माँबा : आफ्रिकेतील अत्यंत भीतिदायक साप. इलॅपिडी या सर्पकुलाच्या डेंड्रॅस्पिस या प्रजातीतील जातींना माँबा म्हणतात. यांपैकी काळा माँबा (डेंड्रॅस्पिस पॉलिलेपिस) व हिरवा माँबा (डे. अँगुस्टिसेप्स) या जाती अधिक परिचित आहेत.

वाळवंटी प्रदेश सोडल्यास आफ्रिकेमध्ये सर्वत्र आणि विशेषतः आफ्रिकेच्या दक्षिण, पूर्व व मध्य भागांत हे साप आढळतात. या सापांचे शरीर सडपातळ असून त्यांची लांबी सामान्यतः १·८ ते २·८ मी. असते. पण ४·३ मी. पर्यंत लांबीचे सापही आढळतात. हे साप अंशतः वृक्षवासी असून ते अतिशय चपळ आहेत. ते झाडांवर सहजपणे चढतात व जमिनीवरही वेगाने सरपटत जाऊ शकतात. काहींचा सरपटण्याची वेग १०० मी. अंतरासाठी ताशी सु. ३० किमी. असल्याचे आढळले आहे. याचे डोके लहान असते. पण ते मानेपासून वेगळे ओळखू येते. याचे डोळे व अंगावरील खवले मोठे असतात. हा नागाशी निगडित असल्याने याला वृक्षवासी नाग असेही म्हणतात. परंतु याला नागासारखी फणा नसते. तथापि तो भय दाखविण्यासाठी आपली मान फुगवू शकतो. याला आपला पुढील भाग सरळ ताठ उभा करता येतो. याचे विषारी दात तोंडामध्ये अगदी पुढे आलेले असून ते मोठे व जवळजवळ उभे असतात. याचे खालील दातही अतिशय मोठे असतात. झाडावर लोंबकळत असताना किंवा शरीर ताठ उभे करून हा भक्ष्याच्या डोक्याला वा खांद्याला दंश करतो. याचे विष अतिशय जहाल असते. वृक्षावरील लहान प्राणी (छोटे पक्षी, सरडगुहीरा इ.) उंदीर, बेडूक वगैरेवर या सापांचा उदरनिर्वाह चालतो. मादी एका वेळेस ९–१२ अंडी घालते व ती तशीच ठेवते. अंडी उबविण्याचे काम नर वा मादी करीत नाहीत.

काळा माँबा : इथिओपिया, सोमालीलँड, नाताळ व नैर्ऋत्य आफ्रिका या प्रदेशात हा मुख्यत्वे आढळतो. याची लांबी ४·३ मी. पर्यंत असून जगातील सर्वांत मोठ्या विषारी सापांमध्ये केवळ नागराजाची लांबी यापेक्षा अधिक आहे. हा उघड्या खडकाळ भागात आढळतो व वृक्षावरही राहतो. लहान असताना याचा रंग हिरवा असतो व नंतर तो गडद तपकिरी व काळा होतो. माँबामधील सापांमध्ये हा सर्वांत धोकादायक, भयानक व आक्रमक वृत्तीचा असून डिवचले नसताही हा हल्ला करतो. याने एका वेळेस ओकलेल्या विषाने दहा माणसे मरू शकतील इतके ते जहाल असते. याच्या विषाचे परिणाम पुढीलप्रमाणे होत जातात : दंशाच्या जागी वेदना होतात, सूज येते, तोंडाला लाळ सुटते. स्वरतंतूंचा पक्षाघात होते, घाम येतो. उलट्या होतात, अस्वस्थ वाटते, ग्लानी येते, बेशुद्धी येते व शेवटी मृत्यू होतो. या विषावरील प्रतिविष (उतारा) उपलब्ध आहे. मात्र विषाविरुद्ध उपचार न झाल्यास मृत्यू अटळ असतो.

हिरवा माँबा : याची लांबी २·७ मी. पर्यंत असते व याचा रंग आयुष्यभर हिरवा असतो. हा अधिक प्रमाणात वनामध्ये व झुडपांत राहतो. हा कमी आक्रमक आहे. 

जेमसन्स माँबा : (डें. जेमसनी). हा मध्य आफ्रिकेतील पर्जन्यवनांच्या व सरोवरांच्या भागात आढळतो. याच्या अंगावर मुख्यत्वे हिरवट व कधीकधी करडी वा तपकीरी छटा असते आणि याची शेपटी काळी तरी असते अथवा काळी व हिरवी असते.

पश्चिम आफ्रिकी माँबा : (डें. व्हिरिडीस). या मध्यम लांबीच्या सापाच्या अंगावर गडद कडा असलेले हिरवे खवले असतात.

ट्रान्सव्हाल माँबा : (डें. माँबा). ही जाती विशेष महत्त्वाची नाही.

संदर्भ : Pope, C. H. The Reptile World London, 1960.

कर्वे, ज. नी. ठाकूर, अ. ना.