हॅमिल्टन – १ : कॅनडातील आँटॅरिओ प्रांतातील शहर. तेआँटॅरिओ सरोवरच्या पश्चिम काठावर वसलेले असून टोराँटो शहराच्या नैर्ऋत्येस सु. ५६ किमी.वर आहे. कॅनडातील प्रधान औद्योगिक केंद्र व सरोवर बंदर म्हणून या शहरास महत्त्व आहे. लोकसंख्या ५,१९,९४९ (२०११). फ्रेंच समन्वेषक रेने-रॉबेर फाव्हल्ये याने या ठिकाणाचाप्रथमतः १६६९ मध्ये शोध लावला. १८१५ मध्ये जॉर्ज हॅमिल्टन याने सध्याच्या शहराची स्थापना केली. त्यावरूनच या शहरास हॅमिल्टन हेनाव दिले गेले. हॅमिल्टन हार्बर (बर्लिंग्टन उपसागर) आँटॅरिओसरोवरास कालव्याद्वारे जोडला गेल्याने (१८३०) या शहराचा बंदर व लोहमार्ग केंद्र म्हणून झपाट्याने विकास झाला. शहरात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात येथे लोह आणि पोलाद उद्योगाची सुरुवात झाली, त्यामुळे हे शहर पोलाद निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र बनले. लोहमार्ग साहित्य, कापड, जनित्रे, मोटारगाड्यांचे सुटे भाग इत्यादीचे निर्मितिउद्योग येथे भरभराटीस आले आहेत. हॅमिल्टन आणि शहराभोवतीचा परिसर फळ-बागांसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर रेल्वे आणि रस्तेमार्गांनी टोराँटो, बफालो, न्यूयॉर्क या शहरांशी जोडलेले आहे.

 

शहरात अणुसंशोधनासाठी प्रसिद्ध असलेले मॅकमास्टर विद्यापीठअसून त्याद्वारे प्रामुख्याने अणुविज्ञानाचे शिक्षण दिले जाते. शहरात अनेक पर्यटन स्थळे आणि पुरातन वास्तू असून त्यांपैकी हॅमिल्टन राजवाडा, द कॅनडियन फुटबॉल हॉल ऑफ फेम म्यूझीयम, डन्डर्न किल्ला, रॉयल बोटॅनिकल गार्डन, स्टोनी क्रिक बॅटलफिल्ड स्मारक, हॅमिल्टनकलावीथी आणि कॅनडियन वॉरप्लेन हेरिटेज म्यूझीयम इ. स्थळे पर्यटकांची आकर्षणे आहेत.

बिराजदार, गोविंद