डेनेब : हंस (सिग्नस) या तारकासमूहातील प्रमुख तारा. ज्योतिषशास्त्रात तो आल्फा सिग्नी या नावाने ओळखतात. समूहाचा आकार हंसपक्षी मानला, तर शेपटाच्या टोकाशी किंवा या समूहाच्या नॉर्थ क्रॉस या नावानुसार क्रॉसच्या शीर्षभागी हा तारा आहे. हा A2 वर्णपटीय प्रकारचा श्वेत तारा [⟶ तारा] असून होरा २० ता. ३९·७ मि., क्रांती ४५° ५८·६’ [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति], दृश्य प्रत १·३, निरपेक्ष प्रत – ६·२ [⟶ प्रत], सूर्याच्या ६० हजारपट तेजस्वी व सूर्यापासून १,६०० प्रकाशवर्षे दूर अशी याची सामान्य माहिती आहे. दिशा समजण्यासाठी नावाडी या ताऱ्याचा पूर्वी उपयोग करीत असत. धानाब (शेपटी) या अरबी शब्दापासून डेनेब नाव पडले. याला पद्मराग, हंसपुच्छ व ॲरिदेद अशीही नावे आहेत. 

पहा : हंस–१.

ठाकूर, अ. ना.