शेतवाडीतील बांधकाम : शेतीकडे जेव्हा उदयोगाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते तेव्हा त्यात शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये मुख्यत्वे शेतवाडीच्या आकारप्रकारानुसार ठराविक प्रकारची बांधकामे फार महत्त्वाची ठरतात. भारताच्या गामीण भागात मोठया प्रमाणात पसरलेल्या शेतकरी वर्गात लहान शेतवाडया, विखुरलेली शेती, भांडवलाची कमतरता, सामाजिक चालीरीती आणि जागरूकतेचा अभाव इ. कारणांमुळे शेतवाडीमधील बांधकामांकडे दुर्लक्ष होते.
शेतवाडीमधील बांधकामांचे नियोजन करताना त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची निवड, इमारतींमधील अंतर, वाऱ्यापासून संरक्षण, आकर्षकपणा, रस्त्यांची सुविधा इ. गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जागेची निवड करताना पाण्याची उपलब्धता, जमिनीचा उतार, मातीचा प्रकार, इमारतींची दिशा, बाजारपेठेशी संलग्नता इ. सर्व बाबींचा सर्वांगीण विचार करणे महत्त्वाचे असते.
शेतीला जोडधंदा म्हणून दूधदुभत्याच्या व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन धंदयासाठी लागणारी संबंधित बांधकामे आणि त्यांचे सरासरी क्षेत्रफळ विशिष्ट रीत्या लक्षात घ्यावे लागते.
शेतवाडीमधील राहण्याचे घर हे जनावरांच्या गोठयापासून दूर अशा एकांत ठिकाणी असावे. वाऱ्याची दिशा घराकडून गोठयाकडे असली म्हणजे ते दुर्गंधी व माशांच्या उपद्रवापासून दूर राहते. घराची रचना करताना हवामानाचा विचार, सुरक्षितता, मुख्य रस्त्याशी संलग्नता या बाबी विचारात घ्याव्या लागतात. डोंगराळ प्रदेशात कमी उंच तर सपाट प्रदेशात जास्त उंच घरे बांधावीत. यांशिवाय घरासाठी चांगल्या प्रतीचे बांधकाम साहित्य, सांडपाण्याची सोय, भरपूर उजेड, हवेशीरपणा या बाबींचीही योग्य दखल घ्यावी लागते.
जनावरांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गोठे खास तयार करावे लागतात. सर्वसाधारण गोठा किंवा साखळी गोठा यामध्ये जनावरे साखळीने एका ओळीत बांधली जातात. जनावरांची संख्या जास्त असेल तर ती दोन ओळींत तोंडाकडे तोंड करून वा शेपटाकडे शेपूट करून बांधतात. चारा-पाणी आणि शेण गोळा करण्यासाठी वेगवेगळे रस्ते असतात. मोकळ्या जनावरांच्या गोठा पद्धतीत संरक्षक कुंपण व सावलीसाठी छप्पर बांधून आत जनावरे मोकळी सोडली जातात. वेगळी दोहन (दूध काढण्याची) खोली असलेल्या या गोठयाला दोहनगृह पद्धतीचा गोठा असेही म्हणतात.पेन पद्धतीचा गोठा हा पूर्ण बंदिस्त असतो. वासरे किंवा आजारी जनावरे किंवा वळू ठेवण्यासाठी तो वापरतात. मुख्य गोठयापासून हा गोठा वेगळा असतो.
शेतवाडीतच कोंबडयांसाठी स्वतंत्र निवारा महत्त्वाचा असल्यामुळे लहान प्रमाणातल्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी बांबूपासून बनविलेले खुराडे किंवा डालगे वापरतात, तर मोठया प्रमाणातल्या व्यवसायासाठी विशेष कुक्कुटगृहे तयार करतात. या सुधारित पद्धतीमुळे कोंबड्यांचे आरोग्य तसेच अंडी उत्पादन वाढते. कुक्कुटखादयाची नासधूस टळते. कुक्कुटगृह हवेशीर, दाट झाडीमध्ये आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर बांधणे सोयीचे असते. लहान मोठया पक्ष्यांची संख्या व हवामान लक्षात घेऊनच कुक्कुटगृहाचे क्षेत्रफळ ठरवावे लागते[→ कुक्कुटपालन ]. मेंढयांसाठी निवारा हा शक्यतो चराऊ कुरणांशेजारी संरक्षक कुंपण टाकून बांधतात. त्यावर सावलीसाठी छप्पर असते.
शेतवाडीवर चारा, खादय, खते, बी-बियाणे, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ, यंत्रे आणि अवजारे, धान्ये इ. साठविण्यासाठी साठवणगृहांची गरज असते.
जनावरांसाठी लागणारा वाळलेला चारा बहुतेक वेळा गंज लावून वा छपराच्या पडळीमध्ये (शेडमध्ये) साठविला जातो. हिरवा चारा दीर्घकाळ साठविण्यासाठी व त्याची प्रत राखण्यासाठी त्याचा ‘ सायलो ’ नामक साठवणगृहामध्ये ‘ मुरघास ’ तयार करतात. [→ मुरघास वैरण ].
धान्याचे साठवणगृह उंदीर, घूस, पक्षी व कीड यांपासून मुक्त, कोरडे, हवेशीर व देखभालीस सोपे असावे लागते. धान्यसाठवणुकीसाठी ते गोण्यांत/पोत्यांत भरून गोदामात ठेवतात किंवा तसेच साठवायचे असेल तर बुखारी, कोठार, मोराई वगैरे प्रकारच्या कोठीचा वापर करतात. [→ इमारती व घरे].
पडळीची सुविधा असल्यास शेतीला लागणारी सर्व प्रकारची अवजारे व यंत्रे ऊन आणि पावसापासून सुरक्षित ठेवता येतात. यासाठी तीन बाजूंनी मोकळी, तार लावून संरक्षित केलेली परंतु पुढच्या बाजूला अर्ध्या उंचीपर्यंत भिंत बांधलेली आणि वर जाळी वगैरे लावून बंदिस्त केलेल्या पडळीची उभारणी करतात.
मोठया शेतवाडीसाठी कार्यशाळेची आवश्यकता असते. सामान्यतः ८० हेक्टरपेक्षा लहान कृषिक्षेत्रासाठी सुसज्ज अशा कार्यशाळेची गरज भासत नाही. कार्यशाळा ही यंत्रे, अवजारे ठेवण्याच्या पडळीजवळ असावी. तसेच इंधनाचे भांडार, सुट्या भागाचे भांडार इ. कार्यशाळेजवळ असावे. या सर्व बांधकामांव्यतिरिक्त शेतवाडीमध्ये विहीर, तलाव इ. पाणीपुरवठा यंत्रणा, पाण्याची टाकी, शेतवाडीचे कुंपण, रस्ते, खतांचे खड्डे, सांडपाण्याची योजना आदी बाबींचा समावेश होतो.
संदर्भ : 1. Boyd, J. S. Boyd, V. T. Practical Farm Buildings, 1979.
2. Weller, J. B. Farm Buildings, 2 Vols., 1965–72.
शिंगटे, मा. ब.