नागवेली (पानवेल) : (अ) फुलोऱ्यासह वेलीचा भाग (आ) स्त्री-कणिश (इ) नर-कणिश (ई) फळाचा उभा छेद : (१) फलावरण, (२) बीजावरण, (३) परिपुष्क, (४) पुष्क, (५) गर्भ.

नागवेली : (नागवल्ली, पानवेल म., हिं., गु. पान क. यल्ली बळ्ळी सं. नागवल्ली, तांबूली इं. बीटल व्हाइन, बीटल पेप्पर लॅ. पायपर बीटल कुल-पायपरेसी). पिंपळी, मिरी व कबाबचिनी यांच्या वंशातील (पायपर) ही अनेक वर्षे जगणारी, सदापर्णी, नाजूक वेल श्रीलंका, भारत व मलेशिया या देशांत आढळते. ही मूळची जावातील असावी. आशियातील उष्ण व दमट भागांत खाद्य पानांकरिता हिची बरीच लागवड करतात. फार प्राचीन काळापासून जेवणानंतर मुखशुद्धीकरिता ⇨तांबूल (नागवेलीचे पान, कात, चुना, सुपारी, वेलची, लवंग, खोबरे, जायफळ, जायपत्री, खसखस, कंकोळ, केशर, बडीशेप इ. एकवीस पदार्थांच ‘त्रयोदशी गुणी’ विडा) खाण्याची जुनी परंपरा आहे. चरक, सुश्रुत, वात्स्यायन, कालिदास इत्यादींच्या अनेक संस्कृत ग्रंथांत तांबुलाचा उल्लेख आलेला आहे. हल्ली गुंजेची पाने, सोने अथवा चांदीचा वर्खही घालतात काही लोक त्याबरोबर तंबाखूही खातात. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू इ. ठिकाणी नागवेलीची लागवड केली जाते. या वेलीच्या शाखा पेऱ्यांजवळ फुगीर असून तेथे अनेक आगंतुक मुळे फुटतात व त्यांच्या साहाय्याने ही वेल आधारावर चढते पाने मध्यम आकाराची, साधी, ५–२०सेंमी. लांब, २–२·५सेंमी. लांब देठाची, तळाशी हृदयाकृती, अंडाकृती आयत व टोकदार असतात ती एकाआड एक, नरम, गुळगुळीत असून तळातून ५–७शिरा निघून टोकाकडे जुळतात. स्त्री-पुष्पे व नर-पुष्पे लहान, स्वतंत्र, लोंबत्या कणिश फुलोऱ्यावर अलग वेलीवर पण पानांसमोर (विरुद्ध बाजूस) येतात. लहान आठळी फळे एकबीजी व गोलसर असतात. बियांत पुष्क व परिपुष्क (वाढणाऱ्या गर्भाला पोषक द्रव्ये पुरविणारे भाग) असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨पायपरेसी कुलात (मिरी कुलात) वर्णिल्याप्रमाणे. पानांचा मुख्य उपयोग तांबुलाकरिता असल्याने त्याकरिता फक्त नर वेलीची लागवड विशेषेकरून करतात. पाने सुगंधी, पाचक, वायुनाशी व उत्तेजक असून पानांतील बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल जंतुनाशक असते. तहान शमविण्यासाठी व मस्तकातील रक्ताधिक्य कमी करण्यास पानांचा रस उपयुक्त असतो. डोके दुखत असल्यास व रातांधळेपणात पानांचा रस वापरतात. फळे मधाबरोबर कफ विकारांत देतात. पाने फुप्फुसाच्या विकारांतही गुणकारी असून गळू व सूज यांवर त्यांचे पोटीस बांधतात. अधिक पान खाणे हानिकारक असल्याचे आढळले आहे. काळ्या मिरीबरोबर नागवेलीच्या कोवळ्या मुळांचे चूर्ण घेतल्याने स्त्रियांना गर्भधारणा टाळणे शक्य असते.

वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.

नागवेलीचे पीक बारमाही आहे. ते फायदेशीर तितकेच अत्यंत कष्टाचे व खर्चाचे पीक आहे. या पिकाच्या लागवडीचे खास तंत्र असून मशागतीपासून बाजारात माल पाठविण्यापर्यंत प्रत्येक अवस्थेत विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते.

लागवडीचे क्षेत्र : या पिकाच्या लागवडीला भारताच्या द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील किनाऱ्याचा जंगलाचा भाग आणि आसामच्या टेकड्या यांतील नैसर्गिक परिस्थिती अनुकूल आहे परंतु प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत पिकाला पोषक अशी परिस्थिति कृत्रिम रीत्या निर्माण करून, वायव्येकडील भाग वगळता, भारताच्या बहुधा प्रत्येक राज्यात लहान लहान मळ्यांतून या पिकाची लागवड केली जाते. या पिकाखाली एकूण सु. २६,०००हे. क्षेत्र असून त्यातील ४,०००हे. क्षेत्र कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या तीन राज्यांत आहे. या खालोखाल महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांत या पिकाची लागवड होते. महाराष्ट्रात ठाणे, सातारा, पुणे, सांगली, जळगाव, कोल्हापूर, नागपूर आणि अमरावती हे पानाच्या लागवडीचे प्रमुख जिल्हे आहेत.

हवामान : उष्ण कटिबंधातील जंगलाच्या प्रदेशांतील हवामान (थंडगार सावली, दमट हवा आणि जमिनीत पुरेसा ओलावा) या पिकाला मानवते. पश्चिम घाटात समुद्रसपाटीच्या प्रदेशापासून ९००मी. उंचीपर्यंतच्या २२५ते ४७५सेंमी. पावसाच्या भागांत हे पीक चांगले येते. केरळ व उत्तर कारवार यांचा पश्चिम किनारा, महाराष्ट्रातील वसईचा पश्चिम किनाऱ्यावरील भाग आणि आसामच्या ईशान्य भागातील टेकड्यांच्या प्रदेशात हे पीक झाडांच्या सावलीत वा नारळ आणि सुपारीच्या बागांत कोणतीही खास व्यवस्था न करता घेतले जाते. इतरत्र मळ्यांत कृत्रिम रीतीने पोषक हवामान निर्माण करून हे पीक घेण्यात येते. फार उन्हाळा अगर कडाक्याची थंडी तसेच ऊन, रुक्ष अथवा फार थंड वारे या पिकाला मानवत नाहीत. यासाठी या भागांत वाऱ्याला प्रतिबंध करण्यासाठी पानमळ्याच्या चारी बाजूंना तुतीची झाडे लावून अथवा दगडाच्या किंवा मातीच्या भिंतीचे अगर बांबूचे कुंपण करून वर सावलीसाठी बांबू अथवा स्थानिक उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करून छत करतात. मात्र छतातून पुरेसा सूर्यप्रकाश आत जाईल, अशी व्यवस्था केली जाते.

जमीन : जांभा दगडापासून बनलेली लाल अथवा गाळाची अथवा पाण्याचा चांगला निचरा असलेली भारी जमीन या पिकाला चालते. मात्र अल्कधर्मी अथवा क्षारीय (अल्कलाइन) जमीन चालत नाही.

प्रकार : निरनिराळ्या राज्यांत नागवेलीचे निरनिराळे सु. ३५प्रकार लागवडीत आहेत. यांपैकी महाराष्ट्रात गंगेरी, कुऱ्हे, नाबकर, पांढरी, काळी, बांगला आणि कपुरी या प्रकारांची लागवड होते. गंगेरी व पांढरी हे प्रकार सांगली व इस्लामपूर भागात लागवडीत आहेत आणि नाबकर हा प्रकार ठाणे जिल्ह्याच्या वसई भागात आहे. नागपूर व रामटेक भागांत काळी आणि पुणे भागात काळी व कुऱ्हे हे दोन प्रकार लागवडीत आहेत. काळी प्रकाराची पाने जाड आणि काळ्या रंगाची असून कुऱ्हे प्रकारातील पाने नाजूक असतात. नाबकरची पाने लांब व टोकाकडे निमुळती असतात. गंगेरी प्रकाराची पाने काळपट हिरवी व खाण्यास चवदार असतात. बांगलाची पाने जाड व तिखट आणि कपुरीची पाने मध्यम जाड व तिखट असतात.

जमिनीची मशागत : आसाम आणि केरळ भागांत नागवेली सुपारीच्या अगर माडाच्या (नारळाच्या) झाडांवर चढवितात. यामुळे त्या भागात नागवेलीसाठी खास मशागतीची जरूरी नसते. ६०ते १२०सेंमी. व्यासाचे आणि ३०ते ६०सेंमी. खोल असे खड्डे आधाराच्या झाडाच्या बुंध्यापाशी खणून कुजलेला पालापाचोळा आणि राख मातीत मिसळून खड्डा भरून काढतात. इतरत्र म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम, महाराष्ट्र इ. भागांत जमिनीच्या पूर्व मशागतीची जरूरी असते. जमीन १८–२०सेंमी. खोल नांगरून ढेकळे फोडून २-३कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करतात. तणे वेचून फळी फिरवून दाबून घेतात.

वाफ्यांची आखणी : जून महिन्यात लागवडीसाठी जमिनीची आखणी करतात. निरनिराळ्या राज्यांत पानमळ्याच्या आखणीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. वाफ्यांत पाटाचे पाणी योग्य रीतीने खेळविणे आणि नंतर ते पाणी शेताबाहेर काढून लावणे हा सर्व प्रकारच्या आखणीमागील मुख्य हेतू असतो. महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि अहमदनगर भागांत १००चौ. मी. जागेत ३मी. लांब व १·६मी. रुंद असे सहा आडवे वाफे व त्यांच्या वरील अंगास त्याच मापाचे उभे १२ वाफे मिळून १८वाफ्यांचा एक चिरा होतो. पानमळ्याचे क्षेत्र चिऱ्यांत सांगण्याची पद्धत आहे. वसई भागात वाफ्याला हराळ म्हणतात. प्रत्येक हराळची लांबी ३ मी., रुंदी १५ सेंमी. व खोली १५ सेंमी. असते. एक हेक्टर क्षेत्रात २०० हराळ असतात.

आधारासाठी झाडांची लागवड : पावसाळ्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्रावर शेवरी व पांगाऱ्याच्या बिया वाफ्याच्या लांबीच्या बाजूला एकाआड एक याप्रमाणे लावतात. शेवरी लवकर उगवून येते आणि वाढते. पांगाऱ्याची झाडे शेवरीप्रमाणे जलद गतीने वाढत नाहीत. लागण केलेल्या वेलींना पहिली दोन वर्षे शेवरीचा आधार मिळतो व तिसऱ्या वर्षापासून पांगाऱ्याचा कायमचा आधार मिळतो. पानमळ्यात जागोजागी केळीही लावतात. त्यापासून उत्पन्न मिळते व त्यांच्या सोपटाचा उपयोग पानांचे डाग बांधण्यासाठी होतो.

नागवेलीची लागवड : ऑगस्ट महिन्यात लागवड करण्यासाठी जुन्या, निरोगी, रसरशीत व जोमदार नर वेलींच्या शेंड्यांच्या बाजूचे ४५सेंमी. लांबीचे ४–६पाने व वर्धनबिंदू (डोळे) शाबूत असलेले तुकडे बेण्यासाठी काढतात. एका हेक्टरला सु. ३७,०००तुकडे लागतात. शेवरीच्या बुंध्यापाशी लहान खड्डे खणून त्यांत माती व शेणखत यांचे मिश्रण घालून खड्डे पुन्हा भरतात. पानवेलीचे बेणे शेंडा वर करून खड्‌ड्यात बसवितात. वर माती घालून ती चांगली दाबून बसवितात. दोन बेण्यांतील अंतर ३० सेंमी. ठेवतात. बेणे लावल्यावर प्रथम बेण्याच्या शेंड्यावर झारीने पाणी देतात व नंतर वाफ्यात पाणी देतात. पाण्याच्या पहिल्या तीन पाळ्या दररोज व नंतरच्या सात पाळ्या एक दिवसाआड देतात.१५ दिवसांत बेणे रुजून वेलीची वाढ सुरू होते. वेली जसजशा वाढतील तसतशा त्या शेवरीच्या खोडावर दर १५ सेंमी. अंतरावर लव्हाळ्याने सैलसे बांधतात.


खत : जमिनीच्या मशागतीच्या वेळी शेणखत, लेंडीखत, तलावातील गाळ, पेंड, मासळीचे खत इ. खते देण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे वेली उतरविताना वरीलपैकी एक अगर जास्त खते देतात. शक्य असल्यास दर वर्षी तांबूस रंगाची तलावातील माती (गाळ) वाफ्यांत घालतात. वरखते देण्याची सहसा पद्धत नाही.

वेलींची उतरण : वेली ३मी. उंच वाढल्यावर त्यांच्यातील जोम कमी होतो व शिवाय त्यांची पाने खुडणे कष्टाचे होते. यासाठी वेली उंच वाढल्यावर उतरविण्यात येतात. पश्चिम महाराष्ट्रात दर वर्षी ही उतरण मार्च-एप्रिलमध्ये करतात व विदर्भात ऑक्टोबरमध्ये करतात. त्या वेळी शेंड्याची पाने वगळून वेलीवरील सर्व पाने काढून घेतात. नंतर आधारापासून वेली मोकळ्या करून त्यांची गुंडाळी करतात व बुंध्याजवळच खड्डा करून त्यात खत घालून ती गुंडाळी शेंडा वर ठेवून पुरतात. बाजूची माती दाबून घट्ट करतात व पाणी देतात. उतरणीनंतर वेलीची वाढ जोमात होते. लागणीनंतर पहिल्या वर्षी एकदा आणि दुसऱ्या व तिसऱ्या वर्षात एकदा अगर दोनदा वेलींची उतरण करतात.

इतर निगा : कडाक्याच्या थंडीमध्ये पानमळ्यांत गोवऱ्या किंवा गवताच्या राशी धुमसत ठेवून तापमान कायम राखण्यात येते.

कीड : नागवेलीवर डिस्फिंक्टस वंशातील ढेकण्या (टिबा, मेरू) ही एक महत्त्वाची कीड आहे. ती कोवळ्या पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पानावर शिरांच्यामध्ये रस शोषिल्या गेलेल्या जागी काळे डाग पडतात आणि त्याचा पानांच्या प्रतवारीवर प्रतिकूल परिणाम होतो. याकरिता वेलींवर पायरेथ्रमयुक्त कीटकनाशक फवारतात. कधीकधी पिठ्या आणि मावा यांचाही प्रादुर्भाव वेलीवर आढळतो.

रोग : मर, भुरी व पानांवरील ठिपके हे रोग व मुळांवरील गाठी हा सूत्रकृमिजन्य रोग वेलींना अपाय करतात.

मर : (पदगलन). हा फायटोप्थोरा पॅरासिटिका या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. याने पानवेलींचे अतिशय नुकसान होते. काही वेळा स्क्लेरोशियम रोल्फसाय या कवकाचाही प्रादुर्भाव या रोगामध्ये आढळतो. या रोगामुळे पानवेलीच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये वेली एकाएकी कोमेजून वाळू लागतात व शेंड्याजवळची पाने गळतात कालांतराने वेली पिवळ्या पडून मरून जातात. मुळे व जमिनीखालील खोडाचा भाग कुजतो पानेसुद्धा कुजलेली आढळतात. रोगोत्पादक कवक मातीत राहिल्यामुळे रोगप्रसार जमिनीमधून बीजुकाद्वारे होतो. रोगप्रतिबंधासाठी लागणीपूर्वी बेणे २ : २ : ५० बोर्डो मिश्रणात बुडवून लावतात. तसेच २ : २ : ५० बोर्डो मिश्रण किंवा ताम्रयुक्त कवकनाशक वेलींच्या रांगांमधील जमिनीत टाकतात. जरूरीनुसार त्याचा उपयोग दर महिन्यास करतात. रोगट वेल उपटून नष्ट करतात.

भुरी : हा रोग ओइडियम पायपेरिस या कवकामुळे होतो. रोगामुळे पानावर राखी रंगाचे चट्टे दोन्ही बाजूंवर आढळतात. त्यामुळे पाने पिवळी पडून गळून पडतात. रोग प्रतिबंधासाठी ३०० मेशची गंधक भुकटी पिकावर पिस्कारतात.

मुळांवरील गाठी : हा रोग सूत्रकृमीमुळे होत असून त्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळला आहे. रोगामुळे वेली पिवळ्या पडून वाळू लागतात. यावर उपाय म्हणून पिकाखालील जमिनीला सूत्रकृमिनाशकाची धुरी देतात.

वरील रोगांव्यतिरिक्त नागवेलीवर पानांवरील ठिपक्यांचा रोग काही ठिकाणी आढळतो. त्यावर बोर्डो मिश्रण फवारल्यास रोगाला आळा बसतो. पिकावर कवकनाशके फवारली असता फवारल्यापासून कमीत कमी १५ से २०दिवसांपर्यंत वेलींवरील पानांचा खाण्यासाठी उपयोग करीत नाहीत किंवा वापरण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घेतात.

तोडणी व उत्पन्न : सर्वसाधारणपणे पानमळ्यांचे आयुष्य तीन वर्षे असते. महाराष्ट्रातील वसई भागात ते २-३वर्षे आणि इतर भागांत ६–१०वर्ष असते. कर्नाटकात हंगामी आणि कायम स्वरूपाचे असे दोन प्रकारचे पानमळे असतात. हंगामी मळ्यांचे आयुष्य ३-४वर्षे व कायम मळ्यांचे आयुष्य ५० वर्षांपेक्षाही जास्त असते. तमिळनाडू, महाराष्ट्रातील वसई भाग, केरळ आणि आंध्र प्रदेशात लागणीनंतर ६महिन्यांनी पानांच्या तोडणीला सुरुवात होते. इतर भागात ती १–३वर्षांनी सुरू होते. प्रत्येक वेलीची वर्षातून ३ते ५वेळा तोडणी केली जाते. तोडणीचे दोन प्रकार प्रचलित आहेत. एका प्रकारात वेलीवरील कोवळी पाने वगळून बाकीची सर्व पाने तोडण्यात येतात. दुसऱ्या पद्धतीत प्रत्येक वेलीची एका वेळी फक्त २ते ३पाने तोडतात. पहिल्या पद्धतीत पानांचे उत्पन्न जास्त येते परंतु वेली कमजोर होतात  आणि त्यांचे आयुष्य कमी होते. पानांच्या दर हेक्टरी उत्पन्नाच्या बाबतीत निरनिराळ्या भागांत बरीच तफावत आढळून येते. सर्वसाधारणपणे पानवेलीचे उत्पन्न पहिल्या वर्षात कमी असते व ते वाढत जाऊन वेलीच्या आयुष्याच्या मध्याच्या सुमारास ते सर्वांत जास्त असते व त्यानंतर कमी होत जाते. पश्चिम बंगालमध्ये दर वर्षी दर हेक्टरी दोन कोटी पाने मिळतात. महाराष्ट्रातील वसई भागात पहिल्या वर्षी दर हेक्टरी ३७लाख पाने मिळतात आणि दुसऱ्या वर्षी दीड कोटी पाने मिळतात. आसाम, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र व केरळ भागात दर हेक्टरी दर वर्षी ७५लाखांपासून १·८कोटी पाने मिळतात. पश्चिम महाराष्ट्रात पानांचा हिशेब कुडतानांत करतात (एक कुडतान =१८,४५० पाने).

धांडे, गो. वा. रुईकर, स. के. गोखले, वा. पु.

प्रतवारी : पानांची प्रतवारी भिन्न ठिकाणी भिन्न प्रकारे लावली जाते. वेलीवरील त्यांचे स्थान, कमीजास्त पक्वता व लागवडीचे स्थान यांना महत्त्व दिले जाते. दख्खनमध्ये वेलीच्या बाजूच्या फांद्यांवरील पाने उत्तम मानतात व त्यांना ‘हातवण’ म्हणतात प्रमुख खोडाच्या पेऱ्यावरील पाने मध्यम प्रकारची असून त्यांना ‘अंगवण’ म्हणतात. काही ठिकाणी मोठ्या पानांना ‘बाबला’, मध्यम आकाराच्या पानांना ‘अडके’ आणि लहानांना ‘मोडवण’ म्हणण्याचा प्रघात आहे. मध्य प्रदेशात मोठ्या पानांना ‘बडे पान’ आणि लहानांना ‘खिट्टी’, किंवा ‘नटवन’ म्हणतात. पानांच्या रंग व पक्कतेप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागांत कोवळ्या पानांना ‘नवती’, त्यानंतरच्या तोडीस ‘परती’ व शेवटी काढलेल्यांना ‘तेर्ती’ म्हणतात. वेलीवरच दीर्घकाळ राखलेल्या पानांना ‘जुनवान’ म्हणतात, त्यांना जास्त भाव येतो. उत्तर प्रदेशात उत्पादनाच्या प्रदेशावर आधारलेले पानांचे पुढील प्रकार ओळखले जातात : ‘देशी’ (स्थानिक), ‘मघई’ (बिहार), ‘बांगला’ (पं. बंगाल), ‘जगन्नाथी’ (ओरिसा) व ‘कपुरी’ (तमिळनाडू). आंध्र प्रदेशात पहिल्या प्रतीच्या पानांना ‘कळ्ळी’, दुसऱ्या प्रतीस ‘पापडा’ व मध्यम प्रतीस ‘कळगोठा’ म्हणतात. ‘कळ्‌ळी’ प्रकार बाजूच्या फांद्यांवरील पानांचा असून त्यांचा मुख्यतः उपयोग स्थानिक असतो पापडा प्रकारची मोठी पाने निर्यात करतात. सालेम जिल्ह्यात (तमिळनाडू) ‘मार’ पाने कोवळी व बाजूकडील असून ‘चक्कई’ प्रकार मुख्य खोडावरील जून पानांचा असतो. याशिवाय उत्पादनाच्या प्रदेशावरून वा अन्य कारणाने रामटेकी, बनारसी, सांची, कपुरी, मालवी, मंगेरी इ. प्रकारांची नावेही प्रचलित आहेत.


बांधणी, वाहतूक व निर्यात : पानमळ्यांतून पाने जमविल्यानंतर ती चांगल्या प्रकारे एकत्र जुळवून आणि बांधून बाहेर पाठविण्यास सोयीचे व्हावे व ती टिकून राहावीत म्हणून विशिष्ट प्रकारे त्यांच्या जुड्या (कवळ्या) करून नंतर त्यांचे गठ्ठे बनवितात. चिंगलपेटमध्ये एका कवळीत शंभर पाने, तर कोईमतूरमध्ये दोनशे पानांची एक कवळी बांधून दहा कवळ्यांची एक ‘पालगाइ’ (गठ्ठा) करतात. आंध्र प्रदेशात व महाराष्ट्रात साधारणपणे पानांचे आकारमान लहान असल्यास सहा हजार आणि मोठी असल्यास तीन हजार पानांचा गठ्ठा बांधतात. केरळात शंभर पानांच्या कवळ्या (आकारमान व कोवळेपणा लक्षात घेऊन) लहान रुंद परड्यांत खालीवर केळीच्या पानांत गुंडाळून एकत्र बांधतात. मध्य प्रदेशात शंभर पानांच्या कवळ्या बांबूच्या विशिष्ट प्रकारच्या टोपल्यांमध्ये वर्तुळाकार रचतात एकावर एक अशी अनेक मंडले बाहेरून व मधून मधून पळसाची पाने घालून बांधतात. त्यामुळे ती पाने न सुकता वाहनांतून पाठविता येतात. पॉलिथिलिनाच्या पिशव्या अधिक संरक्षण देतात असा अनुभव आहे. १९६६-६७ सालात परदेशी केलेल्या निर्यातीची आकडेवारी खाली दिली आहे.

नागवेलीच्या पानांची निर्यात १९६६-६७ (हजार कि.ग्रॅ. मध्ये). 

देश  

निर्यात 

एडन 

३·१ 

कुवेत 

३·० 

केन्या 

१३·५ 

नेपाळ 

१०·८ 

बांगला देश 

१·२ 

बहरीन बेटे 

२·४ 

ब्रिटन 

६·६ 

इतर 

१२·० 

एकूण 

५२·६ 

रासायनिक संघटन : नागवेलीच्या (ताज्या) पानात पुढील द्रव्ये आढळतात : जलांश ८५·४%,प्रथिन ३·१%, मेद (स्निग्ध पदार्थ) ०·८%, कार्बोहायड्रेटे ६·१%, तंतू २·३%, आणि खनिजे २·३%[कॅल्शियम २३०मिग्रॅ., फॉस्फरस ४०मिग्रॅ., लोह ७ मिग्रॅ., आयनीकरणशील (विद्युत्‌ भारित अणू वा रेणूत रूपांतरित होऊ शकणारे) लोह ३·५ मिग्रॅ.], कॅरोटीन (अ जीवनसत्त्व ९,६०० आं. ए. (आंतरराष्ट्रीय एकक), थायामीन ७० म्यूग्रॅ. (१ म्यूग्रॅ. = १० ग्रॅ.), रिबोफ्लावीन ३० म्यूग्रॅ., निकोटिनिक अम्ल ०·७ मिग्रॅ., क जीवनसत्त्व ५मिग्रॅ. आणि आयोडीन ३·४म्यूग्रॅ./१००ग्रॅ. पानांतील बाष्पनशील तेल व शर्करा यांच्या प्रमाणावरून त्यांचे खाण्याच्या दृष्टीने महत्त्व ठरते. सूर्यफुलाप्रमाणे पिवळट रंगाचे, नरम, नाजूक व चकचकीत, पक्व (विरंजित) पान खाण्यास चांगले त्यात अधिक तेल, अम्लता व क्षपणकारक [→ क्षपण] शर्कराअसून स्टार्च, डायास्टेज व अक्षपणकारक शर्करा कमी असतात. भिन्न ठिकाणातील पानांची रुची आणि वास भिन्न असल्याचे आढळले आहे त्याचे कारण त्यातील तेलांश होय. ‘सांची’ प्रकारची पाने फारच तिखट असतात, तर तमिळनाडूतील पाने सौम्य आणि गोडसर असतात. पूर्ण पक्व पानांत तेलांश अधिक असतो. भारतातील पानांतील तेलाचे प्रमाण ०·७-२·६%  असते. वेगळ्या केलेल्या तेलाचा रंग भडक पिवळा ते गर्द पिंगट असतो. ते सुगंधी व तिखट असते. तेल, तूप व चरबीत पाने टाकून उकळल्यास त्यांतील खवटपणा जातो. भुईमूग तेल, मोहरी तेल, तिळेल, खोबरेल व करडई तेल यांमध्ये पाने ठेवून दिल्यास तेले सुस्थितीत राहतात.

परांडेकर, शं. आ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969.

           2. Govt. of India, Ministry of Food and Agriculture, Betelvine Cultivation in India, New Delhi.

           3. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.

          ४. आरकेरी, एच्‌. आर्‌. अनु. पाटील, ह. चिं. पिकांच्या उत्पादनाची तत्त्वे आणि प्रघात, मुंबई,१९५९.

          ५. काणे, व. स. फडके, श्री. यं., संपा. बृहन्महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल डिरेक्टरी, प्रथम खंड, पुणे,१९५४.

          ६. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर,१९७४.