बीज : (बी). प्रस्तुत नोंदीत प्रथमतः बीजाचे वनस्पतिवैज्ञानिक वर्णन दिलेले असून नंतर कृषिविज्ञानाच्या दृष्टीने बीजगुणन व वितरण व्यवस्था यांसंबंधीची माहिती दिलेली आहे. 

वनस्पतिवैज्ञानिक वर्णन 

वनस्पतींचे ‘बीजी’ व ‘अबीजी’ असे दोन विभाग ज्या एका महत्त्वाच्या, प्रमुख आणि जटिल (गुंतागुंतीच्या) प्रजोत्पादक इंद्रियामुळे ओळखले जातात, त्यास ‘बीज’ म्हणतात. बीजधारी (बीजी) वनस्पतींत आढळणाऱ्या बीजकांमध्ये [बीजपूर्व अवस्थेत ⟶ फूल] लैंगिक प्रकारे गर्भधारणा (फलन) झाल्यावर बीजकाचे रूपांतर बीजामध्ये होते व कमीअधिक विश्रांतिकालानंतर बीज रुजून [⟶ अंकुरण] त्यापासून नवीन वनस्पती निर्माण होते [⟶ प्रजोत्पादन]. कृषीमध्ये सामान्य भाषेत पेरणीकरिता वापरल्या जाणाऱ्या बियांखेरीज इतर कोणत्याही भागालाही‘बी’ अथवा ‘बियाणे’ (बेणे) असे म्हणतात उदा., कलमे, उसाची कांडी, बटाट्याचे तुकडे, बीटच्या परिदलाचे [⟶ फूल] झुबके इ. तथापि ती खऱ्या अर्थाने बीजे नव्हेत. अनेक वर्षे बीजाखेरीज इतर भागांपासून लागवडीत असलेल्या कित्येक वनस्पतींची बीजे वंध्य असतात (उदा., केळ, गुलाब इ.), तरीही ती शास्त्रीय दृष्ट्या बीजेच होत. काही प्राचीन (पुराजीव महाकल्पातील, म्हणजे सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) वनस्पतींच्या [उदा., मिथाडेस्मिया, लेपिडोकार्‌पॉन,⇨ लेपिडोडेंड्रेलीझ] जीवाश्मांत (शिळारूप अवशेषांत) बीजकांसारखी पण ज्यांत गर्भाची वाढ झालेली नाही अशी इंद्रिये (गुरुबीजुककोश) आढळतात परंतु पुराजीव महाकल्पाच्या मध्यापासून पुढे मध्यजीव महाकल्पात (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) आढळणारे ⇨ बीजी नेचे व मध्यजीव महाकल्पाच्या पूर्वार्धातच आढळणारे ⇨ बेनेटाइटेलिझ ह्यांमध्ये फलनक्षम व अनावृत (प्रकट, नग्‍न) बीजे होती यावरून पृथ्वीवर बीजनिर्मितीची सुरुवात पूर्व कार्‌बॉनिफेरस कल्पापासून (सु. ३५ कोटी वर्षांपूर्वीपासून) झाली असावी.

बीज किंजदलाने वेढलेले असल्यास त्या वनस्पतींना ‘आवृतबीजी’ म्हणजे फुलझाडे [⟶वनस्पति, आवृतबीज उपविभाग] व ते किंजदलावर उघडेच असल्यास ते धारण करणाऱ्या वनस्पतींना ‘प्रकटबीजी’ [⟶वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] म्हणतात (उदा., देवदार सायकस, पाइन, थुजा, जूनिपर इ.). आवृतबीजींच्या बिया फळात, परंतु प्रकटबीजींत त्या उघड्यावरच असतात. पूर्ण पक्व बीज हवेइतके सुके असून त्यातील जीव ⇨ प्रसुप्तावस्थेत (निष्क्रिय) असतो व अनुकूल परिस्थितीत त्यातील जीवन क्रियाशील बनते. निसर्गतः बीज हे जनक वपस्पतीला व तिच्या गर्भाला प्रतिकूल परिस्थितीतून यशस्वी रीतीने पार पडण्यास उपयुक्त असून ते वनस्पतींच्या प्रसाराचे (काल व अवकाश यांत) फार महत्त्वाचे साधन आहे. त्यातील अन्नसाठा नवीन वनस्पतीच्या वाढीस प्रारंभी उपयुक्त असून सर्व मनुष्यमात्रास व कित्येक प्राण्यांस अन्न म्हणून त्याचा उपयोग होतो. पिकांच्या बाबतीत दरवर्षी नवीन पीक काढण्यास बीज हे उत्कृष्ट साधन आहे. वनस्पतींच्या ⇨ क्रमविकासात (उत्क्रांतीत) बीजी वपस्पतींच्या भूमीवरच्या स्पर्धेतील यशाचे श्रेय बव्हंशी बीजालाच द्यावे लागेल. बीजी वनस्पतींच्या जीवनात बीजाला एक नवीन पिढीच समजतात.

आकारमान व आयुर्मान : बिगोनिया ऑर्किडे (आमरे) यांची बीजे इतकी लहान व हलकी असतात की, धुळीच्या कणांप्रमाणे ती विखुरली जातात याउलट जहरी नारळाच्या बिया वजनाने सु. ७ किग्रॅ. (फळाचा घेर १.२ मी. व वजन सु. ११.५ किग्रॅ.,) असतात [⟶नारळ, जहरी]. या कक्षेत सामान्यतः इतर बियांचे विविध आकारमान आढळते. रंग व स्वरूप या बाबतींतही बरीच विविधता असते.

आयुर्मान:(अंकुरणक्षमता). निरनिराळ्या जातींच्या बियांच्या अंकुरणक्षमतेत भिन्नता आढळते. वनस्पतिसंग्रहालयात सुकवून ठेवलेल्या शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) वनस्पतींच्या सु. शंभर वर्षांपूर्वीच्या [⟶ लेग्युमिनोजी] काही बिया आज रुजतात, असे आढळले आहे. मांचुरियातील प्राचीन पीट दलदलीतून काढलेल्या कमळाच्या एका जातीच्या [निलंबो न्युसीफेरा⟶ कमळ] सु. एक हजार वर्षांपूर्वीच्या बिया रुजून नवीन वनस्पती वाढल्याचा पुरावा उपलब्ध आहे. याउलट ⇨ वाळूंज व ⇨ पॉप्‍लर [⟶ बहान] यांच्या बिया काही आठवड्यांपेक्षा जास्त टिकत नाहीत. आंबा, वेलची, अंबुटी यांच्या बियांची अंकुरणक्षमता थोड्या मुदतीपर्यंत टिकणारी असते. कांद्याचे बी सर्वसाधारण योग्य स्थितीत साठवूनही त्यांची अंकुरणक्षमता सहा महिन्यांपेक्षा जास्त राहत नाही परंतु बियांतील आर्द्रतेचे प्रमाण फक्त ३ ते ४% असल्यास त्यांची अंकुरणक्षमता २ वर्षांपर्यंत पुष्कळ प्रमाणात कायम राहते. गहू, जोंधळा, बाजरी, मका या पिकांच्या बियांची अंकुरणक्षमता पहिल्या पाच वर्षांत थोडी थोडी कमी होत जाते परंतु पुढील काळात ती झपाट्याने कमी होते. तेरा वर्षांनंतर मटकीचे बी ६४%, मुगाचे ५४% आणि उडदाचे २०% अंकुरणक्षम असल्याचे आढळले आहे. तंबाखूचे बी कित्येक वर्षे टिकते. कठीण व अपार्य (पाणी शोषून न घेणारे) बीजावरण असलेले बी, तसेच ० से. पासून ५ से. पर्यंतच्या तापमानात व कमी आर्द्रता असलेल्या परिस्थितीत ठेवलेले बी सर्वसाधारण तापमानात ठेवलेल्या बियांपेक्षा जास्त काळ अंकुरणक्षम राहते, असे सर्वसामान्यपणे आढळून आले आहे. तसेच कित्येक तणांच्या बिया जमिनीत दीर्घकाळ अंकुरणक्षम राहतात काही २० वर्षांपर्यंत व काही अपवादात्मक बाबतींत ३९ वर्षांपर्यंतही राहतात [⟶अंकुरण प्रसुप्तावस्था]. बीजांच्या अत्यंत लहान आकारमानाचा व वजनाचा संबंध त्यांच्या दूरवर होणाऱ्या प्रसाराशी असतो [⟶विकिरण, फळांचे व बीजांचे]. विमानांतून सु. ६२ — ९३० मी. पर्यंतच्या उंचीवर गवतांची लहान बीजे संकलित केली आहेत.


बीजसंरचना : पूर्णावस्थेत बीजाला एक आवरण (बीजावरण) असते किंवा दोन आवरणे (बीज-चोल व अंतश्चोल) असून त्यावर एक छिद्र असते, त्यास बीजकरंध्र म्हणतात [आ. (अ)]. यातूनच बीजकातील अंदुकात पराग-नलिका फलनाच्या वेळी प्रवेश करते  [⟶ प्रजोत्पादन फूल]. काही फुलझाडांत बीजाचा देठ (बीजबंध) बीजकरंध्राजवळच असतो व काहींत तो दूर असतो तो तुटल्यावर बीजावर राहिलेल्या वणास नाभी म्हणतात. काही बीजांवर बीजकरंध्रासमोर नाभीजवळ एक जाड कंगोरा आढळतो, त्याला संधिरेषा म्हणतात कारण हा रेषाकृती भाग बीजबंध बीजकाच्या एका बाजूस सांधून राहिल्याने बनतो (उदा., एरंड, पावटा). बहुतेक अधोमुख (बीजकरंध्र खाली वळलेल्या) बीजकापासून बनलेल्या बीजावर ही संधिरेषा आढळते. कधीकधी पुटकुळ्या, कंगोरे किंवा तत्सम संरचना बीजावरणापासून बनतात एरंडाच्या बियांवर [आ. (आ)] नाभीजवळ बीजावरणापासून बनलेल्या मांसल उंचवट्यास नाभिजाल म्हणतात तसेच नाभी किंवा बीजबंध यांपासून बनलेल्या अर्धवट (उदा., कपाळफोडी, विलायती चिंच, हबाब इ.) किंवा पूर्ण विशेष आवरणास [उदा., कमळ, जायफळ, यू, लिची, आभाळ इ. आ. (इ) व (ई)] अध्यावरण म्हणतात. कमळाच्या बियांच्या अध्यावरणातील हवेमुळे ते पाण्यात तरंगते. डाळिंबाच्या बीजावर असलेल्या रसाळ आवरणास कोणी अध्यावरण म्हणतात, तसेच अध्यावरण ही संज्ञा सर्वसामान्यपणे बीजावरणावरील सर्वच प्रकारच्या विशेष संरचनेत वापरतात. कधीकधी बीजावरणावर पंख [⟶ उदा., शेवगा, पाडळ आ. (उ)], केसांचा तुरा [उदा., रुई, कुडा आ. (ऊ)], धागे [उदा. कापूस आ (ऊ)], उपत्वचेचा लेप किंवा काटे, कंगोरे इ. आढळतात. अफूच्या बियांवर कंगोऱ्यांच्या दाट जाळ्यामुळे बारीक खाचा दिसतात [आ. (ए)], तो पृष्ठभाग खाचदार (खातांकित) होय पिवळ्या तिळवणीच्या बीजावर अनेक जाडजूड व समांतर रेषा असल्याने त्याला ‘रेषांकित’ व पांढऱ्या तिळवणीच्या बीजावर अनेक सूक्ष्म उंचवटे असतात म्हणून त्यास ‘पिटकित’ म्हणतात [आ. (ए) व (ए)]. अळशी, कोळसुंदा, भोपळा इत्यादींचे बीजावरण पाण्याशी संपर्क होताच बुळबुळीत होते, त्यामुळे ती बीजे प्राण्यांच्या शरीरास चिकटून अन्यत्र पसरविली जातता व ती रुजण्यास मदत होते.

बीजे व त्यांचे भाग (अ) पावटा : (अ१) बीज, (अ२) भिजवून उघडलेले बीज, (अ३) रोप (आ) एरंड : (आ१)बीज,(आ२) बीजाचा उभा छेद (इ) कमळाचे बीज (ई) जायफळ : (ई१) जायपत्रीसह बी, (ई२) बीजाचा उमा छेद (उ) सपक्ष बी : (उ१) पाडळ, (उ२) शेवगा (ऊ) केसाळ बी : (ऊ१) रुई, (ऊ२) कापूस (ए) बीजांचे पृष्ठभाग (ए१) खाचदार-अफू, (ए२) पिटकित-पांढरी तिळवण, (ए३) रेषांकित-पिवळी तिळवण (ऐ) गहू (ऐ१) बीजाचा (फलाचा) उभा छेद, (ऐ२) बीज (सस्यफल) (ओ) मका : (ओ१) बीज (सस्यफल), (ओ२) बीजाचा उभा छेद (औ) वेलदोडा : (औ१) बीज, (औ२) बीजाचा उभा छेद (क) खारीक : (क१) बी, (क२) बीजाचा आडवा छेद (का) सूर्यफूल : (का१) फळ (संकृत्स्‍न), (का२) फळाचा (व बीजाचा) उभा छेद (कि) तांबडा भोपळा : जाड किनारीचे बी (की) नारळ : (की१) बीज (गोटा), (की२) बीजाचा उभा छेद. पुढील भाग आकृतीत निरनिराळ्या ठिकाणी (आवश्यकतेनुसार) दर्शविले आहेत : (१) फलावरण, (२) बीजावरण, (३) बीजकरंध्र, (४) नाभी, (५) संधिरेषा, (६) परिपुष्क, (७) पुष्क, (८) नाभिजात, (९) अध्यावरण, (१०) दलिका, (११) गर्भ, (१२) आदिकोरक, (१३) आदिमूल, (१४) अधराक्ष, (१५) अप्याक्ष, (१६) बालपर्णे, (१७) मूल तंत्र, (१८) आपांडूर स्तर, (१९) पुष्कादनी, (२०) आदिमूलवेष्ट, (२१) आदिकोरकवेष्ट, (२२) उभी चीर, (२३) जाड किनार.

 

पाण्यात भिजवलेल्या बिया सोलून पाहिल्यास [आ. (अ)] त्यामध्ये बीजावरणाने झाकलेले वनस्पतीच्या गर्भाचे भाग दिसतात. एका बारीक अक्षाला चिकटून एक [उदा., गहू, मका आ. (ऐ) व (ओ)] किंवा दोन पातळ (उदा., एरंड, ओक) किंवा जाड (उदा., हरभरा, वाटाणा, पावटा इ.) गर्भदले (दलिका) असून गर्भाक्षाच्या वरच्या भागास अप्याक्ष व खालच्या (दलिकांच्या खालच्या) भागास अधराक्ष म्हणतात. अप्याक्षाच्या टोकास आदिकोरक अथवा कोंब (सूक्ष्म प्ररोह) व अधराक्षाच्या टोकास आदिमूल किंवा मोड म्हणतात. या दोन्हींत भावी वनस्पतीच्या टोकास असणारे व दीर्घकाळ वाढत राहणारे, अनुक्रमे प्ररोह व मूळ सूक्ष्मावस्थेत असतात [⟶विभाज्या]. अप्याक्षापासून खोड व पाने यांचा प्ररोह, अधराक्षापासून खोड व मूळ यांतील मध्यभाग (संक्रमणाक्ष) व आदिमूलापासून मूल तंत्र [आ. (अ) मूळ – २] बनते.


दलिका : प्रकटबीजीत दोन (उदा., सायकस) किंवा अधिक (उदा., पाइन) दलिका व पुष्क हा त्याव्यतिरिक्त अन्नांश असलेला भाग आढळतो. आवृतबीजी वनस्पतींचे दोन वर्ग दलिकांच्या संख्येवरून केले आहेत : एकदलिकित (एक दल असलेल्या) व द्विदलिकित (दोन दले असलेल्या). द्विदलिकितांच्या काही बीजांत [उदा., एरंड आ. (आ)] अन्नसाठा पुष्कात असून दलिका पानासारख्या पातळ असतात, तर काहींत [उदा., हरभरा, पावटा, घेवडा आ. (अ)] गर्भाच्या विकासात अंकुरणामध्ये लागणारा अन्नसाठा दलिकांत असल्याने त्या मांसल असतात. एकदलिकितांच्या बीजात (उदा., खारीक, मका, गहू) बहुधा पुष्क असून त्यातील ढालीसारख्या दलिकेला पुष्कादनी म्हणतात, कारण अंकुरणाच्या प्रक्रियेत तिचे कार्य पुष्कापासून अन्नशोषण करून ते गर्भास उपलब्ध करण्याचे असते [आ. (ऐ) व (ओ)]. कित्येक एकदलिकितांच्या [उदा., सस्यफले (घान्ये)] गर्भाच्या आदिकोरक व आदिमूल यांवर आवरक वेष्टने असून त्यांना अनुक्रमे आदिकोरकवेष्ट व आदिमूळवेष्ट म्हणतात [आ. (ऐ) व (ओ) ⟶ अंकुरण]. काही बियांत पुष्काऐवजी किंवा पुष्काखेरीज दलिकांबाहेर अन्नसाठा आढळतो त्या ऊतकास (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या — पेशींच्या — समूहास) परिपुष्क म्हणतात [उदा., कमळ, गुलबुश, वेलदोडा आ. (औ)]. पुष्कयुक्त बीजास सपुष्क व पुष्कहीनास अपुष्क म्हणतात. काही बीजांतील पुष्क अंतश्चोलाचा (आतील बीजावरणाचा) त्यात प्रवेश झाल्याने अनेक रेषांनी विभागल्यासारखे म्हणजे रेषाभेजित होते [उदा., सुपारी, जायफळ, हिरवा अशोक इ. आ. (ई)].

बीजावरण: बीजावरणाच्या बाबतीतही द्विदलिकित व एकदलिकित यांच्या बियांत फरक आढळतात. एकदलिकितांपैकी धान्यातील फलावरण व बीजावरण एकरूप झालेले असून त्याच्या आतील बाजूस पुष्क-कोशिकांचा एक प्रथिनयुक्त (आपांडूर) ऊतकाचा थर  [आ. (ऐ) व (ओ)] बनतो. पिठातील कोंड्यामध्ये या आवरणांच्या व प्रथिनांच्या कणांचा भरणा असून धान्यातील थायामीन व रिबोफ्लाविन या जीवनसत्त्वांचा भाग या ऊतकात व पुष्कादनीजवळ असतो. द्विदलिकितांत बीजावरणाची संरचना विविध प्रकारची असते. सर्वांत बाहेर ⇨उपत्वचेचा अगर मेणाचा अपार्य लेप असून घेवडा व वाटाणा यांच्या बीजावरणात त्याच्या आतील बाजूस गुरुकठकासारख्या घनावरणाच्या कोशिकांचा थर असतो [⟶ दृढोतक] त्याखाली वाहिन्यांचा गट व त्याभोवती शाखायुक्त कोशिकांचा व हवायुक्त मार्गांचा थर असतो. अंकुरणात जलशोषणाच्या दृष्टीने ही रचना सोयीची असते. कठीण फलावरण व पातळ बीजावरण असलेली कित्येक बीजे फलावरणापासून अलग असतात [संकृत्स्‍न ⟶ फळ] उदा., सूर्यफूल [आ. (का)] व दुधळ चेरी, सप्ताळू, रासबेरी तसेच अक्रोड, बदाम यांची अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळे बीजांच्या भिन्न भागांचा व त्यावरच्या आवरणांचा उपयोग त्यांच्या नैसर्गिक प्रसाराकरिता केला जातो [⟶ विकिरण, फळांचे व बीजांचे].

प्रकार : बीजांच्या संरचनेसंबंधी वर दिलेल्या सर्वसाधारण माहितीवरून त्यांची विविधता लक्षात येईल तथापि पुढे दिलेल्या माहितीवरून बीजांच्या प्रकारांची निश्चित कल्पना येणे शक्य आहे. 

(१) मका, गहू व खारीक [आ. (क)] ह्या एकदलिकितांच्या बीजांमध्ये पुष्क, एक दलिका, गर्भाक्ष, आदिमूल व आदिकोरक हे भाग बीजावरणाच्या आतील बाजूस असतात, तथापि त्यांत काही किरकोळ फरक आहेत. मका व गहू यांच्या बीजावर फलावरण चिकटून बसल्याने ती फळेच (सस्यफल) होत. मक्यातील गर्भाचे स्थान फळाच्या एका सपाट बाजूवर असते [आ. (ओ)] गव्हाच्या दाण्यावर एका बाजूस उभी चीर असून उलट बाजूस तळाजवळ गर्भ असतो [आ. (ऐ)] खारकेच्या बियांवरही एका बाजूस उभी चीर व उलट बाजूस मध्यावर एका लहान उंचवट्याखाली गर्भस्थान असते [आ. (क)]. 

(२) पावटा, सूर्यफूल, एरंड व भोपळा यांमध्ये द्विदलिकित बीजांच्या आवरणात वेढलेल्या दोन दलिका, आदिकोरक, आदिमूल इ. असलेला गर्भ असतो फक्त एरंडाच्या बीजात दलिका पातळ व पुष्क बराच तेलकट असतो. एरंडाखेरीज इतर तिन्हींच्या दलिका मांसल असून त्यांत स्टार्च, प्रथिन व तेल यांचे भिन्न प्रमाण असलेले अन्न असते. पावट्याच्या बीजावर [आ. (अ)] लांबट वाकडी संधिरेषा व त्याजवळच एका टोकास बीजकरंध्र व दुसऱ्या टोकास नाभी असते. गर्भाक्षाचे अप्याक्ष व अधराक्ष आणि  इतर भाग स्पष्ट असतात. अंकुरणानंतर दलिका जमिनीवर येतात व त्यामुळे ते अपिभौम असते पहिल्या पानांना बालपर्णे म्हणतात. सूर्यफुलाचे बी पातळ व शुष्क फलावरणाने वेढलेले असून ते खरे फळच असते [आ. (का)]. मात्र बीजावरण व फलावरण सुटी असतात (संकृत्स्‍न). ते गोलसर पण खाली अरुंद असून माथ्यावर किंजलाचा किण (वण) असतो. खालच्या बाजूस बीजावरणात गर्भाचे आदिमूल व मधे लहान आदिकोरकासह जाड दलिका असतात. एरंडाचे बी [आ. (आ)] पुष्कयुक्त, बीजावरण जाड, ठिसूळ व नाभिजातयुक्त असते. तांबड्या भोपळ्याचे बी चपटे  [आ. (कि)] व त्याची कडा जाड असते बीजावरण कठीण व चिवट असून भिजल्यावर चिकट बनते व जमिनीस चिकटते. पुष्काचा अभाव असून दलिका थोड्या मांसल व त्यांत पानांप्रमाणे शिरा दिसतात. बाजारात विकला जाणारा नारळ हे फळाच्या अंतःकवचासह बी (गोटा) असते त्यातील पाणी व खोबरे हे पुष्क असून गर्भ फार लहान असतो [आ. (की)]. खोबऱ्याचा मागील तपकिरी भाग हे बीजावरण असते. बीजांचे भिन्न प्रकार असतात, त्याप्रमाणेच अंकुरणांचेही भिन्न प्रकार आढळतात [⟶ अंकुरण].


संघटन : भिन्न प्रकारच्या बियांमध्ये ह्या बाबतीत बरीच विविधता आढळते. साल अथवा बीजावरणे, दलिका, पुष्क, परिपुष्क, अध्यावरण, नाभिजात इ. भागांत आढळणारे पदार्थ भिन्न प्रकारचे असतात व त्या त्या बीजांना त्यांचा भिन्न प्रकारे उपयोग होतो. सोयाबीन व भुईमूग ह्यांच्या दलिकांत तेलाचे प्रमाण भरपूर असते परंतु घेवड्याच्या दलिकांत स्टार्चाचे प्रमाण मोठे असते. सर्वच शिंबावंत वनस्पतींच्या  [⟶ लेग्युमिनोजी] बीजात प्रथिनांचे प्रमाण बरेच असते (उदा., मूग, उडीद, तूर, हरभरा,वाटाणा इ.). शुकधान्यांच्या (उदा., गहू, मका इ.) गर्भात तेल व प्रथिन भरपूर असले, तरी बीजातील त्याबाहेरच्या मोठ्या भागात (पुष्कात) स्टार्च विपुल असतो. एरंडाच्या बियांतील तेल मात्र पुष्कात असते. मका व वाटाणा यांच्या कोवळ्या बिया गोड असण्याचे कारण त्यांतील साखर होय., हिचे पुढे स्टार्चामध्ये रूपांतर होते. कांद्याच्या बियांतील साखर मात्र परिरक्षित असते. गाजर, खारीक, जहरी नारळ इत्यादींच्या बीजांतील पुष्कात अर्धसेल्युलोजरूप अन्नसाठा असतो. ⇨ लिची व विलायती चिंच [⟶ चिंच, विलायती] यांच्या अध्यावरणात गोड शर्करायुक्त अन्न असते, तर डाळिंबाच्या अध्यावरणात गोड रस असतो या गोड अध्यावरणांचा उपयोग प्राण्यांकडून त्या बीजांचा प्रसार होण्यासाठी केला जातो कठीण आवरणांचा उपयोग संरक्षणार्थ व प्राण्यांस चिकटू शकणाऱ्या बीजावरणांचा उपयोगही प्रसाराकरिता होतो. बीजांतील एंझाइमांचा (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांचा) उपयोग अंकुरणात अन्नाचे रूपांतर होऊन ते शोषण करण्यास सुलभ अशा स्वरूपात आणण्यास होतो त्या अन्नावर गर्भविकास व नवीन रोपाची वाढ होते.

आर्थिक महत्त्व : प्रसाराच्या दृष्टीने वनस्पतींना बीजांचे महत्त्व मोठे आहे तसेच मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून त्याला आवश्यक असलेल्या अनेक उपयुक्त वनस्पतींचा प्रसार बीजांद्वारे करीत आला आहे. बीजे व त्यांपासून उपलब्ध होणाऱ्या अनेक पदार्थांच्या औद्योगिक उत्पादनाकरिता मनुष्याचे प्रयत्‍न दिवसेंदिवस वाढत आहेत. कारण त्यापासून त्याचे अर्थोत्पादन वाढत्या प्रमाणात होत आहे. ज्वारी, गहू, तांदूळ, मका, नाचणी, बाजरी इत्यादींचे उत्पादन मुख्यतः त्यांचा बीजांतील अन्नाकरिता व इतर भागांचे जनावरांच्या चाऱ्याकरिता केले जाते तसेच तूर, वाटाणा, हरभरा वगैरे कडधान्यांचे उत्पादन त्यांच्या बियांतील अन्नाकरिता करतात. भुईमूग, सोयाबीन, नारळ, तेलमाड, करडई, सरसू, तीळ, कारळा, मोहरी, ऑलिव्ह, कापूस इत्यादींच्या वियांचे त्यांतील खाद्य तेलाकरिता मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते व आंतरराष्ट्रीय व्यापारात त्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत यांतील काहींची पेंड पाळीव जनावरांना उपयुक्त खाद्य असते. मका, चिंच, गहू, तांदूळ इत्यादींच्या बियांपासून औद्योगिक उपयोगाचा स्टार्च काढतात. करंज, निंब, अळशी, उंडी, तुंग, जंगली अक्रोड इत्यादींच्या बियांपासून अखाद्य तेले मिळतात व त्यांचा औद्योगिक उपयोग तेल, रोगण, साबण, वंगण इत्यादींकरिता करतात. एरंड, वेलची, जायफळ, करंज, चौलमुग्रा इत्यादींच्या बिया औषधी तेलाकरिता उपयुक्त आहेत. कुचला, जमालगोटा, पळस, इसबगोल, सागरगोटा, तुळस वगैरेंच्या बिया औषधी दृष्ट्या उपयुक्त तर कॉफी, कोको, ग्वाराना, कोलानट इत्यादींच्या बिया पेयांकरिता वापरतात. अनेक तृणधान्यांच्या बिया मादक पेयांच्या उत्पादनात वापरतात व मोहरी,मेथी,खसखस,वेलची,कारळा,तीळ,जिरे इत्यादींच्या बिया मसाल्यात वापरात असल्याने व्यापारी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

परांडेकर, शं. आ. 

बीजगुणन व वितरण 

कृषी उद्योगातील यश ज्या अनेक बाबींवर अवलबूंन असते त्यांत चांगल्या प्रतीच्या बीजाला फार महत्त्व आहे. चांगल्या प्रतीच्या बीजात (बियात) पुढील गुणधर्म असावे लागतात : (अ) ते जननिक (आनुवंशिक) आणि आकृतिक (सजीवांचा आकार व त्यांची संरचना यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राच्या) दृष्ट्या शुद्ध असावे. (आ) ते लागवडीतील इतर प्रकारांपेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या प्रकारांचे असावे. (इ) त्यात इतर धान्यांचे अथवा तणांचे बी आणि काडीकचरा नसावा. (ई) त्याची अंकुरणक्षमता उच्च प्रतीची असावी व उगवून आलेली रोपे जोमाने वाढणारी असावीत. (उ) ते आकारमानाने मोठे व एकसारखे असावे. (ऊ) रोग व किडींपासून ते मुक्त असावे. (बी साठविण्याच्या जागेतील तापमान सु. २५ ते ३५ से., हवेतील आर्द्रता ६२ ते ८०% आणि साठविलेल्या बियांतील जलांशाचे प्रमाण १० ते १४% असल्यास किडी व बुरशीचे प्रमाण जास्त असते). 

वनस्पती प्रजनक तज्ञ निरनिराळ्या पिकांचे सुधारलेले प्रकार (वाण) निर्माण करतात. या प्रकारांचे शुद्ध व प्रमाणित बी तज्ञांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून ते शेतकऱ्यांना पुरविणे आवश्यक असते.

शुद्ध बीजाचे गुणन ज्या निरनिराळ्या अवस्थांमधून होते त्या अवस्था क्रमशः पुढीलप्रमाणे आहेत : (१) प्रजनक बीज, (२) आधार बीज, (३) पंजीयित (नोंदणीकृत) बीज आणि (४) प्रमाणित बीज. प्रजनक बीज मूळच्या (प्रकार निर्माण करणाऱ्या) प्रयोगक्षेत्रातून पुरविले जाते व त्यांचे प्रमाण मर्यादित असते. ते शासनाच्या बीजगुणन क्षेत्रात तज्ञांच्या देखरेखीखाली वाढविण्यात येते आणि ते ‘आधार बीज’ या नावाने ओळखण्यात येते. लायक व पंजीयित शेतकऱ्यांच्या शेतावर आधार बीज मोठ्या प्रमाणावर पेरून गुणन केले जाते व ते ‘पंजीयित बी’ या नावाने ओळखण्यात येते. पंजीयित बी पुन्हा मोठ्या प्रमाणावर गुणन करून ते ‘प्रमाणित बी’ या नावाने शेतकऱ्यांना पुरविले जाते. वरील प्रत्येक अवस्थेत शुद्ध बीजाच्या पिकात दुसऱ्या पिकाची अथवा त्याच पिकाच्या इतर प्रकारांची अथवा तणांची भेसळ न होऊ देण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. भेसळीची झाडे उभ्या पिकात आढळल्यास ती उपटून काढतात आणि पिकाची कापणी, मळणी, उफणणी व पिशव्यांतून बी भरणे या प्रत्येक अवस्थेत भेसळ न होऊ देण्यासंबंधी खबरदारी घेण्यात येते. प्रमाणित बी साफ करून त्यावर कवकनाशकाची [बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणाऱ्या द्रव्याची⟶ कवकनाशके] प्रक्रिया करतात व असे बी पुढे नमूद केलेले तपशील असलेले लेबल लावलेल्या सीलबंद पिशव्यांतून शेतकऱ्यांना पुरविले जाते : (१) पिकाचा प्रकार, (२) उत्पादन राशि-क्रमांक, (३) बीज परीक्षणाची तारीख, (४) उगवणशक्ती (टक्के), (५) शुद्धता (टक्के), (६) इतर पिकांच्या बियांचे प्रमाण (टक्के), (७) काडीकचरा (टक्के). (८) तणांचे बी (टक्के), (९) बियांचे वजन, (१०) बियांवर विषारी रसायनाची प्रक्रिया केली असल्यास रसायनाचे नाव, (११) विक्रेत्याचे नाव व पत्ता.

निरनिराळ्या पिकांच्या प्रमाणित बियांसाठी त्यांतील उगवणशक्ती, शुद्धता, जलांश, वगैरे बाबींच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. या मर्यादेत न वसणारे बी विकले गेल्यास विक्रेता १९६६ सालच्या भारतीय बीज अधिनियमाखाली शिक्षेस पात्र ठरतो. भात व संकरित ज्वारी यांची किमान उगवणशक्ती ८० टक्के असावी लागते. मका, गहू, बाजरी व भुईमूग यांच्या बाबतीत अनुक्रमे ९०, ८५, ७५ व ७५ टक्के असली पाहिजे. जलांशाचे कमाल प्रमाण भातात १४ टक्के गहू, संकरित ज्वारी, बाजरी व मका यांच्या बाबतीत १२ टक्के व भुईमूगात ८ टक्के ठरविण्यात आले आहे. कापसाच्या बियांची किमान उगवणशक्ती ७० टक्के व जलांश १० टक्क्याच्या आत असावा लागतो.


राष्ट्रीय बीज महामंडळ : भारतात या महामंडळाची १९६३ मध्ये स्थापना झाली. महामंडळाने १९७५ मध्ये ५४,५४० क्विंटल प्रमाणित बियाण्याचे उत्पादन व वितरण केले. ७० पिकांच्या २१० प्रकारांच्या प्रमाणित बियाण्याचे उत्पादन हाती घेण्यात आले आहे व बीज प्रक्रियेसाठी ३६ केंद्रे आणि विक्रीसाठी ३,५०० केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रमाणित बियाण्याच्या उत्पादनासाठी महामंडळ स्वत:च्या शेतांचा किंवा कृषी विद्यापीठे, राज्य शेती महामंडळे आणि अपवादात्मक परिस्थितीत खाजगी शेतांचाही उपयोग करते. हे कार्य राज्य बीज महामंडळाच्या कार्याला पूरक असे आहे.

जागतिक बँकेच्या मदतीने भारतात ५० कोटी रुपयांचा राष्ट्रीय बियाणे प्रकल्प सुरू झाला आहे. त्यात नियोजन, सूत्रीकरण, निरीक्षण इ. बाबतची मुख्य जबाबदारी राष्ट्रीय बीज महामंडळावर टाकण्यात आली आहे. १९७९-८० मध्ये महामंडळाने ९२,६३२ क्विंटल आधार बीज निर्माण केले. राज्य बीज महामंडळांच्या सहकार्याने राष्ट्रीय बीज महामंडळाने तागाच्या प्रमाणित बियाण्याच्या उत्पादनाचे कार्य हाती घेतले आहे.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ : जागतिक बँकेच्या अर्थ साहाय्याने १९७५ साली देशात स्थापन झालेल्या राष्ट्रीय बियाणे प्रकल्पाखाली निरनिराळ्या राज्यांत ‘राज्य बियाणे महामंडळे’ स्थापन झाली. त्यांपैकी महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा’ची स्थापना एप्रिल १९७६ मध्ये झाली. महामंडळाचे एकूण भागभांडवल ५ कोटी रुपयांचे असून त्यांपैकी काही भागधारक बीजोत्पादक असतात. फक्त भागधारकांच्या शेतावर बीजोत्पादन केले जाते आणि भागधारकांना भावाची हमी दिली जाते. महामंडळाच्या कार्यक्षेत्रासाठी अकोला, बुलढाणा, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील १,४२८ गावांची निवड करण्यात आली आहे. भागधारकांना दर वर्षी कृषी विद्यापीठाच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेले आधार बीज दिले जाते. खते, कीटकनाशके उपलब्ध करून देणे, आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी मदत करणे, बीजोत्पादन क्षेत्रावर तांत्रिक कर्मचाऱ्यांमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करणे आणि उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून त्याचे माफक किंमतीला वितरण करणे ही महामंडळाच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. बीजोत्पादनामध्ये राहुरी, अकोला व परभणी येथील कृषी विद्यापीठे सहभागी असतात. पाच वर्षांच्या काळात ४०,००० हेक्टरवर २०,००० टन बियाणाचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. १९७८-७९ मध्ये संकरित ज्वारी, संकरित बाजरी, भात, कापूस, हरभरा आणि मर्यादित प्रमाणावर गहू यांचे बीजोत्पादन ८,०५७ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आले. महामंडळाचे मुख्य कार्यालय अकोला येथे आहे.

राज्यांतर्गत प्रमाणित बियाण्याची गरज भागल्यावर शिलकी बियाणे गरजू राज्यांना राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत पुरविले जाते. तसेच दुष्काळी भागात राखीव साठा योजनेखाली शिकली बियाणे थंड व कोरड्या भांडारात साठविले जाते.

बीजतंत्रविज्ञान व बीजपरीक्षण प्रयोगशाळा : स्वातंत्र्यपूर्व काळात बीजासंबंधीच्या प्रश्नांवर विशेष लक्ष देण्यात आले नाही. पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांच्या काळात बीजगुणन व वितरण यांवरच भर देण्यात आला. १९६१ मध्ये दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये पहिली बीज परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आणि बीजशास्त्र व बीजतंत्रविज्ञान यांचा पाया घातला गेला. बीजाच्या प्रतीचे नियंत्रण करण्यासाठी १९६९ मध्ये वरील संस्थेत बीजशास्त्र आणि बीजतंत्रविज्ञानासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला. बीजनिर्मिती, परीक्षण, प्रतीवर नियंत्रण, बीज रोग आणि कीटकविज्ञान, बीज-क्रियाविज्ञान आणि बीज प्रक्रिया या बाबींवर संशोधन करणे हे या विभागाचे प्रधान हेतू आहेत. निरनिराळ्या पिकांच्या बीज परीक्षणाच्या पद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत. 

देशात १९ ठिकाणी बीज परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात नागपूर येथे अशा प्रकारची प्रयोगशाळा आहे. शासकीय नमुन्याबरोबरच इतर कोणत्याही व्यक्तीला आपल्या बियांचा नमुना या प्रयोगशाळेतून ठराविक शुल्क देऊन तपासून घेता येतो.

पहा : अंकुरण गर्भविज्ञान प्रजोत्पादन प्रसुप्तावस्था फूल विकिरण, फळांचे व बीजांचे.

गोखले, वा. पु.

संदर्भ : 1. Brooke, A. J. The Living Plant, Edinburgh, 1964.

            2. D’Almeida, J. F. R. Mullen, D. P. Lessons in Plant Morphology, Bombay, 1946.

            3. Fuller, H. J. The Plant World, New York, 1955.

            4. Lawrence, G. H. M. Introduction to Plant Taxonomy, New York, 1958.

            5. Poehlman, J. G. Borthakur, D. Breeding Asian Field Crops, Bombay, 1969.

            6. Strasburger, E. Textbook of Botany, London, 1965.

            7. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Poona, 1972.