शिशुधान प्राणि : स्तनी वर्गाच्या मेटॅथेरिया उपवर्गातील मार्सुपिएलिया महागणातील (काहींच्या मते मार्सुपिएलिया गणातील) प्राण्यांना हे नाव देतात. यामध्ये विविध प्रकारचे आदिम सस्तन प्राणी येतात. यातील प्राण्यांत अपूर्ण वाढीच्या म्हणजे अकालप्रसव अवस्थेत असलेल्या पिलाचा जन्म होतो व अशा पिलाची पुढील वाढ मातेच्या शरीराबाहेर तिच्या दुधावर पूर्ण होते. या काळात पिलू मातेच्या स्तनाग्रांना चिकटून राहते. बहुतेक शिशुधान प्राण्यांत मादीच्या उदरावर स्तनाग्रांच्या वर शिशुधानी नावाने ओळखण्यात येणारी पिशवी अथवा त्वचेचा झोळ (पाळ) असतो व त्यात पिलाची वाढ पूर्ण होते. म्हणून या प्राण्यांना शिशुधान प्राणी म्हणतात. अर्थात काही थोड्या प्राण्यांत शिशुधानी नसते. काही जातीत स्तनाग्रांना वेढणारी त्वचेची फक्त घडी असते, तर इतर काहींत अशा प्रकारची संरचना नसते.

प्रसार व अढळ : सध्या अस्तित्वात असलेले शिशुधान प्राणी ऑस्ट्रेलेशियन प्रदेशांत आढळतात. त्यांच्या १७५ जाती मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी, तिमोर व सेलेबीझ येथे आढळतात. ऑस्ट्रेलियात कांगारु, वॉलबी, कोआला (टेडी बिअर), वाँबट इ. शिशुधान प्राणी आढळतात. दक्षिण व मध्य अमेरिकेत यांच्या ७० जाती आढळतात (उदा., सीनोलिस्टस, ओरोलिस्टस, रायनोलिस्टस इ.), तर उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागांत काही थोड्या जाती आढळतात व दक्षिण कॅनडात सामान्य ऑपॉस्सम (डायडेल्फिस मार्सुपिॲलिस) ही एकच जाती आढळते. या शिशुधान प्राण्यांच्या आकारमानात बरीच भिन्नता आढळते. उदा., प्लॅनिगेल किंवा मार्सुपियल माऊस (प्लॅनिगेल इंग्रामी) हा सर्वात लहान शिशुधान प्राणी आहे, त्याचे डोके चपटे असून वजन ५ ग्रॅ. व उंची १२ सेंमी. असते. मोठा करडा कांगारु (मॅक्रोपस जायगँटियस) हा सर्वात मोठा शिशुधान प्राणी असून त्याचे वजन ७५ किग्रॅ., लांबी सु. ३ मी. व उंची सु. २ मी. असते.

अधिवास : क्रमविकास (उत्क्रांती) होताना त्यांची विविध रूपे तयार झाली व त्यांच्या अधिवासातही विविधता आढळते. हे प्राणी जमिनीवर, वृक्षांवर, बिळांत व पाण्यात राहणारे आहेत. कोआला (फॅस्कॉलॅरक्टॉस सिनेरियस) व वृक्ष कांगारु (डेंड्रोलॅगस) हे वृक्षवासी शिशुधान प्राणी आहेत. शोइनोबॅटस व्होलान्स हा विसर्पी (उडणारा) शिशुधान प्राणी आहे. याला पुढील व मागील पायांदरम्यान त्वचेचे पटल असते.त्यामुळे ⇨ उडऱ्या ख़ारींप्रमाणे हा प्राणी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तरंगत जाऊ शकतो. न्यू वर्ल्ड वॉटर ऑपॉस्सम (किरोनेक्टिस मिनिमस) हा एकमेव जलचर शिशुधान प्राणी आहे. वाँबट हा बिळात राहणारा शिशुधान प्राणी असून वॉलरु (कांगारु) हा पुष्कळदा गुहेत राहतो.

अन्न: पुष्कळसे शिशुधान प्राणी शाकाहारी आहेत. कांगारु हे मुख्यत्वे गवत खातात. वाँबट (वाँबॅटिडी कुल) झाडाची मुळे, कवक (बुरशीसारख्या हरितद्र्व्यरहित सुक्ष्म वनस्पति) व गवत खातात. हनी ऑपॉस्सम हे प्राणी फुलांतील मकरंद (मधुरस) खातात. विशिष्ट जातीच्या निलगिरी वृक्षांच्या पानांवरच कोआलाची उपजीविका चालते. नूम्बॅट हा प्राणी आपल्या लांब जिभेने मुंग्या व वाळवी खाऊन जगतो. ऑपॉस्सम व बँडिकूट हे प्राणी सर्वसाधारणपणे सर्वभक्षी असून ते विविध प्रकारचे वनस्पतिज द्रव्य व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणारे) प्राणी खाऊन जगतात. पुष्कळ मार्सुपियल माऊस व मार्जार कुलातील लहान स्थानिक प्राणी (डॅसियूरिडी कुल) हे कीटक व पाली, सरडे, उंदीर इ. लहान पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणारे) प्राणी खातात. टास्मेनियन डेव्हिल (सार्कोफिलस हॅरिसी) यांसारख्या अधिक मोठ्या मांसाहारी शिशुधान प्राण्यांचे भक्ष्य पक्षी व इतर सस्तन प्राणी हे असतात.

शारीरिक वैशिष्ट्ये : शिशुधान प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. मादीच्या उदरावर स्तनग्रंथींच्या वर शिशुधानी ही पिशवी असते. यांचे मागील पाय पुढील पायांपेक्षा लक्षात येतील एवढे लांब असतात (उदा. कांगारू). शेपटी लांब व मागे वळलेली असून आधारासाठी व शरीराचा तोल सांभाळण्यासाठी तिचा उपयोग होतो. या प्राण्यांची कवटी लहान असते. श्रोणी मेखलेशी (मागील पायांना आधार देणाऱ्या हाडांच्या शृंखलेशी) निगडीत दोन शिशुधानी असतात. या हाडांना शिशुधानीला आधार मिळतो. आयुष्यभर या प्राण्यांचा दातांचा एकच संच असतो. दुधाच्या दाढेची जागा उपदाढ घेते. या प्राण्यांमध्ये दातांची संख्या २२ पासून (हनी ऑपॉस्सम) ५२ पर्यंत (नूम्बॅट) असते. यांच्या प्रत्येक जबड्यात तीन उपदाढा व चार दाढा असतात. याउलट अपरास्तनीत (वार असणाऱ्या प्राण्यात) प्रत्येक जबड्यात चार उपदाढा व तीन दाढा असतात. शिशुधान प्राण्यांना मानेचे सात मणके असतात. बोटांना नख्या असतात.

तंत्रिका तंत्र : प्रमस्तिष्क गोलार्ध (मोठा मेंदू) आकारमानाने लहान असतो. गंधपालीचे आकारमान जास्त असते. मेंदूत तंतुपट्ट (मस्तिष्क गोलार्ध जोडणारा तंत्रिका-ऊतकांचा पट्ट) नसतो. अधिक क्रमविकसित सस्तन प्राण्यांपेक्षा यांचा मेंदू कमी विकसित झालेला असतो. यामुळे शिशुधान प्राणी मंद बुद्धीचे मानले जातात. [⟶ तंत्रिका तंत्र].

जनन तंत्र : नरामध्ये वृषण (पुं-जनन ग्रंथी) उदराबाहेर असणाऱ्या मुष्कात (पिशवीत) व शिश्नाच्या (मैथुन इंद्रियाच्या) थोडेसे पुढे असते. मादीला दोन योनिमार्ग व दोन गर्भाशये असतात. नर व मादी या दोन्हीत मूत्रवाहिनी दोन्ही युग्मक वाहिन्यांमधून गेलेली असते.

मादीत उजवी व डावी योनिमार्ग नलिका (बीजनलिका) असून या दोन्ही नलिकांना गर्भाशयाजवळ बाक आलेला असून त्याच्या खालील बाजूस या नलिका गर्भाशयाला जोडलेल्या असतात. अंडकोशातील स्त्रीबीज या नलिकेत येते व बाकदार भागात आलेल्या शुक्राणूद्वारे (पुं-जनन कोशिकेद्वारे) ते फलित होते.

शिशुधानी : ही पिशवी लवचिक असून तिच्यावर केस असतात. त्यामुळे तिच्यात असणाऱ्या पिलांना ऊब मिळते. बॅंडिकूटासारख्या प्राण्यात ही पिशवी खालील बाजूस उघडते, तर कांगारूंमध्ये ती वरच्या बाजूस उघडते.


वाढ : शिशुधान प्राणी हे जरायुज म्हणजे पिलांना जन्म देणारे व नियततापी आहेत. यांचा गर्भावधी ८ ते ४० दिवसांचा असतो. पिलांची वाढ गर्भाशयात होते. मात्र नवजात पिले आंधळी व अतिशय लहान (२·५ सेंमी. पेक्षा कमी लांबीची) व अपूर्ण वाढ झालेली असतात. पिलांचे पुढील पाय मोठे असून बोटांना नख्या असतात. मागील पाय लहान व कलिका अवस्थेत असतात. ऑपॉस्समाची पिले नख्या असणाऱ्या पुढील पायांच्या सहाय्याने शिशुधानीत प्रवेश करतात व स्तनाग्राला तोंड लावतात. कांगारू व वॉलबी यांच्या माद्या नवजात पिलाला ओठांनी उचलून शिशुधानीतील स्तनाग्राला चिकटवितात. पिलाला दूध चोखून प्यावे लागत नाही. ते मातेकडून त्याच्या तोंडात आपोआप येते वा सोडले जाते. अंगावर केस येऊन आपले अन्न मिळवू लागेपर्यंत पिलू शिशुधानीत राहते. याला काही आठवडे वा महिने लागतात. थोड्या कालावधीसाठी पिले शिशुधानीच्या बाहेर पडतात. नंतरही ती मातेच्या फरला पकडून तिच्याबरोबर राहतात.

सामूहिक जीवन : शिशुधान प्राणी समूहाने राहत नाहीत. मात्र प्रजनन काळात ते एकत्र येतात. कांगारू झुंडीने चरताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसतात, परंतु या समूहाचा प्रमुख नसतो. ही असामाजिकता त्यांच्या मंद बुद्धीमुळे निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. यामुळेच ते क्वचितच संपर्कासाठी आवाज काढण्याचा प्रयत्न करतात.

वर्गीकरण : शिशुधान प्राण्यांची विभागणी पुढील तीन गणांमध्ये केली जाते.

पॉलिप्रोटोडोंशिया : (बहुदंती). या प्राण्यांत ४ ते ५ कृंतक (कुरतडण्यास उपयुक्त असे) दात असतात. यातील बहुतेक प्राणी मांसाहारी आहेत. यांची शेपटी मागे वळलेली असते. यांपैकी काहींमध्ये शिशुधानी असते व काहींत ती नसते. या गणात पुढील सहा कुले आहेत : मर्मिकोबिडी (उदा., पट्टेवाला मुंगीखाऊ), डॅसियूरॉइडिया (मांसाहारी प्राणी), नोटोरिक्टीझ (शिशुधानी मोल), थायलॅसिनिडी (थायलॅसिनस), डायडेफिल्डी (ऑपॉस्सम) व पेरॅमेलिडी (बँडिकूट). यांपैकी ऑपॉस्सम या प्राण्याला जीवंत जीवाश्म म्हणतात. कारण त्याच्या शरीरात क्रिटेशस कल्पापासून (१४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या दीर्घ काळापासून) आतापर्यंत अत्यल्प बदल झालेला आहे. मांजराएवढ्या आकारमानाचा हा प्राणी वृक्षवासी आहे.

डायप्रोटोडोंशिया : (द्विदंती). या प्राण्याच्या खालच्या जबड्यात कृंतक दातांची एक जोडी, तर वरच्या जबड्यात दोन जोड्या असतात. या सर्व प्राण्यांना शिशुधानी असून बहुतेक प्राणी शाकाहारी आहेत. यात पुढील तीन कुले आहेत : फॅलँजरिडी (फॅलँजर), मॅक्रोपोडिडी (कांगारू, वॉलबी) व फॅस्कोलोमिडी किंवा वाँबॅटिडी (वाँबट).

मॅक्रोपोडिडी कुलातील कांगारू व वॉलबी हे दोन्ही प्राणी दिसायला व शरीराच्या संरचनेच्या दृष्टीने सारखेच असतात. ज्यांच्या पावलांची नखाशिवाय लांबी २५ सेंमी. पेक्षा जास्त असते त्यांना कांगारू व ज्यांची ही लांबी याहून कमी असते त्यांना वॉलबी म्हणण्याची प्रथा आहे. हे प्राणी धावत जात नाहीत, तर उड्या मारीत मारीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. वाँबटची उंची १ मी. व वजन सु. ४० किग्रॅ. असून तो बिळात राहतो. [⟶ कांगारु वाँबट].

सीनोलिस्टॉयडिया : हे प्राणी वरील बहुदंती व द्विदंती प्राण्यांच्या दरम्यानच्या अवस्थेतील प्राणी समजले जातात. यातील काही प्राणी नष्ट झाले आहेत. सीनोलिस्टस, ओरोलिस्टस, रायनोलिस्टस ही यातील काही जिवंत असलेल्या प्राण्यांची उदाहरणे होत.

क्रमविकास : शिशुधान प्राणी ही स्तनी वर्गाच्या क्रमविकासातील एक वेगळी शाखा मानली जाते. सुमारे १० कोटी वर्षांपूर्वीचे (क्रिटेशस कल्पातील) शिशुधान प्राणी माहीत झालेले आहेत. विशेषतः सु. ७·५ ते ८ कोटी वर्षांपूर्वीचे उत्तर क्रिटेशस कालीन त्यांचे जीवाश्म म्हणजे शिळारूप झालेले अवशेष आढळले आहेत. यांपैकी आधीचे पुष्कळ प्राणी हे सध्याच्या ऑपॉस्समाच्या डायडेफिल्डी कुलातील आहेत. शिशुधान प्राण्यांची उत्पत्ती पश्चिम गोलार्धात झाली. तेथून ते आधीच्या भूसेतूवरून (दोन प्रदेशांना जोडणाऱ्या जमिनीच्या पट्ट्यावरून ऑस्ट्रेलियात गेल्याचे मानतात. अपरास्तनी प्राण्यांच्या उदयाच्या आधी काही काळ स्थलांतर घडले असावे. आशिया व आफ्रिका खंडात शिशुधान प्राण्यांचे जीवाश्म आढळले नाहीत. तृतीय कल्पाच्या प्रारंभी (सु. ६·६४ कोटी वर्षांपूर्वी) ऑस्ट्रेलिया इतर खंडांपासून अलग झाला आणि येथील शिशुधान प्राण्यांमध्ये व्यापक प्रमाणावर विविधता निर्माण होऊ शकली. तेथे त्यांना इतर सस्तन प्राण्यांशी स्पर्धा करावी लागली नाही. परिणामी त्यांची संख्याही वाढली. अपरास्तनी प्राण्यांच्या अनेक गणांतील प्राण्यांची रूपे किंवा सवयी विविध शिशुधान प्राण्यांमध्ये विकसित झाल्याचे आढळून आले आहे. या आविष्काराला अभिसारी (केंद्राभिमुख) क्रमविकास म्हणतात. अशा प्रकारे चरणाऱ्या कांगारूंचे (मॅक्रोपोडिडी) जे परिस्थितीवैज्ञानिक स्थान आहे, ते स्थान इतर खंडांमध्ये विविध प्रकारच्या खुरी सस्तन प्राण्यांनी घेतलेले आहे. परभक्षी (हिंस्त्र) डॅसियूर (डॅसियूरिडी) प्राणी हे मार्जार कुलातील लहान प्राण्यांशी तुल्य आहेत, तर शिशुधानी मोल (नोटोरिक्टीझ) या प्राण्यांच्या रूप व सवयीमध्ये खऱ्या मोलप्रमाणे क्रमविकास झालेला दिसतो. ऑस्ट्रेलियातील इतर शिशुधान प्राण्यांचे रूप व सवयी या बाबतींत अस्वले, खारी, लांडगे व उंदीर यांच्याशी साम्य आहे. ऑस्ट्रेलियात कोल्हे, ससे, डिंगो (लांडग्यासारखे रानकुत्रे) इ. प्राणी माणसाने बाहेरून आणले. या प्राण्यांचा शिशुधान प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. पश्चिम गोलार्धात डायडेल्फिडी व सीनोलेस्टिडी (रॅट ऑपॉस्सम) ही शिशुधान प्राण्यांची दोनच कुले टिकून राहिली आहेत. बहुतेक काळ हे प्राणी सर्वसाधारणपणे सर्वभक्षी सवयीचे राहिले आहेत. यामुळे अपरास्तनी सस्तन प्राण्यांशी स्पर्धा करूनही ते तगून राहण्यास मदत झाली आहे. बोऱ्ह्यीनिडी कुलातील मोठ्या परभक्षी शिशुधान प्राण्यांसारखे अधिक विशिष्टीकरण झालेले प्राण्यांचे गट अपरास्तनी या अधिक प्रगत व परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या स्पर्धक प्राण्यांच्या लोंढ्याशी स्पर्धा करू शकले नाहीत. अनेक शिशुधान प्राण्यांच्या मेंदूचे आकारमान हे त्यांच्याएवढ्या आकारमानाच्या अपरास्तनी प्राण्यांच्या मेंदूच्या आकारमानापेक्षा पुष्कळच कमी असते. ही वस्तुस्थिती पुष्कळ शिशुधान प्राणी नष्ट होण्यास कारणीभूत ठरली, असे निश्चितपणे म्हणता येते. अशा रितीने ऑपॉस्सम सोडून बहुतेक शिशुधान प्राणी उत्तर व दक्षिण अमेरिकेतून नाहीसे झाले.

पहा: ऑपॉस्सम कांगारू कोआला धानीमूषक पुराप्राणिविज्ञान बँडिकूट वाँबट स्तनी वर्ग.

संदर्भ : 1. Caroll, R. L. Vertebrate Paleontology and Evolution, New York, 1988.

           2. Colbert, Edwin H Evolution of Vertebrates, New Delhi, 1982.

                                                                                      

पाटील, चंद्रकांत प.