मॅस्केलिन, नेव्हिल : (६ ऑक्टोबर १७३२–९ फेब्रुवारी १८११). ब्रिटिश ज्योतिर्विद. सागरातील स्थानाचे रेखांश काढण्याची पद्धती शोधून व पहिले नॉटिकल अल्मॅनॅक (नाविक पंचांग) प्रसिद्ध करून त्यांनी मार्गनिर्देशनाच्या (नौकानयनाच्या) क्षेत्रात मोलाचे कार्य केले.
त्यांचा जन्म लंडनला आणि शिक्षण वेस्टमिन्स्टर स्कूल व ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज) येथे झाले. १७५४ मध्ये ते सातवे रँग्लर झाले व १७५५ मध्ये दीक्षा मिळाल्यावर ते धर्मोपदेशकाचे (रेक्टरचे) साहाय्यक झाले. १७७५–८२ या काळात ते धर्मोपदेशकही होते. मात्र २५ जुलै १७४८ च्या ग्रहणामुळे त्यांना ज्योतिषशास्त्रात रस निर्माण झाला. ते जेम्स ब्रॅड्ली यांना प्रणमनासंबंधीची (एका माध्यामातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाच्या दिशेत होणाऱ्या बंदलीसंबधीची) कोष्टके तयार करण्यास मदत करीत. ब्रॅड्ली यांच्याच शिफारशीमुळे १७६१ सालच्या शुक्राच्या अधिक्रमणाचे [मोठ्या खस्थ पदार्थाच्या (येथे सूर्याच्या) बिंबावरून त्यापेक्षा लहान स्वस्थ पदार्थाचे (येथे शुक्राचे) बिंब सरकत जाण्याच्या घटनेचे ⟶ अधिक्रमण] वेध घेण्यासाठी रॉयल सोसायटीने त्यांना सेंट हेलीना बेटावर पाठविले.सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर काढण्यासाठी या वेधांचा वापर करण्यासाठी कल्पना होती परंतु ढगाळ आकाशामुळे वेध घेता आले नाही. मात्र या जलप्रवासात त्यांनी चंद्राच्या वेधावरून जहाजाच्या स्थानाचे रेखांश काढण्याची पद्धत शोधून काढली. ती ब्रिटिश मरिनर्स गाइडमध्ये प्रसिद्धीही झाली (१७६३) व सर्रास वापरात आली. १७६५–१८१० या काळात ते राजज्योतिषी होते. १७६६ मध्ये त्यांनी पहिले नॉटिकल अल्मॅनॅक प्रसिद्ध केले व मृत्यूपावेतो या प्रकाशनाची व्यवस्था त्यांनी पाहिली. पृथ्वीचे विशिष्ट गुरुत्व काढण्याचा प्रयत्न त्यांनी १७७४ मध्ये केला. त्याकरिता पर्वताच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओळंब्याच्या दिशेत पडणारा फरक त्यांनी ताऱ्यांच्या वेधांवरून काढला आणि त्याच्या आधारे पृथ्वीचे वि. गु. ४·५५९–४·८६७ दरम्यान असल्याचे शोधून काढले (हल्ली पृथ्वीचे वि. गु. ५·५१७ मानतात). याशिवाय त्यांनी व्याधाचा पराशय [निरीक्षकाचे स्थान बदलल्याने त्याच्यापासून भिन्न अंतरावर असलेल्या दोन वस्तूंमध्ये एकमेकींच्या सापेक्ष होणारे भासमान स्थानांतर⟶ पराशय] काढण्याचा प्रयत्न केला. तसेच एकदशांश सेकंदापर्यंतचे अचूक कालमापन त्यांनीच प्रथम केले आणि सेंट हेलीना व बार्बेडोस येथील भरती-ओहोटीचा अभ्यास केला. १७५८ मध्ये ट्रिनिटी कॉलेजचे व १७५९ साली रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली होती. मॅस्केलिन हे ग्रिनिच येथे मृत्यू पावले.
नेने, य. रा.