एडिंग्टन, सर आर्थर स्टॅन्ली : (२८ डिसेंबर १८८२ – २२ नोव्हेंबर १९४४). सुप्रसिद्ध इंग्रज ज्योतिर्विद. तार्‍यांचे गतिविज्ञान, त्यांचे अंतरंग तसेच ðसापेक्षता सिद्धांत यांसंबंधीच्या संशोधनामुळे अर्वाचीन ज्योतिर्विदांत त्यांना मानाचे स्थान मिळालेले आहे. वेस्टमोरलंडमधील केंडल येथे त्यांचा जन्म झाला. ओएन्स कॉलेज, मँचेस्टर व ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे त्यांचे शिक्षण झाले. केंब्रिज येथून १९०४ मध्ये ते  ‘रँग्‍लंर’ झाले व १९०७ साली त्यांना स्मिथ पारितोषिकाचा मान मिळाला. त्यानंतर ते ट्रिनिटी कॉलेजचे फेलो, १९१३ मध्ये ज्योतिषशास्त्राचे प्लुमियन प्राध्यापक आणि नंतर मृत्युपावेतो केंब्रिज विद्यापीठाच्या वेधशाळेचे प्रमुख होते.

गुरुत्वाकर्षण आणि वायू दाब यांच्या बरोबरच प्रारण दाब (तरंगरूपी उर्जेचा दाब) हाही तार्‍यांच्या समतोलास कारणीभूत असलेला एक मोठा घटक आहे, हा महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी १९१६ मध्ये मांडला.

आइन्स्टाइन यांचा व्यापक सापेक्षता सिद्धांत सर्वमान्य होण्यास एडिंग्टन यांचे प्रयत्न, संशोधन व लेखन हे कारणीभूत आहेत. द मॅथेमॅटिकल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी (१९२३) व स्पेस, टाइम अँड ग्रॅव्हिटेशन (१९२०) या आपल्या ग्रंथांद्वारे त्यांनी सापेक्षता सिद्धांताच्या उपपत्तीत महत्त्वाची व मौलिक भर घातली. सूर्यबिंबाजवळून तार्‍यांचा प्रकाश जाताना गुरुत्वाकर्षणामुळे तो आतील बाजूस वळतो, या आइन्स्टाइन यांनी सापेक्षता सिद्धांतावरून मांडलेल्या विधानाची सत्यता २९ मे १९१९ च्या सूर्यग्रहणाच्या वेळी पडताळून पाहण्यात आली. त्यावेळी या ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेत गेलेल्या तुकडीचे नेतृत्व एडिंग्टन यांच्याकडे होते. तेथे त्यांनी घेतलेल्या वेधांवरून आइन्स्टाइन यांच्या विधानाची शास्त्रज्ञांना खात्री पटली.

तार्‍यांची दीप्ती त्यांच्या वस्तुमानांवर अवलंबून असते तार्‍यांमध्ये बव्हंशी हायड्रोजन असतो सीफीड चल तारे [ज्यांची भासमान प्रत स्थिर नाही असे एका विशिष्ट गटातील तारे, → तारा] स्पंदमान असतात पाण्यापेक्षा सूर्य घनतेने जास्त असूनही तो व लघुतार्‍यांखेरीज इतर सर्व तारे पुष्कळ दाट असूनही वायुरूपच आहेत हे त्यांच्या संशोधनाचे महत्त्वाचे निष्कर्ष आहेत. द इंटर्नल कॉन्स्टिट्यूशन ऑफ द स्टार्स (१९२६) या ग्रंथात त्यांनी प्रतिपादिलेल्या सिद्धांतावरच ताऱ्यांच्या उत्क्रांतीविषयीचा आधुनिक सिद्धांत आधारलेला आहे. ðअवकाशकालाची वक्रता-त्रिज्या त्यांनी गणिताने काढली. ðपुंजयामिकी व सापेक्षता सिद्धांत यांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला व या विषय़ावर द काँबिनेशन ऑफ रिलेटिव्हिटी थिअरी अँड क्वांटम थिअरी (१९४३) हा ग्रंथ लिहिला.

विश्वरचनेसंबंधी एडिंग्टन यांनी केलेल्या विवेचनामुळे विश्वविषयक विचारांना व संशोधनाला नवी दिशा मिळाली. या विषयासंबंधीचे स्ट्रक्चर ऑफ द युनिव्हर्स (१९१४), स्टार्स अँड ॲटम्स (१९२७) आणि द एक्स्पांडिंग युनिर्व्हस (१९३३) हे त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य सुशिक्षितांना भौतिकीतील नवीन उपपत्तींचा परिचय करून देण्यासाठी व त्यांवर आधारलेले आपले तत्त्वज्ञान विशद करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत द नेचर ऑफ द फिजिकल वर्ल्ड (१९२८) आणि न्यू पाथवेज इन सायन्स (१९३५) हे ग्रंथ प्रमुख आहेत. द फिलॉसॉफी ऑफ फिजिकल सायन्स (१९३९) ह्या ग्रंथात विज्ञानाच्या स्वरूपासंबंधीचा आपला दृष्टिकोन त्यांनी सुव्यवस्थित रीतीने व तात्त्विक पातळीवरून मांडला आहे. ह्या दृष्टिकोनाला अनुसरून भौतिकीतील उपपत्ती निष्पन्न करण्याचा व त्यांची व्यवस्था लावण्याचा त्यांचा प्रयत्न रिलेटिव्हिटी थिअरी ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स (१९३६) आणि फंडामेंटल थिअरी (१९४६, सर ई. टी. व्हिटाकर संपादित) ह्या ग्रंथांत आढळतो.

विज्ञानाच्या स्वरूपासंबंधीचे एडिंग्टन यांचे मत थोडक्यात पुढीलप्रमाणे मांडता येईल : बाह्य जगापासून आपल्याला वेदने लाभतात. ह्या वेदनांच्या आशयाशीच आपला साक्षात परिचय असतो बाह्य जगाशी नसतो. म्हणून बाह्य जगाचे आपल्याला साक्षात ज्ञान होऊ शकत नाही. पण आपल्याला लाभणाऱ्या वेदनांच्या आशयात आपल्याला परस्परसंबंध, आकृतिबंध आढळून येतात. आपली वेदने आपल्याला बाह्य जगाकडून लाभत असल्यामुळे त्यांच्यातील परस्परसंबंध, त्यांचे आकृतिबंध हेही बाह्य जगाकडूनच आपल्याला लाभलेले असतात त्यांचे मूळ बाह्य जगात असते. तेव्हा आपल्या वेदनांच्या आकृतिबंधांपासून बाह्य जगाच्या आकृतिबंधांचे अनुमान आपण करू शकतो. विज्ञानात आपण अशी अनुमाने करतो. सारांश विज्ञानात आपल्याला बाह्य जगाच्या आशयाचे ज्ञान होत नाही, तर त्याच्या आकाराचे ज्ञान होते.


आपली ज्ञानेंद्रिये बाह्य जगाकडून लाभणार्‍या चेतकांना, वेदनांच्या स्वरूपात प्रतिसाद देतात एवढेच नव्हे, तर ह्या चेतकांची निवडही ती करतात. आपल्या बुद्धीच्या प्रकृतीला अनुसरून ही निवड करण्यात येते. म्हणजे आपल्या वेदनांत आढळून येणारे आकृतिबंध आपल्या बुद्धीच्या प्रकृतीमुळे निश्चित झालेले असतात, म्हणून ते बुद्धीग्राह्य असतात. आपल्या बुद्धीने निश्चित केलेल्या मूळ आकृतिबंधापासून अधिक गुंतागुंतीचे आकृतिबंध आपण गणितात निष्पन्न करतो. आपल्या वेदनांच्या आशयामध्ये जेव्हा असा एखादा आकृतिबंध मूर्त झालेला आपल्याला आढळतो, तेव्हा एक वैज्ञानिक उपपत्ती सिद्ध होते. वेदनांच्या आशयांत मूर्त झालेला, त्यांना परस्परांशी संबंधित करणारा आकृतिबंध म्हणजेच वैज्ञानिक उपपत्ती होय. पण याचा अर्थ असा होतो, की निरीक्षणाने आपल्याला ज्ञात होणाऱ्या घटनांचा आकृतिबंध आपण शोधून काढू शकतो निसर्गनियम आपण शोधून काढू शकतो, ह्याचे कारण आपल्याला प्राप्त होणार्‍या वेदनांमध्ये सुरुवातीपासूनच बुद्धीने दिलेला आकृतिबंध अनुस्यूत असतो. पण आपली वेदने आपल्याला बाह्य जगापासून लाभलेली असतात. तेव्हा आपल्या वेदनांतील आकृतिबंध म्हणजे बाह्य जगाच्या आकृतिबंधाचे प्रतिबिंब असते. पण आपल्या वेदनांचा आकृतिबंध आपल्या बुद्धीपासून त्यांना लाभलेला असतो. तेव्हा बाह्य जगाच्या आकृतिबंधाचाही उगम बुद्धीतच असला पाहिजे, असा निष्कर्ष एडिंग्टन यांनी काढला. बाह्य जगाची घडणही बुद्धीनेच केली असली पाहिजे. जेम्स जीन्स यांच्या शब्दांत ‘ईश्वर गणितज्ञ असला पाहिजे’.

एडिंग्टन यांच्या भौतिकीतील मोठ्या आणि रास्त प्रतिष्ठेमुळे विज्ञानाच्या स्वरूपाविषयीच्या त्यांच्या मतालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली, सर्वसाधारण श्रध्दाळू माणसाला रुचेल असेच हे मत असल्यामुळेही, त्याला बरीच लोकप्रियता व मान्यता लाभली. पण हे मत बऱ्याच तर्काभासांवर आधारलेले आहे आणि स्यूझन स्टेबिंगसारख्या अनेक तत्त्ववेत्त्यांनी त्याचे खंडन केले आहे.

एडिंग्टन यांची लंडनच्या ‘रॉयल सोसायटी’ च्या फेलोपदावर १९१४ मध्ये निवड झाली. १९२८ मध्ये सोसायटीचे रॉयल मेडल, १९३० मध्ये नाइट बॅचलर आणि १९३८ साली ऑर्डर ऑफ मेरिट हे बहुमान त्यांना मिळाले. ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.

संदर्भ : 1. Dinge, M. Sources of Eddington’s Philosophy, London, 1954.

           2. Stebbing, S. Philosophy and Physicists, London, 1937.

           3. Whittaker, E. T. Eddington’s Principles in the Philosophy of Science, London, 1951.

रेगे, मे. पुं. मराठे, स. चिं.