तण : मनुष्याने काही वनस्पतींची अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर गरजांसाठी लागवड सुरू केली तेव्हापासूनच तणांच्या कल्पनेचा उगम झाला. ज्या वेळी मनुष्य एखाद्या वनस्पतीची हेतुपूर्वक लागवड करतो त्या वेळी शेतात वाढणाऱ्या इतर सर्व वनस्पतींना ‘तण’ म्हणतात. तणाची ही व्याख्या मर्यादित स्वरूपाची आहे. वास्तविक कोणत्याही ठिकाणी वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पतींना तण म्हणून ओळखणे आवश्यक आहे. तलावांत, कालव्यांत अगर पाण्याच्या नळांत वाढणाऱ्या वनस्पती तसेच कारखाने, घरे व इतर इमारतींभोवती उगवून येणारी लहान झुडपे गवते ही सर्व तण या सदरातच येतात. शेतातील लागवडीखालील मुख्य पिकात दुसऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष लागवड न केलेल्या परंतु उगवून आलेल्या वनस्पतींना तण असेच म्हणतात. काही वनस्पती उदा., शिंपी, कुंदा, हरळी या नेहमीच तण या नावाने ओळखल्या जातात तर काही वनस्पती सापेक्षतेने तण वा लागवडीखालील वनस्पती असतात. ‘अनावश्यक वाढणारी वनस्पती’ अशी तणाची सोप्या भाषेत व्याख्या करता येईल.

तणांमुळे होणारे नुकसान : रोग आणि किडी यांमुळे पिकांचे पुष्कळ नुकसान होते. पंरतु त्याहीपेक्षा जास्त नुकसान तणांमुळे होते, असा अंदाज आहे. तणांची मुळीच दखल न घेतल्यास (म्हणजे तणांवर काहीही उपाययोजना न केल्यास) ७० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होते. खालील कारणांमुळे तणे पिकांचे शत्रू मानली जातात : (१) तणांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे लागवडीखालील पिकाला पाणी, प्रकाश आणि पोषक द्रव्ये यांचा योग्य पुरवठा होत नाही. (२) तणांमुळे प्रती हेक्टरी १५० किग्रॅ नायट्रोजन वाया जातो. (३) काही तणांच्या (उदा., लव्हाळा) मुळांवाटे विषारी द्रव्ये बाहेर पडतात व त्यांचा लागवडीखालील पिकावर अनिष्ट परिणाम होतो. (४) तणांचा नाश करण्यासाठी फार मोठा खर्च होत असल्याने पिकाच्या उत्पादनाचा खर्च वाढतो. (५) तणांमुळे लागवडीखालील पिकांचे उत्पन्न कमी येते व पिकाची कापणीही त्रासदायक होते. (६) पिकाची मळणी करतेवेळी तणांची बीजे पिकात मिसळल्यामुळे पिकाला बाजारात कमी किंमत येते. (७) कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), सूक्ष्मजंतू, व्हायरस व किडी या पिकांच्या शत्रूंना तणे आश्रय देतात. (८) काही तणे मनुष्य आणि जनावरांना विषारी असतात (उदा., सत्यनाशी अथवा पिवळा धोत्रा). (९) पाण्यात वाढणाऱ्या तणांमुळे पाण्याच्या प्रवाहात (नद्या, कालवे, पाण्याचे नळ) अडथळा निर्माण होतो. कृषिव्यवसायात मनुष्याची पुष्कळशी शक्ती तणांशी झगडण्यात खर्च होते. याबाबतीत शिथिलता आली की, तणांचा जोर वाढतो व मग तणनाशाचे काम आणखीच त्रासदायक आणि खर्चाचे ठरते.

विशेष गुणधर्म : लागवडीखालील पिकांशी होणाऱ्या स्पर्धेमध्ये तणे अनेक बाबतींत आघाडीवर असतात. त्याला तणांचे पुढील विशेष गुणधर्म कारणीभूत आहेत. (१) हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, अवर्षण, रोग आणि किडी या सर्वांचा प्रतिकार लागवडीखालील पिकांच्या तुलनेने तणे जास्त परिणामकारक रीतीने करू शकतात. (२) तणांची बीजोत्पादनक्षमता जास्त असते. उदा., पिवळा धोत्रा, ज्वारीवरील टाळप (टारफुला), गाजर गवत वगैरे. एका वर्षात उत्पन्न झालेल्या तणांच्या बियांपासून उगवलेली झाडे नष्ट करण्यासाठी सात वर्षे लागतात, अशा अर्थाची इंग्रजी भाषेत म्हण आहे. (३) पुष्कळ तणे लागवडीखालील पिकांपेक्षा झपाट्याने वाढतात, त्यांना फुले लवकर येतात व ती पिकांपेक्षा लवकर तयार होतात. (४) तणांच्या बीजांची अंकुरणक्षमता (रुजून अंकुर फुटण्याची क्षमता) व सुप्तावस्था दीर्घकालीन असते. पुष्कळ तणे ५ वर्षांपेक्षा जास्त काळ अंकुरणक्षम असतात. १८७९ मध्ये जमिनीत काचेच्या नळ्यांत पुरलेल्या २० निरनिराळ्या तणांच्या बियांपैकी २५ वर्षांनंतर निम्म्या तणांच्या बिया अंकुरणक्षम असल्याचे आढळून आले व तीन तणांच्या बियांपासून ८० वर्षांनंतर रोपटी तयार करण्यात आली. (५) काही तणांची (उदा., हरळी, लव्हाळा) मुळे किंवा मूलक्षोड (जमिनीखालील आडवे खोड) जमिनीत खोलवर असतात त्यामुळे ती खणून काढण्यास फार त्रास पडतो. (६) सर्वसाधारणपणे पिकाखालील झाकलेल्या तणांची वाढ नीट होत नाही आणि प्रकाशाअभावी ती मरतात परंतु काही तणे पिकांवर वेलीसारखी वाढतात व त्यामुळे ती झाकली जात नाहीत.


 फायदे : तणांमुळे पुष्कळसे तोटे होत असले, तरी काही फायदेही असतात, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येत नाही. फुलावर येण्यापूर्वी तणे जमिनीत गाडल्यास पिकाला सेंद्रिय खताचा पुरवठा होतो (उदा., बावची, गोखरू). शिंबावंत (शेंगा येणाऱ्या) तणांपासून जमिनीला नायट्रोजनाचा पुरवठा होतो. ओसाड प्रदेशांत वाळूमुळे व जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशांतील उतारावरील जमिनीचे वाहत्या पाण्यामुळे होणारे नुकसान तणांमुळे वाचते. हरळीसारख्या तणांचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होतो. काही तणांचा औषधासाठी उपयोग होतो. गुम्मा (ल्युकस ॲस्पेरा) नावाचे तण सर्पदंशावर गुणकारी आहे. पिवळ्या धोत्र्याच्या बियांपासून काढलेले तेल त्वचारोगावर उपयोगी आहे. कासे गवतासारख्या तणांचा उपयोग घरे अथवा झोपड्या शाकारण्यासाठी व लव्हाळ्याचा उपयोग उदबत्त्या तयार करण्यासाठी करतात. पिवळ्या धोत्र्याच्या झाडांमुळे क्षारधर्मी (अल्कलाइन) जमिनी सुधारण्यास मदत होते.

वर्गीकरण : जीवनचक्र पुरे होण्यास लागणाऱ्या कालावधीप्रमाणे तणांचे वर्षायू (एक वर्ष जगणारे), द्विवर्षायू आणि बहुवर्षायू असे प्रकार आहेत. वर्षायू तणांची वाढ एका हंगामात पूर्ण होऊन बी धरते. द्विवर्षायू तणांचे जीवनचक्र पुरे होण्यास कमीत कमी दोन हंगाम लागतात. एका हंगामात तणांच्या कंदांची वाढ होते व दुसऱ्या हंगामात कंदावर फुलोरा येऊन बी धरते. उदा., जंगली कोबी. अशा प्रकारची तणे मुख्यत्वेकरून समशतोष्ण हवामानात आढळून येतात. बहुवर्षायू तणे दोन वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत जगतात. मामुली मशागतीने त्यांचा नाश करता येत नाही. उदा., हरळी, कासे गवत, लव्हाळा, बहुतेक तणे स्वतंत्रपणे वाढणारी असतात, परंतु काही तणे परजीवी (दुसऱ्यावर उपजीविका करणारी) असतात. परजीवी तणांमध्ये खोडावर वाढणारी (अमरवेल व बांडगूळ) व मुळांवर वाढणारी (बंबाखू आणि टाळप) असे भेद आहेत. जमिनीच्या प्रकारांप्रमाणे तणांचे काळ्या जमिनीत वाढणारी, गाळवट जमिनीत वाढणारी व पाणथळ जमिनीत वाढणारी असे भेद आहेत. पाण्यात वाढणाऱ्या तणांमध्ये पाण्यात तरंगणारी, पाण्याखाली व जलाशयाच्या तळाशी वाढणारी असे प्रकार असतात.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या प्रमुख तणांची नावे खाली दिली आहेत : (१) आंबुटी  (ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा ऑ. बोवी), (२) आघाडा (ॲचिरँथस स्पेरा), (३) उन्हाळी (टेफ्रोसिया पुर्पुरिया), (४) एकदांडी किंवा दगडी  (ट्रायडॅक्स प्रोकंबेन्स), (५) ओसाडी (ॲजिरॅटम कॉनिझॉइडीस), (६) कांगणी (सोलॅनम नायग्रम), (७) काटे माठ (ॲमरँथस स्पिनोसस), (८) काटेरिंगणी (सोलॅनम झँथोकार्पम), (९) कासे गवत (सॅकॅरम स्पाँटॅनियम), (१०) काळा माका (सीसुलिया ऑक्सिलॅरिस), (११)  कुंदा (एशिमम पायलोजम), (१२) कुरडू वा कोंबडी (सेलोशिया अर्जेन्शिया), (१३) कुरासन्ना (प्लुचिया लॅन्सिओलॅटा), (१४)  केणा (सायनॉटिस ऑक्सिलॅरिस), (१५) गंगोत्री (स्यास्थोक्लाइन लायरॅटा), (१६) गाजरी किंवा गाजर गवत (पार्थेनियम हिस्टेरोफोरस), (१७) दुतुंडी (झँथियम स्ट्रुमारियम), (१८) गोरखमुंडी (स्फेरँथम  इंडिकस), (१९) गोवर्धन वा दुधी (यूफोर्बिया हिर्टा), (२०)  घोळ (पोर्चुलॅका ओलेरॅसिया), (२१) चिकटा (बायडेन्स पिलोजा), (२२) चिकणा (सिडा कॉर्डिफोलिया), (२३) चिमणचारा, छोटा (एरग्रोस्टिस मायनॉर), (२४) चिमणचारा, मोठा (ए. मेजर), (२५) जलपिंपळी (फायला नोडिफ्लोरा), (२६) टारफुला वा टाळप (स्ट्रायगाल्युटिया स्ट्रायगा जाती), (२७) तांबा अथवा टंपा अथवा गुम्मा (ल्युकस ॲस्पेरा), (२८) तालीमखाना (ॲस्टरकँथा लाँगिफोलिया), (२९) तुपकडी (सिडा स्पायनोजा), (३०) तेंडला (डायजेरिया आर्व्हेसिस), (३१) दूर्वा अथवा हरळी (सायनोडॉन डॅक्टिलॉन), (३२) नायटी (यूफोर्बिया थायमीफ्लोरा), (३३) निचर्डी (ट्रायंफेटा ऱ्हाँबॉइडिया), (३४) नीलपुष्पी किंवा विष्णुक्रांता (इव्हॉल्व्ह्युलस ॲल्सिनॉइडिस), (३५) पांढरा माका (एक्लिप्टा इरेक्टा ए. आल्बा), (३६) पाथरी किंवा भुईपात्रा (लॉनिया पिनॅटिफिडा लॉ. सर्मेटोजा), (३७) पिवळा धोत्रा किंवा काटे धोत्रा (अर्जिमोन मेक्सिकाना), (३८) मोठी दुधी (युफोर्बिया पिल्युलिफेरा), (३९) मोथा (सायपेरस रोटुंडस), (४०) बंबाखू (ऑरोबँकी सर्नुंआ ऑ ईजिप्टिका ऑ. इंडिका), (४१) ब्राह्मी (सेंटेला एशियाटिका), (४२) भुईआवळी (फायलँथस निरूरी), (४३) भुरुंडी (हेलिओट्रोपियम इंडिकम), (४४) रिंगणी, डोर्ली किंवा भुई रिंगणी (सोलॅनम इंडिकम), (४५) रुई (कॅलॉट्रॉपिस जायगँशिया), (४६) लव्हाळा किंवा नागरमोथा (सायपेरस स्कॅरिओसस), (४७) हिरांकुरी किंवा चांदवेल (कॉन्व्हॉल्व्ह्युलस आर्व्हेंसिस).


प्रसार : वर्षायू तणांच्या बियांचा प्रसार पुढील मार्गांनी होतो : (१) वारा, (२) पाणी (पावसाचे, नद्यांचे, कालव्यांचे वा पुराचे), (३) जनावरांच्या विष्टेवाटे अथवा त्यांच्या अंगाला चिकटून, (४) धान्यांच्या बियांत मिसळून, (५) न कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट खत. बहुवर्षायू तणांचा प्रसार बियांखेरीज धावते खोड, मूलक्षोड, ग्रंथिक्षोड अथवा कंद यांमुळे होतो.

नियंत्रणाच्या पद्धती : तणांच्या वाढीसाठी पोषक परिस्थिती, तणांचे जीवनचक्र, त्यांच्या पुनरुत्पत्तीच्या आणि प्रसाराच्या पद्धती, तणनाशकांचा निरनिराळ्या तणांवर होणारा परिणाम इ. गोष्टींचा सखोल अभ्यास करून विशिष्ट तणांना नाश करण्यासाठी कोणती उपाययोजना करावयाची ते ठरवावे लागते. तणे कोठे वाढतात हेही लक्षात घेणे जरूर आहे. कारखान्यांभोवती आणि पाण्यात वाढणारी तणे संपूर्णपणे नष्ट करावी लागतात. रस्त्याच्या कडेच्या तणांची वाढ अंशतः कमी करावी लागते. शेतात व फळबागेत मुख्य पीक सुरक्षित ठेवून फक्त तणे नष्ट करावयाची असतात. तणनियंत्रणाच्या निरनिराळ्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत : (१) प्रतिबंधक उपाय, (२) यांत्रिक उपाय, (३) पीक पद्धत, (४) जैव पद्धत, (५) रासायनिक पद्धत. निरनिराळ्या पद्धतींचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

प्रतिबंधक उपाय : (अ) पेरणीसाठी वापरावयाच्या बियांतील तणांचे बी काढून टाकणे, (आ) आयात कलेले धान्य पेरण्यापूर्वी त्यातील तणांचे बी वेगळे काढून नष्ट करणे, (इ)  योग्य प्रकारे कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरणे, (ई) मोकळ्या जागेतील अथवा शेताच्या बांधावरील तणे बी धरण्यापूर्वी कापून नष्ट करणे.

यांत्रिक उपाय : यांत हाताने तणे उपटणे, खुरपणे, जाळणे, शेतात पाणी भरून तणे नष्ट करणे, खोल नांगरणे, कुळवाच्या पाळ्या देणे व कोळपणे यांचा अंतर्भाव होतो. यांपैकी जाळणे या उपायाखेरीज इतर उपायांनी तणे काढावयाची असल्यास ती फुलावर येण्यापूर्वीच काढणे फार महत्त्वाचे आहे. कोकणात भाताचे रोप तयार करण्यापूर्वी जमीन ‘राब’ पद्धतीने भाजून तयार करतात, त्या वेळी तणांचे बी जळून नष्ट होते. शेताच्या बांधावरील तणे जाळून नष्ट करता येतात. कासे गवत शेतात पाणी भरून नष्ट करतात. वाळलेले गवत, भाताची टरफले वा पॉलिथीनचे जाड कापड शेतात पसरल्याने हवा व सूर्यप्रकाश यांच्या अभावी तणे मरतात अथवा त्यांची वाढ खुरटते. वरील उपायांनी तणे संपूर्णपणे नष्ट करणे अवघड आणि खर्चाचे काम आहे. हंगामी तणांचा नाश करण्याच्या कामी वरील उपायांचा विशेष फायदा होतो.

पीक पद्धत : या पद्धतीमध्ये पिंकांचा फेरपालट खरीप हंगामात जमीन पड ठेवून कुळवाच्या साहाय्याने तणे नष्ट करणे आणि हिरवळीची खते हे उपाय आहेत. पिकाच्या फेरपालटामुळे एकाच प्रकारच्या तणांची वाढ होत नाही. हिरवळीच्या खताचे पीक दाट वाढत असल्यामुळे तणांची वाढ होत नाही. शिवाय हिरवळीचे पीक जमिनीत गाडले जाते त्या वेळी तणेही पुष्कळ प्रमाणांत गाडली जातात.


 जैव पद्धत : या पद्धतीत तणांच्या  नैसर्गिक शत्रूंचा वापर केला जातो. हे शत्रू वनस्पती अथवा प्राणी वर्गातील असतात. द. भारतात काही वर्षांपूर्वी कोचिनियल किड्यांचा वापर करून फार मोठ्या क्षेत्रावरील निवडुंगाचा नाश केला गेला. विशिष्ट किड्यांचा वापर करून ऑस्ट्रेलियात निवडुंगाचा व हवाई बेटांत घाणेरीचा (लँटाना कॅमरा) नाश करण्यात यश मिळाले आहे. बास्केट ग्रास अथवा टर्कीज बिअर्ड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या मुळावाटे बाहेर पडणाऱ्या पदार्थाचा कासे गवताच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो, असे आढळून आले आहे. काही ठळक उदाहरणे वगळल्यास जैव पद्धतीने तणांचा नाश करण्याच्या बाबतीत फारशी प्रगती झालेली नाही.

रासायनिक पद्धत : १९०० च्या सुमारास मोरचूद, सोडियम क्लोरेट, सोडियम बोरेट, सोडियम आर्सेनेट यांचा वापर तणनाशासाठी होऊ लागला परंतु लागवडीखालील पिकांतील तणांचा नाश करण्यासाठी ती उपयोगी नसत. लोहमार्गाच्या बाजूंची वा कारखान्याच्या आसपासची तणे नष्ट करण्यासाठी यांचा वापर होत असे. अमेरिकेत आणि यूरोपात शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यावर मजुरांकरवी पिकांतील तणे काढणे परवडेनासे झाले. त्यामुळे मुख्य पिकाला इजा न पोहोचता पिकातील तणे कशी मारता येतील, यावर शास्त्रज्ञांचे लक्ष केंद्रित झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत २, ४–डी आणि इंग्लंडमध्ये एमसीपीए या हॉर्मोन वर्गातील रसायनांचा शोध लागला. पिकाला इजा न पोहोचता त्यातील तणांचा नाश करण्यासाठी ही रसायने फार उपयुक्त असल्याचे आढळून आले. त्यानंतर नव्या रसायनांचा शोध लागून आज बाजारात निरनिराळ्या तणांवर मारक अशी विविध प्रकारांची पन्नासपेक्षा जास्त रसायने उपलब्ध झाली आहेत. तणनाशाच्या कामी वापरली जाणारी रसायने सर्वसाधारणपणे हर्बीसाईड्स (औषधिनाशके) या नावाने ओळखली जातात. त्यांना पर्यायी शब्द ‘तणनाशके’ (वीडीसाइड्स अथवा वीडकिलर्स) हा या लेखात वापरला आहे.

तणनाशकांचे वर्गीकरण : तणनाशकांचे दोन मुख्य प्रकार आहेत : (१) वेचक व (२) अवेचक (अथवा सर्व तणनाशी). वेचक तणनाशके पिकातील विशिष्ट तणांचा नाश करतात, परंतु पिकाला इजा पोहोचत नाही. उदा., २,४–डी या तणनाशकामुळे तृणधान्याच्या पिकातील रुंद पानांची तणे मरतात परंतु तृणधान्याच्या पिकाला इजा पोहोचत नाही. याचे कारण रुंद पानांच्या तणांचा एकूण पृष्ठभाग मोठा असल्यामुळे तृणधान्याच्या पिकांच्या मानाने त्यांवर पडणारे तणनाशकाचे प्रमाण जास्त असते, शिवाय अशा तणांचा वर्धनबिंदू (जो वनस्पतीचा फार नाजूक असा भाग असतो तो) झाकलेला नसतो त्यामुळे त्यावर तणनाशकाचा लवकर परिणाम होतो परंतु तृणधान्यांच्या वनस्पतीचा वर्धनबिंदू पानांनी झाकलेला असतो व पेरे बाहेर पडेपर्यंत तो जमिनीलगत असतो. तृणधान्यांच्या पिकाची पाने अरुंद व उभी असल्यामुळे तणनाशकांचे थेंब खाली वाहत जमिनीवर पडतात. तणनाशकांचा विषारी परिणाम सर्व वनस्पतींवर सारखा नसतो. ज्या वनस्पतींवर तो जास्त होतो त्या वनस्पती मरतात. पिकांतील विशिष्ट तणे मारण्यासाठी वनस्पतींच्या या गुणधर्मांवर आधारित अशी वेचक तणनाशके शोधून काढण्यात आली आहेत. तृणधान्याची पिके, भाजीपाला (विशेषतः गाजर वर्गातील भाजीपाल्याची पिके), वाटाणा करडई आणि इतर पुष्कळ पिकांतील आणि चाऱ्याच्या पिकांतील तणांचा नाश करण्याच्या कामी वेचक तणनाशके उपयुक्त आहेत. अवेचक तणनाशके सर्व प्रकारच्या वनस्पती मारण्यासाठी वापरली जातात. वेचक आणि अवेचक हा भेद सापेक्ष आहे. वेचक आणि अवेचक तणनाशकांत (अ) पानांवर मारण्याची आणि (आ) जमिनीवर उपयोग करण्याची असे भेद असून, पानांवर मारण्याच्या वेचक आणि अवेचक तणांमध्ये (१) स्पर्शीय आणि (२) स्थानांतरणीय (दैहिक) असे पोटभेद आहेत. स्पर्शीय तणनाशकामुळे वनस्पतीच्या अगर पानांच्या ज्या भागावर तणनाशक पडते तेवढाच भाग मरतो. याउलट स्थानांतरणीय तणनाशके वनस्पतीच्या एका भागातून दुसऱ्या भागात पसरतात. प्रथम तणांची पाने मरतात आणि मागाहून तणनाशक मुळांमध्ये ओढले जाऊन मुळे आणि अन्नसंचयाचे कार्य करणाऱ्या अवयवांचा नाश होतो. या प्रकारच्या तणनाशकांना दैहिक तणनाशके अशीही संज्ञा आहे. बहुवर्षायू तणांचा नाश करण्याच्या कामी ती विशेष परिणामकारक असतात. जमिनीवर मारण्याच्या वेचक तणनाशकांचा उपयोग पीक उगवून येण्यापूर्वी अथवा उगवून आल्यावर करावयाचा असतो. सर्व प्रकारच्या वनस्पतींचा नाश करण्यासाठी अगर काही काळापर्यंत कोणतीही वनस्पती उगवणार नाही अशी तजवीज करण्यासाठी अवेचक (अथवा सर्व तणनाशी) तणनाशकांचा वापर करतात. या वर्गातील तणनाशकांत धूमक (धूम्रकारी पदार्थ) व वंध्यीकारक असे भेद आहेत. विशिष्ट पिकाची अगर वनस्पतीची लागवड करण्यापूर्वी शेतात वाढणाऱ्या सर्व वनस्पतींचा नाश करणे हा उद्देश असतो, त्या वेळी धूमकांचा उपयोग केला जातो (उदा., कार्बन डायसल्फाइड, क्लोरोपिक्रिन, व्हॅपॅम, एपटाम, सायनामाइड). या धूमकांचा जमिनीतील परिणाम चार आठवड्यांपेक्षा जास्त टिकत नाही. त्यामुळे या मुदतीनंतर धूमकाचा वापर केलेल्या शेतात पिकाची पेरणी करता येते. वंध्यीकारक तणनाशके वापरलेल्या जागी ठराविक काळापर्यंत कोणतीही वनस्पती वाढू शकत नाही. बोरेट व क्लोरेट वर्गातील अकार्बनी रसायने, सिमॅझीन, ॲट्रॅझीन, फेनुरॉन आणि मॉनुरॉन ही वंध्यीकारक तणनाशके आहेत.


अवेचक तणनाशकांचा वापर पाण्यावर अथवा पाण्याखाली वाढणाऱ्या तणांचा नाश करण्यासाठी करण्यात येतो (उदा., मोरचूद ॲक्वालीन, सोडियम आर्सेनाइट, २, ४–डी). तयार करण्याच्या कृतीप्रमाणे तणनाशकांचे पुढील प्रकार आहेत : (१) पाण्यात अगर तेलात विद्राव्य (विरघळणारी), (२) पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांचे मिश्रण), (३) पाण्यात मिसळून फवारण्याची भुकटी आणि (४) दाणेदार. बहुसंख्य तणनाशकांची लवणे पाण्यात विद्राव्य असतात. उदा., २, ४–डी,४–५ टी एमसीपीए यांची सोडियम अगर अमाइन लवण डीएनबीपीचे अमाइन लवण पेंटाक्लोरोफिनॉल टीसीए आणि डालापॉन यांचे सोडियम लवण. २,४–डी च्या एस्टर प्रकारांचे पाण्यात पायस तयार होते. सिमॅझीन, ॲट्रॅझीन, मॉनुरॉन, डाययुरॉन आणि नेबुरॉन ही पाण्यात मिसळून मारण्याच्या भुकटीच्या स्वरूपातील तणनाशके आहेत. दाणेदार तणनाशके वापरण्यास सोईस्कर असतात. कारण त्यांच्या वापरासाठी पाणी अगर भारी किंमतीची यंत्रसामग्री लागत नाही. ती हाताने अगर पाभरीने शेतात पसरता येतात.

काही महत्त्वाची तणनाशके : २,४–डी : हे वृद्धिनियंत्रक अथवा हॉर्मोन वर्गातील दैहिक वेचक तणनाशक असून ते फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. याचा शोध १९४४ च्या सुमारास लागला आणि या व अशा प्रकारच्या इतर तणनाशकांच्या शोधामुळे तणनियंत्रणाच्या शास्त्रात फार मोठी प्रगती झाली. हे तणनाशक तृणधान्याच्या पिकांतील वर्षायू आणि बहुवर्षायू रुंद पानांच्या तणांचा नाश करते, परंतु पिकाला इजा होत नाही. तुलनेने ते स्वस्त असून मनुष्य आणि जनावरे यांना त्यापासून विषबाधा होत नाही. ते ज्वालाग्राही नसल्यामुळे आणि वापरण्यास सोपे असल्यामुळे फार लोकप्रिय ठरले आहे. या तणनाशकामुळे वापरण्याची भांडी गंजत नाहीत. अतिसूक्ष्म प्रमाणातही ते प्रभावी आहे. सोडियम लवण (उदा., डायकोटॉक्स), आमइन लवण आणि एस्टरे अशा तीन स्वरूपांत ते मिळते. ते मुळावाटे व पानांवाटे शोषिले जाते. बी पेरल्यावर परंतु उगवून येण्यापूर्वी, तसेच पीक उगवून आल्यावर अशा दोन्ही अवस्थांमध्ये ते फवारण्यास उपयुक्त आहे. गहू, भात, ऊस, मका, ज्वारी, बाजरी आणि इतर तृणवर्गीय पिकांतील रुंद पानांच्या तणांचा नाश करण्यासाठी हे तणनाशक सोडियम लवणाच्या स्वरूपांत वापरले जाते. लव्हाळा या बहुवर्षायू तणाचा नाश करण्याच्या कामीही याचा वापर केला जातो. मात्र यासाठी हे तणनाशक फक्त एकदाच फवारून तणाचा संपूर्ण नाश होत नाही. याची फवारणी करते वेळी ते शेजारच्या रुंद पानांच्या पिकांवर (उदा., कापूस, टोमॅटो, भेंडी) वाऱ्याने उडून पडणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असते, कारण पिकांना तणनाशकामुळे इजा होण्याचा धोका असतो. हे तणनाशक विषारी नसले, तरी फवारताना त्याचा त्वचेशी संपर्क येणार नाही अथवा ते नाकातोंडात जाणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

, ४–५ टी : हे तणनाशक २, ४–डी पेक्षा जमिनीत जास्त दिवस टिकून राहत असल्यामुळे काष्ठमय तणांचा नाश करण्याच्या कामी उपयुक्त आहे. ते २, ४–डी पेक्षा महाग असते.

एमसीपीए :, ४–डी सारखेच हे तणनाशक आहे परंतु २, ४–डी पेक्षा जास्त वेचक आहे.

एमसीपीबी आणि २, ४–डीबी :ही तणनाशके त्यांच्या मूळ स्वरूपांत वनस्पतींना विषारी नाहीत. अशिंबावंत वनस्पतीच्या पानांत या तणनाशकांचे अनुक्रमे एमसीपीए आणि २, ४–डी मध्ये रूपांतर होऊन त्या तणांचा नाश होतो. शिंबावंत वनस्पतींना काही इजा होत नाही. वाटाण्यासारख्या शिंबावंत पिकातील रुंद पानांच्या तणांचा नाश करण्यासाठी ही तणनाशके वापरतात.

स्टॅम एफ ३४ : हे स्पर्शीय वेचक तणनाशक आहे. भारताच्या पिकातील वर्षायू गवते आणि रुंद पानांची तणे यांचा नाश करण्यासाठी उपयुक्त आहे.


सिमॅझीन : हे दैहिक वेचक तणनाशक आहे. बी पेरल्यावर उगवून येण्यापूर्वी रुंद पानांची तणे आणि गवते यांचा नाश करण्यासाठी जमिनीवर फवारणी करतात. मका, बटाटे आणि द्राक्षे या पिकांतील तणनाशासाठी फार उपयुक्त आहे. हे पाण्यात अल्प प्रमाणात विद्राव्य असल्यामुळे तणांच्या मुळांद्वारे ते शोषिले जाऊन जमिनीवरील अवयवांत पसरते.

ॲट्रॅझीन : सिमॅझिनाप्रमाणेच गुणधर्म आणि कार्यपद्धती असणारे तणनाशक. ते सिमॅझिनापेक्षा पाण्यात जास्त विद्राव्य असल्याने पीक उगवून आल्यावर देखील फवारण्यास योग्य आहे. या दोन्ही तणनाशकांच्या वापरामुळे शेतात पुष्कळ महिन्यांपर्यंत तणे उगवत नाहीत.

इपीटीसी अथवा एपटाम : शेतातील पीक उगवून येण्यापूर्वी फवारणीसाठी उपयुक्त असते. याच्या वापरामुळे गवत वर्गातील तणे उगवून आल्याबरोबर मरतात. लव्हाळ्याचे कंद नष्ट करण्याच्या कामीही हे उपयोगी आहे.

टीसीए : उसाच्या पिकातील रोपट्यांच्या अवस्थेतील सर्व वर्षायू आणि बहुवर्षायू तणांचा नाश करण्यासाठी लागणीनंतर पेरांवरील डोळे फुटून कोंब वर येण्यापूर्वी २, ४–डी या तणनाशकाबरोबर फवारण्यासाठी उपयुक्त आहे. ते मुळांवाटे आणि पानांवाटे शोषिले जाते.

मॉनुरॉन अथवा सीएमयू : उसांतील आणि संत्री–मोसंब्यांच्या बागांतील तणांचा नाश करण्यासाठी उपयुक्त असते. हे तणांच्या मुळावाटे जमिनीतून शोषिले जाते.

डालापॉन अथवा डोपॉन : वर्षायू आणि बहुवर्षायू गवतांचा नाश करण्यासाठी फार उपयुक्त असे हे दैहिक तणनाशक आहे. ते मुळांवाटे आणि पानांवाटे शोषिले जाते. इतकेच नव्हे, तर गवतांच्या नवीन फुटव्यांतही ते मुळावाटे प्रवेश करते. त्यामुळे फुटव्यांचा नाश करण्यासाठी तणनाशकाची पुन्हा फवारणी करावी लागत नाही. या तणनाशकाचा विशेष उपयोग कासे गवतामुळे पिकांच्या लागवडीस निकामी झालेल्या जमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी होण्यासारखा आहे.

वरील तणनाशकांशिवाय अनेक तणनाशके उपलब्ध आहेत. ग्रॅमाझोन, टोक ई–७५, अनसार, रॅनडॉक्स आणि लास्सो ही नवी तणनाशके आहेत.


तणनाशके वापरताना ती शिफारशीप्रमाणे वापरणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्यापासून जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी त्यांची फवारणी तणांच्या विशिष्ट अवस्थेत करणे आवश्यक आहे. निरनिराळी तणनाशके फवारण्याच्या योग्य वेळा निरनिराळ्या असतात. गव्हामध्ये २, ४–डी फवारणीची योग्य वेळ सर्व फुटवे फुटल्यानंतरची आहे. आधी फवारल्यास गव्हाच्या ओंब्या विकृत होतात व उशीरा फवारल्यास तणांची जास्त वाढ झाल्यामुळे ती नाश न पावण्याची शक्यता असते. तणनाशकांत दोन प्रकारचे घटक असतात : (१) क्रियाशील आणि (२) अक्रियाशील. दर हेक्टरी वापरावयाची क्रियाशील घटकाची मात्रा आणि त्या त्या तणनाशकातील क्रियाशील घटकाचे प्रमाण या दोन गोष्टी लक्षात घेऊन एका हेक्टरसाठी किती तणनाशक वापरावयाचे, हे ठरवावे लागते. २, ४–डी च्या सोडियम लवणात ८०% क्रियाशील घटक असल्यास आणि दर हेक्टरी १·२ किग्रॅ. क्रियाशील घटक फवारावयाचा असल्यास १००/८० x १·२ = १·५ किग्रॅ. सोडियम लवण एका हेक्टरसाठी लागेल.

तणनाशके फवारण्यासाठी उपयोगात आणलेली सर्व साधने कीटकनाशके अगर कवकनाशके फवारण्यासाठी शक्यतोवर वापरू नयेत ही काळजी कटाक्षाने घेणे आवश्यक आहे. वापरावयाची झाल्यास त्यांत तणनाशकाचा थोडाही अंश राहणार नाही अशा तऱ्हेने स्वच्छ करून ती वापरावी लागतात.

संदर्भ : 1. Crafts, A. S. Robbins, W. W. Weed ControlNew York, 1962.

           2. I. C. A. R. Handbook of Agriculture, New Delhi, 1966.

           3. Reddy, D. B. Pant Protection in India, New Delhi, 1968. 

          4. Vaidya, V. G. Sahasrabuddhe, K. R. Khuspe, V. S. Crop Production and Field Experimentation, Pune, 1972.

पाटील, ह. चिं. अभ्यंकर, ह. नी. गोखले, वा. पु.