वेधशाळा, ज्योतिषशास्त्रीय : प्रकाशीय ⇨दूरदर्शक (दुर्बिण) किंवा ⇨रेडिओ दूरदर्शक अथवा अवकाश दूरदर्शकासाठी लागणारी इलेक्ट्रॉनीय सामग्री, तसेच या दूरदर्शकाद्वारे घेण्यात येणाऱ्या खगोलीय वेधांचे वा निरीक्षणांचे अध्ययन करणारे ज्योतिर्विद यांच्यासाठी ज्या इमारतीत (किंवा इमारतीच्या संकुलात) सोय केलेली असते, तिला ज्योतिषशास्त्रीय वेधशाळा म्हणतात. येथून सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू, अभ्रिका, दीर्घिका (तारामंडळे) व इतर खस्थ पदार्थ आणि खगोलीय आविष्कार यांची निरीक्षणे नुसत्या डोळ्यांनी किंवा अशा दूरदर्शकांनी केली जातात आणि त्यांवरून खस्थ पदार्थाची गती, स्थान (स्थिती) इत्यादींचा विविध पद्धतींनी अभ्यास केला जातो. १९९७ सालच्या सुमारास जगातील किमान ४३ देशांमध्ये अशा ३०० हून अधिक वेधशाळा कार्यरत होत्या. यांमध्ये राष्ट्रीय, संशोधन प्रकल्पासाठीच्या, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या, खाजगी इ. प्रकारच्या वेधशाळा आहेत. अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे पन्नासाहून अधिक वेधशाळा होत्या तर दक्षिण गोलार्धात फक्त १५ टक्के वेधशाळा होत्या. यांशिवाय खाजगी छोट्या पुष्कळ वेधशाळा व दूरदर्शकाद्वारे ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणे करणारे हजारो हौशी आकाशनिरीक्षक पण हे काम करतात. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ५-६ अवकाश वेधशाळा असून ⇨रेडिओ संदेशवहन प्रणाली व संगणक यांच्या मदतीने जमिनीवरून त्यांचे नियंत्रण केले जाते. आत दूरदर्शक बसविलेल्या, अतिशय उंचावरून उडणाऱ्या एका विमानातूनही ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणे केली जातात.

वेधशाळेचा विकास ज्योतिषशास्त्राच्या प्रगतीशी निगडित असून हिचे सामान्यपणे चार कालखंड मानता येतील. प्रकाश नेहमी सरळ रेषेत जातो ओळंबा बिनचूक उभी दिशा दाखवितो आणि द्रवाचा स्थिर सपाट पृष्ठभाग क्षितिजपातळी दर्शवितो या वैज्ञानिक तत्त्वांच्या आधारावर पहिल्या कालखंडात स्थानीय ज्योतिषशास्त्राचा विकास झाला. या कालखंडात वेध घेण्याची साधने अगदी साधी होती. उदा., सरळ मोजपट्टी, ओळंबा, पाणसळ, छेदणाऱ्या काठ्या वा दंड, उभ्या काठ्या, कोनमापक, वेधयंत्र, दृष्टिक्षेपक नलिका आणि भिंतीत तयार केलेली आणि सहज हाताळता येतील वा टांगून ठेवता येतील अशी ⇨चतुर्थयंत्रे. जयपूर, दिल्ली, उज्जैन, मथुरा व बनारस येथे सवाई जयसिंगांनी (१६६९–१७४३) बांधलेल्या वेधशाळांमध्ये याच तत्त्वांचा उपयोग करून घेतला होता [→ जंतरमंतर]. दुसऱ्या कालखंडात प्रकाशकिरणांचे नियमित परावर्तन व प्रणमन (वक्रीभवन) होते, या तत्त्वाचा उपयोग करणारे प्रकाशीय दूरदर्शक निर्माण होऊन गतिविषयक ज्योतिषशास्त्राची प्रगती झाली. नंतरच्या कालखंडात वर्णपटलेखकाच्या साहाय्याने प्रकाशाचे पृथक्करण करणे शक्य होऊन त्याचा ज्योतिषशास्त्रीय अर्थ लावण्याचे शास्त्र प्रगत झाले व ⇨खगोल भौतिकी ही ज्योतिषशास्त्राची शाखा पुढे आली. यानंतरच्या काळात ⇨रेडिओ ज्योतिषशास्त्राचा उदय होऊन डोळ्यांना न दिसणाऱ्या खगोलीय घटकांचे अस्तित्व उघड होऊ लागले. नंतरच्या अवकाश ज्योतिषशास्त्रामुळे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन घेतलेल्या वेधांद्वारे आकाशगंगा व उच्च ऊर्जेने भरलेल्या उर्वरित विश्वातील गूढ माहिती मिळण्यास सुरुवात झाली. दोन अब्ज किमी. अंतरावरील आंतरग्रहीय अवकाशात अतिसुधारित कॅमेरे व प्रारणमापक (तरंगरूपी ऊर्जा म्हणजे प्रारणाच्या रूपातील ऊर्जा मोजणारे साधन) ही उपकरणे पाठवून त्यांच्यामार्फत ग्रह व उपग्रह यांचे अधिक जवळून छायाचित्रण करण्यात आले. मग मंगळावर अवकाशयान पाठवून तेथील मातीचे विश्लेषण करण्यात आले. [→ ज्योतिषशास्त्र].

इतिहास : बॅबिलोनिया, ग्रीस, ईजिप्त इ. पुरातन संस्कृतींमध्ये केवळ धार्मिक सणांच्या तारखा ठरविण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय वेध घेण्याची परंपरा पुरोहित वर्गाकडे होती. हे वेध जेथून कोणत्याही साधनाशिवाय म्हणजे नुसत्या डोळ्यांनी घेतले जात, त्या स्थळाचे नंतर मंदिरात रूपांतर होत असे. त्या काळी बहुधा मंदिरांमध्ये दिशासाधनाची प्रथा अंमलात आणली जात असे. काही विशिष्ट दिवशी सूर्योदय, सूर्यास्त अथवा विशिष्ट ताऱ्याचा उदय होण्याच्या दिशेकडे येतील अशा रीतीने अशा मंदिरातील दारांची योजना केलेली असे (उदा., ईजिप्तमधील कार्‌नॅक तारामंदिर). तंजावरच्या (तमिळनाडू) बृहदीश्वर मंदिराच्या बांधकामात दिशाविषयक विचार केलेला दिसतो.

किमान चार हजार वर्षांपूर्वीपासून माणूस ताऱ्यांचे पद्धतशीर निरीक्षण करीत आला आहे. उभ्या स्तंभाच्या संदर्भात तारा पाहून किंवा सूर्यामुळे पडणाऱ्या सावल्यांचे मापन करून दिशा निश्चित करीत. इ. स. पू. सु. ५०० पर्यंत अशी निरीक्षणे मुख्यत्वे ऋतू अथवा पूर यांविषयीच्या अंदाजासाठी व शेतीच्या कामांची आखणी करण्यासाठी वापरीत. मेक्सिकोमधील ॲझटेक लोक मुख्यत: धार्मिक सणावारांचे दिवस निश्चित करण्यासाठी अशी निरीक्षणे करीत.

सूर्य, चंद्र व तारे यांच्या स्थानांचा अभ्यास करण्यासाठी पूर्वी वेधशाळा बांधण्यात आल्या होत्या. अशी सर्वांत जुनी इमारत दक्षिण इंग्लंडमधील स्टोनहेंज (विल्टशर) येथे आहे. हे दगडी लाद्यांचे बांधकाम इ. स. पू. २८००–१५०० दरम्यानचे असावे. ईजिप्तमधील हीलिऑपोलीस व सेर्सेसुरा दरम्यानची वेधशाळा युडॉक्सस (इ. स. पू. सु. ४००–३५०) या ग्रीक ज्योतिर्विदांनी वापरली होती. नंतर त्यांनी नायडस (आशिया मायनर) येथे दुसरी वेधशाळा बांधली. दुसरे टॉलेमी (फिलाडेल्फस इ. स. पू. ३०८–२४६) या राजांच्या कारकीर्दीत ॲलेक्झांड्रिया ( ईजिप्त) येथे एक वेधशाळा उभारली होती. इ. स. पू. १४० मध्ये ⇨हिपार्कस  यांनी ऱ्होड्‌स बेटावर वेधशाळा स्थापली होती. अल्‌ -मामून या खलिफांनी इ. स. ८२९ मध्ये बगदादजवळ, तर अरबी ज्योतिर्विद ⇨अल्‌-बातानी  यांनी ८७७ च्या सुमारास अँटिऑक येथे वेधशाळा उभारली. अल्‌ -बातानी यांनी येथे वेध घेऊन ज्योतिषशास्त्रीय कोष्टके तयार केली व ⇨संपातचलनाचे  मूल्य पुन्हा काढले. इ. स. १००० च्या सुमारास अल्‌ – मुकातम येथे सहावे फातिमाइड खलिफा अल्‌ -काकिम यांनी एक वेधशाळा उभारली होती. याच सुमारास दमास्कस येथे महत्त्वाची वेधशाळा बांधण्यात आली.

हुलागू खान यांनी मंजूर केलेल्या निधीतून मारागे (आता इराण) येथे वेधशाळा स्थापन झाली. येथे दूरदर्शकाच्या आधी वापरात असलेली उपकरणे वापरून ज्योतिर्विद नासीर–अल्‌-दीन यांनी अत्यंत अचूक वेध घेतली. कीऑंगजू (कोरिया) येथे सिलिंडराच्या आकाराची दगडी वेधशाळा ६४७ साली बांधण्यात आली. पीकिंग (चीन) शहराच्या पूर्व तटालगतची वेधशाळा ज्योतिर्विद कोशाव यांनी कूब्लाईखानांच्या मदतीने १२७९ मध्ये उभारली. तेथे १६७३ साली नवीन उपकरणे बसविण्यात आली आणि १६८५ साली राजज्योतिषी असलेल्या फादर फेर्दिनांद व्हर्बीस्त या धर्मगुरूंनी तिचे स्वरूप बदलले. समरकंद (उझबेकिस्तान) येथील वेधशाळा १४२० च्या सुमारास राजपुत्र ⇨ऊलुगबेग मिर्झा यांनी स्थापन केली. तेथील मोठे चतुर्थयंत्र वापरून त्यांनी महत्त्वाची ज्योतिषशास्त्रीय कोष्टके संकलित केली व ताऱ्यांची सूची (यादी) तयार केली.

जुन्या साम्राज्याच्या काळातील इंका व माया संस्कृतींमधील लोकांनी ज्योतिषशास्त्रीय वेध घेण्याचे प्रयत्न केले होते. धार्मिक उत्सवाच्या वेळा काढण्यासाठी व शेतीचे वेळापत्रक तयार करण्यासाठी या वेधांचा उपयोग होई. ग्वातेमालातील वाक्‌शातून येथील उत्खननात आढळलेले इ. स. सु. २३५ मधील स्टील २० हे बांधकाम व त्याआधीचे (इ. स. पू.सु. ७०) सु. ८ मी. उंचीचे पिरॅमिड ही बांधकामे तीन छोट्या देवळांच्या संदर्भात एका विशिष्ट रेषेत बांधली आहेत. यामुळे उत्तर संस्तंभ, दक्षिण संस्तंभ, वसंत व शरद संपात या खगोलीय घटना घडताना सूर्योदयाची स्थिती कोणती असेल ते सूचित होते. माया संस्कृतीमधील आधीच्या काळात कॅलेंडरमधील अचूक वेळा ठरविण्याकरिता या दगडी बांधकामांचा उपयोग होत असे. मेक्सिकोमधील इत्झा (यूकातान) येथील वेधशाळेप्रमाणे वापरण्यात येणारा एल काराकोल हा दगडी गोल मनोरा नवीन माया साम्राज्यातील लिग ऑफ मायापान काळातील (इ. स. सु. १००७) आहे.

सागरी प्रवासात ⇨मार्गनिर्देशनासाठी वापरण्यात येणाऱ्या सौर कोष्टकांत सुधारणा करण्यासाठी पोर्तुगालचे राजपुत्र हेन्री ( द नेव्हिगेटर १३९४ – १४६०) यांनी १४१८ च्या सुमारास सेंट व्हिन्सेंट भूशिराजवळ साग्रिश येथे वेधशाळा बांधली. १४७१ च्या सुमारास योहानेस म्यूलर यांनी न्यूरेंबर्ग येथे सुसज्ज वेधशाळा उभारली. तेथे त्यांनी वजनावर चालणारे एक घड्याळ उभारले. त्यांनी केलेल्या व्यावहारिक सुधारणांचा नंतर इतर अनेक वेधशाळांमध्ये उपयोग करून घेण्यात आला. पहिला फिरता घुमट जर्मनीतील कासेल येथील वेधशाळेत उभारण्यात आला.

दूरदर्शकाचा वापर होण्यापूर्वी सर्वांत प्रसिद्ध व मोठी वेधशाळा ⇨ट्यूक्रो ब्राए यांनी उभारली होती. डेन्मार्कचे राजे दुसरे फ्रेडेरिक यांनी ब्राए यांना व्हेन हे छोटे डॅनिश बेट वेधशाळा उभारण्यासाठी दिले होते. या सु. २,००० एकर क्षेत्राच्या बेटावरील उरानिबर्ग (आकाशातील किल्ला) या वेधशाळेचे बांधकाम १५७६ साली सुरू झाले. नंतर २१ वर्षे येथे १९ फुटी (सु. ५·८ मी.) चतुर्थयंत्र वापरून ग्रहांची अचूक स्थाने काढण्यात आली, तोपर्यंतची ही सर्वाधिक अचूक व महत्त्वपूर्ण निरीक्षणे होती. येथे अभ्यासिका, निवासस्थाने, प्रयोगशाळा, कार्यशाळा, छापखाना, कागदाचा कारखाना या सोयी होत्या. मुख्य इमारतीभोवतीच्या गच्च्यांवर उपकरणे उभारली होती व सभोवती बगीचाही होता. १५८४ साली स्टेलाबुर्ग (ताऱ्यांचा किल्ला) ही दुसरी वेधशाळा ब्राए यांनी विद्यार्थ्यांसाठी बांधली. तीत कंपने व वारा यांचा त्रास कमी व्हावा म्हणून बांधकामे काहीशी भूमिगत होती. येथील उपकरणे छत किंवा भिंती यांच्यामधील फटींमधून आकाशाकडे रोखीत असत. उरानिबर्ग येथील सर्व उपकरणे स्वत: ब्राए यांनी तेथील कार्यशाळांमध्ये बनविली होती. यांपैकी एकाही उपकरणात कोणताही प्रकाशकीय भाग नव्हता. १५९७ साली वेधशाळेला मिळणारा राजाश्रय संपुष्टात आला आणि होली रोमन सम्राट दुसरे रूडोल्फ यांनी बोलाविल्यामुळे ब्राए प्रागला (आता चेकोस्लोव्हाकियाची राजधानी) गेले. तेथे त्यांनी अगदी छोटी पण नवीन वेधशाळा उभारली.

दूरदर्शकाचा शोध १६०९ साली लागला व त्यामुळे नवीन वेधशाळा उभारण्यास मोठी चालना मिळाली. ⇨व्हिलेब्रॉर्ट स्नेल  यांच्या प्रोत्साहनामुळे लायडेन विद्यापीठाच्या इमारतीच्या गच्चीवर लायडेन वेधशाळा उभारण्यात आली (१६३२). तेथील फिरत्या छताच्या खाली सुधारित दिगंशीय चतुर्थयंत्र बसविले. प्रकाशकीय भाग असलेली उपकरणे वापरणारी ही पहिली वेधशाळा होती. यानंतर १६३७–५७ दरम्यान क्रीस्त्यान सेव्हरेन यांच्या मार्गदर्शनाखाली कोपनहेगन वेधशाळा बांधण्यात आली.

⇨क्रिस्तीआन हायगेन्झ यांनी भिंगांना अचूक वक्रता आणणारी भिंगे घासण्याची व त्यांना पॉलिश करण्याची प्रक्रिया शोधून काढली (१६५५). याशिवाय त्यांनी दूरदर्शकात सुधारणा केल्या कालमापनासाठी लंबकाचे घड्याल बनविले दूरदर्शकाच्या ⇨सूक्ष्ममापकाचे वर्णन केले आणि दूरदर्शकासाठी ऋण म्हणजे अपसारी भिंगाचा अभिकल्प (आराखडा) तयार केला. ऋण केंद्रांतर असणाऱ्या भिंगावर त्याच्या अक्षाला समांतर असे किरण पडल्यास त्यातून पलीकडे गेल्यावर ते विखुरले जातात. १६४१ साली योहानेस डेव्हेलिस यांनी डॅन्झिग (पोलंड) येथे घरीच वेधशाळा बांधली. तेथे हायगेन्झ यांनी `हवाई दूरदर्शक’ उभारला (१६७०). या दूरदर्शकाची लांबी १५० फूट (सु. ४५.७२ मी.) होती आणि कप्प्या व दोर वापरून त्याला आधार दिला होता. यांत भिंगांतील प्रकाशीय विपथन टाळले होते. ही वेधशाळा आगीत नष्ट झाली (१६७६). Machina Coelestis (१६७३) या पुस्तकात हेव्हेलिस यांनी अवजड दूरदर्शक व अन्य सामग्री असलेल्या `आदर्श’ वेधशाळेची योजना वर्णिली होती.⇨सर आयझॅक न्यूटन यांनी परावर्तक दूरदर्शकाची पहिली प्रतिकृती तयार केली. १६८० च्या सुमारास परावर्तक दूरदर्शक वेधशाळेत वापरात आल्यावर खस्थ पदार्थाचे स्थान अधिक अचूकपणे ठरविता येऊ लागले. १७५८ साली जॉन डॉलंड यांनी अवर्णी संयुक्त भिंग प्रथमच प्रत्यक्षात वापरले. या शोधांमुळे दूरदर्शकाच्या अभिकल्पाची प्रगती झपाट्याने झाली आणि जगातील मोठ्या शहरांत ज्योतिषशास्त्रीय वेधशाळा उभारल्या गेल्या. सुरुवातीला अशा बहुतेक वेधशाळा ह्या त्या त्या देशातील सरकारी संस्था होत्या.


पॅरिस येथील वेधशाळा १६६७-७२ दरम्यान बांधण्यात आली. झां दॉमीनीक कासीनी हे तिचे १७१२ सालापर्यंत पहिले संचालक होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा, नातू व पणतू या पदावर होते. हे सर्व प्रसिद्ध ज्योतिर्विद होते.

  रॉयल ग्रिनिच वेधशाळा (ग्रिनिच, इंग्लंड) १६७५ साली राजे दुसरे चार्ल्स यांच्या कारकीर्दीत स्थापन झाली. जॉन फ्लॅमस्टीड हे तिचे पहिले राजज्योतिर्विद होते. सर ख्रिस्टोफर रेन यांच्या योजनेबरहुकूम ही वेधशाळा १६७६ साली बांधून पूर्ण झाली. प्रमाण वेळ ठरविणे व मार्गनिर्देशनासाठी सुमद्रातील स्थानाचे रेखावृत्त अधिक अचूकपणे काढणे, यांसाठी ही वेधशाळा उभारली होती. १८८४ साली मूळ रेखावृत्त (० रेखांश) म्हणून या वेधशाळेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. येथील दूरदर्शकविषयक प्रमुख सामग्री येथून हर्स्टमन्सू कॅसल (ससेक्स) या ठिकाणी हलविण्यास १९४८ साली सुरुवात झाली.

इ. स. १७०० साली स्थापन झालेली बर्लिनची (जर्मनी) शाही वेधशाळा १८३५ साली परत बांधण्यात आली. १९१३ साली ती बर्लिन बाबल्सबेर्क येथील विद्यापीठाशी संलग्न झाली. १९४७ साली ती जर्मन विज्ञान अकादमीचा एक घटक झाली.

एकोणिसावे शतक संपण्यापूर्वी यूरोप (उदा., बोलोन्या, इटली, १७१२), आफ्रिका (उदा., केपटाउन, दक्षिण आफ्रिका, १८२०), आशिया, ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका या प्रदेशांत २० हून अधिक अकादमींशी निगडित असलेल्या, सरकारी व खाजगी संस्थांच्या वेधशाळा बांधण्यात आल्या.

सर विल्यम हर्शेल यांनी स्वत:ची खाजगी वेधशाळा स्लॉव (इंग्लंड) येथे १७८६ साली उभारली. तेथे बसविण्यासाठी त्यांनी ४० फुटी (सु. १२ मी.) लांबीचा परावर्तक दूरदर्शक १८४५ साली बनविला. याचा आरसा पॉलिश केलेल्या धातूच्या पत्र्याचा व ४९·५ इंच (१·२६ मी.) रंध्रव्यासाचा होता. १७८६ पर्यंत त्यांनी  ⇨अभ्रिकांसाठी संपूर्ण आकाशाची पाहणी केली.

रॉसचे तिसरे अर्ल विल्यम पार्सन्स यांची पार्सन्स टाउन (आयर्लंड) येथील खाजगी वेधशाळा १८२५ च्या सुमारास पूर्ण झाली. ही महत्त्वाची वेधशाळा आहे. तेथील ५८ फूट (१७·६८ मी.) लांब परावर्तक दूरदर्शकाच्या पॉलिश केलेल्या धातूच्या आरशाचा रंध्रव्यास ६ फूट (१·८३ मी.) होता.

पूलकव्ह (रशिया) येथील ऐतिहासिक इंपिरिअल ऑब्झर्व्हेटरी १८३९ मध्ये सुरू झाली. ⇨फ्रीड्रिख गेओर्ख व्हिल्हेल्म फोन श्ट्रूव्हे हे ज्योतिर्विद तिचे पहिले संचालक होते. दुसऱ्या महायुद्धात लेनिनग्राडभोवतीच्या वेढ्याच्या काळात १९४२ साली ही वेधशाळा पूर्णपणे नष्ट झाली. १९५४ साली ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस ऑफ यूएसएसआर या संस्थेची मध्यवर्ती वेधशाळा म्हणून तिची पूलकव्ह येथे परत उभारणी करण्यात आली.

डेव्हिड रिटनहाऊस (१७३०–९६) यांनी १७६८ साली नॉरिसटाउन (पेनसिल्व्हेनिया) येथे तात्पुरती खाजगी वेधशाळा उभारली. १७६९ मध्ये होणाऱ्या शुक्राच्या अधिक्रमणाचे

[ शुक्राचे बिंब सूर्यबिंबावरून सरकत जाण्याच्या आविष्काराचे→अधिक्रमणज्योतिषशास्त्र] निरीक्षण करण्यासाठी त्यांनी स्वत: एक खास दूरदर्शक बनविला होता. हा बहुधा अमेरिकेतील पहिला खराखुरा ज्योतिषशास्त्रीय दूरदर्शक होय. यू. एस. नेव्हल ऑब्झर्व्हेटरी ही वेधशाळा वॉशिंग्टन, डी. सी. येथे १८३० साली स्थापन झाली. येथे मूलभूत व स्थानविषयक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जातो. न्यू हेवन (कनेक्टिकट) येथील पूर्वीच्या येल कॉलेजचा एक भाग म्हणून येल युनिव्हर्सिटी ऑब्झर्व्हेटरी १८३१ साली स्थापण्यात आली. ज्योतिषशास्त्रीय संस्था म्हणून उभारण्यात आलेली ही अमेरिकेतील पहिली संस्था आहे. १८३२ साली हिची जागा बदलली मात्र हिचे काम अजून चालू आहे. १८३१ साली युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठाची वेधशाळा चॅपल हिल येथे बांधण्यात आली होती, परंतु ती नंतर नष्ट झाली. १८३८ साली विल्यम्सटाउन (मॅसॅचूसेट्‌स) येथील विल्यम्स कॉलेजची हॉपकिन्स ऑब्झर्व्हेटरी स्थापन झाली. इमारतीत विशेष बदल न झालेली ही सर्वांत जुनी वेधशाळा आहे. अमेरिकेत यानंतर स्थापन झालेल्या महत्त्वाच्या वेधशाळा पुढील आहेत.

हार्व्हर्ड कॉलेज ऑब्झर्व्हेटरी प्रथम डेनाहाऊस (केंब्रिज, मॅसॅचूसेट्‌स) येथे १८३० साली बांधण्यात आली व १८४४ साली ती महाविद्यालयाच्या आवारात नेण्यात आली. १९५५ साली स्मिथसोनियन ॲस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरी हिला जोडण्यात आल्याने ती आता खगोल भौतिकीचे महत्त्वाचे केंद्र बनली आहे. जेम्स लिक यांच्या देणगीतून कॅलिफोर्निया विद्यापीठात १८८८ साली लिक वेधशाळा बांधून पूर्ण झाली. १९५७ साली पूर्ण झालेला येथील १२० इंची (३·०५ मी.) परावर्तक दूरदर्शक हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा परावर्तक दूरदर्शक आहे.⇨जॉर्ज एकरी हेल यांचे प्रयत्न व चार्ल्स टी. यर्कीस यांची देणगी यांतून शिकागो विद्यापीठाची यर्कीस वेधशाळा १८९७ साली विल्यम्स बे (विस्कॉन्सिन) येथे स्थापना झाली. येथील ४० इंची (सु. १०० सेंमी.) प्रणमनक दूरदर्शकाचे भिंग हे जगातील सर्वांत मोठे भिंग आहे. या वेधशाळेने टेक्सस विद्यापीठाचे सहकार्य व डब्ल्यू. मॅक्‌डॉनल्ड यांची देणगी यांमधून टेक्ससमधील फोर्ट डेव्हिसजवळील लॉक माउंट येथे मॅक्‌डॉनल्ड वेधशाळा १९३९ साली स्थापन केली. येथे ८२ इंची (२·०८ मी.) परावर्तक दूरदर्शक असून शिकागो व टेक्सस विद्यापीठांच्या संयुक्त प्रशासनाखाली येथील कार्य चालते. हेल यांचे प्रयत्न व कार्नेगी इन्स्टिट्यूशनचे आर्थिक साहाय्य यांमुळे सॅन गाब्रीएल पर्वतरांगेत माउंट विल्सन ऑब्झर्व्हेटरी ही सौर वेधशाळा १९०४ साली स्थापन झाली. तेथे ६० व १५० फूट (१८·२९ व ४५·७२ मी.) उंचीचे सौर मनोरा दूरदर्शक आणि ६० इंची (१·५२मी.) रंध्रव्यासाचा परावर्तक दूरदर्शक उभारण्यात आले. जॉन डी. हूकर व कार्नेगी इन्स्टिट्यूशन याच्या सहकार्यातून १०० इंची (२·५५ मी.) आरशाचा दूरदर्शक १९१७ साली उभारण्यात आला. नंतर हेल यांनी २०० इंची (५·१० मी.) व्यासाचा परावर्तक दूरदर्शक तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले. याकरिता सॅन-डिएगोच्या ईशान्येस असलेली पॅलोमार माउंटन ही जागा निश्चित करण्यात आली. या दूरदर्शकाचे वजन ५०० टनांहून जास्त आहे. याला‘हेल दूरदर्शक’हे नाव देण्यात आले असून याद्वारे २६ जानेवारी १९४९ रोजी पहिले चाचणी छायाचित्र घेण्यात आले. आकाशगंगेबाहेरच्या अंधुक अभ्रिका व अतिशय दूरचे अंधुक खस्थ पदार्थ यांची माहिती मिळविण्यासाठी हा दूरदर्शक उभारला आहे. या दूरदर्शकाची प्रकाश एकवटण्याची क्षमता मानवी डोळ्याच्या क्षमतेच्या ३·६ लाख पट असून तत्त्वतः हा दूरदर्शक अवकाशात २ अब्ज प्रकाशवर्षे एवढ्या अंतरापर्यंतचे वेध घेऊ शकतो. १९४८ पासून माउंट विल्सन व पॅलोमार या वेधशाळांचे प्रशासन कार्नेगी इन्स्टिट्यूशन (वॉशिंग्टन, डी. सी.) आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्था संयुक्तपणे पाहत आहेत. या दोन वेधशाळा व नॅशनल जिऑग्राफिकल सोसायटी यांनी एक कार्यक्रम संयुक्तपणे हाती घेतला होता. त्यानुसार पॅलोमार माउंटन येथून ४८– ७२ इंची श्मिट दूरदर्शक वापरून आकाशाच्या ३/४ भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात घेण्यात आलेल्या १,७०० हून अधिक छायाचित्रांचा बांधणी न केलेला ‘’ हा संग्रह प्रसिद्ध करण्यात आला. सहकारी तत्त्वावर वापरण्यासाठी अमेरिकेतील सर्व वैज्ञानिकांना पुढील दोन वेधशाळा उपलब्ध करून दिल्या आहेत: ॲरिझोनामधील किट पीकजवळील युनायटेड स्टेट्‌स नॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी [येथे ३६ व ८४ इंची (०·९१ व २·१३ मी.) परावर्तक दूरदर्शक असतील] आणि ग्रीन बॅंक (वेस्ट व्हर्जिनिया) जवळील नॅशनल रेडिओ ऑब्झर्व्हेटरी [येथे ८५ व १४० फुटी (२५·९० व ४२·६७ मी.) दिशानियंत्रण करता येणारे अन्वस्तपृष्ठ प्रकारचे रेडिओ दूरदर्शक असतील.]


कॅनडाची डॉमिनियन वेधशाळा ओटावा (ऑंटॅरिओ) येथे १९०२ साली स्थापन झाली. तिच्यात व्हिक्टोरिया (ब्रिटिश कोलंबिया) येथील डॉमिनियन ॲस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरी १९१८ साली अंतर्भूत झाली. यांपैकी दुसऱ्या वेधशाळेत ७२ इंची (१·८३मी.) परावर्तक दूरदर्शक आहे. टोरॉंटो विद्यापीठाची डेव्हिड डनलॅप ऑब्झर्व्हेटरी ही रिचमंड हिल (ऑंटॅरिओ) येथे १९३२ मध्ये उभारण्यात आली असून तेथे ७४ इंची (१·८८मी.) परावर्तक दूरदर्शक आहे.

अठराव्या शतकात वेधशाळांमध्ये अनेक नवीन उपकरणे वापरात आली. उदा., १७५० च्या सुमारास वर्णपटलेखक वापरात आले व यामुळे प्रथमच ताऱ्यांचे रासायनिक संघटन अभ्यासणे शक्य झाले. अठराव्या शतकाअखेरीस छायाचित्रण पट्टी (वा काच) हे वेधशाळेतील महत्त्वाचे साधन बनले होते. एकोणिसाव्या शतकात बहुतेक मोठ्या वेधशाळांत परावर्तक दूरदर्शक वापरण्यात येऊ लागले.

इ. स. १९५५ नंतर ताऱ्याच्या प्रकाशाचे अचूक मापन करण्यासाठी प्रकाशीय दूरदर्शकांवर ⇨इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्या बसविण्यात येऊ लागल्या. मोठ्या वेधशाळांतील अशा प्रयुक्त्या नंतर अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत गेल्या. टूसॉन (ॲरिझोना, अमेरिका) येथे १९७९ साली सुरू झालेल्या मल्टिपल मिरर टेलिस्कोप ऑब्झर्व्हेटरीमध्ये ज्योतिर्विदाला दूरदर्शकाच्या नेत्रिकेला डोळा लावून बसावे लागत नाही. तो कृत्रिम रीतीने उबदार केलेल्या एका खोलीत बसून दूरचित्रवाणी संचाच्या पडद्याकडे पाहून वेध घेऊ शकतो आणि संगणकाच्या मदतीने दूरदर्शकाचे नियंत्रण करू शकतो. सर्व रेडिओ व अवकाश वेधशाळा इलेक्ट्रॉनीय स्वरूपाच्या असल्याने आधुनिक वेधशाळांमध्ये इलेक्ट्रॉनीय तंत्रज्ञ व संगणक गरजेचे झाले आहेत.

गॅमा किरण, जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरण, क्ष-किरण इ. प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) वातावरणात शोषले गेल्याने भूपृष्ठापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून त्यांच्या अध्ययनासाठी १९६०– ७० दरम्यान एषण्या व वेध घेण्याची साधने बसविलेले कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अवकाश वेधशाळांचे कार्य रेडिओ तरंगांद्वारे रेडिओ नियंत्रण पद्धतीद्वारे चालते.

पहिला रेडिओ दूरदर्शक शिकागो येथे ग्रोट रेबर यांनी १९३४ साली उभारला. याचा थाळी ⇨आकाशक ३० फूट (सु. ९ मी.) व्यासाचा व तबकडीसारखा (बशीसारखा) होता. १९४८ साली ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरून एका रेडिओ व्यतिकरणमापकाच्या साहाय्याने रेडिओ तरंगांच्या स्रोतांचे निरीक्षण करण्यात आले. यानंतर सिडनीजवळ पार्क्स (न्यू साउथ वेल्स) येथे रेडिओ निरीक्षण केंद्र उभारण्यात आले. १९५० साली इंग्लंडमध्ये केंब्रिज येथे तर फ्रान्समध्ये नॅन्सी येथे येडिओ निरीक्षणे करण्यास सुरुवात झाली. नंतर जगभर अनेक रेडिओ वेधशाळा स्थापन झाल्या.   

रेडिओ वेधशाळांनंतर अवकाश वेधशाळा पुढे आल्या. १९४६ साली अमेरिकेतील नेव्हल रिसर्च लॅबोरेटरीने एक रॉकेट थेट वातावरणापलीकडे पाठवून सूर्याच्या दूरस्थ जंबुपार प्रकाशाचे निरीक्षण केले. ४ ऑक्टोबर १९५७ रोजी रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठविला व नंतर असे अनेक उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले. सुरुवातीच्या अवकाश एषण्यांद्वारे मुख्यतः पृथ्वी व तिचे वातावरण यांविषयी माहिती मिळविण्यात आली. ४ मार्च १९६२ रोजी अमेरिकेच्या नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा (एनएएसए) या संस्थेने ऑर्बिटिंग सोलर ऑब्झर्व्हेटरी (ओएसओ) ही पहिली अवकाश वेधशाळा अवकाशात पाठविली व १९६५ साली अशी दुसरी अवकाश वेधशाळा पाठविण्यात आली. नंतर चंद्र, शुक्र व मंगळ यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी व तेथे उतरविण्यासाठी, तसेच आंतरग्रहीय इतर मापनांसाठी अनेक अवकाशयाने व एषण्या पाठविण्यात आल्या. ग्रह व उपग्रह यांच्याशी तुलना करता तारे, अभ्रिका व दीर्घिका ह्या अतिशय दूर आहेत परंतु यांचा अभ्यास नासाने सोडलेल्या ऑर्बिटिंग ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी (ओएओ) वरील दूरदर्शकांच्या मदतीने करण्यात येत आहे. १९८०-९० दरम्यान नासाने पुनःपुन्हा वापरता येण्याजोगे अवकाश विमान (स्पेस शटल) तयार केले. त्याच्या मदतीने उपकरणे अवकाशात विशिष्ट कक्षांमध्ये ठेवता व नंतर परत आणता येऊ शकतात. यामुळे ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणांच्या क्षेत्रात नवीन दालन उघडले गेले. १९९० साली हबल अवकाश दूरदर्शक याच रीतीने अवकाशात सोडण्यात आला. तो वातावरणाच्या वरील भागातून पृथ्वीभोवती फिरत आहे. यामुळे वातावरणाने प्रतिमा अंधुक होण्याचा प्रश्न उरत नाही. तसेच वातावरणामुळे शोषल्या जाणाऱ्या किरणांचे (विशेषतः जंबुपार किरणांचे) अध्ययनही याच्या साहाय्याने करता येते.

भारत : भारतातील आधुनिक वेधशाळा सुरुवातीला वातावरण वैज्ञानिक कामांसाठी स्थापन झाल्या. यांपैकी काही वेधशाळांत ज्योतिषशास्त्रीय वेधही घेण्यात येऊ लागले. म्हणून वातावरणवैज्ञानिक व ज्योतिषशास्त्रीय वेधशाळांची माहिती एकत्रितपणे येथे दिली आहे.

भारतात प्राचीन काळापासून आकाशाचे वेध घेण्यात येत होते. त्याकरिता गोलयंत्र, चक्रयंत्र, घटिका, यष्टियंत्र, फलकयंत्र, यंत्रराज, ध्रुवभ्रमयंत्र, प्रणोद यंत्र, गोलानंद यंत्र इ. उपकरणे व साधने वापरण्यात येत असल्याचे उल्लेख आढळतात. १७१८-२३ दरम्यान राजे दुसरे जयसिंग यांनी जयपूर, दिल्ली, उज्जैन, मथुरा व बनारस (वाराणसी) येथे ज्येतिषशास्त्रीय वेधशाळा बांधल्या असून त्यांना ⇨जंतरमंतर असे म्हणतात. येथील काही उपकरणे अजून वापरण्यायोग्य स्थितीत आहेत. उदा., सम्राट यंत्र हे बांधून काढलेल्या १०० फुटी (सु. ३० मी.) उताराचे ⇨सूर्यछाया घड्याळ असून त्याच्या प्रत्येक बाजूला मोठे ⇨चतुर्थयंत्रही आहे. रामयंत्र या दुसऱ्या उपकरणात उभ्या चौकटी असलेली विहिरीसारखी दोन वर्तुळाकार बांधकामे आहेत. खस्थ पदार्थांचे ⇨उन्नतांश व ⇨दिगंश काढण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

अठराव्या शतकाअखेरीस ईस्ट इंडिया कंपनीने वातावरणवैज्ञानिक निरीक्षणे घेण्यास सुरुवात केली. चेन्नई (मद्रास) येथील वेधशाळेत १७९६ साली काम सुरू झाले. नंतर सिमला (१८४०), कुलाबा (मुंबई, १८४१) व निलगिरी पर्वतरांगेतील दोडाबेट्टा शिखरावरील (१८४७) वेधशाळा स्थापन झाल्या. काही वर्षांनंतर सिमला व दोडाबेट्टा येथील वेधशाळा बंद करण्यात आल्या. तथापि पुढे दोडाबेट्टा हे उत्कृष्ट वातावरणवैज्ञानिक सामग्री असलेले केंद्र बनले. १९०२ सालापर्यंत पुढील महत्त्वाच्या व अन्य वेधशाळा स्थापन झाल्या होत्या. कुलाबा (मुंबई) येथील चुंबकीय व वातावरणवैज्ञानिक वेधशाळेची चुंबकीय शाखा अलिबाग येथे १९०४ साली नेण्यात आली. आता ही आंतरराष्ट्रीय महत्त्वाची भूभौतिकीय वेधशाळा आहे. कोडईकानल (पालनी टेकड्या, उंची सु. २,३४७मी.) येथे सौर भौतिकीय, चुंबकीय व वातावरणवैज्ञानिक वेधशाळा आहे. चेन्नईच्या ज्योतिषशास्त्रीय व वातावरणवैज्ञानिक वेधशाळेत कालनिश्चितीचे काम मुख्यत्वे केले जाते. कोलकाता येथील अलीपूर मध्यवर्ती वातावरणवैज्ञानिक वेधशाळा देशातील वातावरणवैज्ञानिक वेधशाळांत समन्वय साधण्याचे, तसेच राष्ट्रीय सौर निरयन ⇨पंचांग तयार करण्याचे काम करते. शिवाय दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाच्या २३१ वेधशाळा तेव्हा होत्या. त्यांपैकी २३ वेधशाळा उंच डोंगरावर होत्या. पुढील वेधशाळा सर्वोच्च ठिकाणी होत्या : चौर शिखर (पंजाब सु. ३,४१३ मी.), लेह (काश्मीर सु. ३,५०६ मी.) व केलांग (सु. ३,०७५ मी.) तसेच त्या वेळी २,३९७ पर्जन्यमापक केंद्रेही होती. इतर वेधशाला अशा : पुणे वेधशाळा ही भारतीय उष्ण कटिबंधीय मोसम विज्ञान संस्था या नावाने ओळखली जाते. श्रीनगर, मरी व मुक्तेश्वर (जिल्हा नैनिताल) येथे वातावरणवैज्ञानिक, तर तिरुअनंतपुरम्‌ येथे ज्योतिषशास्त्रीय वेधशाळा आहेत.

भारतातील तीन प्रमुख ज्योतिषशास्त्रीय वेधशाळा पुढीलप्रमाणे आहेत : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स या केंद्रीय संस्थेची कोडईकानल सौर वेधशाळा असून तिच्या कानकूर (स्थापना १९६७) स्थानावर ४० इंची (१·०२ मी.) दूरदर्शक मे १९७२ मध्ये उभारला आहे. या वेधशाळेत⇨भूचुंबकत्व, वातावरणविज्ञान व भूकंपविज्ञान यांविषयीची निरीक्षणे घेण्यात येतात. मात्र येथे मुख्यतः सौर भौतिकीविषयक कार्य चालते. येथील दूरदर्शकामुळे गुरू ग्रहाच्या गॅनिमीड या उपग्रहाची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे व प्रजापती (युरेनस) या ग्रहाभोवतीचे कडे ओळखण्यात आले आहे (१९७७). येथील दूरदर्शकाचा उपयोग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च व अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थांना होतो. या वेधशाळेतून अंधुक खस्थ पदार्थांचे वेध घेण्याचे कामही चालते. हैद्राबादची निझामिया वेधशाळा ही तेथील उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न असून तिच्या जापाळ-रंगपूर शाखेत ४८ इंची (१·२२मी.) दूरदर्शक आहे. उत्तर प्रदेश राज्य वेधशाळा नैनिताल येथे असून तेथे ४० इंची दूरदर्शक आहे. या तीन वेधशाळांतील प्रकाशीय दूरदर्शकांद्वारे घेण्यात येणाऱ्या वेधांच्या आधारे निरीक्षणात्मक ज्योतिषशास्त्राच्या सर्व शाखांतील संशोधन केले जाते.

ऊटकमंड (तमिळनाडू) येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचा मोठा द्वारक संश्लेषण योजना रेडिओ दूरदर्शक आहे. येथील ५३० मी. x ३० मी. आकाशकाची पायारेषा ४ किमी. आहे. येथे रेडिओस्रोत, ⇨पल्सार इत्यादींचे रेडिओ ज्योतिषशास्त्रीय संशोधन होते. पुण्याजवळ नारायणगावनजीक अतिप्रचंड रेडिओ दूरदर्शक उभारला आहे. याचा अभिकल्प टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेने बनविला आहे. यात ३४ एकसारखे, वळविता येण्याजोगे, ४५ मी. व्यासाचे व पोलादी तारेच्या जाळीचे अन्वस्तीय आकाशक आहेत. या आकाशकांची व्यूहरचना इंग्रजी वाय (Y) अक्षराच्या आकृतीप्रमाणे केली असून वायच्या भुजेची लांबी १४किमी. आहे. याने २५ चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे. अवकाशातून येणार्या १ मी. तरंगलांबीच्या प्रारणाचे वेध येथून घेण्यात येतात. आकाशगंगेतील व आकाशगंगेबाहेरील रेडिओस्रोतांचे नकाशे तयार करण्याचे काम येथे चालते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च व अहमदाबादची फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे विश्वातील क्ष-किरण, गॅमा किरण, तसेच जंबुपार व अवरक्त प्रारण यांचे अवलोकन करण्याचे तंत्र विकसित करण्यात येत आहे.


प्रकाशकीय वेधशाळा : आधुनिक नमुनेदार प्रकाशकीय वेधशाळेतील दूरदर्शक व वेध घेण्याची इतर साधने ऊन, पाऊस, वारा, हवामानातील अचानकपणे होणारे बदल यांच्यापासून सुरक्षित राहावीत म्हणून बंदिस्त व बहुधा दंडगोलाकार इमारतीत आढळतात. या इमारतीवर एक अर्धगोलाकार घुमट बसविलेला असून तो उभ्या आसाभोवती फिरविता येतो. या घुमटाखाली प्रकाशीय दूरदर्शक असतात. घुमटात एक रुंद, उभी फट ठेवलेली असून ती झडपांनी सहजपणे उघडता व झाकता येते. हा घुमट फिरविण्यासाठी व दूरदर्शक वळविण्यासाठी विद्युत्‌चलित्रे (विजेचे यांत्रिक ऊर्जेत परिवर्तन करणारी साधने) वापरतात. घुमटाचे वजन कमी राहण्यासाठी तो पातळ लाकडी फळ्यांचा बनवितात. सौर प्रारण कमीत कमी शोषले जावे म्हणून घुमटाला बाहेरून फिकट रंग वा ॲल्युमिनियमाचा मुलामा देतात. कारण घुमटाखालील हवा जास्त तापल्यास घुमटाच्या फटीतून वरच्या दिशेत हवेचा प्रवाह बाहेर पडतो. या प्रवाहामुळे दूरदर्शकाच्या वस्तुभिंगासमोरच्या हवेत प्रक्षोभ निर्माण होऊन मिळणाऱ्या  प्रतिमेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. आकाशाचे निरीक्षण करताना घुमटाच्या फटीवरील झडप उघडून व घुमट सावकाश फिरवून दूरदर्शक आकाशाच्या इष्ट भागाकडे रोखता येतो (उदा., अंधुक खस्थ पदार्थाची प्रतिमा चंद्रप्रकाशाने धूसर होणार नाही अशा प्रकारे तो रोखतात). पृथ्वी फिरत असताना दूरदर्शक इष्ट दिशेत रोखलेला ठेवण्यासाठी विद्युत्‌चलित्र व अचूक दंतचक्र यांची योजना केलेली असते. व्यक्तिगत संशोधनासाठी मध्यम अथवा कमी वजनाचे दूरदर्शक वापरतात. सुरक्षिततेसाठी अशा दूरदर्शकांच्या चारी बाजू बंद असून त्यावर छत असलेली लहान कोठडी असते. एका प्रकारात निरीक्षणाच्या वेळी कोठडीचे पूर्ण छत सहजपणे बाजूला करता येते दुसऱ्या प्रकारात कोठडीचे दोन अर्धे भाग असून निरीक्षणाच्या वेळी रुळांवरून अथवा अन्य मार्गाने ते विरुद्ध दिशांना सरकवितात. घुमट वा कोठडीचे छत आता ॲल्युमिनियम, प्लॅस्टिक किंवा तंतुरूप काच यांचे बनवितात. यामुळे त्याचे वजन कमी होते.

सर्वोत्कृष्ट अशा आधुनिक वेधशाळेत आणखी काही सोयीसुविधा असतात. छायाचित्रीय कामांसाठी अंधारी खोली, कॅमेरा व इतर साहाय्यक साधने, गणक व संगणक, बिनचूक कालमापके व घड्याळे, इतर प्रकाशीय व यांत्रिक उपकरणे आणि या सर्वांची देखभाल व दुरुस्ती करण्याची सुविधा, संदर्भ ग्रंथालय, प्रशासकीय कार्यालय वगैरे शिवाय ज्योतिर्विद आणि अन्य कर्मचारी यांची निवासस्थाने तसचे वेधशाळा बहुधा लोकवस्तीपासून दूर व डोंगरासारख्या उंच ठिकाणी असल्याने तेथे स्वतंत्र वीजनिर्मिती, पाणीपुरवठा, इमारती उबदार ठेवण्याची यंत्रणा इत्यादींची तरतूद करावी लागते.

कार्यानुसार दूरदर्शकांची वेधशाळेत उभारणी करतात. काही दूरदर्शक पूर्व–पश्चिम दिशेत पक्के बसवून दक्षिणोत्तर दिशेतून जाणाऱ्या उभ्या पातळीतच हलविता येतात. यांना क्रांतिदर्शक दूरदर्शक म्हणतात. काही दूरदर्शक पृथ्वीच्या आसाला समांतर दिशेत घट्ट बसविल्याने पृथ्वीच्या विषुववृत्ताला समांतर पातळीत फिरविता येतात. काही दूरदर्शक उभ्या व आडव्या अशा दोन्ही पातळ्यांत फिरविता येतात. साध्या तिपाईवर बसविलेले कमी वजनाचे दूरदर्शक कोठेही नेता येतात. दूरदर्शकांमुळे मनुष्याच्या दृष्टीच्या टप्प्यापलीकडे असलेल्या अंधुक घटकांची व आविष्कारांची माहिती मिळू शकते. दूरदर्शकातून अस्पष्ट वा अंधुक दिसणाऱ्या आविष्कारांची माहिती छायाचित्रणामुळे होऊ लागली. अंधुक खस्थ पदार्थाचा प्रकाश छायाचित्रीय पट्टीवर दीर्घकाळ पडत राहिल्यास त्याची सुस्पष्ट प्रतिमा मिळते. अत्यंत अंधुक खस्थ पदार्थांच्या अध्ययनासाठी इलेक्ट्रॉनीय प्रतिमादर्शन प्रयुक्त्या वापरतात. छायाचित्रणामुळे आकाशातील प्रकाशकीय आविष्कारांची कायमची टिकाऊ नोंद करणे शक्य झाले व या आविष्कारांचा अभ्यास सवडीने करणे शक्य झाले. शिवाय छायाचित्रणामुळे एकाच वेळी अनेक खस्थ पदार्थांचे वेध घेणे शक्य झाले. आकाशातील उल्कारेषेसारख्या क्षणिक किंवा अल्पकालीन आविष्कारांची टिकाऊ नोंद करणे शक्य झाल्याने निरनिराळ्या काळांत व निरनिराळ्या वेळी घेतलेल्या वेधांची तुलना करता येते. परिणामी छायाचित्रण फिल्म व कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनीय कॅमेरा यांसारखी छायाचित्रणाची साधने वेधशाळेतील आवश्यक घटक झाले.

प्रकाशीय वेधांसाठी मुख्यतः भिंगांचा प्रणमनी व अंतर्गोल आरशाचा परावर्तक दूरदर्शक वापरतात. प्रतिमेचे विवर्धन वाढविण्यासाठी उच्च गुणवत्तेची मोठी, जाड भिंगे वापरावी लागतात पण अशी भिंगे तयार करण्याचे काम अवघड असते. शिवाय जाड भिंगात प्रकाशाचे अधिक शोषण होऊन प्रतिमा अंधुक होते. म्हणून बहुतेक वेधशाळांत आरशाचे परावर्तक दूरदर्शक वापरतात. अशा दूरदर्शकांचे आकारमान अगदी भिन्न असू शकते. उदा., मौना केआ (हवाई बेटे) येथे ३८७ इंजी (९·८ मी.) कैक नावाचा सर्वांत मोठा परावर्तक दूरदर्शक असून त्याद्वारे अभ्रिका व दीर्घिका यांचे अध्ययन करतात. याउलट १० इंची (०·२५ मी.) भिंगाच्या झुरिक (स्वित्झर्लंड) येथील दूरदर्शकाने सौर डागांचे अध्ययन करतात. व्हेरी लार्ज टेलिस्कोप ( व्हीएलटी) या अतिप्रचंड समुच्चयात ३१५ इंची (८ मी.) चार दूरदर्शक असून तो यूरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीसाठी चिलीमधील सेरो पॅरानल येथे उभारण्यात येत आहे. त्याचा प्रभावी रंध्रव्यास ६३० इंज (१६ मी.) असेल. प्रतिमाविवर्धनासाठी भिंगांऐवजी मोठे अंतर्गोल आरसे तयार करणे हे कमी अवघड काम आहे. झेलेनचुक्सकाया (रशिया) हा कॉकेशस पर्वतातील दूरदर्शक जगातील सर्वांत मोठा परावर्तक दूरदर्शक असून त्याचा आरसा २३६ इंची (सु.६ मी.) आहे. १८९० सालापासून दूरदर्शकाचा मोठ्या कॅमेऱ्याप्रमाणे उपयोग होऊ लागला. १९१० सालानंतर दूरदर्शकावर वर्णपटलेखक बसवून ताऱ्यांचे वर्णपट मिळविण्यात येऊ लागले. अशा वर्णपटांमधील प्रकाशाचा लेखन, मापन व विश्लेषण यांद्वारे अभ्यास होऊ लागला. यातून ताऱ्यांच्या रासायनिक संघटनांची माहिती मिळू शकते. प्रकाशाच्या तीव्रतेच्या अचूक मापनासाठी विद्युत्‌घटांचा वापर करतात, तर दूरदर्शकाची दिशा निश्चित करणे व त्याद्वारे मिळणाऱ्या माहितींचे विश्लेषण करणे यांसाठी आता मोठ्या प्रमाणावर संगणक वापरतात. [→ दूरदर्शक].

नवीन वेधशाळेची जागा निवडताना आकाशनिरीक्षणाच्या दृष्टीने काही बाबींकडे लक्ष पुरवावे लागते. उदा., आसपासच्या घडामोडींमुळे इमारतीच्या पायाला हादरे बसू नयेत सभोवतालच्या हवेची दृश्यमानता चांगली असावी रात्री ढग असणाऱ्या दिवसांची वर्षातील संख्या किमान असावी, आजूबाजूच्या दिव्यांचा विखुरलेला प्रकाश, धूर, धूळ व धुके यांचा त्रास नसावा आणि वेधशाळेचे ठिकाण भूपृष्ठापासून शक्य तितक्या अधिक उंचीवर असावे. कारण भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांमध्ये मोठा प्रक्षोभ होत असतो. वेधशाळेची इमारत शहरापासून दूर व उंचावर उभारल्यास वरीलपैकी बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. ज्या जुन्या वेधशाळांभोवती शहरे वाढली वा वाढत आहेत, अशा वेधशाळांमधील निरीक्षणाची साधने शहराबाहेर अधिक उंच ठिकाणी नेली आहेत. यामुळे संस्था किंवा विद्यापीठ यांच्यापासून दूरदर्शक बराच दूर असू शकतो. पॅलोमार वेधशाळा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी या तिच्या संस्थेपासून सु. २०० किमी. अंतरावर आहे. उत्तर गोलार्धातील वेधशाळांमधून दक्षिण आकाशाचा काही भाग दिसू शकत नाही. त्यामुळे काही वेधशाळांनी दक्षिण गोलार्धात आपल्या शाखा काढल्या आहेत.

ज्योतिषशास्त्रीय वेधशाळेत अनेक कामे करण्यात येतात. त्यांसाठी अनेक उपकरणे व साधने लागतात परंतु अनेक अडचणींमुळे प्रत्येक वेधशाळा ही सर्व साधने घेऊ शकत नाही. त्यामुळे एका वेधशाळेत काही ठराविक विषयांवरच संशोधन चालते. खाजगी वेधशाळांत देणगीदार संस्थेने ठरवून दिलेल्या विषयांतील संशोधन होत असते. विद्यापीठांशी संलग्न असलेल्या वेधशाळांत विद्यापीठाच्या धोरणानुसार शिक्षण व संशोधन होते. सरकारच्या अखत्यारीतील मोठ्या राष्ट्रीय वेधशाळेत ज्योतिषशास्त्रीय व खगोल भौतिकीय विषयांच्या संशोधनाबरोबरच आणखी काही जबाबदाऱ्याही पार पाडल्या जातात. उदा., अचूक कालमापन व प्रमाणवेळ निश्चित केली जाते. ⇨ मार्गनिर्देशनाच्या उपयोगासाठी काही निवडक ताऱ्यांच्या स्थानविषयक नोंदी, ताऱ्यांची कोष्टके, ग्रहांची स्थाने इ. दैनंदिन उपयोगाच्या बाबी हाताळून त्यांत संशोधन केले जाते. तारेने अथवा रेडिओ संदेशवहन प्रणालीद्वारे ठराविक संस्था, विमान सेवा व समुद्रावर असलेली जहाजे यांना अचूक वेळ कळविली जाते. सूर्य, ग्रह, उपग्रह, धूमकेतू व लघुग्रह (मंगळ व गुरू यांच्या दरम्यानच्या कक्षांमध्ये फिरत असणारे छोटे खस्थ पदार्थ) यांची स्थाने व गती यांचा अभ्यास ताऱ्यांच्या संदर्भात केला जातो. चंद्राच्या दैनिक गतीचा ताऱ्यांच्या संदर्भात अभ्यास करून तिच्यातील आगंतुक विचलने काढतात व संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध करतात. ताऱ्यांची स्थाने, तसेच ग्रह, उपग्रह, पिधाने व ग्रहणे यांची तपशीलवार माहिती कॅलेंडरमध्ये (वार्षिक पंचांगात) प्रसिद्ध करतात.

सौर वेधशाळा हा प्रकाशकीय वेधशाळेचा एक प्रकार असून तेथे विशेषकरून सूर्याचा अभ्यास केला जातो. सूर्याच्या उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी येथे खास सोयी कराव्या लागतात. उष्णतेमुळे भूपृष्ठालगत तापलेल्या हवेचे प्रवाह निर्माण होतात व त्यांच्यामुळे सूर्याची छायाचित्रे धूसर येतात. तप्त हवेचा परिणाम टाळण्यासाठी बहुतेक सौर वेधशाळा उंच मनोऱ्यावर उभारलेल्या असतात.

इ.स. १९७० नंतर सु. १५० इंची अनेक दूरदर्शक उभारण्यात आले असून त्यांतील बहुतेक दक्षिण गोलार्धात आहेत उदा., ऑस्ट्रेलियात दोन आणि अँडीज पर्वतात ला सेरेनाजवळच्या (चिली) तीन वेधशाळांत बसविलेले मोठ्या व मध्यम आकारमानांचे अनेक दूरदर्शक.

परावर्तक दूरदर्शकातून आकाशाच्या छोट्याच क्षेत्राचे स्पष्ट चित्र मिळते. मोठ्या आकाराचे क्षेत्र पाहण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. कुबेर हा ग्रह व ⇨क्वासार यांसारख्या अंधुक खस्थ पदार्थांचा शोध घेण्यासाठी आकाशाचे मोठे क्षेत्र पहावे लागते. याकरिता शक्तिशाली विस्तृत क्षेत्रीय दूरदर्शकीय कॅमेरे वापरतात. बेर्नहार्ट श्मिट यांनी १९३२ साली शोधलेला श्मिट दूरदर्शक, तसेच बेकर-श्मिट कॅमेरा आणि रशियन संशोधक डी. डी. मॉक्सुटॉव्ह यांनी १९४१ साली बनविलेला कॅमेरा ही याची उदाहरणे होत.

खस्थ पदार्थांचे स्थान व गती ठरविणे, त्याचा मागोवा घेणे, ग्रहोपग्रह व चंद्र यांचे निरीक्षण करणे, सूर्य, तारे व अंधुक खस्थ पदार्थांचे वेध घेणे यांसारखी कामे करताना वेधशाळेत पुढील विषयांचे सैद्धांतिक अध्ययनही केले जाते : ताऱ्याची अंतर्गत स्थिती व आंतरतारकीय अवकाशातील परिस्थिती, विश्वाचा इतिहास, शुक्रावरील वातावरण, गुच्छातील ताऱ्यांची गती, दीर्घिकांची द्रव्यमाने व संरचना, न्यूट्रिनोंचा शोध घेणे वगैरे.


रेडिओ वेधशाळा : १९३० सालापूर्वी तारे व इतर खस्थ पदार्थ यांच्याकडून येणाऱ्या केवळ दृश्य प्रकाशाचाच अभ्यास करता येत असे. नंतर रेडिओ संदेशवहन व रडार तंत्रविद्या [→ रडार] यांच्या विकासामुळे ⇨विद्युत्‌ चुंबकीय तरंगांपैकी अधिक तरंगलांबीच्या तरंगांचा अभ्यास करता येऊ लागला. हा अभ्यास ज्योतिषशास्त्राच्या प्रकाशकीय अभ्यासाला पूरक ठरला आणि विश्वाच्या अगदी दूरच्या भागाचे अध्ययन करणे शक्य झाले. ज्योतिषशास्त्राच्या या नवीन शाखेला ⇨रेडिओ ज्योतिषशास्त्र म्हणतात व ⇨रेडिओ दूरदर्शक हे या शाखेचे प्रमुख साधन आहे. प्वेर्त रीको येथील आरेसीबो रेडिओ दूरदर्शकाच्या आकाशकाचा व्यास १,००० फूट (३०५ मी.), तर जर्मनीमधील एफेल्सबर्ग येथील आकाशकाचा व्यास ३३० फूट (१०० मी.) आहे. याहून छोट्या आकाशकांचे समुच्चय असलेले रेडिओ दूरदर्शक २६ देशांत आहेत.

सूर्य, काही ग्रह, रेडिओ स्रोत म्हणून ओळखले जाणारे आकाशाचे विविध भाग यांच्याकडून येणाऱ्या रेडिओ तरंगांची नोंद रेडिओ दूरदर्शकाने केली जाते. बाह्य अवकाशातून पृथ्वीकडे रेडिओ तरंग येत असल्याचे कार्ल जी. जान्स्की यांना १९३१ साली आढळले. रेडिओ तरंग आकाशगंगेच्या पातळीत एकवटले असल्याने नंतर लक्षात आले. १९३७ व १९४७ साली ग्रोट रेबर यांनी या पृथ्वीबाह्य रेडिओ उत्सर्जनाचे अध्ययन केले. दुसरे महायुद्ध व नंतरच्या काळातील रडार, इलेक्ट्रॉनीय शोध इत्यादींमुळे रेडिओ ज्योतिषशास्त्राला मोठी चालना मिळाली. सर्व दिशांनी येणाऱ्या पृथ्वीबाह्य रेडिओ तरंगांपैकी आकाशाच्या छोट्या भागाकडून येणाऱ्या रेडिओ तरंगांवर लक्ष केंद्रित करण्याच्या हेतूने आकाशक [अँटेना → आकाशक] बनविण्यात आले. थाळी प्रकारात आकाशक तबकडीसारखा किंवा बशीसारखा परावर्तक असून त्यामुळे येणारे रेडिओ तरंग केंद्रीभूत होतात. असा आकाशक अंतर्गोल आरशासारखा असला, तरी त्याचे आकारमान अंतर्गोल आरशाच्या १० ते २० पट असते व त्याच्यावर घुमट नसतो. रेडिओ दूरदर्शकाच्या एका प्रकारात अनेक छोट्या आकाशकांचा समुच्चय (व्यतिकरणमापक) असतो. कधी कधी एखाद्या दरीत नैसर्गिक रीतीने बनलेल्या वाडग्यासारख्या खड्ड्यांवर तारांचे जाळे पसरून स्थिर आकाशक तयार करतात.

आकाशकाकडे आलेले रेडिओ तरंग भिन्न कंप्रतांना (प्रत्येक सेकंदास होणाऱ्या  कंपनांच्या संख्येला कंप्रता म्हणतात) मेलित होणाऱ्या ग्राहीकडे जातात व तेथे इलेक्ट्रॉनीय साधनांनी त्यांचे विवर्धन होते. ज्या खस्थ पदार्थाकडून रेडिओ तरंग आलेले असतात, त्याचे तापमान व रासायनिक संघटन समजण्यासाठी या रेडिओ तरंगांचा अभ्यास करतात. रेडिओ दूरदर्शकाचे आकाशक मोठे असल्याने प्रकाशीय दूरदर्शकाच्या दृष्टीने फार दूर असणार्याअ खस्थ पदार्थांचे अध्ययन रेडिओ दूरदर्शकाच्या दृष्टीने फार दूर असणाऱ्या खस्थ पदार्थांचे अध्ययन रेडिओ दूरदर्शकाच्या मदतीने करता येते. स्वतंत्र अशा दोन व अधिक आकाशकांकडे आलेली रेडिओ तरंग एकत्रित करता येतात व यातून रेडिओ व्यतिकरणमापक तयार होतो. एका सुट्या आकाशकापेक्षा रेडिओ व्यतिकरणमापकामुळे अधिक स्पष्ट प्रतिमा मिळते. म्हणजे आकाशकाचे आकारमान किंवा संख्या वाढली की, रेडिओ तरंगांच्या स्रोताची दिशा अधिक अचूकपणे कळते. कारण प्रत्येक आकाशकाकडून येणाऱ्या संदेशावर प्रक्रिया होऊन ते एकच प्रतिमा मिळविण्यासाठी एकत्रित केले जातात. अमेरिकेतील नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी (सकॉरो, न्यू मेक्सिको) येथे अतिविस्तृत आकाशक समुच्चय (व्हेरी लार्ज ॲरे व्हीएलए) उभारला आहे. त्यात २६ मी. (८५ फूट) व्यासाचे २७ आकाशक असून ते इंग्रजी वाय (Y) अक्षराच्या आकृतीनुसार जोडलेले आहेत व वायची प्रत्येक भुजा २०  किमी.लांब आहे. परिणामी हा दूरदर्शक ३५ किमी. (२२ मैल) व्यासाचा झाला आहे. हजारो किमी. लांबीची अतिशय लांब आधाररेषा असलेल्या व्यतिकरणमापकाद्वारे सर्वाधिक तपशीलवार प्रतिमा मिळतात. यात पुष्कळ आकाशक असून ते निरनिराळ्या ठिकाणी असतात. त्या सर्वांवर एकाच वेळी रेडिओ संदेशांची नोंद होते. मग हे संदेश संगणकाकडे पाठविले जातात. तेथे त्यांचा पुनःसंयोग (एकत्रिकरण) होऊन उच्च गुणवत्तेची एक प्रतिमा तयार होते.

जवळपास विजा चमकत नसल्यास, तसेच नभोवाणी व दूरचित्रवाणी यांवरून त्याच कंप्रतेला प्रेषण होत नसल्यास रेडिओ दूरदर्शक रात्री व दिवसाही वापरता येतात. ढग, धूळ, धूके व इतर वातावरणीय प्रक्षोभ यांचा रेडिओ निरीक्षणात अडथळा येत नाही. मोटारगाडीमधील ठिणगी प्रज्वलन किंवा विद्युत्‌ चलित्रातील ठिणगीसुद्धा संवेदनशील रेडिओ दूरदर्शकाकडून टिपली जाते. म्हणून रेडिओ दूरदर्शक नागरी भागांपासून दूर उभारतात. सर्व आकाशातील रेडिओ स्रोतांची नोंद करण्यासाठी किंवा एकाच स्रोताचे अखंडपणे वेध घेण्यासाठी उत्तर व दक्षिण गोलार्धात विविध रेखावृत्तांवर व अक्षवृत्तांवर रेडिओ वेधशाळा उभारणे आवश्यक आहे. म्हणून रेडिओ वेधशाळा सर्वत्र विखुरलेल्या आहेत. तथापि बहुसंख्य रेडिओ वेधशाळा यूरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे आहेत.

पृथ्वीबाहेरील रेडिओ तरंगांच्या अनुसंधानासाठी बनविलेल्या उपकरणांमध्ये अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनीय सामग्री लागते. उदा., रेडिओ तरंगांच्या विवर्धनासाठी एका कंप्रतेला मेलित झालेला इलेक्ट्रॉनीय विवर्धक लागतो. या विवर्धित कंप्रतेचे एकाच दिशेत वाहणाऱ्या एकदिश विद्युत्‌प्रवाहात रूपांतर करावे लागते व त्याच्या साहाय्याने मापक (वा अभिलेखक) चालवून त्याचे मापन केले जाते. त्याच्या साहाय्याने रेडिओ स्रोताच्या तापमानाविषयी अंदाज बांधता येतो. भिन्न कंप्रतांना मिळालेल्या मापनांच्या संयोगातून त्या खस्थ पदार्थाचा रेडिओ वर्णपट मिळवितात.

रेडिओ आकाशकाच्या पेन्सिलीसारख्या शलाकेला अनुसरून रेडिओ ऊर्जा जेव्हा प्रेषित केली जाते, तेव्हा तो रडार आकाशक बनतो आणि तो १६ कोटी किमी. पर्यंतच्या अंतरावरील खस्थ पदार्थ परावर्तनाद्वारे ओळखण्यासाठी वापरता येतो. मंगळ, शुक्र, बुध, चंद्र व सूर्य यांच्याकडून परावर्तित झालेले रडार प्रतिध्वनी ओळखण्यात आले असून त्यांना लागलेले कालावधी मोजले आहेत. १६०किमी. अंतरापर्यंतचे उल्काभ व १,६००किमी. अंतरापर्यंतचे कृत्रिम उपग्रह यांचेच रडार मार्गनिरीक्षण करता येते. अमेरिकेच्या हवाई दलाने अनेक रडार वेधशाळा उभारल्या आहेत. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या पदार्थांचे मार्गनिरीक्षण येथून करतात.

प्रमुख रेडिओ वेधशाळांत सामान्यपणे अनेक थाळी आकाशक तसेच विविध आकारमानांच्या आकाशकांचे समुच्चय (रचनाव्यूह) असतात. हे आकाशक भिन्न रेडिओ कंप्रता मापनासाठी मेलित करता येतात. रेडिओ दूरदर्शकाचे आकारमान (रंध्रव्यास) सर्वसाधारणपणे फुटांत देतात व ते आकारमान म्हणजे अन्वस्तपृष्ठ तबकडीचा व्यास, वर्तुळाकार नसलेल्या परावर्तकांची परिमाणे व आकाशक समुच्चयाचा पूर्व– पश्चिम x उत्तर– दक्षिण व्याप असतो.

रेडिओ वेधशाळेत उपलब्ध असलेल्या सुविधांनुसार तेथील कार्यक्रम ठरवितात. पुष्कळदा तेथे एकाच वेळी अनेक कार्यक्रम चालू असतात. ग्रह, सूर्य, आंतरतारकीय वायू, इतर रेडिओ स्रोत, रडार मार्गनिरीक्षण व अंतरमापन यांसारखे कार्यक्रम या वेधशाळा हाती घेतात. गुरू व शनी या ग्रहांकडून अनियमितपणे रेडिओ तरंग उत्सर्जित होतात. त्यांचा मागोवा पुढील वेधशाळा घेतात : येल, फ्लॉरिडा (अमेरिका) व सँतीएगो (चिली). या ग्रहांच्या पृष्ठभागाचा उंचसखलपणा व परिभ्रमण ओळखण्यासाठी पुढील वेधशाळांमधील मोठ्या आकाशकांचा रडार म्हणून उपयोग करतात : जॉड्रेल बँक व रॉयल रडार एस्टॅब्लिशमेंट (इंग्लंड), जेट प्रॉपल्‌शन लॅबोरेटरी, स्टॅनफर्ड (कॅलिफोर्निया), सोव्हिएट रेडिओ वेधशाळा व आरेसीबो (प्वेर्त रीको) येथील १,००० फुटी नैसर्गिक खळग्यातील आकाशक.

सूर्य तीव्र रेडिओ उत्सर्जक असून त्याच्या किरिटातून (तेजोवलयातून) येणाऱ्या  अधिक तरंगलांबीच्या उत्सर्जनाचे रेडिओ तापमान १० लाख अंश आहे. प्रत्येक प्रकाशीय उद्रेकानंतर लगेचच तेथे रेडिओ उद्रेक (स्फोट) होतो. सूर्याच्या वातावरणाच्या अध्ययनासाठी या रेडिओ उद्रेकाच्या अनेक वेधशाळांतून घेतलेल्या निरीक्षणांची प्रकाशीय माहितीशी सांगड घालण्यात येते.

आंतरतारकीय वायूविषयीचे कार्य नेदर्लंड्‌समधील लायडन वेधशाळेत सुरू झाले. याकरिता सर्व आकाशगंगेतील २१ सेंमी. हायड्रोजन रेडिओ उत्सर्जनाचे मापन करण्यात येऊ लागले. अवकाशातील हायड्रोजन वायूमधील गती तरंगलांबीमधील सूक्ष्मच्युतींद्वारे दर्शवितात व त्या गती ताऱ्यांच्या प्रकाशकीय गतींशी जुळतात. त्यावरून आकाशगंगा स्वतःभोवती फिरत असल्याचे सिद्ध होते. हार्व्हर्ड (मॅसॅचूसेट्स, अमेरिका) व हॅट क्रिक (कॅलिफोर्निया) येथील वेधशाळा आंतरतारकीय वायूच्या वर्णपटांचे समन्वेषण करीत आहेत. यांवरून ताऱ्यांमधील प्रचंड अवकाशातील इतर वायूंचे ढग शोधून काढावयाचे आहेत.

कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (सीएसआयआरओ ऑस्ट्रेलिया) आणि मुलार्ड वेधशाळा (केंब्रिज, इंग्लंड) या रेडिओ वेधशाळांनी १९५० च्या आधी केवळ रेडिओ स्रोत ओळखणे व मोजणे हेच काम केले होते. जॉड्रेल बँक, मुलार्ड, आरेसीबो, सीएसआयआरओ, ओवेन्स व्हॅली (कॅलिफोर्निया) व नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी (एनआरएओ वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिका) येथील वेधांमुळे सदर रेडिओ स्रोतांची स्थाने, आकारमाने व संरचना अधिक अचूकपणे ठरविता आली. रेडिओ स्रोतांशी निगडित असलेले प्रकाशकीय खस्थ पदार्थ ओळखण्यासाठी ओवेन्स व्हॅली येथील रेडिओ ज्योतिषशास्त्रज्ञ व माउंट विल्सन येथील प्रकाशकीय ज्योतिषशास्त्रज्ञ यांनी परस्पर सहकार्य केले होते. काही रेडिओ स्रोत अतिशय लहान असल्याचे सीएसआयआरओ येथे लक्षात आले. त्यांना क्वासीस्टेलर सोर्सेस म्हणजे ⇨क्वासार असे म्हणतात. त्यांचे निरीक्षण पॅलोमार, लिक, माउंट विल्सन व मॅक्‌डॉनल्ड येथील प्रकाशकीय वेधशाळांमधून, तसेच ओवेन्स व्हॅली, जॉड्रेल बँक, मुलार्ड व सीएसआयआरओ येथील रेडिओ वेधशाळांमधून करण्याचे कार्यक्रम आखले आहेत.

रेडिओ स्रोतांची यादी करणे व क्वासारांचा अभ्यास करणे यांव्यतिरिक्त विश्वात इतरत्र जीवसृष्टी असण्याची शक्यता सूचित करणारे नवे, अधिक अंधुक व अनियमित रेडिओ स्रोत शोधण्याचे कार्यक्रमही आखले आहेत उदा., एनआरएओ येथील प्रोजेक्ट ओझ्मा व रशियातील युक्रेनमधील प्रचंड रेडिओ आकाशक समुच्चयाद्वारे चालविण्यात येणारा अशाच प्रकारचा कार्यक्रम.


रेडिओ स्रोतामधील परिस्थितीप्रमाणे रेडिओ तरंगांचेही ध्रुवीकरण होऊ शकते [→  ध्रुवणमिति]. पृथ्वी व रेडिओ स्रोत यांच्यामध्ये विद्युत्‌ भारित अणू, रेणू वा अणुगट यांनी युक्त म्हणजे आयनीभूत वायू असल्यास भिन्न तरंगलांब्यांना ध्रुवीभवन वेगवेगळे असेल. पृथ्वीकडे येणाऱ्या रेडिओ तरंगांचे ध्रुवीभवन ओळखून काढणारी सामग्री अनेक रेडिओ वेधशाळांतील आकाशकाच्या केंद्रापाशी असते. पीच माउंटन ऑब्झर्व्हेटरी (मिशिगन, अमेरिका), नॅन्सी (फ्रान्स) व पूलकव्ह (रशिया) येथे सूर्याकडून येणाऱ्या रेडिओ तरंगांच्या ध्रुवीभवनाचे नियमित निरीक्षण केले जाते. त्यावरून सौरवात (वायू) सूर्याकडून पृथ्वीकडे येत असल्याचे सूचित होते. ताऱ्यांच्या दरम्यान कोणता वायू आहे हे शोधून काढण्यासाठी इतर रेडिओ वेधशाळा दूरवर असलेल्या रेडिओ स्रोतांमधील ध्रुवीभवनाचे निरीक्षण करतात.

उल्काभांचे निरीक्षण केल्यावर हे छोटे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यावर किती जोराने खाली येतात हे समजते तसेच ते खाली येताना कसे दिसतात तेही कळते. उल्काभांचे उत्पत्ती व स्वरूप आणि पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागातील परिस्थिती यांच्याशी निगडित अशी निरीक्षणे स्मिथसोनियन ॲस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरीसाठी व्हाव्हॅना (इलिनॉय, अमेरिका) व वॉलप्स आयलंड येथून घेण्यात येतात. मॅसॅचूसेट्समधील हेस्टॅक, मिलस्टन व सॅगमॉर येथील मोठे रेडिओ आकाशकही पृथ्वीच्या वातावरणाविषयीची माहिती मिळविण्यासाठी वापरतात. [→  रेडिओ ज्योतिषशास्त्र रेडिओ दूरदर्शक].

खस्थ पदार्थांची स्थाने, तसेच चंद्र व ग्रह यांच्या कक्षा यांविषयी प्रकाशकीय पद्धतीने मिळालेली माहिती ताडून पाहण्यासाठी रडार संदेशांद्वारे अंतरे निश्चित करण्याची पद्धती वापरतात. परावर्तित होऊन येणारा रडार प्रतिध्वनी अतिशय मंद असतो. त्यामुळे अधिक तीव्र स्थानिक ⇨विद्युत्‌ गोंगाटाहून तो वेगळा ओळखावा लागतो. प्रतिध्वनीच्या महत्तेवरून त्याचे परावर्तन करणाऱ्या पृष्ठभागाचे स्वरूप समजू शकते. ही माहिती चंद्र, मंगळ वा शुक्र यांच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरविण्याची योजना आखणाऱ्या  अवकाशवैज्ञानिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. चंद्र व ग्रहांवर इलेक्ट्रॉनीय सामग्री सुरक्षितपणे उतरविल्यानंतर रडारच्या मदतीने अधिक अचूकपणे अंतर ठरविण्याच्या योजना आखता येत आहेत [→ रडार].

इलेक्ट्रॉनिकीय क्षेत्राचा विकास झपाट्याने झाल्याने विविध प्रकारच्या दूरदर्शकीय इलेक्ट्रॉनीय प्रयुक्त्या पुढे आल्या. त्यांच्यामुळे आपाती प्रकाश किंवा येणारे रेडिओ तरंग यांच्याशी निगडित असलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रीय पट्टीची संवेदनक्षमता शंभरपट, तर रेडिओ दूरदर्शकाच्या आकाशकाची संवेदनक्षमता हजारपट वाढली. शिवाय खगोलीय निरीक्षणांसाठी रडार तंत्रही वापरण्यात येऊ लागले. यातूनच रेडिओ ज्योतिषशास्त्र पुढे आले.

न्यूट्रिनो वेधशाळा : सूर्य व इतर स्रोतांकडून आलेले ⇨न्यूट्रिनो हे मूलकण शोधण्याचे प्रयत्न १९७५ पासून होत आहेत. जवळजवळ द्रव्यमान नसलेले न्यूट्रिनो हे सूक्ष्मकण ताऱ्यांच्या गाभ्यामधील अणुकेंद्रीय विक्रियांमध्ये निर्माण (मुक्त) होतात आणि तारे व ग्रह यांच्या द्रव्यामधून पलीकडे जातात. न्यूट्रिनो ओळखणाऱ्या अभिज्ञातकात खूप पाणी असून त्याचे घनफळ मोठे असते. अत्यल्प प्रमाणात असलेले लाखो न्यूट्रिनो या अभिज्ञातकातून जाताना प्रकाशाच्या अल्पकालीन चमका निर्माण होतात. संवेदनशील प्रकाशविद्युत्‌घटाद्वारे त्यांची संख्या मोजली जाते. १९८७ ए या अतिदीप्त नवताऱ्याने [ज्याची दीप्ती अचानकपणे लाखोपट वाढलेली आढळते अशा ताऱ्याने → नवतारा व अतिदीप्त नवतारा] उत्सर्जित केलेले न्यूट्रिनोंचे दोन उद्रेक (स्फोट) किमान दोन न्यूट्रिनो वेधशाळांनी ओळखले होते. अमेरिका, जपान व यूरोप येथे असलेल्या अनेक न्यूट्रिनो वेधशाळांतून असे निरीक्षण करण्यात येते.

अवकाशातील वेधशाळा : रॉकेटद्वारे पृथ्वीच्या वातावरणाकडे पाठविलेले कृत्रिम उपग्रह व अवकाश मंच इ. रूपांत या वेधशाळा असतात. अशी वेधशाळा पृथ्वीभोवती एका ठराविक कक्षेत फिरत असते. क्ष-किरण, जंबुपार प्रारण, काही रेडिओ तरंग व काही अवरक्त किरण हे वातावरणात शोषले गेल्याने भूपृष्ठावर पोहोचू शकत नाहीत. म्हणून त्यांचे निरीक्षण भूपृष्ठावर करता येत नाही. त्यांच्या निरीक्षणासाठी अवकाश वेधशाळा उपयुक्त आहेत. अवकाश वेधशाळेची सामग्री वजनाला हलकी व उड्डाणाच्या वेळी घडी करता येईल अशी असावी लागते. अशाच प्रकारे दूरदर्शक अल्प काळ पृथ्वीच्या वातावरणापलीकडे नेतात पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडतात किंवा चंद्रावर अथवा ग्रहावर पाठवितात. हे दूरदर्शक लहान व त्यांच्या खास कार्यानुसार बनविलेले असतात. मात्र हबल अवकाश दूरदर्शक तुलनेने मोठा असून त्याचा रंध्रव्यास ९४ इंच (२·४ मी.) आहे. अवकाश वेधशाळेमुळे अधिक स्पष्ट व रेखीव छायाचित्रे मिळू शकतात. कारण जमिनीवरच्या वेधशाळेच्या वरच्या भागात हलणारी हवा असते आणि या वाऱ्यांमुळे छायाचित्रे थोडी धूसर येतात. [→ उपग्रह, कृत्रिम].

अशा निरीक्षणांसाठी पूर्वी बलून (फुगे) वातावरणाच्या वरील भागात पाठवीत. या बलूनला वर्णपटलेखकासारखी उपकरणे जोडीत. त्यामुळे सूर्याच्या जंबुपार किरणातील वर्णपटाचे छायाचित्र मिळविता येई. २५ सप्टेंबर १९५७ रोजी प्रोजेक्ट स्ट्रॅटोस्कोपद्वारे एक दूरदर्शक बलूनला जोडून सु. २६,००० मी. उंचीपर्यंत गेला होता. त्यामधून तेथील अतिविरल हवेत सूर्याचे सुस्पष्ट छायाचित्र घेण्यात आले.

अशाच प्रकारचा एक कार्यक्रम नोव्हेंबर १९५८ मध्ये सुरू झाला होता. यातील उपकरणे भूपृष्ठापासून २५किमी. उंचीपलीकडे जाणार होती. मंगळाच्या वातावरणातील पाण्याच्या वाफेच्या प्रमाणाचा वर्णपटीय अभ्यास करणे आणि विश्वकिरण (अवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण), तसेच सूर्याची जंबुपार व अवरक्त किरणे व ताऱ्यांपासून येणारे प्रारण यांचा अभ्यास करणे, हा या कार्यक्रमाचा हेतू होता.

पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडील भागात अधिक स्थिर स्वरूपाचे निरीक्षण मंच उभारणे अधिक सोयीस्कर ठरले. तेथे दिवसाच्या आकाशातील चमक नसते आणि बाह्य अवकाशातील अंधार ही सोयीस्कर बाब होते. पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्याभोवती फिरणारे तसेच शुक्र, मंगळ, गुरू व शनी यांच्या जवळून जाणारे आणि अवकाशाचे समन्वेषण करणारे कृत्रिम उपग्रह व एषण्या अवकाशात पाठविल्या आहेत. यांच्यामुळे या खस्थ पदार्थांचे स्वरूप समजून घेण्यास मदत झाली व अवकाशातील परिस्थितीचे परीक्षण करता आले. चंद्र, शुक्र व मंगळ यांच्यावर एषण्या उतरविण्यात आल्या (उदा., मंगळावरील पाथफाइंडर). त्यांनी दूरमापन संदेशांच्या रूपातील माहिती व दूरचित्रवाणी चित्रे पृथ्वीवर पाठविली.

पृथ्वीबाह्य अवकाशात अनेक प्रकाशीय व रेडिओ ज्योतिषशास्त्रीय वेधशाळा पृथ्वीभोवती फिरत आहेत आणि काहींची योजना आखण्यात येत आहे. उदा., इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमिकल सॅटेलाइट (आयआरएएस) या अवरक्त ज्योतिषशास्त्रीय कृत्रिम उपग्रहामुळे एनजीसी- ७०२७ या खस्थ पदार्थाची प्रतिमा मिळाली, तसेच अवरक्त किरणांचे स्रोत, लघुग्रह, धूमकेतू इत्यादींचे वेधही त्याद्वारे घेण्यात आले. गॅमा किरणांच्या अभ्यासासाठी नोव्हेंबर १९७२ मध्ये एसएएस -२ व १९७५ मध्ये सीओएस-बी हे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. ऑर्बिटिंग ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी (ओएओ) ही पृथ्वीभोवती फिरणारी ज्योषिशास्त्रीय वेधशाळा खगोलातील जंबुपार किरण, क्ष-किरण व गॅमा किरण यांचे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने बनविण्यात येत आहे. ऑर्बिटिंग सोलर ऑब्झर्व्हेटरी (ओएसओ) या पृथ्वीभोवती कक्षेत फिरणाऱ्या सौर वेधशाळेत सूर्याच्या वर्णपटातील जंबुपार किरण, क्ष-किरण व गॅमा किरण या भागांतील विद्युत्‌ चुंबकीय तरंगमापनाची सुविधा आहे. स्मॉल ॲस्ट्रॉनॉमी सॅटेलाइट (एसएएस) या ज्योतिषशास्त्रीय लहान कृत्रिम उपग्रहांच्या वेधशाळेने अनेक रेडिओ स्रोत शोधून काढले असून गॅमा किरणांचे मापनही केले आहे. हाय-एनर्जी ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी (एचईएओ) या उच्च ऊर्जा ज्योतिषशास्त्रीय अवकाश वेधशाळेच्या साहाय्याने क्ष-किरण, गॅमा किरण व विश्वकिरण ओळखून काढावयाचे आहेत.

अवकाशातील दूरदर्शक भूपृष्ठापासून अनेक किमी. उंचीवरील कक्षांमधून फिरत असतात. इंटरनॅशनल अल्ट्रा-व्हायोलेट एक्स्प्लोअरर (आययूई) हा आंतरराष्ट्रीय जंबुपार समन्वेषक दूरदर्शक पृथ्वीच्या मध्यापासून ३५,५०० किमी. उंचीवर भूस्थिर कक्षेत फिरत आहे. नासाचा हबल अवकाश दूरदर्शक एप्रिल १९९० मध्ये अवकाश विमानातून कमी उंचीच्या कक्षेत सोडण्यात आला. दर ९५ मिनिटांनी तो पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो वॉशिंग्टन डी. सी. जवळच्या गॉडर्ड स्पेस फ्लाइट सेंटर येथील नियंत्रण कक्षांना व तेथून तो बॉल्टिमोर (मेरिलँड, अमेरिका) येथील स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूटला रेडिओ माध्यमाद्वारे जोडलेला आहे. या दूरदर्शकाचा ९४ इंची ( मी.) मुख्य आरसा सदोष म्हणजे खूपच जास्त केंद्रांतराचा असल्याचे लगेचच आढळले. म्हणून डिसेंबर,  १९९३ मध्ये अवकाश विमानातून गेलेल्या दुरुस्ती-पथकाने त्यातील उपकरणे बदलून दुरुस्ती केली. काही इतर अवकाश दूरदर्शक पुढील आहेत : नासाच्या इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमिकल सॅटेलाइट (आयआरएएस) हा अवरक्त ज्योतिषशास्त्रीय कृत्रिम उपग्रह १,००० किमी. उंचीवरील कक्षेत फिरत आहे. द्रवरूप हीलियमने थंड ठेवण्यात येणाऱ्या या उपग्रहाने १२, २५, ६० व १०० मायक्रोमीटर तरंगलांबीचे अवरक्त तरंग ओळखून काढले जातात. खस्थ पदार्थांकडून येणारे क्ष-किरण व गॅमा किरण यांची निरीक्षणे यूरोपीय देशांनी व नासाने पाठविलेल्या अवकाश वेधशाळांतून (उदा., गॅमा किरणांच्या अध्ययनासाठी १९९१ साली अवकाशात पाठविण्यात आलेली ‘ऑर्थर हॉली कॉम्पटन प्रयोगशाळा’) केली जातात. कारण दूरस्थ अवरक्त किरण, दूरस्थ जंबुपार किरण, क्ष-किरण व गॅमा किरण हे पृथ्वीच्या वातावरणात शोषले जातात.

एप्रिल १९७२ मध्ये अपोलो-१६ या अवकाशयानातील अंतराळवीरांनी चंद्रावर दूरस्थ जंबुपार कॅमेरा बसविला. त्याने तीन दिवसांत खस्थ पदार्थांची १८४ छायाचित्रे व वर्णपट मिळविले होते. चंद्रावर वातावरण जवळजवळ नाहीच चंद्रपृष्ठ भक्कम आहे आणि तेथील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या एक षष्ठांश इतके कमी आहे, हे चंद्राचे ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणाच्या दृष्टीने असलेले फायदे आहेत. मात्र दूरदर्शक पृथ्वीवरून चंद्रावर पाठविण्यासाठी येणारा एकूण खर्च खूप जास्त आहे, हा याचा मोठा तोटा होय.

मंगळावरील दीर्घकालीन सरासरी हवामानातील बदलांची माहिती व मंगळाची छायाचित्रे पाठविणारे मार्स क्लायमेट ऑर्बिटर हे मंगळाभोवती फिरत राहणारे अवकाशयान अमेरिकेने १२ डिसेंबर १९९८ रोजी पाठविले आहे. तसेच त्यावरील पाण्याचा शोध घेणारे मार्स पोलर लॅंडर हे मंगळाच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरणारे अवकाशयान ३ जानेवारी १९९९ रोजी पाठविण्यात आले. त्याद्वारे तेथे हिमबर्फ व जीवसृष्टी यांचा शोध घेण्यात आला. नासा या संस्थेतर्फे दूरदर्शकासहित एक प्रयोगशाळा जुलै १९९९ मध्ये अवकाशात पाठविण्यात आली आहे. या दूरदर्शकाला⇨सुब्रह्मण्यन्‌ चंद्रशेखर यांच्यावरून `चंद्रा’ हे नाव देण्यात आले आहे. हिच्या मदतीने सूर्याव्यतिरिक्त इतर ताऱ्यांकडून निघणाऱ्या क्ष-किरणांचा अभ्यास करण्यात येत आहे. या निरीक्षणांमधून सूर्यकुलाची निर्मिती कशी झाली, तसेच सूर्याकडून येणाऱ्या किरणोत्सर्गाचा पृथ्वीच्या हवामानावर व जीवसृष्टीवर कोणता परिणाम झाला असावा, यांविषयी निश्चित माहिती मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.

वेधशाळांमधील परस्पर सहकार्य : पूर्वी आकाशाचा नकाशा तयार करणे, तसेच तारे व अभ्रिका यांच्या याद्या तयार करणे यांसारखी कामे ज्योतिषशास्त्रीय वेधशाळांनी परस्पर सहकार्याने केली आहेत. हौशी ज्योतिर्विद व आकाशनिरीक्षक बहुधा स्वतःचे आपले दूरदर्शक बनवितात व मंडळे स्थापन करतात. काही मंडळे एखाद्या कृत्रिम तारामंडळाशी निगडित असतात. हौशी मंडळी दूरदर्शकांद्वारे निरीक्षणे करून ताऱ्यांच्या तेजस्वीपणाचे अध्ययन करतात. सैद्धांतिक कार्य करणाऱ्या ज्योतिर्विदांच्या दृष्टीने ही माहिती उपयुक्त असते. हौशी मंडळी उल्का व कृत्रिम उपग्रह यांची माहिती गोळा करतात व सूर्यकुलातील ग्रहांचे नियमितपणे निरीक्षण करतात. यातून पुष्कळ धूमकेतू व नवतारे यांचा शोध लागला आहे.

वेधशाळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्याचा पुरस्कार इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (आयएयू) ही संघटना करते. दर तीन वर्षांनी ही संघटना बैठक घेते व जगातील तीन हजार ज्योतिर्विदांपैकी पुष्कळजण तिला हजर राहतात. ही संघटना प्रमाणभूत ज्योतिषशास्त्रीय नावे व कार्यपद्धती ठरविते आणि निरीक्षणांची नाहक द्विरुक्ती होणार नाही हे पाहते तसेच सहकार्याची आवश्यकता असलेली अनुसंधानाची क्षेत्रे सुचविणे व तसा सल्ला देणे इ. कामे करते. विविध अक्षवृत्तांवर व रेखावृत्तांवर असलेल्या वेधशाळा या संघटनेमार्फत सामाईक प्रकल्पांवर परस्पर सहकार्य करतात (उदा., उत्तर व दक्षिण गोलार्धांतील एकाच अक्षवृत्ताजवळील वेधशाळा भूकवचातील सूक्ष्म व अनियमित विचलनांचे म्हणजे अक्षवृत्तात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करतात). या संघटनेच्या ३६ समित्या (कमिशन) आहेत. प्रत्येक समिती विशिष्ट प्रश्नांशी किंवा विशिष्ट निरीक्षणांशी निगडित असते. उदा., १० व १२ क्रमांकांच्या समित्या सूर्य व सूर्यग्रहणे यांच्या निरीक्षणांची अनेक वेधशाळांमध्ये एकत्रित व्यवस्था करतात. धूमकेतू, ग्रह, उल्का, ताऱ्यांची स्थाने, रंग व वर्णपट, अभ्रिका व दीर्घिका तसेच रेडिओ ज्योतिषशास्त्र व अवकाश एषण्यांद्वारे पृथ्वीबाहेरील अवकाशातील निरीक्षणे यांविषयीच्या कार्यक्रमांमध्ये समन्वय साधण्याचे काम इतर समित्या करतात. जेव्हा एखादा धूमकेतू किंवा नवतारा दिसतो किंवा जेव्हा एखादी अतिशय असाधारण ज्योतिषशास्त्रीय घटना घडते, तेव्हा ही माहिती स्मिथसोनियन ॲस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरी येथील या संघटनेची आयएयू सेंट्रल ब्यूरो फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिग्राम्स ही संस्था सर्व वेधशाळांना कळविते. समित्यांच्या नियमितपणे परिषदा भरतात. त्यांतील अहवालांतून त्या त्या समितीने शोधलेल्या बाबी इतरांना समजतात. तसेच या गोष्टी ट्रँझॅक्शन ऑफ द इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यानेही इतरांना कळतात.

एखाद्या विशिष्ट वर्षासाठी सहकार्याचे कार्यक्रमही संघटित करण्यात येतात. उदा., ⇨आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्ष (इंटरनॅशनल जिओफिजिकल इयर १९५७-५८), तसेच १९६३-६४ हे शांत सूर्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष (इंटरनॅशनल इयर फॉर द क्वाएट सन) पाळण्यात आले. या वर्षात सूर्याच्या पृथ्वीच्या वातावरणावर होणाऱ्या परिणामांचे अध्ययन शंभराहून अधिक प्रकाशकीय व रेडिओ वेधशाळा आणि कृत्रिम उपग्रह यांच्यामार्फत संयुक्तपणे करण्यात आले. याच प्रकारच्या इतर संघटना अवकाश संशोधन, हवामान, महासागरविज्ञान, भूविज्ञान व इतर वैज्ञानिक कार्यांमध्ये व्यापक प्रमाणावर समन्वय साधण्याचे काम करतात.

पहा : उपग्रह, कृत्रिम जंतरमंतर ज्योतिषशास्त्र दूरदर्शक रेडिओ ज्योतिषशास्त्र रेडिओ दूरदर्शक क्ष-किरण ज्योतिषशास्त्र.

संदर्भ : 1. Donnelly, M. A Short History of Observatories, 1973.

           2. Kirby-Smith, H. T. U. S. Observatories, 1976.

           3. Pasachoff, J. M. From the Earth to the Universe, New York, 1995.

          ४. चिपळूणकर, मो. वा. व इतर (संपा.) वेधसाधने आणि वेधशाळा, पुणे, १९५९.

ठाकूर, अ. ना.