गेगेनबाउर, कार्ल : (२१ ऑगस्ट १८२६—१४ जून १९०३). जर्मन शारीरशास्त्रज्ञ. आधुनिक तुलनात्मक शारीराचे (शरीररचनाशास्त्राचे) एक आद्य प्रणेते. त्यांचा जन्म वर्त्सबर्ग येथे झाला आणि त्यांचे शिक्षण तेथील विद्यापीठात रूडोल्फ आलबेर्ट फोन कलिकर व रूडोल्फ व्हिरकोळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. १८५५ मध्ये येना विद्यापीठात आणि १८७३ मध्ये हायड्लबर्ग विद्यापीठात शारीराचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. हायड्‌लबर्गला असताना तेथील ‘ॲनॅटॉमिकल इन्स्टिट्यूट’चे ते १९०१ पर्यंत संचालक होते.

डार्विन यांच्या नैसर्गिक निवडीच्या तत्त्वावर आधारलेल्या क्रमविकासाच्या (आधी अस्तित्वात असलेल्या साध्या जीवांपासून जास्त जटिल जीवांचा क्रमाक्रमाने विकास होण्याच्या, उत्क्रांतीच्या) कल्पनांचा त्यांनी ताबडतोब स्वीकार केला आणि डार्विन यांचे ऑरिजिन ऑफ स्पीशीज  हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी क्रमविकासाच्या दृष्टिकोनातून पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या तुलनात्मक शारीराच्या विस्तृत अभ्यासाला सुरुवात केली. आधुनिक पद्धतीने तुलनात्मक शारीराचा अभ्यास कसा करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे कंकालाचा (हाडांच्या सांगाड्याचा) सांगोपांग अभ्यास हे होय. १८७४ मध्ये त्यांचे उत्कृष्ट पुस्तक Grundriss der vergleichenden Anatomie (इंग्रजी अनुवाद १८७८) प्रसिद्ध झाले. त्यात रचनासादृश्याच्या अभ्यासाचा तुलनात्मक शारीर हा पाया आहे यावर भर दिला आहे. १८७५ मध्ये त्यांनी Morphologisches Jahrbuch  हे नियतकालिक सुरू केले व ते पुष्कळ वर्षे त्याचे संपादक होते. १९०१ मध्ये त्यांनी आत्मचरित्र प्रसिद्ध केले. ते हायड्लबर्ग येथे मरण पावले. 

जमदाडे, ज. वि.