यिव्हटशेंको, यिव्हगेन्यी अल्यिकसांद्रव्ह्यिच : (१८ जुलै १९३३– ). रशियन कवी. सायबीरियातील झिमा येथे एका कृषक कुटुंबात जन्मला. त्याचे आईवडील भूगर्भशास्त्रज्ञ होते. यिव्हटशेंको लहान असतानाच त्याच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर यिव्हटशेंको मॉस्कोत आपली आई व बहीण ह्यांच्यासह राहू लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याला मॉस्कोहून झिमा येथे जावे लागले. १९४४ मध्ये तो मॉस्कोला परतला. तेथे एका खोट्या आरोपावरून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आल्यावर तो कझाकस्तानात आपल्या वडिलांकडे आला व त्यांच्या भूगर्भशास्त्रीय संशोधनात त्यांना मदत करू लागला. तरुण वयात यिव्हटशेंको क्रीडापटू होता.

त्याची पहिली कविता १९४९ मध्ये एका सोव्हिएट क्रीडाविषयक मासिकात प्रसिद्ध झाली. ‘द प्रॉस्पेक्टर्स ऑफ द फ्यूचर’ (१९५२, इं. शी.) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह. ‘थर्ड स्नो’ (१९५५, इं. शी.), ‘द हायवे ऑफ एंथूझिऍस्ट्स’ (१९५६, इं. शी.), ‘बो अँड लायर’ (१९५९, इं. शी.) हे त्याचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह. ‘झिमा जंक्शन’ (१९५६, इं. शी.) ही त्याची आत्मचरित्रात्मक दीर्घ कविता झिमा येथील त्याच्या अनुभवांवर लिहिलेली आहे. ही कविता वादग्रस्त ठरली तिने अनेक प्रश्न उभे केले तथापि रशियन बुद्धिवंतांपैकी बहुतेकांनी तिचे स्वागत केले. १९६० पर्यंत नामवंत कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली होती. त्यानंतर त्याने अमेरिका, इंग्लंड, क्यूबा ह्या देशांना तसेच आफ्रिका खंडालाही भेट दिली तेथे आपल्या कवितांचे वाचन केले व आंतरराष्ट्रीय कीर्तीही प्राप्त केली. १९६० पासूनच्या त्याच्या काव्यसंग्रहांत (सर्व इं. शी.) ‘ॲपल’ (१९६०), ‘वेव्हिंग द हँड’ आणि ‘टेंडरनेस’ (१९६२) अंतर्भूत आहेत. त्याची ‘बाबी यार’ (१९६१) ही कविता म्हणजे नाझी जर्मनांनी सु. ३४,००० युक्रेनियन ज्यूंच्या केलेल्या कत्तलीवर लिहिलेले उत्कट शोकगीत आहे त्याचबरोबर रशियामध्ये त्या वेळीही रेंगाळत राहिलेल्या ज्यू−विरोधी भावनेवरही तो हल्ला आहे. ‘प्रिकॉशस ऑटोबायॉग्रफी’ (१९६३, इं. शी.) हे त्याचे आत्मचरित्र फ्रान्समध्ये प्रसिद्ध झाले आणि ‘द डेड हँड ऑफ द पास्ट’ ही त्याची कविता ह्या सालीच प्रकाशित झाली. ह्या दोन्ही साहित्यकृती सोव्हिएट रशियात आक्षेपार्ह ठरल्यामुळे त्याला त्याच्या परदेश दौऱ्यावरून रशियात बोलावून घेण्यात आले. ‘ब्राट्स्क स्टेशन’ (१९६५, इं. शी.) या त्याच्या महत्त्वाकांक्षी कवितासंग्रहात त्याने आपल्या वीज-केंद्राने सर्व रशियाला प्रकाश देणारा सायबीरिया आणि इतिहासकाळापासून रशियन तुरुंग म्हणून ओळखला जाणारा सायबीरिया या दोन प्रतीकांमधील विरोध दाखविला आहे. ह्यानंतर त्याला सोव्हिएट रशियात पुन्हा मान्यता मिळाली. १९७२ मध्ये त्याने लिहिलेले नाटक ‘अंडर द स्किन ऑफ द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ (इं. शी.) मॉस्कोत रंगमंचावर आले. वाइल्ड बेरीज (१९८२, इं. भा. १९८४) ही एक कादंबरीही त्याने लिहिली आहे.

यिव्हटशेंकोचे बहुतेक साहित्य आत्मचरित्रात्मक आहे. देशभक्ती आणि साम्यवादावरील निष्ठा त्याच्या साहित्यातून प्रत्ययास येते तथापि आवश्यक तेथे सोव्हिएट जीवनशैलीचा तो टीकाकारही झालेला आहे.

पांडे, म. प. (इं.) कळमकर, यं. शं. (म.)