रसेल, हेन्री नॉरिस : (२५ ऑक्टोबर १८७७ – १८ फेब्रुवारी १९५७). अमेरिकन खगोल भौतिकीविज्ञ. ताऱ्यांची निरपेक्ष दीप्ती आणि तापमान यांनुसार त्यांचे वर्गीकरण दाखविणाऱ्या हर्ट्झस्प्रंग–रसेल अथवा ह. र. आकृती [⟶ खगोल भौतिकी] या नावाने ओळखण्यात येणाऱ्या आलेखाचे एक जनक. याशिवाय त्यांनी युग्मताऱ्यांच्या कक्षांची, द्रव्यमानांची व अंतरांची निश्चिती, ताऱ्‍याच्या उत्क्रांतीविषयीची उपपत्ती, ताऱ्‍याची अंतर्गत रचना आणि त्याच्या वातावरणातील घटक वगैरे विषयांवरही संशोधन केले असून विसाव्या शतकातील ज्योतिषशास्त्रीय अध्ययनावर त्यांच्या संशोधनाचा पुष्कळच प्रभाव पडला आहे.

रसेल यांचा जन्म ऑयस्टर बे (न्यूयॉर्क) येथे झाला. त्यांचे आधीचे शिक्षण घरी व प्रिन्स्टन येथील शाळेत झाले. नंतर त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठाची पदवी (१८९७) व पीएच्. डी. (१९००) संपादन केली. काही काळ केंब्रिज विद्यापीठाच्या वेधशाळेत छायाचित्रण पद्धतीने ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्याचे काम केल्यावर १९०५ साली ते प्रिन्स्टन विद्यापीठात ज्योतिषशास्त्राचे निदेशक म्हणून दाखल झाले. तेथे ते सहाय्यक प्राध्यापक (१९०८) आणि प्राध्यापक व वेधशाळेचे संचालक (१९११) झाले. १९२१ साली माउंट विल्सन वेधशाळेतील सहयोगी संशोधक या अतिरिक्त पदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आली. १९२७ साली त्यांची ‘सी. ए. यंग संशोधन प्राध्यापक’ म्हणून नेमणूक झाली. निवृत्तीनंतर त्यांनी लीक व हार्व्हर्ड वेधशाळांत संशोधन चालू ठेवले.

युग्मताऱ्‍यांच्या कक्षेतील वर्तनावरून त्यांची द्रव्यमाने तसेच कक्षा आणि द्रव्यमाने त्यांच्यावरून त्यांची अंतरे काढण्याची पद्धती त्यांनी विकसित केली. त्यांनी पिधानकारी [⟶ पिधान] युग्मताऱ्‍यांच्या तेजस्वितेतील चढ उताराचे विश्लेषण करून त्यांच्या आकाराचा अंदाज करता येतो असे दाखविले. तसेच हे तारे एकमेकांपासून जेथे किमान अंतरावर असतात, त्या कक्षेवरील बिंदूच्या गतीच्या अभ्यासावरून सहचर ताऱ्यांची अंतर्रचना कळू शकते, असे त्यांनी दाखविले.

ताऱ्यांच्या अंतराविषयी आधी केलेल्या संशोधनातून त्यांनी पुढील निष्कर्ष काढला. ताऱ्यांचे दोन मुख्य वर्ग असून एका वर्गातील तारे दुसऱ्‍यातील ताऱ्यांपेक्षा पुष्कळच तेजस्वी आहेत. डॅनिश ज्योतिर्विद ई. हर्टझस्प्रंग यांना या दोन वर्गांचे वर्णपट सारखे असल्याचे आढळले, तर रसेल यांनी या ताऱ्यांची दीप्ती व वर्णांक यांचा आलेख काढून ताऱ्‍याची खरी दीप्ती व वर्णपटीय प्रकार यांमध्ये निश्चित संबंध असल्याचे दाखविले. आपले हे निष्कर्ष रसेल यांनी डिसेंबर १९१३ मध्ये जाहीर केले व १९१४ साली ह. र. आकृती प्रसिद्ध केली. अशा तऱ्‍हेने या आकृतीमुळे महातारे, लघुतम तारे, महत्तम तारे, प्रमुख श्रेणींचे तारे इ. असे ताऱ्यांचे वर्गीकरण करणे शक्य झाले. [⟶ खगोल भौतिकी तारा].

या आकृतीतून मिळालेल्या माहितीमुळे ताऱ्याच्या उत्क्रांतीविषयीच्या त्यांच्या उपपत्तीला चालना मिळाली. ताऱ्याचा वर्णपट, द्रव्यमान व दीप्ती यांमध्ये कालानुसार होणाऱ्या बदलांवर या उपपत्तीत भर दिला आहे. त्यांची ही उपपत्ती १९२९ साली सारांशरूपात प्रसिद्ध झाली. तीनुसार तारे प्रारंभी खूप तेजस्वी, थंड, तांबड्या ज्योती असतात. नंतर त्यांचे आकुंचन होत जाते, आकुंचनाने तापमान वाढत जाते व रंगात तांबडा, पिवळा, पांढरा व निळा असा बदल होतो. आकुंचनाने घनता वाढते व वाढलेल्या घनतेचा पुढील आकुंचनास

प्रतिबंध होतो. परिणामी ताऱ्‍याचे तापमान व तेजस्विता कमी होत जातात आणि लहान, थंड, तांबड्या ज्योती मागे शिल्लक रहातात. अशा तऱ्‍हेने हे दोन प्रकारचे तारे उत्क्रांतीच्या आरंभीची व अखेरची अवस्था दर्शवितात, असे त्यांचे मत होते. आकुंचनानंतर ताऱ्यांच्या अंतर्भागी औष्णिक अणुकेंद्रीय प्रक्रियेस चालना मिळते व द्रव्यमानाचे रूपांतर उर्जेत होऊ लागते. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर ताऱ्यांच्या उत्क्रांतीच्या प्रतिरूपात बदल झाले.

वर्णपटीय काळ्या शोषण रेषांच्या विश्लेषणाच्या आधारे सूर्याच्या वातावरणात ५६ मूलद्रव्ये असल्याचे त्यांनी दाखविले व त्यांचे प्रमाणही काढले. सूर्य व इतर ताऱ्‍यांच्या वातावरणात हायड्रोजन विपुलपणे आढळतो असेही त्यांनी दाखविले. निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या वर्णपटांच्या अभ्यासावरून अणूची अंतर्रचना समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. तसेच निरनिराळ्या ताऱ्यांच्या वातावरणांचा तुलनात्मक अभ्यासही त्यांनी केला. अंतराळात सूर्यकुलासारख्या लक्षावधी ग्रहमाला असून त्यांपैकी काहींत जीवसृष्टी असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली होती.

ताऱ्यांच्या वातावरणातील अणूंच्या आयनीभवनासंबंधात (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट निर्माण होण्याच्या क्रियेच्या संबंधात) भारतीय शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांची जी उपपत्ती होती, ती अनेक प्रकारचे वायू अणू असलेल्या परिसरात लावता येईल अशा तऱ्‍हेने रसेल यांनी अधिक व्यापक केली आणि सूर्यावरील काळ्या डागांकडून आणि दीप्तिमंडलापासून येणाऱ्या प्रकाशाच्या वर्णपटातील काळ्या शोषण रेषांच्या तौलनिक अभ्यासाने दोन्ही उपपत्तींची सत्यता पडताळून पाहिली.

रसेल यांनी पाचशेहून जास्त लेख व पुढील पुस्तके लिहिली : डिटरमिनेशन्स ऑफ स्टेलर पॅरॅलॅक्स (१९११), अँस्ट्रॉनॉमी (चार्ल्स यंग त्यांच्या पाठ्यपुस्तकाची सुधारित आवृत्ती १९२६ -२७), द सोलर सिस्टिम अँड इट्स ओरिजीन (१९३५) व द मासेस ऑफ द स्टार्स (सी. ई. मुर हे सहलेखक १९४०). धर्म व नीतिमत्ता त्यांच्याशी विज्ञानाचे संबंध परस्परपूरक असतात, असे त्यांचे मत होते. त्यांनी आपली ही मते व्याख्यानमालेद्वारे मांडली व ती फेट अँड फ्रीडम (१९२७) या पुस्तकाद्वारे प्रसिद्धही केली.

रसेल यांना देशी व परदेशी संस्था, संघटना, विद्यापीठे वगैरेंकडून अनेक सन्मान मिळाले. उदा., ड्रेपर, ब्रूस, रम्फर्ड, फ्रँक्लिन इ. पदके लालांद पारितोषिक, अमेरिकन सोसायटी ऑफ अँस्ट्रॉनॉमीचे अध्यक्षपद, लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व वगैरे. रसेल प्रिन्स्टन येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.