दोडका : (शिराळे हिं. जिंगा, तोरी गु. घिसोडा, तुरिया क. हिरेकाई सं.कोष्टकी इ. रिज्ड (रिब्ड) गोर्ड लॅ, लुफा अक्युटँग्यूला कुल-कुकर्बिटेसी). या परिचित वनस्पतीचे (वेलीचे) मूलस्थान भारत आहे.घोसाळे व दोडका या एकाच वंशातील (लुफा) असल्याने त्यांची अनेक शारीरिक लक्षणे समान आहेत [⟶ कुकर्बिटेसी]. पाने साधी, एकाआड एक, ५–७ खंडांची पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे एकाच झाडावर पुं-पुष्पाचा फुलोरा, १०–२० फुलांची मंजरी स्त्री-पुष्प एकच व दोन्ही प्रकार पानांच्या बगलेत येतात. फळ साधारणपणे १५–३० सेंमी. लांब, देठाकडे निमुळते व शेंड्याकडे फुगीर (मुद्‌गलाकृती) असून त्यावर सूक्ष्म पंखाप्रमाणे दहा उभे व कडक कंगोरे (शिरा) असतात. (आकृतीकरिता ‘कुकर्बिटेसी’ ही नोंद पहावी). काही प्रकारांत ते नाममात्रच असतात. बिया चपट्या (१०–१२ मिमी.), लांबट, काळ्या असून मगज (गर) घोसाळ्याप्रमाणे उपयुक्त. कोवळ्या फळांची भाजी करतात. काही फळे कडू असतात. बी वांतिकारक, कडू व रेचक असते. कडू फळाचा प्रकार (अमारा) औषधी दृष्ट्या उपयुक्त असून त्यामध्ये ल्यूफिन नावाचे कटुद्रव्य असते. ते कावीळ, कफ, अतिसार, नेत्रदोष, कुष्ठ इत्यादींवर गुणकारी असते. दोडक्याच्या पानांचे पोटीस कुष्ठ, मुळव्याध व प्लीहादाह यांवर उपयोगी आहे.ताज्या पानांचा रस मुलांच्या डोळे येण्याच्या विकारावर वापरतात. जावामध्ये पानांचा काढा अनार्तव (विटाळ बंद होणे) व मूत्रविषरक्तता (मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा आल्यामुळे रक्तात यूरियाचे प्रमाण वाढून निर्माण झालेली अवस्था) यांवर देतात. बियांचे तेल व पेंड विषारी असते. पेंडीत नायट्रोजन व फॉस्फरस भरपूर असल्याने तिचा खतासारखा वापर करता येतो.

बिहारमध्ये सातपुतिया नावाचा प्रकार आढळतो. त्याला द्विलिंगी फुले येतात फळांचे घोस असतात. एकलिंग प्रकाराशी याचा संकर करून काढलेल्या प्रकारास पाचपट फळे येतात व तो उन्हाळ्यात पिकविता येतो. भारतीय कृषी संशोधन संस्थेने शिफारस केलेल्या पुसा नसदार नावाच्या प्रकाराला (एकलिंगी फुलांच्या नेहमीच्या प्रकारांपासून काढलेल्या) लवकर फुले येतात आणि तोही उन्हाळ्यात पिकविण्यास सोयीचा असतो.

क्षीरसागर, ब. ग. परांडेकर, शं. आ.

शेतात याची लागवड भाजीसाठी करतात. बिहार, बंगाल, तमिळनाडू या राज्यांत ही वेल जंगली अवस्थेत आढळते. मध्यम प्रकारच्या जमिनीत ३० सेंमी. व्यासाचे तितकेच खोल खड्डे ओळीत १·५ मी.वर खणून प्रत्येकी पाटीभर शेणखत घालून ४-५ बिया लावतात व लगेच पाणी देतात. हंगाम पावसाळी व उन्हाळी असतो. बी रुजल्यावर आळ्यात दोन जोमदार रोपे ठेवून बाकीची उपटतात. वेल आधारावर चढवितात. पाणी दर दहा दिवसांनी देतात. लागणीपासून सु. दीड महिन्याने फळे येऊ लागतात. ती पोसल्यावर भाजीसाठी कोवळीच काढण्याचे काम सु. सहा आठवड्यांपर्यंत चालते. पिकाचे आयुष्य सु. चार महिने असते. हेक्टरी ४,०००-५,००० किग्रॅ. फळे मिळतात.

या पिकावरील रोग व किडीकरिता ‘काकडी’ ही नोंद पहावी.

पाटील, ह. चिं.