कार्तिक : हिंदूंच्या कालगणनेप्रमाणे आठवा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्राजवळ असतो, म्हणून त्याला कार्तिक हे नाव दिले आहे. यालाच बाहुल, ऊर्ज व कार्तिकिक हीही नावे आहेत. या महिन्यात सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो. बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा), यमद्वितीया (भाऊबीज), पांडवपंचमी, गोपाष्टमी, कृष्मांड नवमी, प्रबोधिनी एकादशी, व्दादशी (तुलसीविवाह), वैकुंठ चतुर्दशी व त्रिपुरी पौर्णिमा हे सर्व या महिन्याच्या शुद्ध पक्षातील धार्मिक महत्त्वाचे दिवस असतात. तीर्थ व यज्ञ यांच्यापेक्षा कार्तिकाचे पावित्र्य अधिक असते, असे स्कंदपुराणात सांगितले आहे. पौर्णिमान्त कार्तिकात कार्तिकस्नान, दीपदान इ. कृत्येही करतात. चातुर्मासाची समाप्ती याच महिन्यात होते.

ठाकूर अ.ना.