हस्त : (ध्वांक्ष कोर्व्हस). भारतीय नक्षत्रमालिकेतील हे तेरावे नक्षत्र असून ते कन्या राशीतील सव्वादोन नक्षत्रांपैकी एक आहे. याची देवता सविता आणि आकृती (प्रजापतीचा) हाताचा पंजा सांगितला आहे. यात बीटा (आंगठा), डेल्टा म्हणजे अल्गोरब (तर्जनी), गॅमा म्हणजे जीना (मध्यमा), एप्सायलॉन (अनामिका) आणि आल्फा म्हणजे अल्किला (करंगळी) हे पाच तारे पाच ठिकाणी आहेत. याचे कोर्व्हस (कावळा) हे इंग्रजी नाव एका पाश्चात्त्य कथेवरून पडले आहे. हस्त नक्षत्र दक्षिण खगोलार्धात क्रांतिवृत्तालगत [विषुवांश १२ तास, क्रांती २०° दक्षिण → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] असते. मे महिन्याच्या सुरुवातीला रात्री सु. ९ वाजता ते मध्य मंडलावर दिसते. या नक्षत्रालाशुभ मानले आहे. सामान्यपणे सूर्य हस्त नक्षत्रात २६ सप्टेंबर ते९ ऑक्टोबर या काळात असतो. जोरदार पावसाचे नक्षत्र अशी हस्त (हत्ती) नक्षत्राची ओळख आहे. सूर्याच्या हस्त नक्षत्र प्रवेशाच्यादुसऱ्या दिवसापासून मुलींचा हदगा (भोंडला) हा खेळाचा सणसुरू होतो.

 

पहा : नक्षत्र.

ठाकूर, अ. ना.