बेली, फ्रान्सिस : (२८ एप्रिल १७७४ – ३० ऑगस्ट १८४४). इंग्लिश ज्योतिषशास्त्रज्ञ. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या आद्य संस्थापकांपैकी एक ‘वेली मणी’ या आविष्काराचे त्यांनीच प्रथमच तपशीलवार वर्णन केले. त्यांचा जन्म न्यूबरी (इंग्लड) येथे झाला. त्यांचे शिक्षण थोडेच झाले होते. त्यांनी अमेरिकेचा धाडसी प्रवास केला होता व त्यांनी साहसी मोहिमांत भाग घेण्याची इच्छा होती. परंतु ते न जमल्याने त्यांनी शेअर खरेदी-विक्रीचा व दलालीचा व्यवसाय करून चांगली कमाई केली. १८२५ साली सर्व व्यवसायांतून निवृत्त होऊन त्यांनी ज्योतिषशास्त्राला वाहून घेतले व त्याकरिता लंडनमधील आपल्या घरी वेधशाळा उभारली.

रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला व तिचे (स्थापना १८२०) ते पहिले सचिव होते. त्यांनी ‘नॉटिकल अल्मॅनॅक’मध्ये सुधारणा घडवून आणल्या. या संस्थेतर्फे पुढाकार घेऊन टॉलेमी, झोझेक लालांद, विल्यम लासेल वगैरेंनी बनविलेल्या ५७,००० ताऱ्यांची माहिती देणाऱ्या नाकाशांचे त्यांनी संपादन केले, सूची बनविली व पुनर्मुद्रणही करून घेतले. तसेच या संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताऱ्यांच्या वाद्यांचे एकत्रीकरण करण्याचे कामही त्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली करवून घेतले. शिवाय त्यांनी ताऱ्यांच्या कित्येक याद्यांमध्ये दुरुस्त्या केल्या.

खग्रास अगर कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी ग्रहण पूर्ण होण्याच्या अथवा पूर्ण ग्रहण संपण्याच्या क्षणाच्या किंचित आधी अथवा नंतर सूर्याच्या कडेशी तेजस्वी मण्यांच्या माळेप्रमाणे दृश्य दिसते. चंद्रावरील डोंगर-दऱ्यांमुळे चंद्रबिंबाच्या कडा दंतुर झालेल्या असतात. अशा कडेवरील उंच डोंगरांमधील मोकळ्या भागांतून येणाऱ्या प्रकाश झोतांमुळे असे प्रकाशाचे मणी दिसल्यासारखे वाटते. हे दृश्य २-३ सेकंदच दिसते. हे दृश्य पूर्वीही पाहण्यात आले होते. मात्र १८३६ व १८४२ सालच्या सूर्यग्रहणांच्या वेळी वेली यांनी हे दृश्य पाहून त्याचे प्रथमच तपशीलवार वर्णन केल्याने त्याला ‘वेली मणी’ हे नाव पडले.

लंबकाच्या साहाय्याने प्रयोग करून त्यांनी पृथ्वीचा चापटपणा (पृथ्वीच्या विषुववृत्तीय व ध्रुवीय त्रिज्यांतील फरक भागिले विषुववृत्तीय त्रिज्या हे गुणोत्तर) १/२८९ एवढा असल्याचे दाखविले होते (प्रत्यक्षात हा चापटपणा १/२९७ एवढा आलेला आहे). १८४३ साली लांबीचे प्रमाणभूत मापक पुन्हा निश्चित करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. गुरुत्वाकर्षण स्थिरांक मोजण्याचा हेन्री कॅव्हेंडिश यांचा प्रयोग पुनश्च करून त्यांनी पृथ्वीची सरासरी घनता ५.६७ (हल्लीची ५.५१७) ग्रॅ./घ. सेंमी. एवढी अचूक काढली होती. या कार्याबद्दल १८४२ साली व ताऱ्यांच्या यादीच्या कार्याबद्दल १८२७ साली रॉयल ॲस्ट्रॉनॉमिक सोसायटीने वेली यांना सुवर्णपदक दिले होते. ते या संस्थेचे चार वेळा अध्यक्ष होते. तसेच ते १८२१ साली रॉयल सोसायटीचे फेलो होते. ते लंडन येथे मृत्यु पावले.      

       मोडक, वि.वि.