पर्सिमन : (हिं. हलवा तेंदू इं. काकी पर्सिमन, जॅपनीज पर्सिमन लॅ. डायोस्पिरॉस काकी कुल-एबेनेसी). याचे मूलस्थान भारताचा ईशान्य भाग आहे. चीन आणि जपानमध्ये या फळझाडाची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळून येते व तेथे त्याला काकी असे नाव आहे. इतर काही देशांत त्याची थोड्याफार प्रमाणात लागवड आहे. भारतात त्याची लागवड कलकत्ता, सहारनपूर, कुन्नूर, बंगलोर आणि इतर काही ठिकाणी होते. हिमालयात ९००–१,५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात याची वाढ होते.

पर्सिमनचे प्रकार : (अ) फुयू (आ) हचिया १२–१५ मी. उंच वाढणारा व सु. १ मी. घेराचा हा पानझडी वृक्ष आहे. पाने व्यस्त अंडाकृती अथवा दीर्घवृत्ताकृती, खालील बाजूला लोमश (लवदार) आणि वरच्या बाजूला गुळगुळीत व चकाकणारी असतात. फुले पिवळसर पांढरी. स्त्री-व पुं-पुष्पे बहुतांशी निरनिराळ्या झाडांवर असतात परंतु ही दोन्ही प्रकारची पुष्पे एकाच झाडावरही आढळून येतात. फळे आकर्षक व सु. ७·५ सेंमी. व्यासाची, गोलाकार चपटी अथवा लांबट व काहीशी निमुळती असतात. त्यांची साल पातळ. गुळगुळीत व नारिंगी पिवळी ते तांबूस असून मगज (गर) नारिंगी रंगाचा असतो. बी दीर्घवर्तुळाकार असते.

प्रकार : फुयू, हचिया आणि ह्याकूमे या प्रकारांची भारतात लागवडीसाठी शिफारस करण्यात येते. याशिवाय दाई-दाई-मारू व तनेनाशी या प्रकारांची लागवड निलगिरी पर्वतात  कुन्नूर येथे यशस्वी झाली आहे. डा. काकीचे जपानमध्ये ८०० आणि चीनमध्ये २,००० प्रकार आहेत.

पर्सिमन हे उपोष्ण कटिबंधातील झाड असल्यामुळे त्याला सौम्य हवामान लागते परंतु चीनमध्ये ते–१८° से. पर्यंतचे तापमानही सहन करते. या झाडाला कोणतीही चांगल्या निचऱ्‍याची खोल जमीन चालते. लागणीनंतर काही दिवस पाणी देण्याची सोय करावी लागते. मागाहून ते पावसाच्या पाण्यावर वाढते.

झाडाची अभिवृद्धी बियांपासून अथवा डोळे भरून व इतर प्रकारांनी तयार केलेल्या कलमांपासून करतात. पावसाळ्यात ६·५ ते ७·५ मी. अंतरावर लावतात. लावताना त्यांचे शेंडे ६०–९० सेंमी. उंचीवर छाटतात. नंतर फुटलेल्या फांद्यांपैकी जोमदार अशा ४-५ फांद्या ठेवून बाकीच्या कापतात म्हणजे झाड डेरेदार आणि ठेंगणे राहते.  

बहुतेक प्रकारांची फळे तुरट असतात आणि ती पूर्ण पिकल्यावरच चवदार होतात.फळांची काढणी करताना ती पूर्णपणे तयार झालेली, परंतु कडक असतानाच संदल मंडल व देठाचा थोडासा भाग ठेवून तोडतात आणि विशेष पद्धतीने पिकवून बाजारात विकतात. फळे पिकविण्यासाठी सोपी पद्धत भारतात शोधून काढण्यात आली आहे. केळी, टोमॅटो अशांसारख्या पिकणाऱ्‍या फळांबरोबर पार्सिमनची कडक फळे बंद डब्यांत ३-४ दिवस ठेवतात. फळे पिकविण्याचा त्रास वाचविण्यासाठी तुरटपणा नसलेल्या प्रकारांची लागवड करणे जास्त चांगले. फुयू हा अशा प्रकारचा प्रकार आहे आणि अमेरिकेत त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दर झाडामागे २५–३० किग्रॅ. फळे मिळतात.

चौधरी, रा. मो.