रोहण : एखादा खस्थ पदार्थ मध्यमंडलावर येण्याच्या क्रियेला रोहण असे म्हणतात. खस्थ पदार्थ पूर्वेकडे उगवतात व क्षितिजापासून आकाशात वर वर जाताना मध्यमंडलावर येतात, याला खस्थ पदार्थांचे रोहण झाले असे म्हणतात. रोहणाच्या वेळी खस्थ पदार्थाचे उन्नतांश जास्तीत जास्त असतात. नंतर खस्थ पदार्थ पश्चिमेकडे कलून त्याचे उन्नतांश कमी कमी होतात व तो पश्चिम क्षितिजावर मावळतो. परिध्रुवीय तारे म्हणजे ध्रुवताऱ्याशेजारचे काही तारे उत्तर गोलार्धावरून पाहताना नेहमीच क्षितिजाच्या वर असतात. त्यामुळे ते तारे दोन वेळा मध्यमंडलाला स्पर्श करतात म्हणजे दोन वेळा त्यांचे रोहण होते. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना असा तारा ध्रुव व खस्वस्तिक बिंदूमध्ये मध्यमंडलावर परमोच्च स्थितीत येतो तेव्हा त्याचे उन्नतांश जास्तीत जास्त असतात. अशा रोहणास अधिरोहण म्हणतात. उलट तो तारा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना ध्रुव व क्षितिज यांमधून परम-नीच स्थितीत मध्यमंडलावर येतो, तेव्हा त्यांचे उन्नतांश कमीत कमी असतात, अशा रोहणाला अवरोहण असे म्हणतात.

मराठे, स. चिं.