून रस, चटणी, कोशिंबीर, सार, केचप, सॉस, सूप व सूप-पूड या निरनिराळ्या स्वरूपांत त्यांचा उपयोग करतात. टोमॅटोचा रस भूक लागण्यासाठी भोजनापूर्वीचे पेय म्हणून घेण्याचा प्रघात आहे. वाफारून, साल काढून फळे मोठ्या प्रमाणावर बंद डब्यात टिकविण्यात येतात. टोमॅटोचे टिकाऊ पदार्थ तयार करण्याचे भारतात सु. २०० लहान-मोठे कारखाने आहेत. त्यांत टोमॅटोची फळे व त्यांचा रस, केचप, सॉस, चटणी व सूप हे पदार्थ तयार करून हवाबंद डब्यांत अथवा बाटल्यांत भरण्यात येतात. सूपापासून सूप-पूड तयार करतात. कारखान्यातील टाकाऊ पदार्थांपासून तेल काढण्यात येते. त्याच उपयोग साबण करण्यासाठी अथवा रंग तयार करण्यासाठी करतात.

संशोधन : वनस्पतीच्या क्रियाविज्ञानाचा अभ्यास करण्यायाठी टोमॅटो ही वनस्पती फार उपयुक्त ठरली आहे. कारण या वनस्पतीची अभिवृद्धी बियांपासून आणि शाकीय (एरवी पोषणाचे कार्य करणाऱ्या झाडाच्या भागांपासून अभिवृद्धी करता येणाऱ्या) पद्धतीने करता येते व निरनिराळ्या हवामानांत आणि काचघरात ती वाढू शकते. आनुवंशिकी, कोशिकाविज्ञान, रोगविज्ञान या बाबींवरही या वनस्पतींद्वारा पुष्कळ संशोधन झाले आहे. मक्याच्या खालोखाल सर्वांत जास्त संशोधन या वनस्पतीवर झाले असे महणतात.

करंट टोमॅटो : (लहान आकारमानाचा टोमॅटो लॅ. लायकोपर्सिकॉन पिम्पिनेलिफोलियम). मूळच्या पेरू-एक्वादोर भागातील या टोमॅटोच्या जातीचे लागवडीखालील टोमॅटोच्या जातींशी पुष्कळ साध्यर्म्य आहे. कारण दोन्ही जाती लायकोपर्सिकॉन वंशात मोडतात. या जातीचे खोड बारीक असून फळे लहान (१ ते १·५ सेंमी. व्यासाची), गोल, चकचकीत लाल अगर नारिंगी लाल, लोंबणाऱ्या फलविन्यासांत (घडांत) सर्वसाधारणपणे १० ते ४० (कधीकधी १५० पर्यंत) असतात. फळे खाद्य असून करंटच्या फळांसारखी दिसतात म्हणून या जातीला करंट टोमॅटो हे नाव आहे. ही लवकर तयार होणारी जात असून फळे काहीशी आंबट आणि क जीवनसत्त्वाने समृद्ध असतात. तसेच त्यांत ९% शर्करा असते. फळे पिकल्यावर त्यांना तडे जात नाहीत. लागवडीखालील टोमॅटोपेक्षा ही जात उष्ण हवामानाला आणि पुष्कळशा रोगांना प्रतिकारक आहे. या जातीच्या फळांत टोमॅटाइन नावाचे प्रतिजैव (अँटिबायॉटिक) असून ते त्वचा रोगांवर उपयोगी आहे. लागवडीखालील टोमॅटोच्या प्रकारांशी संकर करण्यासाठी या जातीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. पुसा रेड प्लम हा लागवडीखालील टोमॅटोचा प्रकार अशा प्रकारच्या संकारांपासून निर्माण करण्यात आला आहे.

ट्री टोमॅटो : (टोमॅटो फळाचे झाड लॅ. सायफोमँड्रा बीटेसी). मूळचे पेरू देशातील टोमॅटोच्याच कुलातील (सोलॅनेसी) ३ मी. उंच वाढणारे हे झाड निलगिरी पर्वतात ८०० ते २,००० किमी. उंचीवरील प्रदेशात घरांच्या आसपास लावलेले आढळून येते. फळे अंडाकृती, गुळगुळीत असून झुबक्याने येतात. ती काहीशी आंबट असतात व मुरंबा करण्यासाठी त्यांचा वापर होतो.

संदर्भ : 

1. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.

2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. Vl, New Delhi, 1962.

3. I. C. A. R. Fruit Culture in India, New Delhi, 1963.

जोशी, रा. ना. पाटील, ह. चिं.

रुईकर, स. के. गोखले, वा. पु.