क्षयमास : चांद्र व सौर कालगणना यांत मेळ घालण्यासाठी ⇨ अधिकमास व क्षयमास यांची योजना केलेली असते. चैत्रादि चांद्र महिन्यांची नावे सूर्यसंक्रांतींशी निगडित असतात. मेष संक्रांत ज्या चांद्र महिन्यात येईल तो चैत्र, वृषभ संक्रांत असेल तो वैशाख, कुंभ संक्रांत असेल तो माघ आणि मीन संक्रांत असेल तो फाल्गुन महिना होय.परंतु पृथ्वीची म्हणजे सापेक्षतः सूर्याची गती कार्तिक, मार्गशीर्ष व पौषया महिन्यांत जलद असते. म्हणजे वृश्‍चिक, धनू व मकर या राशी आक्रमण्यास सूर्याला २९१/२ दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. अशा वेळी एकाच चांद्रमासात दोन संक्रांती येण्याची शक्यता असते. ज्याचांद्रमासात दोन संक्रांती येतात, त्याला क्षयमास म्हणतात. उदा., कार्तिक या चांद्र महिन्यात वृश्‍चिक संक्रांत होऊन जाते आणि पुढच्या चांद्र महिन्यात धनू व मकर अशा दोन्ही संक्रांती आल्या तर धनू संक्रांतीचा मार्गशीर्ष या महिन्याचा क्षय समजतात.

कार्तिक, मार्गशीर्ष व पौष हेच महिने क्षयमास म्हणून येण्याची शक्यता असते. ज्या वर्षी क्षयमास येतो त्याच्या आधी व नंतर ३-४ महिन्यांच्या अवधीत अधिक मास असतोच. त्यांपैकी अगोदर येणाऱ्या अधिक महिन्याला संसर्प व पुढे येणाऱ्या अधिक महिन्याला अंहस्पती अधिकमास म्हणतात. शके १६०१– शके २०७३ या काळातील क्षयमास पुढीलप्रमाणे : शके १६०३ मार्गशीर्ष, शके १७४४ मार्गशीर्ष, शके १८८५ मार्गशीर्ष, शके १९०३ पौष, शके १९५० मार्गशीर्ष, शके १९६९ मार्गशीर्ष, शके २००७ कार्तिक, शके २०२६ मार्गशीर्ष, शके २०४५ पौष.

यांवरून क्षय महिना १९ किंवा १४१ वर्षांनी येतो असे दिसते.शके १८८५ मध्ये मार्गशीर्ष क्षयमास आलेला होता त्या वेळी आश्विन १८८५ हा संसर्प आणि पुढचा चैत्र १८८६ हा अंहस्पती हे अधिक-मास आले होते.

पहा : अधिकमास पंचांग.

गोखले, मो. ना.