झांसेन, प्येअर झ्यूल सेझार : (२२ फेब्रुवारी १८२४–२३ डिसेंबर १९०७). फ्रेंच ज्योतिर्विद. वर्णपटविज्ञान व छायाचित्रण यांचा उपयोग करून सूर्यासंबंधी केलेल्या अभ्यासाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. तेथील विद्यापीठात रसायनशास्र, गणित आणि भौतिकी या विषयांचा अभ्यास केल्यानंतर १८६५ मध्ये वास्तुशिल्प विद्यालयात सामान्य विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८५७ साली चुंबकीय विषुववृत्ताच्या स्थानासंबंधी अभ्यास करण्यासाठी द. अमेरिकेतील पेरू देशात त्यांना पाठविण्यात आले. तेथून परतल्यावर १८६४ मध्ये फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसतर्फे त्यांना इटली व स्वित्झर्लंड येथे सूर्याच्या वर्णपटाचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात आले. तेथे त्यांनी पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्याच्या वर्णपटातील शोषल्या जाणाऱ्या रेषांचा विशेष अभ्यास केला. १८७४ व १८८२ या वर्षी झालेल्या शुक्राच्या ⇨अधिक्रमणांचे (सूर्यबिंबावरून सरकण्याचे) त्यांनी वेध घेतले. त्याचप्रमाणे अनेक सूर्यग्रहणांच्या वेळी नियुक्त झालेल्या संशोधकांच्या पथकांत त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला. १८६८ च्या सूर्यग्रहणाच्या वेळी ‘सूर्याची  तेजःशृंगे (तेजस्वी ज्वालांसारखे भाग) वायुरूप असतात’ असे त्यांनी दाखवून दिले. सूर्याचे हे आविष्कार फक्त ग्रहणाच्या वेळी काही मिनिटेच दिसू शकत. कोणत्याही दिवशी या आविष्कारांचे वेध घेता येतील असा सौरवर्णपटदर्शक (स्पेक्ट्रोहीलिओस्कोप) त्यांनी भारतातील सिमला येथे १८६९ मध्ये काही काळ सूर्याच्या दीप्तिगोलाचा अभ्यास करीत असताना तयार केला. अशाच उपयोगाचे उपकरण नॉर्मन लॉक्यर यांनीही तयार केले होते. झांसेन यांचे उपकरण सूर्याचे वर्णपटीय वेध घेण्यास अतिशय उपयुक्त ठरले आहे. आकाशस्थ ज्योतींच्या वर्णपटांचे निरीक्षण करण्यातील वातावरणाचा होणारा अडथळा कमीत कमी व्हावा यादृष्टीने आल्प्स पर्वतातील माँ ब्लाँ येथे एक वेधशाळा बांधली. या वेधशाळेत काम करीत असताना १८९३ साली त्यांनी सूर्याच्या वर्णपटातील ऑक्सिजनच्या तीव्र रेषा वातावरणीय ऑक्सिजनामुळेच निर्माण होतात, असे सिद्ध केले. त्यांनी सूर्याच्या अभ्यासाकरिता छायाचित्रणाचा सर्रास वापर सर्वप्रथम केला. १८७६ साली पॅरिस येथील मदाँ वेधशाळेचे पहिले संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली व मृत्यूपावेतो त्यांनी तेथेच कार्य केले. त्यांनी १९०४ साली Atlas des Photographies Solaries  हा सूर्यबिंबाची ६,००० छायाचित्रे असलेला संग्रह प्रसिद्ध केला. सूर्यासंबंधीच्या अभ्यासात हा संग्रह अतिशय महत्त्वपूर्ण म्हणून गणला जातो.

ते फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे (१८७३) त्याचप्रमाणे रोम, ब्रुसेल्स, सेंट पीटर्झबर्ग, एडिंबरो इ. ॲकॅडेमींचे सदस्य होते. ते मदाँ येथे मृत्यू पावले.

काजरेकर, स. ग.