चित्रफलक : (शिलींध्र, पिक्टर). पारावत (कोलंबा) या तारकासमूहाच्या अगस्त्य तारा व ⇨असिदंष्ट्र तारकासमूह यांच्या दरम्यान खगोलीय विषुववृत्ताच्या बराच दक्षिणेस ५०°च्या आसपास व होरा [→ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] ५ ता. च्या आसपास असणारा हा छोटासा तारकासमूह. यांतील सर्वांत तेजस्वी तारा तिसऱ्या प्रतीचा [→ प्रत] आहे. याच्या दक्षिणकडेशी १९२५ साली एक नवतारा (नोव्हा पिक्टॉरिस, कमाल प्रत १·१) म्हणजे अकस्मात दृष्टोत्पत्तीस येणारा अतिशय दीप्तिमान व सामान्यतः जलद गतीने दीप्ती कमी होणारा तारा दिसला होता, तो दिसेनासा झाल्यावर छायाचित्रीय निरीक्षणांवरून त्या जागेपासून अगदी जवळ दोन अभ्रिकातंतू असल्याचे आढळते. याच क्षेत्रात प्रतिवर्षी ८”·७५ इतकी मोठी निजगती (दृष्टीपथरेषेला काटकोनात असणारा ताऱ्याच्या गतीचा घटक) असणारा १२ प्रकाशवर्षे दूर अंतरावरचा कापटाइन तारा आहे.

ठाकूर, अ. ना.