पॅरा गवत: (लॅ. ब्रॅकिॲरिया म्युटिका, पॅनिकम म्युटिकम, पॅ. पुर्पुरॅसेन्स कुल-ग्रॅमिनी). हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत मूळचे ब्राझीलच्या पॅरा प्रांतामधील असल्यामुळे त्याला ‘पॅरा गवत’ म्हणतात. ते दिसावयास भरभरीत असून जमिनीवर वाढणाऱ्या धावत्या खोडापासून याची वाढ झपाट्याने होते. खोडावरील पेरांपासून मुळे आणि २ मी. अथवा जास्त उंचीची सरळ वाढणारी पर्णयुक्त संधिक्षोडे (खोडे) निघतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ग्रॅमिनी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. हे गवत गुरे फार आवडीने खातात.

दमट उष्ण हवामानातील पाणथळ जागी ते चांगले वाढते. १८९४ साली श्रीलंकेतून ते भारतात आणले गेले आणि पुणे येथील सरकारी प्रायोगिक कृषिक्षेत्रात लावण्यात आले. महाराष्ट्र, केरळ व कर्नाटकमधील खोलगट पाणथळ जमिनीत त्याची लागवड वाढत आहे.

खोलगट भागातील सुपीक जमीन या पिकाला चांगली असते. खारामुळे अगर दलदल बनल्यामुळे इतर पिकांस निरुपयोगी बनलेल्या जमिनीत हे पीक चांगले येते. ४-५ वर्षे हे पीक घेतल्यानंतर ती जमीन सुधारून इतर पिके घेण्यालायक बनते.

फेब्रुवारी-मार्चमध्ये जमीन नांगरून, कुळवून हेक्टरी ३५ ते ४५ टन शेणखत घालून तयार करतात व तिच्यामध्ये मे-जूनमध्ये मुळ्या फुटलेल्या, ३-४ डोळे असलेल्या, २५–३०सेंमी. लांबीच्या या गवताच्या खोडाच्या कांड्या १ मी.× १ मी. हमचौरस अंतरावर ओळीत जमिनीत खोचून लावतात. हेक्टरी दहा ते बारा हजार कांड्या लागतात. दलदलीच्या जमिनीत मशागत न करताच लागण करतात. जमिनीत खोचलेल्या कांड्यांच्या प्रत्येक पर्वातून (पेऱ्यातून) मुळ्या फुटून गवत वाढीला लागते. कांड्या लावल्याबरोबर पाणी देतात. १०० सेंमी. पेक्षा कमी नसलेल्या पर्जन्यमानाच्या भागात गवत चांगले वाढते पण पाऊस नसेल तेव्हा ५-६ दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे लागते. हेक्टरी १७० किग्रॅ. अमोनियम सल्फेट दिल्यास हेक्टरी ९२,००० किग्रॅ.पर्यंत हिरवा चारा मिळतो.

हे पीक पसरून जमीन झाकून टाकते. त्यामुळे त्याच्यात तण वाढत नाही. पाणी दिल्याने जमीन कडक झाल्यास पिकाच्या दोन ओळींमधील जमीन हलक्या नांगराने फोडून मोकळी केल्यास पिकाची वाढ चांगली होते. एकदा लागण केलेले पीक ७-८ वर्षे ठेवतात.

लागवडीपासून साधारणत: अडीच-तीन महिन्यांत ते १–१·२५ मी. उंच वाढल्यावर पहिली कापणी करतात. नंतर पुढे पाण्याचा भरपूर पुरवठा झाल्यावर ते झपाट्याने वाढीस लागून सर्व जमीन झाकून टाकते. पुढे महिन्याला एक याप्रमाणे कापणी करतात. त्यामुळे गवताची प्रत चांगली राहते.

मुंबईशेजारील आरे गवळीवाड्यामध्ये सु. २०० हे. दलदलीच्या जमिनीत हे पीक घेतले आहे. तेथील १६-१७ हजार दुभत्या जनावरांचे गोठे धुण्याकरिता वापरलेले पाणी याच क्षेत्रात सोडलेले आहे. त्यामुळे हेक्टरी २५० टनांपर्यंत हिरवे गवत वर्षाला मिळते. मैलापाण्याचे खत वापरल्याने बंगलोर आणि दिल्ली येथे हेक्टरी १२८ टन हिरवे गवत वर्षाला मिळालेले आहे. पुरेसे खत आणि पाणी दिल्याने वर्षाला हेक्टरी ९८ टनांपेक्षा जास्त उत्पन्न सर्वसाधारणपणे मिळते. कीटक आणि रोग यांचा या पिकाला उपद्रव नसतो. वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हे गवत जनावरे आवडीने खातात. त्यातील प्रथिनांचे प्रमाण आणि पोषणमूल्ये ही गिनी गवत आणि नेपिअर गवतापेक्षा काहीशी कमी आहेत.

महाराष्ट्रात बऱ्याच जागी दलदलीचे व दमट हवामानाचे क्षेत्र आहे तेथे हे गवत लावल्यास पौष्टिक हिरवी वैरण जनावरांना मिळेल व नापीक जमीन उपयोगात आणता येईल.

पहा : गवते वैरण.

चव्हाण, ई. गो.