अभिजित : (व्हीगा). भारतीय नक्षत्रमालिकेतील जादा म्हणजे २८ वे नक्षत्र. यात एकच तारा मानतात. पाश्चात्त्य पद्धतीतील लायरा (सांरगी) तारका-पुंजामधील व्हीगा म्हणजे आल्फा लायरी हा सर्वांत तेजस्वी तारा (विषुवांश १८ ता. ३६ मि., क्रांती ३८४५’ आणि प्रत ०.१४, ®ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति प्रत). सर्व आकाशात तेजस्वीपणात हा चौथ्या क्रमांकाचा तारा आहे. हा तारा क्रांतिवृत्तापासून बराच दूर असल्यामुळे हे नक्षत्र सत्ताविसात घातले नसावे. लायरा या पुंजात अकरा तारे मानतात. मैत्रेयी संहिता  (२.१३.२०), तौत्तिरीय ब्राह्मण  (१.५.१), अथर्व संहिता  (१९.७) यांत अभिजित नक्षत्राचा उल्लेख आहे. पणतैत्तिरीय संहिता व काठक संहिता यांत त्याचा उल्लेख नाही. वृद्धगार्ग्य संहिताखंड खाद्यक, लल्लाचारत्‍नकोश, श्रीपतीची रत्‍नमालाशाकल्पब्रह्मसिद्धांत वगैरे ग्रंथांत अभिजित नक्षत्राचे तीन तारे मानले आहेत. लायरा-पुंजात  टॉलेमी १०, ट्यूको ब्राए ११ तर हेव्हेलियस १७ तारे मानीत असत.

अभिजित ताऱ्याचा तेजस्वीपणा सूर्याच्या ५० ते १०० पट व व्यास सु. २.५ पट आहे. तो सूर्यापासून सु. २६ प्रकाशवर्षे [®प्रकाशवर्ष]दूर आहे. त्याचे पृष्ठतापमान ११,२०० के. [®केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम]असावे. त्याच्या वर्णपटात हायड्रोजन-रेषा प्रामुख्याने आढळतात. वर्णाने अभिजित तारा श्वेतनील आहे. पंचांगात अभिजित या नक्षत्राला वेगळे स्थान नसले तरी उत्तराषाढाचा अंतिम चरण व श्रवणाचा प्रारंभीचा १/१५ भाग मिळून हे नक्षत्र तयार होते. या नक्षत्रातून जाण्यास सूर्याला फक्त चार दिवस लागतात. हे गमन हल्ली जानेवारी २० ते २४ या सुमारास होते. पंचांगात ‘अभिजिदर्कप्रवृत्ती’ व ‘अभिजिदर्कनिवृत्ती’ असे याचे उल्लेख असतात. याला ‘क्षिप्र नक्षत्र’ असेही म्हणतात (क्षिप्र=लवकर). चंद्र या नक्षत्रात असल्याचा पंचांगात उल्लेख नसतो. 

आकाशात हा तारा ओळखण्याची खूण म्हणजे श्रवण नक्षत्राच्या तीन ताऱ्यांची रेषा उत्तरेकडे वाढविली म्हणजे जो अत्यंत ठळक तारा लागतो तो अभिजीत होय. ऑगस्ट महिन्याच्या मध्यास हा तारा रात्री सु. नऊ वाजता याम्योत्तर वृत्त ओलांडतो. हे तारकायुग्म असून त्याचा सोबती फार बारीक व दहाव्या प्रतीचा तारा आहे. पृथ्वीच्या अक्षाच्या परांचन गतीमुळे [àअक्षांदोलन]आणखी १३,९६० वर्षांनी अभिजित हा तारा ध्रुवतारा होईल.

लायरामधील बीटा व आर या रूपविकारी (भासमान प्रत स्थिर नसलेल्या) तारका आहेत. याच समूहातील बीटा आणि गॅमा यांच्यामध्ये एम ५७ ही सुप्रसिद्ध कंकणाकृती अभ्रिका आहे.

फडके, ना. ह.