सीलस्टॅट : घड्याळासारख्या यंत्रणेने फिरविले जाणारे व आरसा असलेले हे एक साधन असून यामुळे स्थिर दूरदर्शकाच्या दृष्टिक्षेत्रात आकाशाचा एकच प्रदेश अखंडपणे ठेवता येतो. आकाशातून गमन करीत असलेल्या खस्थ पदार्थाच्या भासमान गतीला अनुसरुन ही यंत्रणा कार्यरत राहते आणि तिच्याद्वारे खस्थ पदार्थाची प्रतिमा स्थिर दूरदर्शकात परावर्तित होते. ही प्रतिमा फिरत नाही, हा सीलस्टॅट या साधनाचा फायदा आहे. यामुळे हे उपकरण पुष्कळदा सूर्याच्या व इतर ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी वापरतात. ग्रहणांच्या निरीक्षण मोहिमांत हे उपकरण खास उपयुक्त आहे.

पृथ्वीच्या पश्चिम-पूर्व गतीमुळे खगोल व त्यातील ताऱ्यासारखे खस्थ पदार्थ सतत पूर्व-पश्चिम दिशेत मंदपणे सरकत असतात. यामुळे दूरदर्शकातून निरीक्षण करताना खस्थ पदार्थाचे प्रतिबिंब दीर्घकाळ कायम नजरेसमोर राहत नाही व त्यासाठी दूरदर्शकाची स्थिती सारखी बदलावी लागते. तसेच दूरदर्शकातून दिसणाऱ्या दृश्याची छायाचित्रे घेता येत नाहीत. ग्रहणे, युत्या, पिधाने इ. दीर्घकाळ म्हणजे तो आविष्कार संपेपर्यंत पाहता येत नाहीत. अशा वेळी खस्थ पदार्थाकडून येणारे किरण परावर्तनाने उभ्या वा आडव्या स्थितीतील स्थिर दूरदर्शकातून नेहमी जावेत, यासाठी दूरदर्शकाबरोबर सीलस्टॅट हे उपकरण वापरतात.

सीलस्टॅट मोठमोठ्या वेधशाळांमधील दूरदर्शकांबरोबर वापरतात. यामध्ये पृथ्वीच्या वलनाक्षाला समांतर असलेल्या आसावर फिरु शकणारा एक सपाट आरसा असतो. या आरशाला पृथ्वीच्या दैनंदिन गतीच्या उलट म्हणजे पूर्व-पश्चिम अशी निम्मी गती दिलेली असते. याची एक फेरी सु. ४८ तासांत पूर्ण होते. यामुळे खगोल फिरल्यासारखा वाटतो. या आरशाच्या वर दक्षिणेस दुसरा एक सपाट आरसा ठेवलेला असतो. तो हव्या त्या स्थितीत ठेवता येतो. खस्थ पदार्थाकडून येणारे प्रकाशकिरण पहिल्या फिरत्या आरशावर घेण्यात येतात. हे किरण परावर्तित होऊन दुसऱ्या स्थिर आरशावर पडतात. खस्थ पदार्थाचे आकाशातील स्थान बदलले, तरी हे परावर्तित किरण एका ठराविक दिशेनेच येतात. दुसऱ्या आरशाची उंची व कल असा ठेवतात की, यातून परावर्तित झालेले किरण आडव्या किंवा उभ्या स्थिर दूरदर्शकाच्या वस्तुभिंगावर पडतात. त्यामुळे दूरदर्शकातील आकाशाचे दृश्य दीर्घकाळ स्थिर राहते. खस्थ पदार्थाची क्रांती [⟶ क्रांति –१] वेगवेगळी असली, तरीही त्यासाठी सोय केलेली असते. सूर्यबिंबस्थापक (हीलिओस्टॅट) व नक्षत्रस्थापक ही उपकरणेही याच तत्त्वावर कार्य करतात.

ठाकूर, अ. ना.