बरुआ, पार्वतीप्रसाद : (१९ ऑगस्ट १९०४-? १९६४). आधुनिक असमिया कवी व नाटककार. जन्म सिबसागर येथे. त्यांचे आरंभीचे शिक्षण सिबसागर येथे व नंतरचे कलकत्ता येथे झाले. कलकत्ता येथून त्यांनी पदवी घेतली. त्यांचे आजोबा जदुराम बरुआ हे असमियातील आद्य कोशकार होत. कलकत्ता येथे शिकत असतानाच पार्वतीप्रसादांवर रवींद्रनाथ टागोरांचा फार मोठा प्रभाव पडला. त्यांच्या साहित्यातही हा प्रभाव दिसून येतो.

 

पार्वतीप्रसादांच्या काव्याची तीन ठळक वैशिष्ठयै दिसून येतात : (१) उत्कट भावगीतात्मकता, (२) गेयता व माधुर्य आणि (३) काहीसा गूढगुंजनात्मक सूर. या दृष्टिने त्यांचे गुनगुननी १९५७), भगा तोकातीर गीत (१९५८), लुइती (१९५९) आणि सुकुलादावर कहुवा फूल हे कवितासंग्रह लक्षणीय आहेत. त्यांच्या काव्यातील लय व शब्दकळा यांवर पूर्व आसाममधील लोकगीतांचाही प्रभाव पडलेला दिसून येतो.

 

 

लखिमी आणि सोनार सोलेंग ही त्यांची दोन संगीतिकासदृश पद्य नाटके असून ती प्रतीकात्मक आहेत. लखिमीत सरत्या शरद ऋतूस निरोप व सुगीदेवता हेमंत ऋतूचे स्वागत आहे. हेमंताचे स्वागत आसाममधील लोक ‘बिहू’ नावाचा उत्सव साजरा करून करतात ह्या संगीतिकेत पार्वतीप्रसादांनी हेमंत ऋतूचे वातावरण मोठ्या मार्मिकपणे आणि कौशल्याने शब्दांकित केले आहे. सोनार सोलेंग मध्ये अनेक कर्णमधुर प्रतिकात्मक गीतांतून नाट्याचा विकास होताना दिसतो. माटरलिंकच्या द ब्ल्यू बर्डसारखी या संगीतिकेची रचना आहे. बीन बरागी हे त्यातील केंद्रीभूत पात्र आहे. ‘सोनार सोलेंग’ म्हणजे ‘सर्वोच्च आनंद’. हा आनंद बाहेर कुठेही नसून तो आपल्या जीवनातच सामावलेला आहे. म्हणूनच त्याचा प्रत्येक क्षणी उत्कटत्वे अनुभव घ्यायला हवा, अशी कवीची भूमिका आहे. यातील सर्वच गीते उत्कृष्ट व नाट्यानुकूल आहेत.

 

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं.) सुर्वे, भा.ग. (म.)